आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकीच्या शत्रूसंगे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. भरत केळकर हे ‘डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स’ या आंतरराष्ट्रीय संस्थेसाठी कार्य करणारे भारतातील काही मोजक्या डॉक्टरांपैकी एक आहेत. तीन-चार वर्षांपूर्वी त्यांनी सििरया आणि गेल्या वर्षी येमेनच्या सीमेवर जाऊन युद्धग्रस्तांची सेवा केली होती. हिंसेने पोळलेल्या माणसांच्या आयुष्याला नव्याने अर्थ देण्यासाठी धडपडणाऱ्या डॉ. केळकरांनी मांडलेले हे विदारक अनुभव...

तसा मी हाडांचा डॉक्टर... वेदनांना सामोरं जाणं मला नवीन नाही, परंतु ‘रामथा’पासून जवळच असलेल्या झतारी या गावात उभारलेल्या रुग्णालयात त्या दिवशी जे काही माझ्या समोर घडलं ते खूपच अस्वस्थ, बेचैन करणारं आणि हादरवणारं होतं...
 
भूसुरुंगाच्या स्फोटात जखमी झालेली दोन कोवळी मुलं... एक पाच तर त्याचाच मोठा भाऊ सात वर्षांचा... भूसुरुंगावर पाय पडल्याने अचानक मोठा स्फोट झाला आणि बॉम्बचे शार्पनेल त्यांच्या सबंध शरीरात घुसले होते. अंगावर जागोजागी भाजल्याच्या जखमा झाल्या होत्या. छोट्याचे दोन्हा पाय व उजव्या हाताचा पंजा पार निकामी झाला होता. मात्र त्याचे प्राण वाचवण्यासाठी दोन्ही पाय व हाताचा पंजा कापून काढण्यावाचून दुसरा पर्यायच नव्हता. काही तासांपूर्वी स्वत:च्या पायावर उड्या मारू शकणाऱ्या या गोबऱ्या गालाच्या निरागस कोवळ्याचे दोन्ही पाय मी कापून टाकले होते. वैद्यकीय क्षेत्रातल्या इतक्यावर्षांच्या अनुभवात पहिल्यांदाच मला भडभडून आलं...
 
वॉर वुंडेड पेशंट्सचे (युद्धात जखमी झालेले रुग्ण) एक भयावह रूप मी पहिल्यांदाच पाहात होतो.

रामथा हे जॉर्डनच्या सीमेवरील एक छोटंसं गाव. सीरियाची सीमा तेथून अक्षरश: पाच ते सात किलोमीटरवर आहे. याच सीमेवरच्या झतारी या गावात यादवीने होरपळलेल्या सिरियातल्या निर्वासितांची छावणी आहे आणि म्हणूनच ‘डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स’ या संस्थेने म्हणजे मेडिसिन्स सान्स फ्रंटियर्स - एमएसएफने युद्धात जखमी झालेल्यांवर उपचार करण्यासाठी येथे एक रुग्णालय उभारले आहे. ही संस्था आज जगभरातल्या जवळपास ७० देशांमध्ये रुग्णसेवेचं काम करते. यातले काही देश युद्ध किंवा यादवीने होरपळलेले आहेत, तर काही देशांमध्ये साथीच्या रोगांनी थैमान घातलेलं आहे. या संस्थेला १९९९मध्ये  शांततेसाठीचं नोबेल पारितोषिक मिळालं आहे. अलिप्तता अन् मौन सोडून प्रत्यक्ष संकटस्थळी धावून जाण्याचा थेटपणा हे या संस्थेचं वैशिष्ट्य. या हाकेला साद देऊन जगभरातले असंख्य डॉक्टर्स ‘एमएसएफ’कडे अर्ज करतात आणि त्यापैकीच मी एक डॉक्टर...

जॉर्डनमधून मी महिनाभराने भारतात परत आलो तरी त्या मुलाची सध्याची अवस्था काय आहे, याकडे माझे लक्ष होतेच. त्या मुलाला कृत्रिम पाय लावून फिजियोथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली चालण्याचे प्रशिक्षण देण्यात असल्याचा एक व्हिडिअो जॉर्डनमधील रामथा गावच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी मला नंतर पाठविला. तो पाहून मनाला समाधान वाटले. या दोन्ही मुलांना ज्या माणसाने सिरियाची हद्द ओलांडून रामथा रुग्णालयात आणले होते, तो खरे तर त्यांचा शेजारी होता. या दोन मुलांची आई गर्भवती होती. मुलांचे वडील बॉम्बहल्ल्यात जखमी झाल्याने सिरियातील एका रुग्णालयात उपचार घेत होते. त्यामुळे या दोन मुलांना उपचारांसाठी कोणीतरी रुग्णालयात नेणे गरजेचे होते. ते काम या शेजाऱ्याने केले. प्रथम तो आम्हाला मीच या मुलांचा पिता आहे, असे सांगत होता. मग मात्र त्याने आपण या मुलांचे शेजारी आहोत, असे खरे सांगून टाकले. मानवतेचा झरा सीमा ओलांडूनही कसा वाहता राहतो, याचे दर्शनच मला या अनुभवातून घडले.

सिरियाच्या यादवीमध्ये बॅरल बॉम्बचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असे. समजा, हा बॉम्ब पडलेल्या घरामध्ये सात-आठ जणांचे कुटुंब राहात असेल तर त्यातील दोघे-तिघे जण जागीच ठार झालेले असायचे. त्यातील बाकीच्या चार-पाच सदस्यांपैकी जो अितशय गंभीर जखमी असेल त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाही प्रकृती ढासळत जायची व शेवटी तो मरण पावायचा. जे उरलेले जखमी असायचे त्यांचे अवयव या बॉम्बहल्ल्यात निकामी झालेले असायचे. त्यामुळे  कायमचे अपंगत्व येणे हे ठरलेलेच. एकदा बॉम्बस्फोटामध्ये एक कुटुंबच रुग्णालयात उपचारांसाठी आले. 
 
बॉम्बस्फोट झाला तेव्हा त्यांच्या कुटुंबातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्या कुटुंबातील जे जखमी रुग्णालयापर्यंत येऊन पोहोचले त्यापैकी दोघांनी तिथे प्राण सोडले. कुटुंबातील तीन व्यक्ती वाचल्या. त्यात एक महिला दोन तरुण होते. त्यांच्या जखमा कालांतराने बऱ्या झाल्या असतील; पण मनावर उमटलेल्या जखमा कधी भरून निघाल्या असतील का? असा प्रश्नही मला पडला होता. 
********* 
जॉर्डनमध्ये रामथाच्या आमच्या रुग्णालयापासून झतारी येथे सिरियातील निर्वासितांसाठी एक प्रचंड छावणी उभारलेली होती. झतारीच्या छावणीत मी आठवड्यातून दोनदा जात असे. कोणत्याही निर्वासित छावणीचे दृश्य डोळ्यासमोर आणले तर सर्वप्रथम नजरेत भरते ती तेथील अस्वच्छता. पण झतारीच्या छावणीत अगदी वेगळे दृश्य होते. तिथे दृष्ट लागावी अशी स्वच्छता राखण्यात आलेली होती. तेथील एक अनुभव माझ्या मनावर कोरला गेला आहे. या छावणीतील एका आइसक्रीमच्या दुकानापाशी गेलो. आइसक्रीम खरेदी केल्यानंतर त्या दुकानदाराला पैसे देऊ लागलो तर तो ते घेईना. एमएसएफ या संस्थेचा लोगो असलेला टीशर्ट त्या वेळी मी घातला होता. त्यावरून मी सेवाकार्यासाठी तिथे आलेला डॉक्टर आहे, हे त्या दुकानदाराने ओळखले होते. तो अतिशय कृतज्ञभावाने माझ्याकडे बघत होता. मी त्याला विनंती केली की, माझ्या सोबत एक छायाचित्र काढाल का? तर तो चक्क नाही म्हणाला. याचे कारण असे होते की, त्या माणसाचा मूळ व्यवसाय हा काही आइसक्रीम विकण्याचा नव्हता. तो मुळातला एक बडा व्यावसायिक. पण सिरियातील यादवीमुळे तेथील ज्या अनेक संपन्न लोकांनाही विपन्नावस्था अाली, त्यापैकी तोही एक होता. माझ्या बरोबर काढलेला फोटो जर त्याच्या ओळखीच्या लोकांनी बघितला असता त्यांना कळले असते की, हा आता आइसक्रीम विकतो तर त्याला इभ्रतीच्या दृष्टीने ते अयोग्य झाले असते. 
********* 
सिरियाच्या अनुभवानंतर माझ्या गाठीशी अनुभव जमा झाला तो येमेन या देशाचा. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात येमेनमध्ये एक महिनाभरासाठी दाखल झालो. सिरियापेक्षा येमेन हा देश फारच गरीब. मी तिथे गेलो त्याच्या एक वर्ष आधीच भारत सरकारने ‘ऑपरेशन राहत’ ही मोहीम राबवून येमेनमधील ४५०० भारतीयांना सुखरूप भारतात आणले होते. येमेनमध्ये सुरू असलेल्या यादवीत तेथील स्थानिक नागरिक सापडले आहेत. चहुबाजूंनी त्यांची कोंडी झाली आहे. सेवाकार्यासाठी पहिल्यांदा येमेनच्या भूमीवर पाऊल ठेवले, ते साना येथील विमानतळाच्या ठिकाणी. बाॅम्बहल्ल्यामध्ये साना विमानतळाचे अतिशय नुकसान झालेले आहे. येमेनमध्ये बंडखोरांच्या ताब्यात जो प्रदेश आहे, त्यात सानाही येते. सानापासून काही तास अंतरावर असलेल्या तैझ गावामध्ये एमएसएफने एक रुग्णालय उभारले होते. तिथे पोहोचलो. एकदा रुग्णालयात प्रवेश केला, तो सुरक्षिततेच्या कारणांमुळे महिनाभर तिथे आतमध्येच होतो. रुग्णालयाचे प्रवेशद्वार उघडून बाहेर येण्याचा प्रश्नच नव्हता. कारण बंडखोरांचे वर्चस्व असलेल्या भागातच ते रुग्णालय होते. म्हणजे एकदम युद्धजन्य भागातच. त्यामुळे दिवसा रात्री बॉम्बस्फोट यांचे आवाज यायचे. त्या आवाजाची नंतर सवय होऊन गेली. तिथे बहुतेक लोकांकडे एके४७ रायफली ग्रेनेड बेल्ट असायचे. ते रुग्णालयात आले तरी ही शस्त्रसामुग्री बाहेरच्या खोलीत ठेवून मगच ते डॉक्टरकडे यायचे. बॉम्बहल्ल्यात, भूसुरुंगाच्या स्फोटात जखमी झालेले असंख्य रुग्ण तैझच्या रुग्णालयांतही यायचे. येमेनमध्ये अगदी लहान मुलेही शस्त्रे बाळगतच फिरायची. ट्रकसारखी अवजड वाहने चालवितानाही मुले पाहायला मिळाले. तैझमध्ये यादवीमुळे वैद्यकीय सेवा तसेच अन्नधान्य पुरवठा अशा सगळ्याच बाबी कोलमडून पडलेल्या होत्या. अन्न पाण्यासकट सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या होत्या. याचा सर्वाधिक वाईट परिणाम कोणावर होत असेल तर तो गरोदर महिला लहान मुलांवर. अनेक कुटुंबांना आपली घरेदारे सोडून जाण्यासाठी बळजबरी करण्यात आली. त्यामुळे घराचे छप्पर नसलेले असंख्य लोक आता येमेनमध्ये खूप हालाखीचे जिणे जगताना दिसतात. युद्धाच्या खाईत ढकललेल्या देशांमध्ये केवळ वास्तूच बेचिराख होतात असे नाही तर माणसेही सर्वार्थाने उद्ध्वस्त होतात, याचे जवळून दर्शन मला सिरिया येमेन अशा दोन्ही ठिकाणी झाले. 
********* 
माझ्या रामथा आणि येमेनमधील वास्तव्याच्या काळात मी रोज किमान सात ते आठ शस्त्रक्रिया करायचो. गोळ्या किंवा भूसुरुंगामुळे जखमी रुग्ण आला नाही, असा जवळजवळ एकही दिवस उगवला नाही. नाव, वय, लिंग वगळता जखमांचा तपशील तोच. भयानक रक्तस्राव आणि बाहेरून अंदाज येऊ नये एवढ्या तीव्र स्वरूपाच्या अस्ताव्यस्त जखमा. 
 
- bkelkar@gmail.com
शब्दांकन- समीर परांजपे 
 
बातम्या आणखी आहेत...