आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलाहल आणि विसर्जन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज गणपती विसर्जन. यंदा श्रीगणेशाचं वास्तव्य तब्बल बारा दिवस होतं आपल्याकडे, तरीही तो निघताना डोळ्यांत पाणी आणि घशात आवंढा येतोच सर्वांच्या. राज्यभरात सकाळपासून मिरवणुका निघतील त्या उद्या सकाळपर्यंत सुरू राहतील. एकीकडे बाप्पाला निरोप देण्याचं दु:ख तर दुसरीकडे रस्त्यावर डीजेच्या तालावर चालू असलेला धांगडधिंगा या गदारोळात आपल्या मनातही विचारांचा गोंधळ होत असतो. परंपरा, नवा विचार, आपल्या श्रद्धा, शिक्षण या सगळ्यांचं युद्ध मनातल्या मनात सुरू असतं. ते प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार लढायचं असतं.
 
‘गण्या फू S S S ‘ असे कर्कश ओरडत, त्या आजी घुमू लागल्या की, हे नव्याने पाहणारा महिलावर्ग आणि छोट्या पोरीबाळींची घाबरून अशी पळापळ व्हायची, विचारता सोय नाही. खरं तर आम्ही लहानपणापासून त्यांच्याकडे गौरी जागवायला आणि खेळायला जायचो! अन दरवर्षीच त्या प्रकाराला इतके घाबरायचो आणि एक प्रकारची गंमतही वाटायची. काही तरी वेगळे बघितल्याची. मग देवी अंगात येणाऱ्या या आजी प्रत्येकीचे गाऱ्हाणे ऐकून त्यावर तोडगा सांगायच्या. गरोदर बाईच्या किंवा जिला पाठोपाठ मुलीच होतात अशा बाईच्या ओट्यात गणोबा घातला की, मुलगाच होतो अशी तेव्हा ठाम समजूत होती. रिंगण, झिम्मा, फुगडी, लाट्याबाई लाट्या, काटवट काना, कुणी सूप नाचवतंय तर कुणी घागर, कुणी परात वाजवत गौरीचे कान फुंकतंय! एक मोठी आतेबहीण हे सारं बघायची, तिथला सावळा गोंधळ टिपायची, दुसऱ्या दिवशी प्रत्येकीची नक्कल करून दाखवायची. मग आम्ही खो खो हसत सुटायचो.
 
काही वर्षांनी शिक्षणासाठी बाहेर हॉस्टेलला राहायला गेले. हे सारे मागे सुटले. जवळजवळ वीस वर्षांनी लाडक्या लेकीने हट्टच धरला की, गौरी कशा जागवतात आणि काय खेळतात तिला पाहायचेच आहे. तिच्याच एका मैत्रिणीच्या आजोळी आम्ही जागरणाला गेलो आणि वीस वर्षांपूर्वीचे ते सारे क्षण डोळ्यासमोर तरळले. माझे आजोबा भयंकर कडक आणि रागीट होते. घरातल्या बायकापोरींसाठी कमालीचे जाचक नियम. त्यामुळे या एक रात्री गल्लीतल्या त्या घरी आम्हाला खेळायला जाता यावे म्हणून आजीला त्यांची किती तरी दिवस मनधरणी करावी लागायची. वीस वर्षं काही कमी काळ नाही. पण अगदी काल घडल्यासारखं का बरं आठवत असेल हे? मुलीच्या हट्टाखातर गौरीची गाणी म्हणून, मनसोक्त दंगा करून रात्री एक दीड वाजता स्वतः ड्राइव्ह करून घरी परत येताना, गेल्या वीस वर्षांतील अनेक प्रसंग आठवले. लहानपणी जिथे स्वतःच्या एक दोन तासांवरही हक्क नव्हता ; प्रेमापोटी असेल, सुरक्षिततेसाठी असेल, घरच्या आणि गावच्या कर्मठ वातावरणामुळे असेल; हे स्वातंत्र्य नव्हतंच. जगण्याच्या चौकटी बदलल्या. शिक्षण असेल, व्यवसाय असेल किंवा बदललेले जगण्याचे संदर्भ असतील! कुठून कुठे आलो आहोत आपण, आणि कुठे चाललो आहोत? बदल हा नियम असला तरी, बाहेरच्या बदलांबरोबर आतही क्षणाक्षणाला बदलणं अखंड चालू आहे याची जाणीव कधी आश्वस्त करणारी असते, तर कधी अस्वस्थ करणारी. दोन टोकांवरचं जगणं, विचारांचा लंबक काही केल्या स्थिर होत नाही.
 
गेल्या काही दिवसांत, नोटाबंदीनंतरची अनागोंदी, पडद्यावर आणि पडद्याआड होणारे वाद, निराशाग्रस्त लेकरांची आत्महत्या, लिंगपिसाट बाबावरची कारवाई, मुसळधार पावसाने दाखवलेली ताकद, पावसामुळे मानवी वर्तनाचा माणसालाच बसलेला फटका आणि कुठे इमारत कोसळून किड्यामुंगीप्रमाणे जाणारे जीव, मेंदू सगळे टिपत राहतो. आत कुठे तरी प्रत्येक घटनेचा पडसाद उमटतो. सामान्य आहोत आपण, आपल्याच जगण्याच्या परिघावर उभं राहून आपण बघे म्हणून हे बघत राहायचं! करायचं काहीच नाही किंवा काय करायचं ते समजत नाही !
हताशपणा दाटून आला की, मला संदीप खरेंची एक कविता नेहमी आठवते.
कशी ही अवस्था कुणाला कळावे?
कुणाला पुसावे? कुणी उत्तरावे?
किती खोल जातो तरी तोल जातो.
असा तोल जाता कुणी सावरावे?
 
परत कानात ‘गण्या फू S S S ‘ ची आर्त किंकाळी घुमल्याचा भास, की स्वतःच तेवढ्या आर्तपणे ओरडावं असं वाटतं. तो आवाज तसाच दाबला जातो कारण पांघरलेल्या झुलीमुळे असे हिस्टेरिक होण्याची परवानगी स्वतःला देता येत नाही. असं केल्याने किंवा झाल्यानंतर भोवताल बदलणार नसतोच. आपल्या आतील वादळं, बाहेरच्या कोलाहालातही आपणच शमवायची हे शहाणपण किंवा काही अंशी कोडगेपण आलंच आहे, ते घट्ट लपेटून घ्यायचं.
 
बघता बघता विसर्जनाची धामधूम चालू होते, डॉल्बीचा छाती दडपणारा आवाज आतले कान बंद करून क्षीण करायचा केविलवाणा प्रयत्न करायचा! तो होत नाहीच! तरी तो आवाज बंद करा म्हणून ओरडायचं नाही. सारे आवाज रिचवत जेव्हा आडमार्गाच्या एखाद्या इमारतीत शांतपणे इको फ्रेंडली बाप्पाला बादलीतच निरोप दिला जात असतो, तेव्हा आपसूकच शांत वाटते, भवताली कितीही गदारोळ असला तरी. सामान्य माणूस म्हणून जन्माला आल्यावर आपल्यात उमडणाऱ्या साऱ्या वावटळींचे प्राक्तन हे असंच बंदिस्तपणे विसर्जित करायचं, त्यालाही बळ जमवावं लागतंच. सगळे खूप वाईट चाललंय असं नाहीच! काही चांगलं विधायक होत आहे यावर विश्वास ठेवायचा! आपल्याला नंदनवन फुलवता आलं नाही तरी, निसर्गतःच जी झाडे भोवताली दिसत आहेत, किमान ती तरी जपायचा प्रयत्न करायचा. अजून तरी चांगल्या वाटेवर चालत राहण्याचा पर्याय आपल्याकडे आहे, निदान तो पर्याय दिसत आहे तोवर त्यावर प्रामाणिकपणे चालत राहायचं. सुरुवात स्वतःपासून, स्वतःला समजेल, उमजेल, अशी सजगपणे करायची.
 
सार्त्र म्हणतो, ‘त्या त्या काळात होणाऱ्या युद्धालासुद्धा आपण जबाबदार असतो!’ नक्कीच असतो. युद्ध आतलं, बाहेरचं कुंपणाअलीकडचं, कुंपणापल्याडचं, संपूर्णपणे थांबून, सुराज्य येईल, हा भाबडेपणा असेल कदाचित, पण भाबड्या स्वप्नांचं पाईक होऊन प्रयत्न करायला काहीच हरकत नसेल! जोपर्यंत स्वतःच्या आतील अनागोंदी मला यशस्वीपणे हाताळता येणार नाही, तोपर्यंत बाहेरच्या कोलाहलाला समर्थ टक्कर देण्याचं बळ कुठून आणि कसं येईल? आव्हानं सगळ्या काळात होती, राहतीलच. कोणत्या तरी रूपात. त्यांना भिडायचं तर सशक्त होणं, हाच एकमेव पर्याय. शांताबाई शेळके म्हणतात;
 
वाटते, तितके नसतो आपणही एकाकी, निराधार
नसते केवळ आपल्यापुरते आपले हताशपण
म्हणून तर पुढ्यातल्या काळ्याकरड्या राखेतूनही
अवचित झगमगून उठतात इवले इवले अंगारकण!
हे तर खरेच, की तेवढ्याने काळोख नसतो उजळत
पण कुणी तरी, कुठे तरी
आपल्यासाठी असते फुलत जळत!
 
- डॉ. सोनाली वाळवेकर-शेटे, नवी मुंबई
sonujanukevu@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...