आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Jayanti Choudhary Writes About Flower Arrangement

मुक्त पुष्परचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुक्त पुष्परचनेत नावाप्रमाणेच परंपरागत नियमांचे पालन करण्याचे बंधन नसते, रचनाकाराला आपल्या प्रतिभेचा तसेच कल्पकतेचापुरेपूर उपयोग करून नवनवीन रचना साकारण्याची संधी मिळत असते. पुष्पपात्र, पुष्पसामुग्रीची निवड तसेच विशिष्ट रचनापद्धतींबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची आवश्यकता नसते. स्वत:च्या कल्पनाशक्तीला चालना देऊन निसर्गात उपलब्ध असलेल्या विविध साहित्याचा सौंदर्यदृष्टी ठेवून चातुर्याने वापर केल्यास मनमोहक कलाकृतींची निर्मिती होत असते.
🍃साहित्य : मुक्त रचनांमध्ये ताजी फुलेपानेच घ्यावी, असेही जरुरी नसते. दगड, मुळे, शुष्क फांद्या, काष्ठशिल्पे, शंखशिंपले इत्यादी नैसर्गिक साहित्याचा उपयोग करता येतो. फुलापानांना नैसर्गिक स्वरूपात न वापरता विशिष्ट आकार देऊन कापता येते. नैसर्गिक साहित्याचा वापर करून तयार केलेली फुले वापरता येतात, जसे पिस्त्याची टरफले, लाकडाची साले, शिंपले, शंख फांदीवर लावून तयार केलेली फुले, इत्यादि. परंपरागत मूलभूत रचनांमध्ये हे साहित्य वापरले जात नाही.
🍃पात्र : मुक्त रचनेला पात्राचे बंधन नाही, पण आज नागिरे शैलीमध्ये ती साकारत असल्याने उंच उभे पात्र निवडले आहे. ‘मोरिबाना शैली मुक्त रचना’ साकारताना बसके उथळ पात्र निवडावे. आपल्याकडे उपलब्ध पात्रात हव्या तशा आकारात मुक्तपणे फांद्या खोवाव्या व नवीन कलाकृती निर्माण करावी.
🍃कृती : उपलब्ध साहित्यात आपल्याला हवी तशी रचना साकारण्याआधी मनात रचनेची एक आकृती (design) तयार करावी. ही आकृती कोणतीही असू शकते फक्त ती आकर्षक असायला हवी. त्या आकृतीला उंची, लांबी, रुंदी, खोली दिसावी. तसेच रंगसंगती कशी असावी याचा योग्य विचार करावा. फांद्यांची फार दाटी नसावी. अशा तऱ्हेने व्यवस्थितपणे डौलदार अशा फांद्या व इतर साहित्य खोचावे. फोटोत पळसाची एक उंच हलकासा वाक असलेली फांदी निवडली आहे. तर इतर पाच फांद्या डाव्या, उजव्या तसेच समोरच्या बाजूस खोचलेल्या आहेत. पळसाच्या फुलांचा मोहक रंग उठून दिसण्यासाठी व रचना उठावदार दिसण्यासाठी जांभळट काळ्या द्राक्षांचा घोस खोवला आहे. तसेच तीन हिरवी मेफ्लाॅवरची पाने खोवली आहेत.
उजव्या बाजूच्या पळसाच्या फांदीमागून एक लहानसे काळविटासारखे दिसणारे काष्ठशिल्प खोवले आहे. ते मान मागे वळवून पळसाच्या मोहक फुलांकडे कुतूहलाने बघत आहे असे भासत आहे. पळसाच्या फुलांच्या या रचनेला उन्हाळ्यातील म्हणजेच ‘ग्रीष्म ऋतू काळ रचना’ म्हणता येऊ शकेल कारण पळसाची फुले, काळी द्राक्षे ग्रीष्म ऋतूत मिळतात. तसेच विविध रंगाच्या साहित्याचा वापर केल्यामुळे ही ‘रंगयोजना पुष्परचना’ (colour scheme Nageire) प्रकारातसुद्धा मोडली जाईल. आपल्या आवडीनुसार एकाच रंगाच्या साहित्याचा किंवा विरुद्ध तसेच पूरक रंगाच्या साहित्याचा वापर करून हवी तशी ‘रंगयोजना पुष्परचना’ करता येते. ‘मुक्त शैली’ रचनांमध्ये स्वर्ग, पृथ्वी, मानव या तीन फांद्या असाव्यात असे जरुरी नसते. तसेच फांद्या खोचताना कोनांसंबंधी असलेल्या नियमांचे पालन करण्याचीही जरुरी नसते. मुक्त रचनांना शैलींचेही बंधन नसते. रचना रमणीय व कलापूर्ण व्हावी याकडे रचनाकाराच्या लक्ष असायला हवे असते.
🍃बैठक : रचना तीन बाजूंनी बघता येते म्हणून खोलीच्या कोपऱ्यात किंवा भिंतीशी लागून ठेवावी.
drjayantipc@gmail.com