आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी जिवनदृष्‍टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेमा-सिरियल्समधून दिसणारी, किंबहुना दाखवली जाणारी अमेरिका ही विशिष्ट हेतूंनी उदात्तीकरण केलेली आहे. याच्या उलट प्रत्यक्षातली अमेरिका आहे, जिचा जीवन दृष्टिकोन निकोप आहे... जिच्या ठायी सामाजिक जबाबदारीचे भान आहे...

अमेरिकेतील ग्राहकवाद आणि त्यामुळे भासणारा चंगळवाद या पृष्ठभागाखाली अमेरिकन संस्कृती लपली आहे. या लेखमालेचा उद्देश अमेरिकेच्या या लपलेल्या काही अंगांवर चर्चा करणे हा आहे. मागील लेखात सामाजिक नैतिकतेची चर्चा केली होती. या लेखात अमेरिकन लोकांचा जीवन दृष्टिकोन, सामाजिक संबंध यावर चर्चा केली आहे.

अमेरिकेत प्रामुख्याने जाणवणाऱ्या गोष्टीतील एक म्हणजे, परस्परांविषयीचा आदर. हा भाषा, वर्ण, वंश, व्यवसाय, श्रीमंती अशा गोष्टींवर अवलंबून नसतो. कस्टमर सर्व्हिसवाले कस्टमर्सना आदराने वागवतात, ही आश्चर्याची गोष्ट नाही. कस्टमर्ससुद्धा कस्टमर सर्व्हिसवाल्यांना आदराने वागवतात. उदा. रेस्टॉरंटमधे ग्राहक वेटर्सना आदराने वागवतात. पोलीस सामान्य लोकांना, अगदी अटक करतानासुद्धा (इंग्रजी सिनेमा-मालिकांमधून दिसतं ते काल्पनिक चित्र असतं.) आदराने वागवतात. शिक्षक, प्राध्यापक विद्यार्थांना आदराने वागवतात. कामावर तुमचा बॉस तुम्हाला आदराने वागवतो. स्त्रियांचा आदर केला जातो. त्यामुळे रस्त्यावर स्त्रियांकडे बघत कुणी शिट्ट्या मारत नाहीत, कॉमेंट्स करत नाहीत. तुमचा व्यवसाय कोणताही असो, तुमच्या कामाला मान असतो, श्रमाला प्रतिष्ठा असते. अमेरिकेत कुठलेही काम खालच्या दर्जाचे समजले जात नाही. उदा. टॉयलेट साफ करणाऱ्या माणसालासुद्धा इथे आदराने वागवले जाते.

आपण लोकांना जसा आदर देतो, तसाच त्यांनी पण आपल्याला द्यावा, अशी अपेक्षा केली जाते. यामागचे कारण असे आहे की, प्रत्येकाला स्वतःबद्दल आदर असतो, स्वाभिमान असतो. शालेय जीवनापासून परस्पर आदराचे संस्कार केले जातात. स्वाभिमानामुळे स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रवृत्ती असते. आईवडलांकडे पैसे असले तरी, छोट्या मोठ्या नोकऱ्या करून तरुणांना स्वकमाईचा अभिमान असतो. त्यामुळे ते स्वावलंबी बनून आईवडलांपासून स्वतंत्र होतात. अमेरिकेत सुरुवातीपासून आपला देश, आप्त, लोक सोडून स्थलांतरित येत राहिले. परिस्थितीने त्यांच्यातील सरंजामी श्रेण्या, वर्ग त्यांना टाकून द्यावे  लागले. त्यांनी स्वकष्टावर आयुष्य उभारले म्हणूनच  सामाजिक समता, परस्पर आदर, श्रम प्रतिष्ठा, स्वावलंबन या गोष्टींचे संस्कार पिढ्यानी पिढ्या चालूच राहिले आहेत.

सर्वसाधारण अमेरिकन माणूस आपण समाजाचे देणे लागतो, असे समजतो. त्यामुळे गरीबच नव्हे तर वेगवेगळ्या तऱ्हेची गरज असलेल्यांसाठी चालणाऱ्या विविध संस्थांना अमेरिकन्स उदार मनाने पैसे देतो. उदा. गरीब लोकांसाठी, व्यसनी मुक्तीसाठी, पर्यावरण आणि जंगलांचे संरक्षण, मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या, वंशद्वेषाविरुद्ध लढणाऱ्या संस्था यांना उदारपणे पैसे दान केले जातात. पसंतीच्या राजकीय संघटनेसाठी किंवा उमेदवारासाठी पैसा लोकांकडून गोळा होतो. त्याचबरोबर चर्चला सुद्धा मिळकतीचा काही भाग देण्याची जबाबदारी इथे कटाक्षाने पाळली जाते. “Put your money where your mouth is” या वाक्प्रचाराप्रमाणे समाजाचे वर्तन असते.

पण हे पैसे देण्यावरच थांबत नाही. त्याबरोबर लोकांचा सक्रीय सहभागही असतो. म्हणूनच तुम्हाला स्वयंसेवक सर्वत्र  दिसतील. गरीब वस्तीत स्वयंपाकघर चालवून अन्न वाटणे, हॉस्पिटल, वृद्धाश्रम, दिव्यांग लोक, ग्रंथालय इत्यादी ठिकाणी स्वयंसेवक दिसतील. हे बाळकडू शाळेपासूनच मिळते. हायस्कूल पास व्हायला काही तास स्वयंसेवी काम करावेच लागते. सर्व विद्यार्थी स्वेच्छेने आणि सचोटीने तेवढे तास करतात.
पण हे असे का होऊ शकते? या साठी सर्वसाधारण गरजांपेक्षा जास्त पैसे असावा लागतो. ते झालेच.  पण संस्कार, सामाजिक ऋण, आयुष्याचा अर्थ लावणे, अर्थपूर्ण जगणे याचाही यात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे कित्येक लोकं स्वतःच्या आवडीसाठी आयुष्याचा काही  काळ  विशिष्ट तऱ्हेने व्यतीत करतात. उदाहरणार्थ, परक्या देशात जाऊन राहातात, तिथे शिक्षण घेतात. तेथील भाषा शिकतात. मी सर्वात प्रथम अमेरिकन व्यक्तीशी बोललो, म्हणजे मराठी बोलणारी आणि भारतासंबंधीत विषयात पीएचडी करणारी पुण्यातली एक विद्यार्थिनी. तसेच ते अगदी अफ्रिकेतील फारशा माहीत नसलेल्या देशातसुद्धा जातात. त्यांच्या चर्चमार्फत किंवा स्वयंसेवी संघटनेतर्फे जगातील कानाकोपऱ्यात जाऊन सामाजिक कार्य करतात.

समाजात सुबत्ता असल्याने, चैनीच्या गोष्टी बहुसंख्य जनतेला परवडते. याला बरेच जण चंगळवाद म्हणू शकतील. आयुष्य उपभोगण्यासाठी असते, अशी येथे रास्त धारणा येथे आहे. सेल लागला की मंडळी मॉलमध्ये, स्टोअर्समध्ये तुटून पडतात. त्यातून आयुष्य सुखाने उपभोगायचीच प्रवृत्ती दिसते. ती काही फक्त फॅशनचे कपडे, टीव्ही इत्यादी गोष्टींचे मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करणे, रेस्टॉरंट मध्ये जाणे, दारू पिणे एवढेच नसते. दारू पितानासुद्धा ऐट असते. असंख्य प्रकारच्या वाइन्स, बिअर्स मी इथे बघितल्या. पण या ग्राहकवादाबरोबर लोकांना काहीना काही तरी छंद असतात. तो छंद पुरवण्यासाठी कित्येक हॉबी स्टोअर्स असतात. त्यातील विविध प्रकारचे छंद बघून चक्रावल्यासारखे होते. लोकं सतत कार्यमग्न असतात. घरातील बदल, दुरुस्ती, बागकाम, सुतारकाम इत्यादी. आऊट डोअर गोष्टीवर तर अमेरिकी माणसाचे विशेष प्रेम असते. कॅम्पिंग, गिर्यारोहण, सायकल चालवणे, शिकार करणे, बोट, स्किईंग, स्पोर्ट्स अशा गोष्टी फक्त तरुणच नव्हे, तर सर्व वयातील लोक कुटुंबासकट करत असतात. किंबहुना, कामाचा इतर वेळ धावपळीत घालवल्यावर शनिवार-रविवार आणि उन्हाळ्याची सुट्टी, या गोष्टी कौटुंबिक बंध दृढ करायला उपयोगी आणल्या जातात. आईवडील मुलांबरोबर खूप वेळ घालवतात. त्यांच्याबरोबर घरात, घराबाहेर खेळत असतात. त्यांचे अभ्यासाकडे लक्ष असते. अभ्यासाबरोबरच मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, याबद्दल जागरूक असतात. मुलांना  खेळ, संगीत, नृत्य अशा गोष्टीत गुंतवतात. त्यावर खूप पैसे खर्च करतात. आईवडलांबरोबर मुलं सहसा राहत नाही. पण त्यांची खूप काळजी घेतात. वेळप्रसंगी जमेल तेवढा पैसे खर्च करतील. आजारपणात गरज भासते तेव्हा बिन पगारी सुट्टी घेऊन मुलं आळीपाळीने आईवडलांची सेवा करतील. मित्र आणि कुटुंबातील व्यक्ती या जीवनात खूप महत्वाच्या असतात. थँक्स गिव्हिंग सारख्या अधार्मिक सणानिमित्त कुटुंबीय, मित्र जमतात. वर्षभरात ज्या व्यक्तींची मदत झाली, त्यांचे ऋण मान्य करून धन्यवाद देतात.

अमेरिकन टीव्ही सिरीयलमुळे, चित्रपटांमुळे समाजात मोकाट लैंगिक संबंध असतात, असा गैरसमज होतो. प्रत्यक्षात तसे होत नाही. मुलामुलींना निकोप संबंध असलेले खूप मित्र-मैत्रिणी असतात. परंतु त्यातील एखाद्याशीच अत्यंत जवळची मैत्री होते. तेव्हा, फक्त त्या व्यक्तीबरोबर लैंगिक संबंध असू शकतात. बॉय फ्रेंड, गर्ल फ्रेंड यांना कुटुंबात आदराचे स्थान असते. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे प्रमाण अमेरिकेत खूप आहे खरे, पण लग्न झाल्यावर विवाहबाह्य संबंध निषिद्ध मानले जातात. यावरूनच अनेकदा घटस्फोट होतो. खूप घटस्फोट होण्याच्या बऱ्याच कारणात, हे कारण प्रमुख असते. अमेरिकन लोक खूप धार्मिक आहेत. तरीसुद्धा अमेरिका विज्ञान, तंत्रज्ञानात पुढे आहे. तसे सुजाण नागरिक आहेत. याचे मुख्य श्रेय, हे नि:संशय त्यांच्या शालेय आणि कॉलेज शिक्षण पद्धतीला आहे.

- डॉ. प्रमोद चाफळकर
Pramod.Chaphalkar@gmail.com
लेखक मिशिगन येथे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत.
बातम्या आणखी आहेत...