आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Mrunmayee Bhajak Writes About Shopping Practices In The US

अमेरिकेचा आठवडी बाजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरात कालचे दूध असेल तर
चांगल्या चहासाठी आपण ताज्या दुधाची वाट पाहतो. पण अमेरिकेत स्निग्धांशाच्या प्रमाणानुसार रचलेल्या दुधाच्या
कॅनला पर्याय नसतो.
काहीतरी शक्कल लढवून दोन
दिवसातून तरी एकदा दूध आणू
म्हणणारी मी दुधाचाही आठवडी बाजार करू लागले कळलेच नाही !


अमेरिकेला निघण्यासाठी आता अवघे चार दिवस उरले होते. नवऱ्याच्या याआधी अनेक अमेरिका वाऱ्या झाल्या होत्या. पण माझी ही पहिलीच वेळ होती. घरभर समान पसरलं होतं. कपडे, औषधं, भांडी, पुस्तकं... या पसाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नेहमीची सकाळची गडबडीची वेळ होती. नवरा चहा मागत होता आणि माझी गाडी अडकली होती ती ताज्या दुधाचा चहा करण्यासाठी. “पाचच मिनिटं थांब, आत्ता येईलच दूध.” मी
“दूध संपलंय का?”
“आहे, पण कालचं आहे. ताज्या दुधाचा करते ना चहा.”
“तिथे अमेरिकेला गेल्यावर तुला काही रोज ताजं दूध मिळणार नाही बरं का. सगळा बाजार शनिवार - रविवार करायचा. दुधाचंही तेच. आठवड्याचं दूध एकदम आणून ठेवायचं.”
“आठ दिवसांचं दूध एकदम आणायचं?” मी जवळजवळ किंचाळलेच. भाज्यांचं एक वेळ मी समजू शकत होते. पण आठवड्याचं दूध?
मी तर त्याच वेळी मनाशी निश्चय केला की, तिथं गेल्यावर काहीतरी शक्कल लढवायची आणि निदान दोन दिवसातून तरी एकदा दूध आणायचं. म्हणजे तिथं दुकानं रोजच चालू असायची पण ऑफिसच्या सुट्टी दिवशीच बाजार व्हायचा.
अमेरिकेत आल्यावर हा आठवडी बाजार अगदी रीतसर सुरू झाला. आठवड्याचा बाजार करण्यासाठी आम्ही सुटीच्या दिवशी ग्रोसरी स्टोअरमध्ये जाऊ लागलो. आम्ही जात असू त्या मॉलमध्ये सुरुवातीलाच फळांचा विभाग असायचा. वेगवेगळी फळं आकर्षक पद्धतीने तिथे मांडून ठेवलेली असत. ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, किवी, ग्रेपफ्रुट, अॅव्होकाडो अशा प्रकारची आपल्याकडे न पिकणारी फळं असत. तसंच आपल्या सवयीची केळी, सफरचंद, पेअर, कलिंगड, खरबूज, द्राक्षं, अशी फळंही तिथे मिळत. तिथलं किवी फ्रुट पाहिल्यावर मला पुण्यातला एक प्रसंग आठवला. पुण्यात एका फळवाल्याकडे मी किवी पाहिलं होतं. तेव्हा मी तिथल्या मुलाला विचारलं होतं,
“हे काय आहे?”
“किवी.”
“हे कसं लागतं?”
“देव जाणे. आम्ही नाही खात असलं काही. एका गिऱ्हाईकाने खूप मागे लागून आणायला सांगितली म्हणून या वेळी आणली आहेत ही फळं.”
एकूणच त्या किवीबद्दलचा त्या दुकानदाराचा तुच्छतेचा दृष्टिकोन दिसला, बरं ते फळ दिसायलाही अगदी ध्यानच होतं. त्यामुळे ते तेव्हा तिथेच सोडून दिलं होतं. आता आलोच आहोत अमेरिकेत तर ते चाखून तरी बघावं म्हणून घेतलं, पण ते आंबटसर लागणारं फळ काही आवडलं नाही. आणि पुण्याच्या फळवाल्याची आठवण झाली.
“आपल्याकडची फळं किती गोड असतात. इथली सगळी फळं आंबटच,” माझी नवऱ्याकडे तक्रार.
एव्हाना इथल्या वस्तूंबद्दलच्या माझा काहीसा नकारात्मक सूर सुरू झाला होता. “इथला कांदा किती मिळमिळीत असतो. भाज्यांना काही चवच नाही. कोथिंबिरीला वासच नाही. हा फ्लॉवर आहे का भोपळा? इथे छोटे फ्लॉवर मिळतच नाहीत का?” वगैरे वगैरे.
एकदा भाज्यांच्या विभागातून आम्ही मटार घेतले. ताजे, कोवळे, अख्खे, न निवडलेले मटार.
“आज मटारची भाजी करूया,” नवरा. घरी गेल्यावर मटार सोलायला बसलो तर सालांच्या आत मटार कुठे आहेत?
सगळी सालंच सालं. मटारचे दाणे अगदी मोजून सापडले, तेही आकाराने अगदी लहान. पुन्हा माझी तक्रार.
“हे काय मटार आहेत? नुसती टरफलं आहेत.”
मी वैतागून सगळी टरफलं कचऱ्याच्या डब्यात टाकून दिली. त्या मटारचं प्लॅस्टिक कव्हर अजून कट्ट्यावरच पडलं होतं. कचऱ्यात टाकण्यापूर्वी त्या कव्हरवर मला काहीतरी दिसलं. त्यावर ताज्या मटारची चित्र काढली होती आणि खाण्यासाठी टिप्स दिल्या होत्या.
“कच्चे खा किंवा उकडून खा.” आणि चित्रात तरी ते मटार सालीसकट उकडले होते.
“म्हणजे इथले लोक मटार असे खातात? कोवळे आहेत म्हणून सालीसकट खायचे?”
आम्ही नंतर तो नादच सोडून दिला.
काही दिवसांतच ताजे मटार विसरून आम्हाला फ्रोझन वाटाण्याची सवय झाली.
हिवाळ्याच्या दिवसात एका शनिवारी आम्ही आठवडी बाजारासाठी मॉलमधे आलो होतो. स्नोमुळे बाहेर पडायला नकोच वाटायचं. अति बर्फवृष्टीने गाडी घसरण्याचीही शक्यता असायची. त्यामुळे यावेळी जर जास्तच म्हणजे दोन आठवड्यांचं सामान आम्ही घेऊन ठेवत होतो. भाजी, फळं, ब्रेड झाल्यावर दुधाच्या विभागात आलो. १% स्निग्धांशापासून पूर्ण स्निग्धांशापर्यंतचं वेगवेगळं दूध वेगवेगळ्या फ्रिजच्या कप्प्यांमध्ये मांडलं होतं. आम्ही सहसा आठवड्यासाठी एक गॅलन म्हणजे साधारण पावणेचार लिटरचा एक कॅन घेत असू. यावेळी सगळं सामान हिवाळ्यामुळे जास्त घेतलंच होतं, मग एका आठवड्याऐवजी दोन आठवड्यांचं दूधही एकत्रच घ्यावं का, असा विचार चक्क माझ्या डोक्यात आला.
drmrunmayeeb@gmail.com