आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात अभी हुई नहीं

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सकाळी सकाळी वर्तमानपत्रं हातात घेतल्यानंतर एक तरी आत्महत्येची बातमी वाचायला मिळतेच. स्वत:लाच संपवून टाकावंसं वाटणारी इतकी टोकाची नकारात्मकता व्यक्तीमध्ये काही एका रात्रीतून येत नाही. आत्महत्या करावीशी वाटण्याच्या कारणांचा आणि त्यावरच्या उपायांचा वेध घेणारा लेख...
आपल्याकडे स्वयंचलित दुचाकी असते, काही लोक ती चालवत असतात, प्रेमाने जपत असतात आणि काही दामटत असतात. तिच्यात चालवणाऱ्या दोघांनाही त्यात पेट्रोल टाकावे लागते, हवा भरावी लागते. प्रेमाने जपणारी माणसे वेळच्या वेळी सर्विसिंग करून घेतात आणि दामटणारी माणसे बंद पडल्याशिवाय त्याची काळजी घेत नाहीत. पण गाडी बंद पडली, खराब झाली म्हणून कुणी तिथेच सोडून जात नाही. स्वयंचलित दुचाकी सोडा, सायकलसुद्धा खराब झाली म्हणून कुणी रस्त्यात टाकून येत नाही. तिला दुरुस्त करून जितके अधिक दिवस वापरता येतं तितके दिवस वापरतो. खरं तर दुचाकी वाचून आपलं अडत नाही कधी. तरी आपण घेतो दखल तिच्या कुरकुरण्याची. 

मग आपल्यासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या, सर्व सोयीयुक्त असणाऱ्या, एकदाच मिळणाऱ्या या देहाचा त्याग लोक का करतात? अर्थात यंत्र आणि मानवी देह यांची तुलना होऊ शकत नाही. पण मग यंत्राला जपतो मग एकदाच मिळणाऱ्या या जीवनाला आत्महत्या करून का संपवले जाते? का स्वत:वरचे प्रेम कमी पडते? 

वर्तमानपत्र वाचायला घेतले की, रोज एखादी तरी आत्महत्येची बातमी दिसते, सोशल मीडियावर “लाइव” येत कुणी जीव देतं, कुणी आत्महत्या करावी कशी याचे धडे देऊन जातं. कुणी IAS अधिकारी आत्महत्येपूर्वी आपला विडिओ जगासमोर ठेवून जातो. आत कालवाकालव होते, प्रतिक्रिया देता येत नाही, विषण्ण वाटतं. इतका महागमोलाचा जीव किती स्वस्त होतो. मरून जावंसं वाटणं हवंहवंसं का होतं? इतकी हताशा का येते? कोण पेरतं ही विषारी बीजं आपल्यात? कोण उद्युक्त करतं जीवन संपवायला आपल्याला? अर्थहीन का होतं आयुष्य इतके? जीवनापेक्षा मृत्यू इतका जवळचा वाटतो का? मृत्यूने प्रश्न सुटतात का? 

आत्महत्येची खूप कारणं समोर येतात. त्यात मानसिक आजारपणाव्यतिरिक्त कामाच्या ठिकाणी होणारा त्रास, सासरी होणारा छळ, व्यसनाधीनता, कर्जबाजारीपणा, बेरोजगारी, दुष्काळ, प्रेमप्रकरणं किंवा प्रेमभंग, कौटुंबिक समस्या, विवाह न जुळणे, वैवाहिक जीवनातील समस्या, शैक्षणिक अपयश, बदनामीची भीती अशी कित्येक...

आपण एकटेच जात असतो का या समस्येतून? आपल्यालाच का वाटतो जीव द्यावासा? जर असं असेल तर आपल्या विचार प्रक्रियेत काहीतरी गडबड होत आहे का, हे तपासून बघावं. जीव नकोसा झाला की, सारासार विचार लुप्त होऊ लागतात. नकारात्मक विचार घोळू लागतात आणि जीव देणं हाच त्यावर पर्याय आहे, यावर माणूस ठाम होतो. आपल्याविषयी कुणाला काही देणंघेणं नाही, मग का जगायचं? कुणाला काही वाटत असेल किंवा नसेलही, पण आपल्याला वाटत नाही का स्वतःविषयी काही? आपलं स्वतःवर प्रेम नाही का? उद्याच्या काळजीने आपण आज का मरतो? स्वतःमध्ये कोणत्या विचारांचा भरणा करतो? गाडीत भेसळयुक्त पेट्रोल टाकतो का? मग मनाची काळजी का घेत नाही? नको त्या विचारांचा कचरा का भरतो? हा असा कचरा अडकला की, आपल्या गाडीची कार्यक्षमता कमी होते नं. समोर एखादा खड्डा आला की, जीवघेणा घात होतो. स्वतःवर ताबा राहत नाही, ब्रेक कुठे आणि किती दाबायचा, किती स्पीडने अंतर पार करायचं, खड्डे कसे चुकवायचे, गतिरोधक कसे ओलांडायचे, हे समजत नाही. आत्महत्येचे विचार काही एकाएकी येत नाहीत, ते येतात आपण वेळोवेळी पोसलेल्या नकारात्मकतेतून आणि अतार्किक विचारातून. तसेच खड्डे अर्थात प्रतिकूल परिस्थितीदेखील सांगून समोर उभी राहात नसते. रस्त्यावर खड्डे का आहेत? ते कुणी केले? माझ्यासमोर का आलेत? या गोष्टींना तसेच इतरांना दोष देण्यात अर्थ नसतो. आपल्या गाडीवर आपलं नियंत्रण महत्त्वाचं असतं. आपली गाडी सुस्थितीत असणं केव्हाही चांगलं. गाडी चालवताना क्लच, ब्रेक आणि अॅक्सलरेटर याचं गणित नीट जमणं महत्त्वाचं असतं. रस्त्यात खड्डा असेल किंवा नसेल, हे गणित जमलं नाही तर अपघात होणं ठरलेलंच आणि हे गणित स्वतःलाच सोडवावं लागतं. दोष दुसऱ्या कुणाचा असला तरी आपण काय प्रतिक्रिया देतो हे  महत्त्वाचं ठरतं. 

आत्महत्या करताना व्यक्ती जास्त नकारात्मक होते कारण व्यक्तीसमोर भविष्याचं भयावह चित्र उभं राहतं. मी नापास झाले तर... या तरचं एक चित्र पालकांच्या, मित्रांच्या, नातेवाईकांच्या पूर्वीच्या प्रतिक्रियांमधून उभं राहिलेलं असतं. स्व-प्रतिमा डागाळली जाण्याची भीती वाटते. त्यामुळे आपण वर्तमानात जगायला हवं, आपण जसा विचार करतोय तसंच कदाचित होणारही नाही. वेळ आणि परिस्थिती दोन्ही सतत बदलत असतात. ही वेळ आणि परिस्थितीसुद्धा बदलणार आहे, हा विचार सर्वांनी स्वतःमध्ये लॉक करून ठेवायला पाहिजे. 

हे शरीर फक्त माझे एकट्याचंच आहे. त्यामुळे त्यावर प्रेम केलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. आत्महत्येच्या विचारांकडे वळविणारं नैराश्य मेंदूत रासायनिक बिघाड घडवण्यापूर्वीच पळवून लावलं पाहिजे. आपला त्रास कुणाजवळ तरी व्यक्त केला पाहिजे. मित्रमैत्रिणींच्या सहवासात  आवर्जून वेळ घालवला पाहिजे, लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. नुसते विचार करत पडून राहण्यापेक्षा स्वतःला काही न काही कामांमध्ये गुंतवायला हवं. आधार गट शोधावेत, सगळ्यात मुख्य म्हणजे स्वतःला आहोत तसं विनातक्रार, विनाअट स्वीकारलं पाहिजे. स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थ असा काहींचा समज असतो, तर यातला भेद समजून घेतला पाहिजे. स्वतःला सकारात्मक आणि आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्नपूर्वक पावलं टाकायलाची हवीत. हे झालं स्वतःपुरतं.
आजूबाजूला कुणी सतत आत्महत्येचे विचार प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे बोलून दाखवत असेल तर त्याला मदत केली पाहिजे. सकारात्मक विचार त्यांच्यापर्यंत पोहचवून त्यांचं मनोबल वाढवायला हवं. आत्महत्येचे विचार बोलून दाखवणाऱ्या व्यक्तीची टिंगलटवाळी न करता त्याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. त्यांची मदत केली पाहिजे, त्या व्यक्तींना व्यक्त होण्यासाठी विश्वासू व्यक्ती हवी असते, ते होता आले तर छानच. समुपदेशन, आधारगट, हेल्पलाइन यांचं साह्य घ्यायला आणि जे वाटतं ते सांगायला कसलाही संकोच बाळगू नये. हे मळभ दूर होणारं असतं, रात्रीनंतर नवा दिवस उगवणारच असतो. आपण फक्त हार मानायची नाही. “मन के हारे हार, मन के जीते जीत,” हे नेहमी लक्षात ठेवावं. 

अभिषेक मिश्र यांच्या रचनेच्या काही ओळी हा लेख लिहताना सारख्या आठवताहेत -
माना हालात प्रतिकूल हैं, रास्तों पर बिछे शूल हैं
रिश्तों पे जम गई धूल है
पर तू खुद अपना अवरोध न बन
तू उठ, खुद अपनी राह बना
माना सूरज अँधेरे में खो गया है
पर रात अभी हुई नहीं, यह तो प्रभात की बेला है
तेरे संग है उम्मीदें, किसने कहा तू अकेला है
तू खुद अपना विहान बन, तू खुद अपना विधान बन।
 
- डॉ. निशीगंधा व्यवहारे Â औरंगाबाद
v.nishigandha@gmail.com
बातम्या आणखी आहेत...