आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैतिकता हाच अमेरिकेचा पाया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील सुबत्ता, ग्राहकवाद आणि त्यामुळे जाणवणारा चंगळवाद या पृष्ठभागाखाली अमेरिकन संस्कृती लपली आहे.  ही संस्कृती भारतात फारशी माहितीची नाही. जे काही ठाऊक आहे, ते सगळे अतिरंजित, अवास्तव स्वरूपाचे आहे. प्रत्यक्षात अमेरिकी संस्कृतीचे सौंदर्य सामाजिक नैतिकतेमध्ये दडलेले आहे. अमेरिका समजून घेण्याच्या दृष्टीने हे अंग फार महत्त्वाचे आहे. त्यावरील हा लेख...

अमेरिकाच काय, कुठल्याच समाजाबद्दल सरसकट विधाने करता येत नाहीत. त्यासाठी समाजात गट पडावे लागतात. अमेरिकेचे साधारणपणे तीन आर्थिक वर्ग आहेत. गरीब, मध्यम वर्ग आणि वरिष्ठ. ‘ऑक्युपाय वॉल स्ट्रीट’ नावाची चळवळ झाली, त्यात अार्थिक तफावत दाखवण्यासाठी १% विरुद्ध ९९% अशी मांडणी झाली. उच्च वर्ग म्हणजे हे  १% लोक.  उरलेल्या ९९% मध्ये मध्यम वर्ग बहुसंख्य आहे. गरीब वर्गात तीन उपवर्ग आहेत. एक - तरुण, विद्यार्थी, दोन - म्हातारे, आणि तीन - कृष्णवर्णीय, निमगोरे, बेकायदेशीर स्थलांतरित. समाजाचे असे आर्थिक वर्ग विचारात घेण्याचे कारण म्हणजे प्रत्येक वर्गाची  नैतिकता, त्यांची जीवनशैली यात पराकोटीचा फरक आहे. नैतिकतेच्या अभ्यासाच्या दृष्टीने बहुसंख्य असलेला मध्यम वर्ग, गरीब वर्गातले पहिले दोन उपवर्ग यांचा मिळून एक बहुल गट करता येईल. अमेरिकन टिपिकल संस्कृती ही या बहुल गटाची संस्कृती आहे.

अमेरिकन संस्कृतीतील पहिली गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे सचोटी. मी जसा आहे त्याचा अभिमान आहे, मी खोटे बोलणार नाही. तसेच जे दुसऱ्याचे आहे ते माझे नाही. मी चोरी करणार नाही. स्वकष्टातून कमावलेल्या संपत्तीचा आनंद आणि अभिमान मोठा असतो. त्यामुळे सर्वसाधारणपणे तुमच्यावर विश्वास ठेवलेला असतो. या ऑनर सिस्टिम वर समाज चालतो. काही उदाहरणे खाली दिली आहेत.

येथे कुणी लाच मागत नाही. वाचनालयात डिपॉझिट नसते. तरीसुद्धा माणसे पुस्तकं परत करतात. परीक्षेत विद्यार्थी कॉपी करत नाहीत. कित्येकदा प्रोफेसर वर्गात नसतो. हायस्कूल पास होण्यासाठी काही तास सोशल वर्क करणे अनिवार्य आहे. सगळे विद्यार्थी खरोखर तेवढे काम करून फॉर्म भरतात.  मला आणि मुलीला जॉब लागला तेव्हा एम्प्लॉयरला आम्ही आमचे कुठलेच  शैक्षणिक सर्टिफिकेट दिलेले नव्हते. बऱ्याच दुकानात स्वतःची बॅग, पर्स नेता येते. मॉलमधील बऱ्याच दुकानात विकत घेतलेल्या मालाचे पैसे दुकानाच्या आत भरता येते आणि तो घेऊन माल बाहेर घेऊन जाता येतो. तसेच काही दुकानात सेल्फ चेक आऊट असतो. तुम्ही विकत घेतलेल्या गोष्टी स्कॅन करून कॅश किंवा क्रेडिट कार्ड वापरून बिल देतात. तुम्ही खरोखर पैसे दिलेत का, हे बघायला कुणी येत नाही. विकत घेतलेली गोष्ट काही मर्यादित काळात परत करता येते. खराब असल्याने, केवळ आवडली नाही, अशा कुठल्याही कारणांनी परत करता येते. ती  अगदी वापरलेली असली तरी चालते. म्हणून कुणी केवळ काही काळ वापरून परत करायच्या दृष्टीने गोष्ट विकत घेत नाहीत.

काय कारण असावे या नैतिकतेमागे? एकच कारण असू शकत नाही. अमेरिकन इतिहासात स्थलांतर केलेल्यांनी  स्वतःच्या बळावर जीवन घडवले. याचा त्यांना अभिमान होता. हा कुटुंबातील संस्काराचा भाग असावा. पण एवढे मात्र खरे की मिळकत चांगली असेल तर खोटे बोलण्याची, चोरी करायची गरज  भासत नाही. अर्थात प्रत्येक गोष्टींना तुरळक अपवाद असतात. वर उल्लेखलेल्या गरीब वर्गातील तिसरा उपवर्ग हा दारिद्र्य रेषेच्या खालचा आहे. भारतातील दारिद्र्य रेषेखालील लोकांसारखे खायचे वांदे नसले तरी प्रचंड गरिबी आहे. माध्यम वर्गाच्या ग्राहकवादाची, त्यांच्या घरातील सुखसोयींनी छाप पडून तशा गरज निर्माण होतात. अनावश्यक आणि आवश्यक गरजांसाठी परिस्थितीच्या रेट्याखाली ही  लोकं चोऱ्या करतात. इथे गरिबीने नैतिकतेचा पराभव केला आहे. गृहीत धरलेल्या ऑनर सिस्टिममुळे स्टोअर्समध्ये सुपरव्हिजन कमी असते. परंतु गावातील एखाद्या भागातील स्टोअरमधे चोऱ्या वाढल्या तर ते स्टोअर बंद होते. प्रामुख्याने हे गरीब वस्तीत घडते. उदा. डेट्रॉइट शहरात मोठी स्टोअर फार तुरळक आहेत. मग खरेदी करायला लांब जावे लागते. गरीब लोकात कार असण्याचे प्रमाण कमी असल्याने लांब जाऊन आवश्यक गोष्टींची खरेदी करणे अवघड होते. त्यामुळे गरीब भागातील कार्यकर्ते, चर्चमधील धर्मगुरू लोकांना चोरी करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न असतात.

याच्या दुसऱ्या टोकाला जे १% अति श्रीमंत आहेत. यात मोठे शेअर होल्डर्स, बँकर्स, फायनान्सर्स येतात. तिथे वेगळी परिस्थिती आहे. ही लोकं वैयक्तिक आयुष्यात नैतिक असतीलही. पण धंद्यात, मोठ्या कॉर्पोरेशनमध्ये नफा हीच नैतिकता असते. राजकीय नेत्यांना मात्र प्रचंड प्रमाणात लाच दिली जाते. नफ्यासाठी सामान्य लोकांच्या आयुष्यावर होणाऱ्या परिमाणांचा कुठलाही विधिनिषेध ठेवला जात नाही. ग्राहकांना सर्रास फसवलं जातं. पर्यावरणाचा ऱ्हास झाला तरी चालतो. नफ्यासाठी तिसऱ्या जगातील लोक मेले तरी चालतात. तिसऱ्या जगातील गरीब वर्गातील जनतेला ही अनैतिकता दिसते. परंतु तिसऱ्या जगातील नव श्रीमंत, मध्यम वर्गाला आणि अमेरिकेतील जनतेला यात अनैतिक वाटत नाही. काँगो, चिली, इराक अशी उदाहरणे आहेत.

सामाजिक नैतिकतेचा कामाच्या नैतिकतेवर (work ethics) मोठा प्रभाव आहे. लोकं सहसा कामचुकार नसतात. ते काम चोख करतात. त्यात हयगय नाही. याचे कारण ते जे काम करतात, याचा त्यांना अभिमान असतो. कामं करण्यांवर ते  कामं करतोय की  नाही हे बघायला लागत नाही. कामाच्या नैतिकतेचे एक उदाहरण म्हणजे पोलीस. पोलीस कुणाचा मुलाहिजा ठेवत नाहीत. छोटा चोर असू देत, नाहीतर पॉवरफुल लोकप्रतिनिधी असू देत किंवा अतिश्रीमंत असू देत. याचे कारण पोलिस कायद्यात असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. लाच घेत नाहीत. अशा पोलिसांवर कुणाचा दबाव येत नाही. याचे कारण वरिष्ठसुद्धा कामाची नैतिकता पाळतात. अजून एक उदाहरण म्हणजे, मध्यंतरी देवयानी खोब्रागडे प्रकरण लक्षात असेल. यात अमेरिका- भारत संबंध तणावाचे बनले. तेव्हा अमेरिकेचा परराष्ट्रमंत्रीच काय प्रेसिडेंटसुद्धा प्रॉसिक्युटर प्रीत भरारावर दबाव आणू  शकले नाहीत. तो त्याचा जॉब करत होता. परराष्ट्र मंत्री आणि प्रेसिडेंट त्यांचा जॉब करत होते.

पुढील भागात आपण अमेरिकन लोकांच्या  जीवनदृष्टिकोनाची काही अंगे बघूयात. यात धार्मिकता, आदर, आत्मसन्मान, कुटुंब आणि लैगिक संबंध आदी मुद्द्यांचा समावेश असेल.
 
-  डॉ. प्रमोद चाफळकर
Pramod.Chaphalkar@gmail.com
 
 
(लेखक अमेरिका (मिशिगन) येथे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत)
बातम्या आणखी आहेत...