आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Arun Baari Article About Teeth, Divya Marathi

दातांची स्वच्छता : एक न संपणारी क्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दात हा वारंवार अस्वच्छ होणारा मानवी शरीराचा अवयव आहे. म्हणूनच तो पुन्हा-पुन्हा स्वच्छ करावा लागतो; पण नेमक्या याच गोष्टीकडे बहुतेक जणांचे दुर्लक्ष होते. मग त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. दात किडण्याचे प्रमाण 55 टक्के व हिरड्यांच्या विकारांचे प्रमाण 70 ते 80 टक्क्यांच्या आसपास असल्याचे आढळून आले. फरक एवढाच की, सधन देशांमध्ये दंतचिकित्सेसाठी भरपूर खर्च केला जातो व अविकसित देशांमध्ये बहुधा त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

टूथपेस्टपेक्षा ब्रश केव्हा आणि कसे करता हे जास्त महत्त्वाचे : चीनमधील अतिदुर्गम, डोंगराळ व 15 ते 20 हजार फूट उंचीवरील थंड प्रदेशात लोक दात ब्रशच करत नाहीत. दात स्वच्छ ठेवण्यासाठी मी कोणती टूथपेस्ट वापरू? हा नेहमीच विचारला जाणारा प्रश्न असतो; परंतु खरेतर टूथपेस्टपेक्षा तुम्ही ब्रश करता की नाही व करीत असल्यास केव्हा आणि कसे, हे जास्त महत्त्वाचे असते.

ब्रश करण्याची पद्धत : अनेक लोक चुकीच्या पद्धतीने ब्रश करुन त्यानंतर होणार्‍या त्रासामुळे ब्रश वापरणेच बंद करतात. बोटाने मंजनचा वापरही करण्यात येतो; मात्र त्याने दातांच्या फटीत अडकलेले अन्नकण निघू शकत नाहीत. शास्त्रीय पद्धतीने ब्रश केला असता अन्नकण निघून जातात व दातांना हानीसुद्धा पोहोचत नाही. कारण ब्रश केवळ दात स्वच्छच करत नाही, तर हिरड्यांना उत्तेजित करून त्यांचा रक्तप्रवाहही वाढवतो. त्यामुळे हिरड्या मजबूत होतात. म्हणून नेहमी दात ब्रशनेच शास्त्रीय पद्धतीने साफ करावेत. बोटाने हिरड्यांना मालिश करावी. त्याचप्रमाणे हिरड्यांतून रक्त येते म्हणूनही काही लोक ब्रश वापरणे बंद करतात. अशा लोकांनी दंतवैद्यांना भेटून हिरड्यांवर इलाज करून घ्यावा व त्यानंतर ब्रश वापरणे पुन्हा सुरू करावे.

दात घासणेपेक्षा दात विंचरणे हे अपेक्षित : खरे तर दात ‘घासणे’ हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. त्याऐवजी दात ‘विंचरणे’ हा शब्दप्रयोग अधिक योग्य ठरू शकतो. कारण दात स्वच्छ करतेवेळी ते आपसात घासणे अपेक्षित नाही, तर ब्रशने दातांच्या फटीतील अन्नकण काढून टाकणे अपेक्षित आहे. म्हणूनच ब्रश करताना तो वर-खाली व दातांच्या फटींच्या दिशेने फिरवणे आवश्यक आहे. बहुतेक लोक बाहेरून ब्रश करतात व दातांची आतील बाजू तशीच राहू देतात. चीनमध्ये शिक्षक व शालेय विद्यार्थ्यांना दंत आरोग्याबद्दल मी माझ्या भाषणात सांगत असे की, हे म्हणजे एखाद्या भांड्यात स्वयंपाक केल्यानंतर ते बाहेरूनच घासून आत मात्र खरकटे ठेवण्यासारखे आहे.

काही गैरसमज, डेंटल फ्लॉस महत्त्वाचे : दात स्वच्छ ठेवायचे म्हणजे नुसतेच ब्रश करून चालत नाही, तर त्याही पुढे जाऊन दोन दातांच्या संपर्क स्थानात पोहोचून तेथील अदृश्य कीटक काढण्याचे जिकिरीचे कामही पार पाडावयास हवे. त्यासाठी ‘डेंटल फ्लॉस’ म्हणजे रेशमासारखा मजबूत धागा वापरायला हवा. मेडिकलच्या दुकानांमध्ये तो उपलब्ध असतो. आपल्या दंत-मुख आरोग्याविषयी जागरूक असलेले लोक हे सर्व तर करतातच; पण दंतवैद्यांकडे नियमितपणे जाऊन मशीनने दात स्वच्छही करून घेतात. शेवटी महत्त्वाचे म्हणून, दात हे अन्नाच्या संपर्कात जास्त वेळ राहिल्यामुळेच किडतात.

ब्रशसाठी दोन-तीन मिनिटे पुरेशी.., जिभेवरूनही ब्रश करणे आवश्यक त्यासाठी ‘टंग स्क्रॅपर’सुद्धा फायदेशीर : ब्रश व पेस्ट न परवडणार्‍या भारतासारख्या विकसनशील देशात अनेक ठिकाणी कडूनिंब किंवा बाभळीच्या काडीचे दातून वापरतात. बोटाने मंजन करण्यापेक्षा हे खूप चांगले आहे. खरे तर जास्त वेळ ब्रश करण्यानेसुद्धा दातांची हानी होऊ शकते. त्यामुळे ब्रश करण्यासाठी दोन-तीन मिनिटे पुरेशी असतात. शक्यतो प्रत्येक जेवणानंतर व झोपण्यापूर्वी ब्रश करण्याचा आळसपणा बर्‍याचदा दिसून येतो. तसेच जिभेवरूनही ब्रश करणे आवश्यक असते. त्यासाठी ‘टंग स्क्रॅपर’सुद्धा फायदेशीर असते. तोंडातील लाळेमुळेही दात स्वच्छ ठेवण्याची क्रिया नैसर्गिकरीत्या चालू राहते. कमी पाणी पिणार्‍यांमध्ये कमी लाळ व अस्वच्छ, किडलेले दात पाहावयास मिळतात. साखर नसलेले च्युइंगम चघळल्याने लाळही सुटते व दातही स्वच्छ होतात. ‘दातांची स्वच्छता’ या विषयावर कितीही काथ्याकूट केला किंवा कितीही वेळ च्युइंगम चघळले तरी कमीच होईल.