आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालकाच्या भूमिकेतून पालकाच्या भूमिकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांच्या भवितव्याची अकारण चिंता करून स्वतःमध्ये ताणाचा कोश विणू नका. काळजी आणि ताण यांच्यातून आलेल्या संमिश्र प्रतिक्रिया सहसा नकारात्मकतेचा चेहरा घेऊन बाहेर पडतात. त्यामुळे विशिष्ट वयात स्वतःला आणि मुलांना थोडे सैल सोडायला शिका. मन घट्ट करत त्यांना धडपडू द्या. ठेचकाळू द्या. चांगल्या-वाईट गोष्टींना अनुभवातून शिकू द्या. त्याशिवाय या जगात त्यांचा निभाव कसा लागेल?
 
या सुट्टीत आम्ही चौघी मैत्रिणीनी मिळून मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी काही कार्यशाळा घेतल्या. उन्हाळी शिबिरांचे गेल्या काही वर्षांमध्ये फुटलेले पेव आणि गल्लेभरू वृत्ती पाहता हे असे काही उपक्रम न घेतलेले बरे, असे माझे मत; पण ग्रूमिंग माइंड या आमच्या यापूर्वीच्या उपक्रमातून मिळालेल्या परिणामांकडे दुर्लक्षदेखील करता येत नव्हते. बऱ्याच विचारांती काही पालकांच्या आग्रहास्तव आम्ही बालमानसशास्त्रावर आधारित कार्यशाळांचे आराखडे तयार केले. मुलांना काही नावीन्यपूर्ण पद्धतीने देता यावे हा हेतू. शिबिरांमधला तोचतोपणा आम्हालाही नकोच होता, तसंच पालकांच्या खिशाला अतिरिक्त ताण देणे आमच्यापैकी कुणालाच नको होते, त्यामुळे कोणत्याही प्रकारची व्यावसायिक जाहिरात आम्ही केली नाही. जाहिरात न करताही आमच्या कार्यशाळांना भरभरून प्रतिसाद मिळाला, मुलांनी खूप एन्जॉय केले, पालकांनी मन मोकळे केले. कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी मुलं आमच्यासाठी वर्षभर असा उपक्रम घ्या, म्हणून मागे लागत हळवी झाली होती. कार्यशाळांना मिळालेल्या प्रतिसादाचा खरे तर खूप आनंद असला तरी या कार्यशाळांमधून जे मुलांचे आणि पालकांचे प्रातिनिधिक चित्र समोर आले ते खूप अस्वस्थ करणारे आहे. या मुलांकडे पाहताना, त्यांच्या कृतींचे निरीक्षण करतंना मी खूपदा माझ्या बालपणात डोकावून आले, आणि कित्येकदा वाटले, माझ्या आणि माझ्या आधीच्या पिढ्यांना जसे बालपण मिळाले तसे यांना मिळाले असते तर... खरं तर या जर-तरला अर्थ नसतो. तुलनेला तर नाहीच नाही. 

पालकांशी बोलल्यानंतर ठळकपणे जाणवले की, हा भाग तर दृष्टिकोनाचा आहे. आम्हाला अमुक एक गोष्ट मिळाली नव्हती, आमच्या अमुक इच्छा अपूर्ण होत्या त्यामुळे आम्ही आमच्या मुलांना कोणत्याच गोष्टींसाठी नाही म्हणत नाही, अडवत नाही, तोंडातून आवाज निघण्यापूर्वी त्यांची इच्छा पूर्ण केली जाते. मुलांना इतक्या सेफ झोनमध्ये वाढवले जातेय की, त्यांची नकार पचवण्याची क्षमता संपून जाते आहे, जंक आणि फास्ट फूडच्या माऱ्याने त्यांच्यात शारीरिक, मानसिक स्थूलता येतेय, मूल घरातल्या कुंडीतल्या रोपट्यासारखं वाढतंय. वाऱ्याची जोराची झुळूकही ते सहन करू शकत नाहीये. शेकडो सूचनांचा भडिमार करण्यात पालक व्यग्र आहेत. आपल्या इच्छांची पूर्तता मुलांकडून करून घेण्यासाठी जिवाच्या आकांताने प्रयत्न केला जातोय. मुलांची सर्जनशीलता पालकांशी वाद घालण्यात संपतेय. घाण्याच्या बैलासारखं वेगवेगळे क्लास, ट्युशन करत त्याचं बालपण संपून जातंय.

आपल्या पाल्याचे भविष्य सुंदर व्हावे, म्हणून जिवाची ओढाताण केली जातेय. त्यांना काही कमी पडायला नको, म्हणून तुम्ही झपाटल्यासारखे दिवसरात्र कष्ट घेताय. आम्ही त्यांच्या भल्यासाठीच तर सगळे करतोय, या विचारात खूपदा मुलांना काय हवंय, नेमके हे तुमच्या लक्षात येत नाही. त्यांची घुसमट, त्यांचा अंतर्गत संघर्ष तुम्हाला बऱ्याचदा जाणवत नाही. त्यांच्या क्षमतांना तुमची स्वप्न पेलवत नाहीत. त्यांचा कल, त्यांच्या आवडीनिवडी पूर्णतः त्यांच्या स्वतःच्या आहेत, याचा विचार स्पर्धेत उतरलेल्या पालकत्वाला शिवतच नाही. आणि मग आम्ही बघा नं, याच्यासाठी दिवसरात्र कष्ट घेतो अन याला त्याचे काहीच नाही, नुसता निष्काळजी आणि आळशीपणा करतो, अभ्यास करत नाही, कुणाशी धड बोलत नाही, चार लोकांत मिसळत नाही, याचा ताण पालक म्हणून घेतला जातो. 

आपल्याकडे मुलांच्या गैरवर्तनासाठी अजूनही आईलाच जबाबदार ठरवले जाते, त्यामुळे आई म्हणून मी कमी पडतेय का? कुठे कमी पडतेय? असे ताण वाढविणारे, स्वतःला दोषी ठरवणारे, गिल्ट देणारे प्रश्न डोक्याचा भुगा करू लागले की, आपल्यातली आई म्हणवणारी बाई अजून संरक्षक होत जाते, अजून मालकी हक्क गाजवत जाते. मुलांच्या भवितव्याची अकारण चिंता करून स्वतःमध्ये ताणाचा एक कोश विणत राहते. काळजी आणि ताण यांच्यातून आलेल्या संमिश्र प्रतिक्रिया सहसा नकारात्मकतेचा चेहरा घेऊन बाहेर पडतात. काही विशिष्ट वयात स्वतःला आणि मुलांना थोडे सैल सोडायला हवे, मन घट्ट करत त्यांना धडपडू द्यायला हवे, ठेचकाळू द्यायला हवे, चांगल्या-वाईट गोष्टींना अनुभवातून शिकू द्यायला हवे. त्याशिवाय या जगात त्यांचा निभाव कसा लागेल? तुमच्या अपेक्षांचे ओझे टाकत त्यांना अकाली प्रौढत्व देऊ नका, तसेच फार जपून त्यांच्या आकाशाला चौकटी घालू नका. आपली अतिकाळजी त्यांच्या भरारीसाठी लगाम तर ठरत नाहीये ना, याचाही सजगतेने विचार करा. पालकत्व हे ताण वाढवणारे नाही तर तुम्हाला ताणातून बाहेर काढणारे सुंदर नाते आहे, त्याला एन्जॉय करा. मुलांमध्ये आपल्याला हवे तसे बदल घडवण्याआधी एकदा आत्मपरीक्षण करून पाहा. तुमचे मूल तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कृतीतून शिकत असते, घडत असते. आपल्या अपेक्षांच्या एक्सप्रेसमध्ये त्याचा प्रवास कठीण करू नका. पालक म्हणून तुमचा इगो बाजूला ठेवता आला तर अधिक छान. मालकाच्या भूमिकेतून पालकाच्या भूमिकेत येण्याचा प्रवास जास्त सुखद आणि शीण घालवणारा, तसेच तुमचा आणि तुमच्या मुलांचा वर्तमानातला आणि भविष्यातला ताण टाळणारा असेल.
 
 v.nishigandha@gmail.com
बातम्या आणखी आहेत...