आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचे आरोग्य धडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
16 मे रोजी देश लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या धामधुमीत आकंठ बुडालेला असताना, ‘मोदी-आशावादाचा’ धक्कादायक अनुभव आला. म्हणूनच मोदींचा आरोग्याशी संबंध जोडण्याचा मोह मला टाळता येत नाही. 16 मेच्या मध्यरात्री सहा वर्षांचे अत्यवस्थ मूल अतिदक्षता विभागात दाखल झाले. अंगावर आलेले पुरळ गोवर आहे, असे स्वत:च ठरवून गोवर असेल तर रुग्णालयात न्यायचेच नसते, या गैरसमजापोटी मूल घरीच ठेवून त्याला मृत्यूच्या दारात सोडण्याचे काम पालकांनी केले होते. 17 मेची सकाळ उजाडली. व्हेंटिलेटरवरही मूल उपचारांना प्रतिसाद देईना, तेव्हा पालकांना समजून सांगायला केबिनमध्ये बोलावले. ‘‘बाळ खूपच सीरियस आहे आणि वाचण्याची शक्यता नाही,’’ असे सांगितल्यावर रुग्णाच्या नातेवाइकाने दिलेले हे उत्तर धक्कादायक होते - ‘‘डॉक्टरसाहेब, काळजी करू नका, ‘अबकी बार मोदी सरकार आहे, बाळ, नक्की वाचेल!’’ मोदींनी देशाला दिलेला हा आशावाद नक्कीच प्रशंसनीय आहे, पण या नातेवाइकांच्या उत्तरातील आशावादाची सीमा घातकही आहे, हेही मला त्या क्षणी जाणवले. तीन दिवस उपचार न घेता मृत्यूच्या दारातून मोदी सरकार आपले बाळ ओढून आणेल, अशा भ्रमात असलेल्या देशाला, मोदींना अजून भरपूर आरोग्यधडे द्यावे लागणार आहेत. कारण देशाचे आरोग्य आणि सरकारी आरोग्यव्यवस्था आज माझ्याकडे दाखल झालेल्या त्या बालरुग्णासारखीच मृत्यूशी झुंज देत आहे. बालमृत्यू आणि मातामृत्यूंचे देशातले प्रमाण अजूनही चिंताजनक आहे. म्हणूनच मोदींसह आपणा सर्वांनाच अजून अनेक आरोग्यधडे गिरवावे लागणार आहेत.

मोदींनी केलेल्या प्रचाराच्या झंझावातातून मार्केटिंग गुरू धडे घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण डॉक्टर म्हणून या दौºयातील दोन धडे मला महत्त्वाचे वाटतात. माझ्या माहितीनुसार अख्ख्या प्रचार दौ-यात मोदी उकळलेले व सोबत असलेले स्वच्छ पाणी पीत. एकाही ठिकाणी कोणी दिलेले पाणी ते प्यायले नाहीत. मोदींसह देशातील 50 टक्के जनतेला जरी स्वच्छ पिण्याचे पाणी मिळाले तरी देशात रुग्णालयांच्या 50 टक्के खाटा रिकाम्या होतील. मोदी रोज दुपारी घरून आणलेला आणि रात्री गांधीनगरच्या घरात दाल-खिचडी एवढा साधा आहार घेत. पिझ्झा आणि बर्गरवर ताव मारताना गेल्या पंधरा वर्षात ते कोणाला दिसले नाहीत. एका हाताने पिझ्झा, बर्गर खात दुसºया हाताने ‘अबकी बार’ व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड करणा-या व मोठ्या प्रमाणावर मोदींना पाठिंबा दिलेल्या तमाम मध्यमवर्गाने एवढे जरी मोदींकडून शिकले तर हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या प्रतिबंधासाठी येत्या पाच वर्षांत मोदींना फारसे काही करण्याची गरज राहणार नाही.

आता गुजरातमधून अमित शहांनंतर मोदींचे सर्वात निकटवर्तीय कोणी असेल तर तो म्हणजे त्यांचा स्वयंपाकी. दिल्लीत मोदींच्या आयुष्यात कोणा मंत्र्यापेक्षाही स्थान पक्के असेल तर या स्वयंपाक्याचे. आज देशभरातील हॉटेल व घरांमधील स्वयंपाकी जंतुसंसर्गाचे महत्त्वाचे स्रोत आहेत. आम्ही के. ई. एम. रुग्णालय व जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना, सहज मेसमधील स्वयंपाक्यांची मलतपासणी केली. प्रत्येकाच्या मलतपासणीत जंत आढळून आले. तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याची पोटदुखीमुळे बाह्यरुग्ण विभागात एक तरी वारी व्हायची. स्पष्ट बहुमतामुळे मित्रपक्षांच्या पोटदुखीची व्यवस्था झाली आहे, पण देशाची पोटदुखी घालवण्यासाठी मोदींनी स्वत:च्या स्वयंपाक्यासह देशभरातील स्वयंपाक्यांना सलग तीन दिवस ‘अलबंडे झाले’ ही जंतांची गोळी द्यावी. तसेच चौथ्या वर्षानंतर देशभरातील मुलांना दरवर्षी मोदींच्या वाढदिवशी जंताची एक गोळी जरूर द्यावी.

20 मे रोजीचे पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकून खूप आशावाद निर्माण होऊन ‘एन्डॉर्फिन’ हा शरीरात आनंद निर्माण करणारा संप्रेरक मोठ्या प्रमाणात स्रवला. पण रुग्णालयाच्या रिसेप्शनवर भाषण ऐकत उभे असताना अतिदुर्गम भागातील भिल्ल समाजातील एक दिवसाचे बाळ घेऊन पालक धावत आले. भाषण ऐकणे अर्धवट सोडून बाळ तपासले, तर बाळाला ‘निओनेटक टिटॅनस’ असल्याचे आढळून आले. 50 वर्षांपासून टिटॅनसची लस मोफत दिली जाते आहे, तरी आज टिटॅनस हा आजार भारतात आढळणे म्हणजे स्वतंत्र भारतावर एक न पुसता येणारा डाग आहे.

असे आरोग्यव्यवस्थेतील अनेक डाग पुसण्याची मोठी आव्हाने आज देशासमोर आहेत. ही सर्व जबाबदारी एकट्या मोदींवर झटकून चालणार नाही. मोदी मोफत लस देऊ शकतील, पण ती घेण्यासाठी तरी आम्हाला पुढे यावे लागेल. मोदी कदाचित स्वच्छ पाणी देतील, स्वच्छतागृहे बांधून देतील, पण उघड्यावर प्रातर्विधी करण्याचे आम्हालाच थांबवावे लागणार आहे. मोदी सकाळी लवकर उठून देशाच्या कारभारावर लक्ष ठेवतील, पण सकाळी उठून मोकळ्या हवेत फिरायला जाण्यासाठी आम्हालाच उठावे लागणार आहे.