आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाषांचा लक्षवेधी चरित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय भाषा हे एक महाविशाल जाळे आहे. या भाषा अनेकविध स्वरूपाच्या आहेत. भारतभूमी ही जागतिक भाषाभ्यासाची प्रयोगशाळा म्हटली तरी चालेल इतकी तीमध्ये अद््भुतता आहे. या महाविशाल खंडातील भाषांचा लवटे यांनी प्रस्तुत ग्रंथाद्वारे लक्षवेधी परिचय करून दिला आहे... 
 
 
‘हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपू’ या ओळी आहेत, आंतरभारती संकल्पनेचे उद््गाते साने गुरुजी यांच्या. आजचा काळ हा भाषा, साहित्य, संस्कृतीपुढे अनेकविध प्रकारची आव्हाने असणारा काळ आहे. जागतिकीकरण आणि नवी समाजरचना यात एका बाजूला भाषांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्याचबरोबर भांडवली जगाचे नवे संभाषित म्हणूनही भाषेला असाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे.  भारतीय भाषांचा भौगोलिक नकाशा हा बहुविध स्वरूपाचा आहे. हा भाषिक अवकाश सामाजिक, राजकीय स्थितीपरिसराने बदलत आलेला आहे. त्यामुळे भारतीय भाषांची विविधता ध्यानात घेता, ‘बहुरंगी आणि बहुजिनसी भारतीय संस्कृतीत एकत्व पाहणे, हा भारतीय जीवनाचा मुख्य सिद्धान्त आहे’ असे आचार्य स. ज. भागवतांचे म्हणणेही या काळात नीट समजून घ्यावे लागते. 
 
 
या पार्श्वभूमीवर डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा ‘भारतीय भाषा व साहित्य’ हा ग्रंथ ‘साधना’ प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित झाला आहे. त्यांच्या ‘खाली जमीन, वर आकाश’ या रिमांड होममधील मुलांच्या भावविश्वाचे दर्शन घडवणाऱ्या आत्मकथनाने त्यांना वेगळी ओळख प्राप्त करून दिली होती. याबरोबरच हिंदी भाषासाहित्याचे अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, अशी त्यांची ख्याती आहे. डॉ. लवटे यांच्या आणखी एका कार्याचा आवर्जून उल्लेख करायला हवा, तो म्हणजे त्यांनी वि. स. खांडेकर यांचे अप्रकाशित साहित्य प्रसिद्ध करण्यासाठी केलेली अविश्रांत धडपड. आजवर खांडेकरांचे जवळपास पंचवीसहून अधिक ग्रंथ त्यांनी संपादित केले आहेत. २०१५ या वर्षात लवटे यांनी ‘दै. दिव्य मराठी’ या वृत्तपत्राच्या रविवार ‘रसिक’ पुरवणीत ‘आंतरभारती’ या सदरांतर्गत भारतीय भाषांचा परिचय करून देणारी लेखमाला लिहिली. हीच लेखमाला ग्रंथरूपाने वाचकांसमोर आली आहे. 
 
 
भारतीय भाषा हे एक महाविशाल जाळे आहे. या भाषा अनेकविध स्वरूपाच्या आहेत. भारतभूमी ही जागतिक भाषाभ्यासाची प्रयोगशाळा म्हटली, तरी चालेल इतकी तीमधे अद््भुतता आहे. या महाविशाल खंडातील भाषांचा लवटे यांनी लक्षवेधी परिचय करून दिला आहे. भारतीय राज्यघटनेने पारित केलेल्या २२ भाषा व साहित्याचा धावता परिचय या ग्रंथात आहे. तो केवळ भाषा वर्णनापुरता सीमित नाही, तर त्या त्या भाषिक परंपरेतील साहित्याचाही यात परिचय आहे. भाषांचा उगम, भाषा स्वरूप, लक्षणीय वेगळेपणा, भू-परिसर आणि त्या भाषेतील वाङ््मय परंपरेबद्दलच्या संक्षिप्त नोंदी, असे या लेखांचे स्वरूप आहे. 
 
 
भारतीय महाद्वीपाची भू-विविधता आणि त्या त्या प्रदेशातील समूहांनी निर्मिलेल्या भाषा-साहित्याचा पट त्यांच्यासमोर आहे. सर्वसाधारणतः भाषा साहित्याच्या अभ्यासकांना, वाचकांना सर्वसाधारण पाच-सहा भाषांची सर्वसामान्य स्वरूपाची माहिती असते. त्यामुळेच लवटे यांच्या या ग्रंथातील बोडो, डोंगरी, मैथिली, नेपाळी, संथाली, उर्दू आणि सिंधी अशा अल्पगटाच्या समाज भाषांची माहिती वाचकांना नवी ठरते. त्या त्या प्रदेशातील लोकसंस्कृती, जीवनभान, भू-वैशिष्ट्ये यांनी या भाषा आकाराला आल्या आहेत. या भाषांची ध्वनिरूपे व लिपी वैशिष्ट्यांबद्दलचीही काही आगळी निरीक्षणे त्यांच्या लेखांत आहेत. त्या-त्या भाषेची संस्कृतिस्थानातील वाटचाल याविषयीचे विवेचन आहे. त्या-त्या जीवनशैलीने आकाराला आलेली भाषा कशी ‘घडत’ गेली याबद्दलची मार्मिक अशी निरीक्षणे यात नोंदवली आहेत. तसेच या भाषिक समाजाचा राजकीय राजवटीसंदर्भाची पार्श्वभूमीही त्यांनी ध्यानात घेतली आहे. लवटे यांच्या विवेचनातून भाषा साहित्याविषयीचे विशेष स्वाभाविकपणे सुचित झाले आहे. भाषांचे भौगोलिक स्थान, वेगळेपण व साहित्य परंपरेचे वर्णन करणे, हे या लेखांचे उद्दिष्ट आहे. भाषेच्या मौखिकतेपासून ते आतापर्यंतच्या ऱ्हस्व प्रवासखुणा या लेखांसह त्यांनी नोंदविल्या आहेत. तसेच बोली लिपीचे वैशिष्ट्येही सांगितली आहेत. भाषासाहित्याचा इतिहास सांगत असतानाच वासाहतिक समाजपट आणि भाषेचे राजकारणही त्यामधून ध्वनित झाले आहे. 
 
 
ब्रिटिश वसाहतकाळात भाषाविषयक भान वाढीस लागले. या वसाहतकाळाचा आणि भाषासंकलनाच्या विस्ताराचे उल्लेख त्यांच्या विवेचनात जागोजागी आहेत. तसेच भाषा हा राजकीय व भू-प्रदेशाचा सघंर्षाचा एक महत्त्वाचा कळबिंदू आहे. या संघर्षाने भाषा वाटचालीवर काहीएक प्रभाव आणि परिणाम झाला आहे. मोठ्या समूहाची भाषा आणि अल्पसमूहाची भाषा या संबंधावर त्याचा प्रभाव पडलेला आहे. तसेच भाषा वाटचालीत राजकारण प्रभुत्वसंबंधाचे भान कसे कार्यरत असते, त्याच्या सूचक नोंदीही यात आहेत. काही भाषा या विशिष्टता दर्शक म्हणूनही गणल्या आहेत. सिंधी भाषेचा एकचएक प्रदेश नाही. ती भारतभर विस्तारित आहे. तसेच या भाषेचा छावण्या आणि परागंदा समूहाची भाषा म्हणून उल्लेख केला आहे, तो वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. भारतीय भाषातील काही बारकावे या ग्रंथातील लेखनात आहेत. उदा. वि.स. खांडेकरांचे अन्य भाषांमध्ये झालेले अनुवाद. ‘ययाती’ कादंबरीचा माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी केलेला अनुवाद आदी... 
 
 
ग्रंथाच्या शेवटी, लवटे यांनी दोन लेखांची व एका परिशिष्टाची भर टाकली आहे. त्यामध्ये आरंभी ‘भारतीय भाषा व साहित्याचे स्वरूप’ आणि ‘जागतिकीकरणानंतरचे भारतीय साहित्य’ हे दोन लेख समाविष्ट केले आहेत. परिशिष्टात गटेची ‘विश्वसाहित्य’, टागोरांची ‘विश्वभारती’ व साने गुरुजींच्या ‘आंतरभारती’ संकल्पनेचा परिचय करून दिला आहे. जागतिकीकरणाने निर्माण झालेल्या सामाजिक सांस्कृतिक प्रश्नांची चर्चा करुन विविध भारतीय भाषांतील समकालीन साहित्याविषयीच्या संक्षिप्त नोंदी दिल्या आहेत. 
 
 
एकीकडे काळाची गती, भौतिक कायाकल्प, नवमध्यमवर्ग यातून दुभंग समाज तयार होतो आहे. या दुभंग समाजावकाशाने निर्माण झालेल्या भारतीय साहित्याच्या अल्प अशा नोंदी दिल्या आहेत. या लेखनाचा एक विशेष, म्हणजे लवटे यांच्या भाषेतील वाचनीयता.  अर्थात, या ग्रंथातील सर्व लेखांचे लेखन हे प्रामुख्याने वृत्तपत्रासाठी झाले असल्यामुळे, सदर लेखनाच्या जागेच्या मर्यादाही त्यास आहेत. त्या त्या भाषेविषयीचे धावते उल्लेख करत गेल्यामुळे त्या लेखनाचे स्वरूप माहितीपर व परिचयपर झाले आहे. संबंधित भाषा व साहित्यासंबंधीच्या सूक्ष्म स्वरूपाच्या विवेचनाचा अभावही त्यामध्ये आहे. तसेच भाषा साहित्यासंबंधीची गाभ्याची वैशिष्ट्ये व तौलनिक निरीक्षणेदेखील  येथे देता आली असती. तसेच लवटे यांच्या लेखनरूपांवर हिंदीचा काहीएक प्रभाव आहे. काही ठिकाणी वाङ््मय विशेष नोंदवताना त्याचे अपुरे वर्णन झालेले आहे. भालचंद्र नेमाडे यांच्या एकूण कवितेबद्दलचे ‘नेमाडे यांची कविता प्रेमप्रणयाच्या खुणा दाखवते’ अशा प्रकारची विधाने नेमाडे यांच्या कवितेचे अपुरे वर्णन करणारे ठरते.  
 
 
एकंदरीत विशाल अशा राष्ट्रातील सामूहिक सख्यत्व आणि सौहार्दाचे नाते भाषिक संस्कृतीमधून कशा प्रकारे व्यक्त झाले आहे, त्याचे वर्णन या ग्रंथात आहे. डॉ. गणेश देवी यांनी म्हटल्याप्रमाणे ‘भारताचा भाषिक नकाशा एका मोठ्या विस्मृतिपर्वात प्रवेश करीत आहे.’ या पार्श्वभूमीवर भारतीय भाषा साहित्याच्या सौहार्दाची आठवण करून देणाऱ्या कोणत्याही ग्रंथाचे मोल निश्चितच मोठे आहे... ,
 
     
पुस्तकाचे नाव : भारतीय भाषा व साहित्य 
लेखक : डॉ. सुनीलकुमार लवटे,  
प्रकाशक : साधना प्रकाशन, पुणे. 
पृष्ठे : १८६ 
किंमत : २०० रुपये
 
- डॉ. रणधीर शिंदे, randhirshinde76@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...