आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'इबोला' सोडून बोला !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही दिवसांपासून ‘इबोला आलाय’ अशा बातम्या, लेख, मुलाखती प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध होत आहेत. खरे तर कुठल्याही नव्या आजाराबद्दल सर्वसामान्यांमध्ये भीतियुक्त उत्सुकता असणे साहजिकच आहे. पण, अतिउत्साहात दिलेली माहिती सतर्कतेपेक्षा भीती अधिक वाढवते. त्यामुळे अनेकदा साथीपेक्षा ही भीतीच जास्त घातक ठरते. या निमित्ताने काही वर्षांपूर्वी ‘स्वाईन फ्लू’च्या नावाने जो काही गोंधळ व सर्वसामान्यांची फसवणूक झाली, त्याची आठवण झाल्यावाचून राहात नाही.

‘स्वाईन फ्लू’च्या वेळी सोशल मीडिया आजच्या इतका प्रबळ नव्हता, पण इबोला हा जणू काही सोशल मीडिया नावाचा ‘चांदीचा चमचा’ तोंडात घेऊनच जन्माला आला आहे. इबोलाचे नशीब स्वाईन फ्लूपेक्षा थोर, की त्याला ‘वायरल’ करण्यासाठी आज वॉट्सअप सज्ज आहे. इबोलामुळे कर्नाटकातील क्षितिज हा एमटेकचा विद्यार्थी कसा बळी गेला, इथपासून ते तुळशीचा वापर इबोलासाठी कसा करावा, असा मजकूर गेले कित्येक दिवस अनेक माध्यमांतून फिरतो आहे. मुळात काही आफ्रिकी देशांत तुरळक प्रमाणात आढळणारा इबोला भारतात येण्याची तिळमात्र शक्यता नाही, हे कोणीतरी ठामपणे सांगायला हवे.

इबोलाची भीती कायमची मनातून घालवण्यासाठी काही गोष्टी आपण समजून घ्यायला हव्या. हा आजार बाधित व्यक्तीकडून इतरांना ‘बॉडी सिक्रिशन्स’ म्हणजेच धातूंमधून पसरतो. हा आजार इतर आजारांप्रमाणे हवेमधून किंवा पाण्यातून पसरत नाही. त्यामुळे ज्या देशांमध्ये हा आजार आहे, तिथून वार्‍याने किंवा दूषित पाण्यातून तो भारतात पसरेल व मोठी साथ येऊन अनेक मृत्यू होतील, अशी भीती बाळगण्याचे काही कारण नाही. जरी एखादा इबोला बाधित परदेशी नागरिक भारतात आलाच, तर वैद्यकीय शुश्रूषा करणारे सोडून इतरांचा रक्त, मल-मूत्राशी संपर्क येणे कठीण आहे. जंतुसंसर्गापासून ते लक्षणे िदसेपर्यंत सहसा इबोला इतरांपर्यंत पसरत नाही. तसेच सध्या विमानतळावर परदेशी नागरिकांचे ‘थर्मल स्क्रिनिंग’ करण्यात येत आहे. याचा काही उपयोग नाही. तसेच इबोला बाधित व्यक्ती इतकी आजारी असेल की, ती विमानप्रवासच करू शकणार नाही. फार तर लक्षणांच्या आधारे परदेशी नागरिकांचे स्क्रिनिंग शक्य आहे. पण सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी ही इतर अनेक आजारांमध्ये दिसून येतात. ते रुग्ण गंभीर होऊ नये व त्यांनी स्वत:च इतरांशी रक्त, मल-मूत्राचा संबंध येऊ देऊ नये, एवढेच काय ते करता येऊ शकते. पण आधी सांगितल्याप्रमाणे याची शक्यता फारच कमी आहे.

सध्या बर्‍याचदा ‘इबोला’चा संशयित रुग्ण हा शब्दप्रयोग केला जातो. मुळात, इबोलासारख्या आजारांसाठी असे शब्द खूप जपून वापरायचे असतात. सर्दी, खोकला, डोकेदुखी ही लक्षणे असलेले सर्वच रुग्ण मग ‘इबोला’चे संशयित आहेत, असे म्हणावे लागेल. म्हणूनच ‘संशयित’ संज्ञा या आजारापुरती आम्ही पडताळून पाहायला हवी. जर ‘इबोला’ आहे, हे रक्ताच्या चाचणीतून सिद्ध झालेल्या रुग्णाशी गेल्या वीस दिवसांत रक्त, मल-मूत्र किंवा इतर शरीरातील सिक्रिशन्सचा नक्की संपर्क आला असेल व मग त्याला सर्दी, खोकला, अंगदुखी ही लक्षणे दिसत असतील तरच तो संशयित ठरतो. मुळात अजून तरी भारतात असा एकही रुग्ण न आढळल्याने ‘संशयित’ हा शब्द आपण सर्वांना इथून पुढे इबोलाच्या बाबतीत जरा जपूनच वापरावा.

दुर्दैवाने भारतात इबोलाची साथ आलीच, असे गृहीत धरू या; तरीही घाबरण्याचे मुळीच कारण नाही. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील ‘साथींचे भवितव्य’ ही संकल्पना सर्वांनी नीट समजून घ्यावी. कुठलीही साथ आली की सुरुवातीला काही दिवस मृत्यू होतात. नंतर मृत्यू थांबतात, व साथ सौम्य स्वरूपात सुरू राहते.
कॉलराची काही वर्षांपूर्वी मोठी साथ आली होती. सुरुवातीला काही मृत्यू झाले. ‘एलटॉर’ जातीच्या कॉलराची ही साथ अजूनही सुरू आहे. पण त्याची चर्चा होते का?

एकेकाळी अहोरात्र चर्चेचा विषय ठरलेल्या ‘स्वाईन फ्लू’चे काय झाले? त्यातच इबोला हा व्हायरल आजार आहे. कुठलाही व्हायरस हा बहुरूप्यासारखे रंग बदलत असतो. म्हणजे संक्रमित होत असतो. म्हणून आफ्रिकेतील जीवघेणा इबोला भारताच्या साथीत तसाच वागेल, असे नाही.

यापूर्वी स्वाईन फ्लूच्या साथीत काय किंवा आता इबोलाच्या निमित्ताने हात स्वच्छ धुवा, खोकताना तोंडासमोर रुमाल धरा, पौष्टिक आहार घ्या, असे जे काही खबरदारीचे उपाय सांगितले जातात; त्यासाठी आम्हाला या आजारांचे निमित्त कशाला हवे आहे. या साथी असो किंवा नसो, हे नियम आम्हाला रोज पाळायचेच आहेत.

एकही रुग्ण न आढळलेल्या इबोलाविषयी आम्ही एवढी चर्चा करत आहोत. भारतात दर मिनिटाला पाच बालकांचा मृत्यू होतो. यातील ६० टक्के मृत्यू हे कुपोषणामुळे होतात. दर तासाला एक व्यक्ती मलेरियाने दगावते. पण आपण मच्छरदाणीचा प्रचार वा चर्चा बातम्यांमधून व वॉट्सअॅपवर करत नाही. कुठल्याही नव्या आजाराबद्दल भारतात अचानक घबराट पसरणे, नवे नाही. आधी सार्स, मग बर्ड फ्लू, मग स्वाईन फ्लू व आता इबोला. १९९४मध्ये तर सुरतमध्ये प्लेगविषयी एवढी घबराट पसरली, की हजारो लोक सुरत सोडून गेले. सुरतमध्ये दोन महिन्यांत २६० दशलक्ष डॉलर एवढे नुकसान या साथीच्या भीतीने केले. मुळात, ती साथ प्लेगची नव्हतीच, अशी शंकाही त्या वेळी संशोधकांनी उपस्थित केली होती.

नव्याचा ध्यास हा कल्पना व सृजनांच्या बाबतीत योग्य आहे. पण आजारांच्या बाबतीत जुन्या आजारांना प्राथमिकता क्रमप्राप्त आहे, याचे भान सगळ्यांनीच ठेवणे आवश्यक आहे.
amolaannadate@yahoo.co.in