आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणिवांचा बहूजिनसी गलबला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदिम काळापासून मानवी जीवनास सचेतन ठेवणारी, गाठीशी असणारी मूल्यव्यवस्था माणसाने झिडकारून टाकली. परिणामी बेभान मानुषी व्यवहाराने हुसेनच्या चित्रांना महत्त्व येऊन कबीर तुकारामांवर धूळ साचायला लागल्याची, ‘शून्य’ नोंद कवी प्रस्तुत कवितासंग्रहात नोंदवतो. ही नोंद म्हणजे मूल्यात्म अधिभौतिकाचा इतिहास आहे.

‘सत्तासंबंधाच्या अनोळखी रक्तवाहिन्यांमधून घरंगळत जावा एखादा बिंदू तसा मी एक शून्य डाव्या-उजव्या, जैविक-अजैविक घटितांचा साक्षीदार. म्हणाल तर माझ्या असण्याला किंमत आहे, म्हणाल तर नाहीसुद्धा - पण मला वगळून तुम्हाला कसा लिहिता येईल एक सार्वभौम इतिहास?’ कवी पी. विठ्ठल यांच्या ‘शून्य एक मी’ या कवितासंग्रहातील हे प्राक्कथन म्हणजे, समकाळातील वैश्विक अधिभौतिकतेचे केंद्रस्थानी येणे आणि ‘माणूस’ केंद्राबाहेरच्या पोकळीत फेकला गेल्याचा निर्देश आहे.

वर्तमानातील बहुसांस्कृतिकतेच्या बाहुपाशात निश्चल झालेला माणूस स्वतःच एक कमॉडिटी झाला आहे. त्याच्या अतिआधुनिक जगण्याची संहिता कवी पी. विट्ठल ‘शून्य एक मी’ या संग्रहात कोरतात. अर्थात, त्यांनी ‘विध्वंसाचे सुरुंग’ पेरून पूर्वीच या प्रवासास प्रारंभ केलेला आहे, सोबतच समकालीन कवी आणि कविता ‘आक्रंदत’ असताना, हा कवी जातीपेक्षा ‘वर्तमानाच्या नोंदीं’ना प्राधान्याने नोंदवतो. वर्तमानातील माणसाचे एकरेषीय जगणे त्याच्या बकासुरी भौतिक सुखासीनतेला अचेतन करत उदासीन करते. आदिम काळापासून मानवी जीवनास सचेतन ठेवणारी, गाठीशी असणारी मूल्यव्यवस्था माणसाने झिडकारून टाकली. ‘दिल मांगे मोर’च्या वृत्तीतून मंदिरांपासून सुरू झालेला मानवी प्रवास ‘ट्रिपल एक्स’पर्यंत कधी पोहोचला याचं भानच त्याला राहिलं नाही. परिणामी बेभान मानुषी व्यवहाराने हुसेनच्या चित्रांना महत्त्व येऊन कबीर तुकारामांवर धूळ साचायला लागल्याची, ‘शून्य’ नोंद कवी प्रस्तुत कवितासंग्रहात नोंदवतो. ही नोंद म्हणजे मूल्यात्म अधिभौतिकाचा इतिहास आहे.

कवी विठ्ठलच्या कवितेचा प्रवास हा गाव-शहर-शहरगाव असा, आहे. त्यामुळे त्याचं गावशिवेशी असलेलं नातं त्याच्या आत्मकेंद्री जीवनाला अंतर्यामी हलवून टाकतं. मेट्रो आणि स्मार्ट सिटीच्या विस्तारांनी गावंच्या गावं कवेत घेतली. न पाहिलेल्या पैशाने जगातलं सर्वकाही दाखवायला सुरुवात केली. भोगमूल्ये शिरोधारी आली. पैशांचं अवमूल्यन होण्याच्या क्रियेत माणसानेही झेप घेतली. माती आणि नात्यांच्या धमन्यांनी पोसलेला माणूस ब्रँड फॅक्टऱ्यांच्या फेऱ्यात ब्रँडेड झाला, पण मूठभर मातीत ढिगभर सूख पेरणारा बाप शेती-माती आणि नाती यातच अडकला. म्हणून हा मातीतला सर्वांचाच बाप-शेतकरी अजून कसा ब्रँडेड झाला नाही? असा प्रश्न कवी, स्वतःसह समग्रांना विचारतो. त्याचं ब्रॅण्डेड न होणं म्हणजेच, लोकल असणं, हे जगहितावह असलं, तरी पूर्वी ज्या गावाने सुसंस्कार केले, घडवले, तो गाव आता पूर्णतः बदलेला आहे. गावाची सूत्र नव्या पिढीच्या हाती आलेली असल्याने कवी लिहितो,
“ज्या चिंचोळ्या रस्त्यावरून गल्लीबोळातून धावलेलो असतो, आपण
आता तिथे जाण्याची भीती वाटते
ज्या झाडावर चढलो, मनसोक्त ते झाडही आता
ओळखीचे वाटत नाही.”

कवीची गावाविषयीची भीती साहजिक आहे, पण झाडांचं अनोळखी होणं, हा जसा परिवर्तनाचा भाग आहे, तसाच तो पर्यावरण बदलाचा भाग म्हणूनही येतो. हा पर्यावरणीय बदल कालांतराने मानवी अस्तित्वाविषयी प्रश्न निर्माण करणारा असल्याने त्याद्वारेही सर्वव्यापी सूचकता आहे. नैसर्गिक पर्यावरण बदलाबरोबर सांस्कृतिक पर्यावरणही बदलल्याचे कवीला जाणवते. त्यामुळे पूर्वीचा ‘काला’ आता ‘काळा’ झाल्याचे जाणवते. उदा. ‘‘गावात आता सण उत्सव मिरवणुका आणि व्याख्यानांची रेलचेल असते. गणेशोत्सव असो, मोहरम असो, आंबेडकर किंवा महावीर किंवा शिवजयंती असो नित्यनेमानं रंग उधळले जातात. अहिल्याबाई, संत सेना, रोहिदास, अण्णाभाऊ, बसवेश्वर, परशुराम यांचाही जयघोष होतोच हमखास. आणि टिळक, गांधी, नेहरूंचे कार्यक्रम वर्गातल्या वर्गात आटोपून घेतात शिक्षक मंडळी.’’ कवीची ही विधानं प्रागतिक अभिवृद्धीस अधोरेखित करतात; पण अधोरेखनाची ही रेषा लाल आहे, डेंजर आहे. त्यामुळे ती चिंतीत करणारी आहे.

वैश्विकीकरणातील प्रागतिकतेने एकीकडे आपल्याला अमर्याद पर्याय उपलब्ध करून दिले; पण याच बहुपर्यायांमुळे सांस्कृतिक वातावरण दूषित झाले. अशा गावातील असंख्य बदलांना कवी टिपण्याचा प्रयत्न करतो. नव्हे, तर हे आव्हान पेलतोसुद्धा. उदा. ‘आधी सायकलवर, मग एम-८० वर येणारे तलाठी भाऊसाहेब आता सँट्रो गाडी घेऊन येतात. मलेरियाच्या गोळ्या वाटणाऱ्या सूर्यवंशीबाईंना त्यांचा मुलगा रोज पल्सरवर दवाखान्यात घेऊन येतो आणि सही झाली की बाई निघून जातात आल्यापावली.’ ही कवीची निरीक्षणं त्याला ग्रामीण कवितेपासून पुढे घेऊन जातात. ‘त्यातल्या त्यात आता एवढं बरं झालं की, गावातच पोलिस स्टेशन सुरू झाल्यानं भांडणांची फिर्याद द्यायला आधीच्या सारखं तालुक्याला जावं लागत नाही.’ यासारखे बदल हे या कवितेचं सामर्थ्यच म्हणावं लागेल. कारण, ती वाचकांना नोंदींच्या, बदलांच्या पलीकडचा ‘बदल’ दाखवते. तसेच ‘शाळा-कॉलेजच्या मुलांनी रोज प्रार्थना चुकवणे’, ‘श्रद्धेची सडकी फुलं’, ‘बाजारू प्रवचनांचा भ्रामक उपदेश’ ‘निरामय भक्तीचा व्याधिग्रस्त टाळ’ ‘दांभिक अत्याचाराच्या नग्न होड्या’ किंवा ‘मुलं बघतात सांस्कृतिक बाहेरख्यालीच्या मंडपात ओठ रंगवून बसलेल्या बायका’ यासारख्या प्रतिमा आणि विधानांमधून मूल्यऱ्हास अधिक गडद होतो. किंवा चहावाला मुन्नाभाई, इक्बाल, सखाराम कांबळे, शेळके मास्तर, तुळसाई, दूधवाला नरहरी, निळा टिळेवाला दत्ता, केबलवाला रमेश, फळवाली भामाबाई, पंक्चरवाला सावंत, थकलेली सुरैय्या यासारखा बहुजिनसी गलबला मराठी कवितेचा फलक विस्तारण्यास मदत करतो.

जागतिकीकरणामुळे ‘लोकल’ ग्लोबल झालं, पण वैश्विक निरर्थकता अधिक वाढली. या निरर्थकतेचं सर्वात महत्त्वाचं कारण, सर्वात असूनही नसणं, हे आहे. म्हणजेच सुरूवातीचा माणूस गावाच्या पोकळीचा एक भाग होता, आता तो वैश्विक पोकळीचा एक भाग झाला आहे. ह्या वैश्विक पोकळीला आप्तेष्ट, नातेवाइकांकडून छेद दिला जातो. तशातच जिवाभावाच्या माणसांचा मृत्यू हा सर्वांच्याच मनात खोलवर आघात करून जातो, तसा तो कवीवरही आघात करतो. म्हणून कवी लिहितो, ‘कागदावरची अक्षरं कागदावरच विरघळून जावीत, तसा मी अंतर्बाह्य विरघळून जातो हल्ली.’ यामुळे एक शून्य अर्थात पोकळी निर्माण होते; पण स्मृतींचा हिरवा दरवळ आचके देणाऱ्या यंत्राला बॅकअप मिळावा तसा गारवा प्रदान करतो. या स्वस्थ-अस्वस्थतेतूनच ही कविता आकार घेते.

‘शून्य एक मी’ मध्ये जशी निरीक्षणं, नोंदी आहेत, तशीच दस्तऐवजांची व्यापकता, विधानं, परिच्छेदात्मता, स्वगतं ही या कवितेला प्रयोगशीलतेच्या रांगेत बसवतात. यावेळी वसंत गुर्जर यांची आठवण होते. उदा. ‘तर असो. अडतीस वर्ष म्हणजे, तसं खूप झालं जगून. तर या वयापर्यंत ज्या-ज्या गोष्टी करायला हव्या होत्या, त्या-त्या सगळ्या करून झाल्या. म्हणजे शिकताना अफेअर. नोकरी लागल्यावर बायको. नंतर मुलं. दोन-तीन बँकांचे लोन. गाडी, घर, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मुलांचे अॅडमिशन्स, एल.आय.सी., भिशी, बिअर-दारू, गुटखा.’ किंवा अडतीस वर्षात काय बघितले? बघितला गाव-तांडा, वाडी-वस्ती, नगर-महानगर, गुरं-ढोरं, झाडं-झुडपं, राजदूत-जावा, होंडा-फेरारी. घरदार देवजत्रा-शाळा कॉलेज माणसं सतरा. सभा संमेलनं, हॉटेल-लॉज. समुद्राच्या वाळूतही लोळून पाहिले. धर्म पाहिला, दंगल पाहिली, बाबा-बापूंची प्रवचने ऐकली. हवे नको ते वाचून झाले. गाथा सप्तशती ते आषाढमाती. माणसाच्या हजार जाती.’ काही ठिकाणी हा लंबक वाटतो. तो वाचकाला व्हायब्रन्ट करतो, तसाच तो व्हायब्रेटही करतो. ‘समकाळातील ऱ्हासाच्या गर्तेत नेणारा स्नॅप या कवितेला उत्तरेकडे घेऊन जातो. तसेच हे प्रदूषण आणि विश्वाच्या निरर्थक पसाऱ्यातील भग्नतेचं मर्म कवी अनेकविध पातळ्यांवरून रेखण्यात यशस्वी होतो. या कवितेत हिंसेची खोल लिपी जशी आहे, तशीच सहिष्णुतेची स्मृताक्षरेही आहेत. हे आंतर्विरोधाचं सूत्रदेखील या कवितेला स्वत्व प्रदान करतं. शून्य शून्य अवकाशातील सर्वकाही शून्य म्हणजेच इन्फिनिटी. आणि या इन्फिनिटीला वेधण्यासाठी आणि भेदण्यासाठी आपल्याला संदर्भलक्ष्यी व्हावं लागतं, हीच या कवितेची सिद्धता आहे.
शून्य एक मी (कविता) : पी. विठ्ठल
कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे
पृष्ठे : १२८, किंमत : १५० रू.
मुखपृष्ठ : दिनकर मनवर
 
- कैलास अंभुरे, dr.kailas.ambhure@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...