आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Jayanti Choudhary Writes About Moribana, Madhurima, Divya Marathi

मोरिबानातील विरोधी रचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही रचना साधताना स्वर्ग फांदी व मानव फांदी पिनहोल्डरच्या मध्यभागी एकमेकींना क्राॅस करून परस्पर विरुद्ध दिशांना जातील अशा खोचतात, म्हणून तिला विरोधी रचना म्हणतात. या रचनेसाठी सरळ, तिरप्या किंवा अर्धगोलाकार वाक असलेल्या कोणत्याही प्रकारच्या दोन फांद्या निवडतात. स्वर्ग फांदी अर्धगोलाकार असेल तर मानव फांदी तिच्याचप्रमाणे अर्धगोलाकार निवडतात. म्हणजेच सममिती साधतात. लिंबू, सीताफळ, चिकूसारख्या कोणत्याही दोन मुख्य तसेच दोन, तीन पूरक फांद्या निवडाव्या. किंवा निशिगंध, ग्लॅडिओलस, शेवंती इत्यादी फुलांच्या दोन एकसारख्या काड्या व्यवस्थित निवडाव्या. पूरक फांद्या तसेच पृथ्वी फांदी दर्शविण्यासाठी एक मोठे टपोरे आकर्षक फूल निवडावे. तिन्ही मुख्य फांद्या फुलांच्या घ्यायला हरकत नाही. हवी असल्यास इतर पूरक फुले निवडावी.

साहित्य - कात्री, पाणी. फुले जास्त काळ टिकण्यासाठी पाण्यात साखर, मीठ किंवा अॅस्पिरिनची गोळी किंवा कोळसा पावडर घालतात. कमळ अथवा जरबेराची पोकळ देठ असलेली फुले रचनेत वापरायची असली तर त्यांच्या पोकळ देठांमध्ये शिरलेली हवा बाहेर काढण्यासाठी त्यांचा देठ मेणबत्ती पेटवून ५,६ सेकंद तिच्या ज्योतीत पकडतात व पुन्हा लगेच पाण्यात सोडतात. कमळाची फुले जास्त टिकावी म्हणून पोकळ देठात लहान पिचकारीने पाणी भरतात.
पात्र- कोणतेही उथळ पात्र वापरावे. सिरॅमिक, काच, प्लॅस्टिक, स्टील, तांबे, पितळेचे कुठलेही पात्र वापरले जाते. फुलांचे व फांद्यांचे पोत बघून ते निवडावे. जसे नाजूक काचेच्या पात्रात जाड फांद्या खोवणे योग्य दिसणार नाही. त्यात शेवंती, गुलाब, लिली इ. फुले तसेच नाजूक फांद्याच शोभून दिसतील.

पिनहोल्डर - मोठे निवडून पात्राच्या मध्यभागी ठेवावे. नाजूक फांद्या असल्यास ओअॅसिस वापरावे.

प्रमुख फांदी - म्हणजे स्वर्ग फांदी ही पात्राच्या उंची व लांबीच्या दुपटीपेक्षा अधिक घेतात. पिनहोल्डरच्या मध्यभागी आडव्या मध्य रेषेपासून ३० अंशाच्या आत, समोर किंवा मागे (फांद्यांच्या प्रकारानुसार यात आपण बदल करू शकतो) खोचतात. तसेच डाव्या किंवा उजव्या बाजूला उभ्या रेषेशी साधारण ४० ते ६० अंश कोन साधत खोचावी. फांद्यांच्या प्रकारानुसार कोन बदलता येतो. (फोटोत डाव्या बाजूला खोवलेली पाने असलेली एरंडाची फांदी)

दुय्यम फांदी- म्हणजेच मानव फांदी ही लांबीला स्वर्ग फांदीच्या साधारणपणे अर्धीच घेतात. ती स्वर्ग फांदीच्या विरुद्ध दिशेला खोचतात. (उजव्या बाजूला खोवलेली वक्राकार एरंडाची फांदी)

तृतीय फांदी- साधारणत: एखादे मोठे फूल निवडावे. या फुलाची उंची मुख्य फांदीच्या १/३ इतकी घ्यावी. ती समोर ७० अंशाचा कोन करून पिनहोल्डरमध्ये दोन मुख्य फांद्यांच्या क्राॅससमोर खोचावी.

पूरक फांद्या - फोटोत स्वर्ग फांदीच्या जातीची (एरंडाची) एक फांदी साधारण तिच्या १/३ उंचीपेक्षा थोडी कमी निवडली आहे. पृथ्वी फांदीच्या रेषेत क्राॅसच्या मागे थोडी मागच्या बाजूला झुकवून खोचतात. ही रचना आडवी विखुरलेली असल्याने मधील रिकामी जागा भरून काढण्यासाठी पूरक फांद्या संख्येने थोड्या जास्त वापरल्या तरी चालतात. तसे कोणत्याही रचनेत पूरक फांद्या वापरण्यासाठी खूप काटेकोर नियम नाहीत. पण फांद्यांची दाटी दिसू नये व रचना मोकळी व सुटसुटीत दिसावी. फांद्यांच्या लयबद्ध रेषा तसेच दोन फांद्यांमध्ये असलेल्या रिकाम्या जागासुद्धा जपानी रचनेत महत्त्वाच्या असतात.

कृती- स्वर्ग फांदी खोचताना डावी किंवा उजवीकडे झुकवून खोचतात. फोटोत मानव फांदी वक्राकार निवडून स्वर्ग फांदीला देठाशी क्राॅस करून विरुद्ध दिशेला खोचली आहे. तिला साधारणपणे स्वर्ग फांदीपेक्षा समोरच्या तसेच खालच्या बाजूस झुकवून लावतात. पृथ्वी फांदी म्हणून फोटोत लाल गुलाबाचे मोठे फूल निवडले आहे. पूरक फांद्या म्हणून एक एरंडाची फांदी पृथ्वी फांदीच्या मागे मागच्या बाजूस झुकवून उभी तर एरंडाच्या लहान फांद्या, ग्लॅडिओलस व गुलाबाची फुले रिकाम्या जागांमध्ये लावली आहेत. तसेच पिनहोल्डर झाकण्यासाठी एरंडाच्या पानांचा उपयोग केला आहे.

बैठक- ही रचना तीन बाजूंनी बघता येते. आडवी पसरलेली असल्याने साधारणपणे तिला भिंतीला लागून ठेवतात.
(drjayantipc@gmail.com)