आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेक्सपियरचा झिंग देणारा म्हातारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘कल्पनेची संजीवनी देऊन मिथकं पुन्हा जिवंत करायची असतात.’ म्हणाला होता, अल्बेर कामू. त्याचप्रमाणे ‘किंग लिवर’ला ‘शेक्सपिअरचा म्हातारा’ या नाटकात जिवंत करण्यात आलं आहे. मकरंद देशपांडेंनी साकारलेला हा म्हातारा कलात्मक झिंग देणारा आहे...
शेक्सपिअरला पुरून या वर्षी ४०० वर्षं झाली. तरीसुद्धा शेक्सपिअर पुरून उरला आहे, समस्त लेखकांसाठी, एक ‘मिथक’ होऊन! त्याच्या ललितकृतीसुद्धा तशाच झाल्या आहेत. ‘कल्पनेची संजीवनी देऊन मिथकं पुन्हा जिवंत करायची असतात’ म्हणाला होता, अल्बेर कामु. त्याचप्रमाणे ‘किंग लियर’ला ‘शेक्सपिअरचा म्हातारा’ या दोन अंकी नाटकात जिवंत करण्यात आलं आहे. या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक व मुख्य अभिनेते आहेत, मकरंद देशपांडे. पृथ्वी फेस्टिवलमध्ये या नाटकाचा प्रयोग जुहू इथल्या प्रसिद्ध ‘पृथ्वी थिएटर’मध्ये पाहिला. एक विलक्षण अनुभव होता तो. एकविसाव्या शतकात सतत वाढत्या जेष्ठ नागरिकांच्या संख्येत माझ्यासारख्या सामान्य आस्वादकाला हे नाटक पाहताना जे वाटलं ते असं...

हा सम्राट आता म्हातारा झाला आहे. कितीतरी लढाया जिंकून, प्रदेश काबीज करून, साम्राज्य निर्माण करून. विकलांग होत चाललेल्या त्याच्या अंगावर कितीतरी जखमा झाल्या आहेत. असा थकलेला सम्राट विलक्षण ताकदीनं मकरंद देशपांडे यांनी उभा केला आहे. तो पाहात असताना मला वाटलं, प्रत्येक माणूस हा ओसाडगावचा का होईना पण ‘किंग लियर’ असतो. तो जीवनात अनेक संग्राम खेळतो. स्वत:चं साम्राज्य निर्माण करण्याचा यत्न करतो. जखमा होतात. व्रण होतात. पण माणूस म्हणजे कोण? माणूस म्हणजे मानवी शरीर. ‘मला शरीर आहे असं नसून मीच शरीर आहे’ असं विचारवंत-लेखक ख्रिस्तोफर हिचेन्स म्हणाला होता. मानवी शरीर म्हणजेच, सम्राट. या शरीराच्या आधारे माणूस शरीराच्या नाना ‘आयडेंटिटीज’ निर्मितो. बाप, मुलगा, आई, बहीण, शिक्षक, डॉक्टर. एकाच्या अशा अनेक ‘आयडेंटिटीज’ एकाच वेळी अस्तित्वात असतात समाजात, कुटुंबात.
या सम्राटाला तीन मुली असतात. या तीन मुलींच्या भूमिका तीन अभिनेत्रींनी अप्रतिम साकारल्या आहेत. त्या पाहात असताना माझ्या मनात हे रुपक रूप घेत होतं. हा सम्राट त्याच्या आयडेंटिटीज निर्मितो प्रज्ञा, भावनिकता, व तर्कबुद्धी यांच्यासाठीच. माणसाला मिळालेल्या या तीन नैसर्गिक क्षमता. ज्याच्या-त्याच्या कुवतीप्रमाणे या तीन क्षमतांचं ‘समाधान’ वा पूर्ती माणसाला करावीच लागते. त्याच्या तीन मुली हे त्यांचं रूपक.
या सम्राटाबरोबर असतो त्याचा विदूषक. या विदूषकाचं काम एका तरुण अभिनेत्याने खुलून केलं आहे. त्याला दाद द्यायलाच हवी. हा विदूषक म्हणजे, सम्राटाचा ‘अल्टर इगो’, ‘अपरस्व’. तो त्याच्या बरोबर सावलीसारखा असणार, कारण तो त्याचाच भाग. तो जागल्याचं काम करतो. सम्राटाच्या चुका, मूर्खपणा दाखवतो. म्हणूनच कदाचित राजाच्या मोठ्या व मधल्या मुलींना तो मुळीच आवडत नाही. सगळ्यात धाकटी तर्कबुद्धी, ती राजाला बाप-मुलीच्या प्रेमाबद्दल खरं काय ते उलगडून दाखवते. राज्याचे भाग करून मुलींना वाटू नको, असा सल्ला देते. विदूषकही तेच सांगतो. सर्वात धाकटी राजाची लाडकी, पण आज ती दोडकी होते. तिला देशोधडीला लावलं जातं. राज्याच्या दोन भागांवर दोन मुलींचं राज्य येतं. राजाला वनवासात जायला त्या भाग पाडतात. तर्कबुद्धीला तडिपार करणं, हीच खरी शोकात्मिका ठरते.
इथं पहिला अंक संपतो. पण मानवी शरीराचं ऱ्हसन आणि जीवनात तगून राहण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, हे सनातन आहे. शतकामागून शतकं गेली तरी, त्याचे आविष्कार चालूच राहतात. नाटकाच्या दुसऱ्या अंकात याचंच दर्शन घडतं. एक म्हातारा निवृत्त हेडमास्तर आणि त्याच्या तीन वाभ्रट मुली, यांची तीच कथा व व्यथा; एकविसाव्या शतकातील. आता शब्द बदलले आहेत, पण अर्थ तोच राहिला आहे. आईबापाचं आणि मुलांचं पटत नाही, त्याला आता ‘जनरेशन गॅप’ म्हणतात. नवीन तंत्रज्ञानाचं व जागतिकीकरणाचं परिमाण त्याला मिळालेलं आहे. तेच संदेश, तेच संपर्क, पण ते साधण्याच्या पद्धती बदलल्या. वॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, स्काइप, ऑनलाइन.... जग हाच एक रंगमंच. मग प्रत्येक माणूस हा एक नट असणारच.
तो निरनिराळ्या भूमिका त्याच्या जीवनात करतो. त्याचा ड्रेस बदलतो, भूमिका त्याच राहतात. म्हणून तर म्हटलं आहे, ‘बदल’ हीच एक ‘स्थिर’ गोष्ट आहे.
पूर्वार्धातील विदूषक उत्तरार्धात म्हाताऱ्या हेडमास्तरचा विद्यार्थी होतो. ‘डॉक्टरेट ऑफ ह्युमरस ड्रामा’ या विषयाचा ‘पीएचडी’ होऊन अवतरतो. विदूषक-पीएचडी, वा!! शेक्सपिअरच्या काळात प्रेक्षक जसे टोपी उडवत असत, तसंच हे रूपांतर पाहून मी माझी काल्पनिक टोपी उंच उडवली.
म्हाताऱ्या हेडमास्तरची धाकटीवर जास्त माया. मोठीला व मधलीला ते आवडत नाही. प्रॉपर्टी तिला मिळेल, ही भीती. त्या दोघी बापाला घराबाहेरचा रस्ता दाखवतात. पीएचडी आणि हेडमास्तर रस्त्यावर भटकतात. भीक कशी मागायची, दोघं तालीम करतात. भीक मागताना वाद्य कोणतं, भाषा कोणती वगैरे गमतीदार. त्याच वेळी रस्त्यावर कविता साने ही व्यक्तिरेखा येते. कुमारवयातून तारुण्यात पदार्पण करणारी ही मुलगी. हिची भूमिका एका अभिनेत्रीनं बहारदार केली आहे. ‘मॉड’ इंग्रजाळलेली, तिची देहबोली, तिचं इंग्लिश डिक्शन काहीसं अमेरिकी थाटाचं, शब्दाला जोड हातवाऱ्याची. अगदी संस्कृती-संकराचं प्रतीक. तिच्या विश्वाचा एक भाग ‘सिलॅबस’मध्ये अडकलेला, तर दुसरा सोशल मीडियात. ही व्यक्तिरेखा, हे नवीन उमलणाऱ्या कोंभाचं प्रतीक असं मला वाटलं.
‘जे जे आकारासी आले, ते ते पाहिजे नष्टले’ हे जसं सत्य त्याचप्रमाणे ‘नवनवे आकारासी येते’, हेही तितकंच सत्य. एका सत्याने अस्वस्थ व्हायचं का दुसऱ्यानं उल्हसित, हे ज्याचं त्यानं ठरवायचं. नाटकाच्या अंतास आपण परत सम्राटाच्या काळात येतो. मोठ्या व मधल्या मुलीत घनघोर युद्ध होतं. धाकटी बळी पडते. तिचं शव थकल्या पाठीवर घेऊन सम्राट येतो, आणि तोही कोसळतो. विविध स्तरावर कलात्मक झिंग देण्याचं बळ मकरंद देशपांडे यांच्या शेक्सपिअरच्या म्हाताऱ्यात आहे, याचं कारण
तसा जोम आणि जोर शेक्सपिअरच्या मूळ नाटकात आहे, हे विसरता येणार नाही.
बातम्या आणखी आहेत...