Home | Magazine | Rasik | dr-aanand-josh-mind-brain-language

मन, भाषा आणि मेंदू!

डॉ. आनंद जोशी, हृदयरोगतज्ज्ञ/ विज्ञान लेखक | Update - Jun 02, 2011, 01:12 PM IST

माणसाने फक्त एकच भाषा शिकणे आणि त्या भाषेला धरून राहणे म्हणजे त्या माणसाला एकान्तवासाची शिक्षा दिल्यासारखे असते. भाषा एकमेकांना विचार सांगण्यासाठी असतात, तसेच विचार दुसऱ्यापासून लपवण्यासाठीसुद्धा असतात.

  • dr-aanand-josh-mind-brain-language

    प्रत्येक भाषेचे रूप वेगळे असते. या रूपाचे काही निकष आहेत. त्यावर भाषा शिकायला सोपे का कठीण हे ठरवता येते. ध्वनिवर्ण आणि लेखनचिन्हे यांच्या साम्याचे गुणोत्तर हा एक निकष. ते जितके एकास एक तितकी भाषा सोपी. इटालियन भाषेत लेखनचिन्हे व उच्चार-ध्वनीवर्ण यांचे गुणोत्तर ३३:२५ असे आहे. इंग्लिश भाषेत एकाच अक्षराचे अनेक उच्चार असतात. उदाहरणार्थ बी यू टी बट आणि पी यू टी पुटमध्ये यू अक्षराचे उच्चार वेगवेगळे आहेत. इंग्लिशमध्ये हे गुणोत्तर ११२:४ असे आहे. चिनी भाषेत लेखनचिन्हे म्हणजे कॅरॅक्टर्स असतात. तेथे हे गुणोत्तर प्रचंड आहे. शिकायला सुरुवात केल्यापासून मुले इटालियन भाषा एका वर्षात चांगली वाचू लागतात. इंग्लिश चांगली वाचायला मुलाला तीन वर्षे लागतात. तर चिनी भाषा चांगली वाचण्यासाठी मुलाला दहा वर्षे लागतात.
    आईची वडिलांची भाषा निरनिराळी असली, तर त्यांची मुले त्या दोन्ही भाषा शिकतातच, पण शाळेत हिंदी-इंग्लिश अशा भाषाही शिकतात, हे आपण पाहतो. मेंदुतील तीच यंत्रणा वापरून माणूस बहुभाषिक होतो ही मेंदूची जैविक क्षमता असते. परंतु भाषा ही नुसती जैविक क्षमता नाही. या भाषेच्या आधारे माणसाने संस्कृती-कल्चर निर्माण केले. त्यामुळे भाषा ही सांस्कृतिक अस्मितेशी निगडित असते. त्यातून भाषेबद्दलचा पराकोटीचा अभिमान, दुराग्रह निर्माण होतात. खरे पाहता मायबोलीबरोबर इतर भाषा शिकल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीचे आचार-विचार समजायला मदत होते. माणसाने फक्त एकच भाषा शिकणे आणि त्या भाषेला धरून राहणे म्हणजे त्या माणसाला एकान्तवासाची शिक्षा दिल्यासारखे असते.
    भाषा एकमेकाला विचार सांगण्यासाठी असतात, तसेच विचार दुसऱ्यापासून लपवण्यासाठीसुद्धा असतात. त्याचा आविष्कार बोलीभाषेत दिसतो. प्रत्येक भाषेच्या बोलीभाषा असतात. मराठी, इंग्लिशच्या आहेत. तशा त्या भाषा सगळयांना समजत नाहीत. बोलीभाषा ही समूह व स्थानापुरती मर्यादित असते, त्यामुळे बोलीभाषेच्या उपयुक्ततेला आणि महत्त्वाला मर्यादा पडतात. विचार आणि विकार यांच्या प्रदर्शनाचे माणसाजवळचे महत्त्वाचे साधन म्हणजे भाषा. या भाषेचा उपयोग प्रभावीपणे माणसाने वाचन लेखनात केला आहे.
    भाषेबद्दल बॅबेलच्या मनोऱ्याची पुराणकथा आहे. मानवाने बॅबेलचा उंच मनोरा बांधण्यास सुरुवात केली. हे मानवजातीच्या एकतेचे प्रतीक होते. मनोरा बराच उंच झाला. मानवाचे हस्तकौशल्य पाहून ईश्वर खुश झाला. त्याने मानवाला भाषेची जैविक क्षमता भेट म्हणून दिली. या जैविक क्षमतेचा वापर करून मानवाने अनेक भाषा निर्माण केल्या. प्रत्येकाला आपण निर्मिलेल्या भाषेचा अभिमान. भाषेच्या पराकोटीच्या व वृथा अभिमानातून मारामाऱ्या सुरू झाल्या. दैव देते आणि कर्म नेते असे झाले. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे होण्याऐवजी विषाचे झाले. मानवतेच्या एकतेचा मनोरा कधीच पूर्ण झाला नाही. आज आपण याचेच आविष्कार बघतो आहोत. शहरात आपल्याच भाषेच्या पाट्या लावल्या म्हणजे भाषा समृद्ध होत नाही. जर इतर भाषा आपल्याशा केल्या तर भाषा सुदृढ होते. भाषा हे सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक एवढेच माहीत असल्यामुळे असे घडते. पण भाषा ही एक जैविक क्षमता आहे. वाचन-लेखनाने ती ज्ञानभाषा करता येते हे जर सर्वसामन्यांपर्यंत पोहोचले तर भाषेवरून डोकी भडकवण्याचे प्रकार कमी होतील. हे समजण्यासाठी 'रिडिंग इन द ब्रेन'सारखी पुस्तके उपयुक्त ठरतात. यासाठी अशी पुस्तके वाचायची असतात.

Trending