आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबोधनकारी मीराबाई (डॉ. गणेश चंदनशिवे, रसिक)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलेचा संस्कार आणि परिस्थितीचा रेटा या परस्परभिन्न स्थितीत मीराबाईंच्या हाती खंजिरी आली. त्यातल्या जन्मजात नैपुण्यानेच आयुष्याची वाट सापडली. या वाटेनं समाधान खूप दिलं; स्थैर्य मात्र कधीच मिळालं नाही...

मुक्काम लातूर जिल्ह्यातील देशमुखांच्या बाभुळगाव जवळच्या म्हैसगाव इथला. गावातल्या मंदिरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि दुनेदास महाराज यांचा सामना रंगणार होता. वामनराव उमपांचं बिऱ्हाड गावातल्या पारावर होतं. लहानग्या मीराबाईने बाबाकडे हट्ट धरला, ‘मला मंदिराकडे जाऊ द्या.’ पण तेव्हा दलितांना मंदिर प्रवेश नव्हता. बाबांनी मंदिरात जाऊ द्यायला नकार दिला. बाबा ओरडले. तशीच चुरमाळ्या देत, एका कुशीवर होऊन मीराबाई रडू लागली. तेव्हा तुकडोजी महाराजांचं ग्रामगीतेवरील भजन सुरू होतं... 
‘मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव
देव अशान भेटायचा नाय रं, 
देव बाजारचा भाजीपाला नाय रं’
एकतारीचे सूर आणि खंजिरीचा गजर वाढतच गेला, तसतसी मीराबाई अस्वस्थ होऊ लागली. आईबाबा झोपले, यांची खात्री केली आणि थेट मंदिरात जाऊन महाराजांच्या पुढे उभी ठाकली. महाराजांच्या गीतांचा हातावरच ठेका धरला. तेव्हा तुकडोजी महारांजाची नजर मीराबाईंंवर पडली आणि पुढे बोलवून विचारपूस करायला सुरुवात केली. त्यांनी विचारले, ‘तुला वाजवता येते का?’ तेव्हा मीराबाईंनी मानेनं होकार देऊन बाजूला असलेली खंजिरी उचलली आणि सडकून वाजवायला सुरुवात केली. तुकडोजी महाराज प्रसन्न झाले. त्यांनी खूश होऊन मीराबाईंना खंजिरी बहाल केली...
 
लहानपणी तुकडोजी महाराजांनी खूश होऊन दिलेली खंजिरी मीराबाईंनी आजही जिवापाड जपून ठेवली आहे. तुकडोजी महाराजांच्या आशीर्वादाने गावगाड्याबाहेरच्या कलेचा उत्कर्ष झाला. त्यांनी लोकगायकीचे कुबेरासारखे धन मीराबाईंच्या पदरात टाकले. भारूड, आख्यान, पोवाडा हे सारे मीराबाई भराभर गात सुटली...
 
उभ्या महाराष्ट्रात प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या मीराबाईंचा जन्म मातंग समाजातील वामनराव उमप यांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या एका सामान्य कुटुंबात अंतरवली, ता. गेवराई जि. बीड येथे झाला. घरात सात पिढ्यांचा गायन-वादनाचा वारसा. तो वामनरावांपर्यंत आला. वामनराव आणि त्यांची पत्नी रेशमाबाई हे दोघेही गाणे-बजावणे करून कुटुंबाची उपजीविका करायचे. वामनरावांप्रमाणेच रेशमाबाईचा गळा गोड. त्यामुळे एकदा भजन-कीर्तनाला सुरुवात केली की रात्र कशी सरायची, याचं भान दोघांनाही राहात नसे. तसं उमपांचं घराणं हे गुरू घराणं. संतांचे अभंग, लोकगीते, पोवाडे, कीर्तन हे त्यांना मुखोद्गत होते. 

गाणे-बजावणे करून पोटाची खळगी भरण्यासाठी भिक्षापात्र हातात घेऊन त्यांची गावोगावी रणरण भटकंती सुरू असे. ओटीपोटाशी मीरा, कोमल, अनुसया, जनाबाई, सावित्री या पाच मुली आणि महावीर, दीपक, नामदेव हे तिघे मुलगे, असा अकरा लोकांचा कुटुंबकबिला चालवताना वामनरावांची दमछाक होई. म्हणून मीराबाईंच्या हातामध्ये वयाच्या सातव्या वर्षी भिक्षापात्र आले. शाळेची पायरी तिला चढता आली नाही. बाबा एकतारी वाजवायचे, धाकटा चुलता दिमडी वाजवायचा, आणि मीराबाई गात सुटायची, संत परंपरेतलं भजन -
“माझी गोधडी झाली जुनी, तिला धुवूनी आणा कोणी
सात ताळाची मच्छर दाणी, त्या झोपली मैना राणी
गोधडी झाली जुनी”
 
परिस्थितीच्या रेट्यामुळे मीराबाईंचं गाणं सुरू झालं. पाटीवर पेन्सिलीने अक्षर ओढण्याऐवजी दिमडीवर बोटं थिरकू लागली. पण दिमडीला घरात कुणी हात लावू देत नसे. मग कधी जर्मनची वाटी, तर कधी ताट वाजवत बसणे सुरू राहायचे. वय लहान असल्यामुळे कौतुक नसायचे. तशात भांडण झाल्यामुळे अचानक चुलता घर सोडून गेला. खंजिरी वाजवण्याचा उत्तराधिकारी म्हणून आईच्या सांगण्यावरून, खंजिरी मीराबाईंंच्या हाती दिली. चुणुकदार पोरगी चुलत्यापेक्षा चांगली खंजिरी वाजवत असल्यामुळे कौतुक होऊ लागले. मीराबाईला सोबत घेऊन आई-बाबा गावोगावी फिरू लागले...
 
आजही वयाच्या ६०व्या वर्षी महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांत, गावगाड्यांत मीराबाई दिमडीवरचं भारूड करत फिरते. फक्त पारंपरिक नाही, तर आधुनिक काळात, समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांना आपल्या गायकीच्या माध्यमातून वाचा फोडते. हुंडाबंदी, दारूबंदी, स्त्री-भ्रूणहत्या, एड्स यांसारख्या समस्यांवर भारूड-भजनाच्या माध्यमातून भजन करू लागते. दलित समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने माणूस म्हणून जगण्याची ऊर्मी मिळाल्यामुळे, संत विचारांसोबत बाबासाहेबांना ती आपलं दैवत मानते आणि म्हणते -
“खातो तुपात पोळी भीमा तुझ्यामुळे
डोईवरची गेली मोळी, भीमा तुझ्यामुळे
काखेची गेली झोळी, भीमा तुझ्यामुळे”
 
मीराबाईंच्या या प्रबोधनकारी धाटणीमुळे आणि वैचारिक लोकगायकीमुळे आज ती लोकांच्या गळ्यातला ताईत बनत चालली आहे. अनेक सभा-संमेलनांमधून मीराबाईंचा गौरव होत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर पुरस्कार, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्याचा राज्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी मीराबाईंना गौरवण्यात आले आहे. पण एक खंत त्यांना आजही सतावतेय की, ‘पुरस्काराने पोट कुठं भरतं साहेब? पोटाची खळगी भरण्यासाठी पोटभर कार्यक्रम तरी पाहिजे. कधी दुष्काळाचं सावट, तर कधी आपत्कालीन परिस्थिती यामुळे कुटुंबातील १० ते १२ कलावंतांवर कधीकधी उपासमारीची वेळ येते. मग कधी लोक पार्टी सोडून जातात, तर कधी कुटुंबातलेच लोक परके होतात.’ सध्या चिखलठाण्याच्या आठवडे बाजारात दहा बाय दहाच्या रूममध्ये मीराबाईंंनी आपला संसार थाटला आहे. तुकाराम, अर्चना, कविता, राजू, महावीर, दीपक, साखरबाई, आसागम, कोमल, करण असे १४-१५ लोक मीराबाईंवर निर्भर आहेत. त्यांचे शिक्षण आणि उपजीविका मीराबाईंंच्या गाण्यावर चालते. त्यातले काही जण मीराबाईला गायन-वादनात सहकार्य करतात. 

या सगळ्यांचा तांडा घेऊन मीराबाई म्हणते-
‘केसारी फणी घे, माय काळी पोत मणी घे
आठवाभर जोंधळा दे, तुझ्या बाळाला जाईचं काजळ घे”
मात्र, या वैदीनरूपी मीराबाईंचा प्रवेश मंचावर झाली की, प्रेक्षक आश्चर्यचकित होऊन टाळ्या वाजवतात. मीराबाई एकाच वेळी गायन, खंजिरी वादन, तसेच एकपात्री अभिनयाने चालतेबोलते नाट्यशास्त्र उभे करतात. अलीकडच्या काळात मुलगी, मुलगा आणि जावई साईनाथ हे मीराबाईला आजच्या काळातील व्यावहारिक ज्ञान देताना दिसतात. मीराबाई म्हणतात, लहानपणापासून कलेच्या माध्यमातून समाजाची सेवा केली, पण कलेसाठी शिक्षण घेता आले नाही, ते तर महत्त्वाचे असते. ते शिक्षणच शिकायचे राहून गेले. त्यामुळे मला मिळालेले पुरस्कार, पेपरात आलेल्या बातम्या, माझा झालेला गौरव याचे कधी कौतुकच वाटले नाही. मी जर शिकले असते, तर त्यामुळे आज माझ्या कलेला एक वेगळी उंची मिळाली असती. 
अशा मीराबाईंच्या गोड गळ्याला आणि लोककलेच्या मळ्याला माझा नमस्कार!

» मीराबाईंच्या प्रबोधनकारी धाटणीमुळे आणि वैचारिक लोकगायकीमुळे आज मीराबाई लोकांच्या गळ्यातला ताईत बनत चालली आहे. अनेक सभा-संमेलनांमधून मीराबाईंचा गौरव होत आहे. पण त्यांचा सवाल आहे, पुरस्काराने पोट कुठं भरतं साहेब?...
 
लेखकाचा संपर्क : ९८२०४५१७१६
ganesh.chandan20@gmail.com
 
बातम्या आणखी आहेत...