आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपण माझी आई झालात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय संस्कृती पुरुषप्रधान आहे, आपल्याकडे पत्नीने पतीची सेवा करावी, तो तिचा धर्म आहे, असे नेहमी म्हटले जाते. अर्थात प्रत्येक विधानाला अपवाद असणारच, कारण प्रत्येकाचे संस्कार वेगवेगळे असतात. प्रत्येक व्यक्तीची प्रवृती वेगळी असते. किंबहुना आमच्या ओळखीच्या मोहनकाकांकडे बघितल्यावर याची खात्री पटते. साधारण दहा वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी मृदुलाकाकू चाळीसएक वर्षांच्या असताना अथक प्रयत्नांनंतर पहिल्यांदाच गरोदर राहिल्या होत्या. ते दोघेही खूपच आनंदात होते. येणाऱ्या बाळाचे स्वागत कसे करायचे, त्यासाठी काय करू आणि काय नाही, असे दोघांना झाले होते. त्यांचे सात महिने संपले, तोवर सर्व काही सुरळीत होते. पण आठव्या महिन्यात प्रसूतीला चाळीसएक दिवस बाकी असताना त्या काही अत्यावश्यक खरेदीला म्हणून मे महिन्याच्या प्रचंड उन्हात बाहेर पडल्या. खरेदी आटोपल्यावर दुकानाबाहेर पडताच त्या भोवळ येऊन पडल्या. त्यानंतर त्यांना उठताच येईना, म्हणून त्यांना लगेचच आमच्याकडे भरती करण्यात आलं. आवश्यक तपासण्या झाल्यावर त्यांना मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे शरीराच्या डाव्या बाजूला अर्धांगवायूचा झटका आल्याचे निष्पन्न झाले होते.

अर्धांगवायू झालेल्या रुग्णाची खूपच काळजी घ्यावी लागते. सर्व काही सेवाशुश्रूषा अंथरुणातच करावी लागते. त्यांना गावात जवळचे असे कोणी नातेवाईक नसल्याने व काकूंचे माहेरचे पण कोणी नसल्याने काका ते सर्व मायेने करत असत. त्यामुळे मृदुलाकाकू हळव्या होत असत व त्यांना काकांना होणारा त्रास बघून रडू कोसळत असे. त्या म्हणत, “तुम्हाला होणारा त्रास मला बघवत नाही.” पण मोहनकाकांनी नोकरीच्या जागी रजा टाकली व त्यांना आजारपणात खूपच धीर दिला. ते म्हणायचे, “अगं, मी आजारी पडलो असतो तर तू माझे सर्व केलेच असते ना. तू नेहमीच घरचे-बाहेरचे सर्व बघतच असतेस. त्यामुळे आता तू काळजी करू नको, आधी बरी हो.” मग कधी गमतीने म्हणत, “तू बरी झाल्यावर मी हिशेब चुकता करून घेईन तुझ्याकडून, तू काळजी करू नको आता.”

रोज थोडा वेळ दवाखान्यातल्या कर्मचाऱ्यांना काकूंवर लक्ष ठेवण्यास सांगत असत व स्वत: सकाळी घरची कामे लवकर आटोपून येत असत. काकूंना स्नान घालणे, जेवू घालणे, वेळच्या वेळी औषधे देणे, एवढेच नाही तर ‘फिजिओथेरपिस्ट’नी शिकवले तसे त्यांना मसाज करणे, असे अविरत श्रम ते घेत असत. अशी दिनचर्या सुरू असताना काही दिवसांनी त्यांना एक गोंडस मुलगी झाली. त्यानंतर काकांचा उत्साह आणखी वाढला. प्रसूतीनंतर काकूंच्या तब्येतीत पण वेगाने सुधारणा झाली होती व प्रसूतीनंतर अवघ्या महिन्याभरातच त्या आधाराने हिंडू-फिरू लागल्या. ज्या दिवशी त्या चालू लागल्या त्या दिवशी काकांच्या डोळ्यातले आनंदाश्रू आजसुद्धा जसेच्या तसे दिसतात. आयुष्यातल्या कठीण परीक्षेत ते उत्तीर्ण झालेे होते. काका देवाचे आभार मानत होते तर काकू त्यांना, “तुम्ही तर अगदी ‘माझी आई’ होऊन माझी सेवा केली.” असं म्हणत होत्या. तेव्हा ते हसत म्हणाले होते, “अगं, हा नवीन ‘आदर्श पती’धर्म आहे.”

टाकून बोलणाऱ्या, दारूड्या, मारठोक करणाऱ्या नवऱ्याचे अत्याचार सहन करणाऱ्या स्त्रिया आम्ही वरचेवर बघत असतो, तरी त्या पत्नीधर्म निभावत असतात. पत्नी म्हणजे सेवा व घरकाम करणारी स्त्री आजारी पडल्यास, खर्च व शारीरिक श्रम टाळण्यासाठी तिला माहेरी पाठविणारे पती व सासरची मंडळीही कायमच दिसतात. पण आवश्यक तेव्हा तिची शुश्रूषा करून पतीधर्म निभावणारा आदर्श पती बघण्याचा हा अनुभव तसा दुर्मीळच होता. त्यामुळे तो मनात आजवर कोरला गेलेला आहे.

डाॅ. जयंती चौधरी जळगांव
लेखिका स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत.
drjayantipc@gmail.com
बातम्या आणखी आहेत...