आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषधी निश्चित बंद करता येते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनोविकारावरील औषधी (समज गैरसमज)
मनोविकारांमध्ये नैराश्य (डिप्रेशन), चिंतेचे आजार (अ‍ॅझायटी), संशयविकार (स्किझोफ्रेनिया), फोबिया, मंत्रचळ, अतिउत्साह, मनोकायिक आजार इ. आजार येतात त्याबद्दल काही गैरसमज आहेत त्यानिमित्ताने...
१ मनोविकारावर औषधोपचाराची गरज नाही ? त्यावर प्रभावी औषधी नाही
बहुतांश मनोविकारांचे निदान हे रक्त/ लघवी तपासणी, सिटी. स्कॅन, सोनोग्राफी, एक्सरे इत्यादी कुठल्याही तपासणीद्वारे होत नाही किंवा तपासण्यांचे रिपोर्ट नाॅर्मल येतात. त्यामुळे शरीरात काहीही दोष नाही आणि उपचाराची गरज नाही, असा ग्रह निर्माण होतो. तथापि मनोविकारात काही रासायनिक बदल झालेले असतात, पण ते तपासणीत स्पष्ट होत नाहीत. मेंदूमध्ये न्यूरोकेमिकल्सच्या प्रमाणामध्ये असमतोल निर्माण होतो आणि केवळ औषधीद्वारेच आपण तो नियमित करू शकतो. प्रत्येक औषध हे अनेक वर्षे संशोधन करून निर्माण झालेले असते. सध्या वैद्यक क्षेत्रातील सर्वाधिक संशोधन चाचण्या या मनोविकारावरील औषधींवर सुरू आहेत. त्यामुळे मनोविकारांसाठी सध्या अतिशय व प्रभावी औषधोपचार उपलब्ध आहेत.

२ मनोविकारावरील औषधीची सवय लागते किंवा ही औषधी आयुष्यभर घ्यावी लागते
उच्च रक्तदाब किंवा मधुमेहावरील औषधी वर्षानुवर्षे घ्यावी लागते. ( जर गोळी नाही घेतली तर रक्तदाब / साखर वाढते, पण म्हणून हे गोळीची सवय लागल्याचे लक्षण म्हणता येणार नाही) गोळीमुळे शरीराची आजार प्रक्रिया नियंत्रणात राहते व हे नियंत्रण सुटल्याने आजार उफाळून येतो आणि त्रास होतो. मनोविकारावरील औषधीसाठीदेखील हाच नियम लागू होतो. स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसआॅर्डर हे दोन मनोविकार सोडल्यास इतर बहुतांश विकारांमध्ये एका ठराविक कालावधीनंतर औषधी निश्चित बंद करता येऊ शकते. सर्वाधिक प्रमाण असणारे मनोविकार जसे नैराश्य, चिंतेचे आजार, फोबिया इत्यादीमध्ये सहा महिने ते २ वर्षांनी बंद करता येते. बरेचदा रुग्ण पूर्णपणे बरा होण्यापूर्वीच डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी बंद केली जाते. त्यामुळे काही काळ बरे वाटल्यानंतर परत त्रास सुरू होतो. हा त्रास गोळीच्या सवयीमुळे नाही तर आजार उलटल्यामुळे होतो. मनोविकार तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियमित औषधोपचार घेतल्यास गोळ्या ठराविक कालावधीने बंद होतात. (काही मोजक्या प्रकारच्या गोळ्या डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त प्रमाणात घेतल्यास मात्र त्यांची सवय लाग्ण्याची शक्यता असते.)

मनोविकारावरील गोळ्या म्हणजे झोपेच्या गोळ्या असतात मनोविकारात अ‍ॅंटिसायकोटिक, अ‍ॅंटिडिप्रेसन्ट, मुड स्टॅबिलायझर्स यासारखी अनेक प्रकारची औषधी वापरण्यात येते. गरज असल्याशिवाय झोपची गोळी दिली जात नाही. प्रत्येक औषध हे वेगवेगळ्या पद्धतीने मेंदूतील रासायनिक असमतोल नियमित करण्यासाठी दिलेले असते. बहुतेक मनोविकारात सुरुवातीला झोपेची समस्या असते. त्यामुळे काही काळ झोपेला मदत करणारे औषध वापरून लवकरच तो डोस कमी करता येतो. (ज्या काही गोळ्यांचा दुष्परिणाम झोप येणे असा आहे, त्या शक्यतो रात्री दिल्या जातात.)

मनोविकाराच्या औषधीने शरीरावर दुष्परिणाम (किडनी खराब)
कुठल्याही कारणासाठी दिलेल्या अनेक औषधांमध्ये संशोधनात काही दुष्परिणाम आढळतात. (साध्या पॅरासिटॅमाॅल गोळीतही अनेक दुष्परिणामांची नोंद आहे.) हे दुष्परिणाम अतिशय कमी लोकांमध्ये आढळतात. याच प्रकारे मनोविकाराच्या औषधीचे ठराविक दुष्परिणामही मोजक्या लोकांमध्येच आढळून येतात. (शंभरात / हजारांत एखादा) लिथियम क्लाॅझापीनसारख्या दुष्परिणामांची शक्यता असणार्‍या गोळ्या रुग्णाच्या पूर्ण शारीरिक तपासणीनंतर आवश्यक असल्यास वापरतात. तसेच गोळी सुरू असतानाही ठराविक काळाने शरीरातील घटकांची तपासणी केली जाते. पण बहुतांश औषधी सुरक्षित असून काही कारणाने दीर्घकाळ घ्यावी लागली तरी फारसे दुष्परिणाम आढळत नाहीत. (तथापि मनोविकारतज्ज्ञांच्या नियमित सल्ल्याने उपचार घेणे गरजेचे आहे.)

५ औषधीने रुग्ण मंद होतो तो काम करू शकत नाही
काही वर्षांपूर्वीपर्यंत मनोविकारांवर मर्यादित औषधी उपलब्ध होती. त्यामुळे आजार कमी होण्यासोबतच काहीमध्ये जडपणा, थरथर इत्यादी दुष्परिणाम आढळून येत असत, पण आधुनिक संशोधन आता अनेक नवीन औषधी उपलब्ध झाल्याने कमीत कमी दुष्परिणाम होऊन मनोविकारातून सहजपणे बाहेर येता येते. काही मोजके मनोविकार सोडल्यास इतर बाबतीत रुग्ण अतिशय उत्तमप्रकारे समाजात कार्यरत होतात. मोठमोठी जबाबदारीची पदे समर्थपणे भूषवितात. (आता फक्त आजार बरा करणे एवढाच नाही तर रुग्णाला समाजात पूर्वीप्रमाणे उभा करणे हा उपचाराचा उद्देश असतो.)

६ मनोविकाराच्या औषधीसोबत इतर औषधी चालत नाही
इतर सर्वसामान्य रुग्णालयाप्रमाणे जेव्हा मनोरुग्णांनाही काही शारीरिक आजार होतात. (रक्तदाब, मधुमेह किंवा साधा सर्दी, खोकला, ताप, ताप पोटाचे विकार इत्यादी) जेव्हा मनोविकाराची औषधी सुरू ठेवून इतर डाॅक्टरांची औषधीदेखील ते घेऊ शकतात. पण मनोविकाराची औषधी शरीरतज्ज्ञांना दाखविणे आणि इतर विकारांबाबतही औषधी मनोविकारतज्ज्ञांना दाखविणे आणि त्यांच्या सल्ल्यानेच ती औषधी घेणे आवश्यक असते. या वेगवेगळ्या औषधी एकमेकांच्या कार्यात बाधा आणत नाहीत. फक्त काही मर्यादित औषधांच्या बाबतीत मनोविकारतज्ज्ञांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे असते. मनोविकारावर उत्तमोत्तम औषधी उपलब्ध असताना केवळ गैरसमजातून औषधोपचार टाळण्यापेक्षा उपचार घेऊन बरे होणे कधीही शहाणपणाचे ठरेल.

डाॅ. किरण बोडखे, औरंगाबाद
kiranbodkhe@gmail.com
बातम्या आणखी आहेत...