आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नूडल्स नातीगोती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगणं खूप आत्मकेंद्री होऊ लागलंय. सगळं फास्ट, सुपर फास्ट. इथे वेळच नाहीये कुणाला कुणाकडे बघण्यासाठी, कुणाला समजून घेण्यासाठी, समजावून सांगण्यासाठी. सगळं काही लगेच हवं असतं. कळत-नकळत या गतीने आपली नातीगोतीसुद्धा प्रभावित झालीत की काय, असं नेहमी वाटत राहतं. नाती जोडण्याचा आणि तोडण्याचा वेग सुपरफास्ट झालाय. महसूस करने से ज्यादा दिखाना जरुरी हो गया है.

मेरे सैय्याजी से आज मैने ब्रेक अप कर लिया, असं म्हणत नातं तुटण्याचाही गाजावाजा केला जातोय. डिप्रेशनमध्ये जाऊन कुढत बसण्यापेक्षा नातं तुटलं आहे याचा स्वीकार करणं, ही चांगली गोष्ट आहे; पण बाह्य घटकांमुळे नातं तुटत असेल तर आत डोकावून बघायलाच हवं. जवळजवळ सगळ्याच नात्यांच्या बाबतीत थोड्याफार फरकाने असं होताना दिसून येतं. नात्यात जवळीक शोधण्याची घाई असते. त्या नात्याला, व्यक्तीला कुठल्या तरी फ्रेममध्ये बसवण्याची घाई केली जाते. अचानक एखादी व्यक्ती best वाटू लागते आणि या Bestचं Worst व्हायलाही मग वेळ लागत नाही.

नीला आणि रेवती या दोन वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक स्तरातील व्यक्ती. एका चर्चासत्राच्या निमित्ताने भेटतात. रेवती उच्च मध्यमवर्गीय आणि नीला ही कनिष्ठ स्तरातली पण स्वकर्तृत्वाने उच्च मध्यमवर्गीय स्तरात आलेली. दोघींची ओळख होते, एकमेकींच्या कर्तृत्वामुळे त्या प्रभावित होतात. मैत्रीची भावना निर्माण होते आणि परत भेटायचं ठरतं. ठरवल्याप्रमाणे भेट होते. भेटीदरम्यान नीला रेवतीला छानशी भेटवस्तू देते. फार थोड्या दिवसांत ही मैत्री खूप जवळची आहे, असं दोघींनाही वाटू लागतं. मैत्रीचं हे सत्र असंच पुढे जातं. भेटवस्तू, देवाणघेवाण, मौजमजा, सोशल साइटवर मैत्रीचं उदात्तीकरण, छोट्या भेटवस्तूंची जागा महागड्या भेटवस्तूंनी घेणे. एकमेकींचे व्यवहार माहीत असणे, त्यात हस्तक्षेप करणे या सगळ्यांचं प्रमाण इतकं जास्त होतं की, एकमेकींचं जीवन व्यापून टाकलं जातं. यात नातं गुदमरायला लागतं, पण नातं तोडता येत नाही, कारण सोशल साइटवर सगळीकडे आमच्यात किती सख्य आहे, याचा गाजावाजा झालेला असतो. ओळखीचे लोक, नातेवाईक यांनाही मैत्री सवयीची झालेली असते. हे उदाहरण फक्त रेवती आणि नीलापुरतंच मर्यादित नाहीये, अशा पद्धतीने चटकन प्रभावाखाली येणाऱ्यांची आणि तितक्याच चटकन नाते मोडणाऱ्यांची, घुसमटून रेटणाऱ्यांची संख्या खूप आहे. त्यातल्या त्यात जर आपण किती ग्रेट आहोत, आपली किती ओळख आहे, आपलं मित्रमंडळ किती मोठं आहे, आपण खूप सोशल आहोत, हे दाखवायची, जवळीक दाखवायची हौस असेल तर मग विचारायलाच नको. ‘हट के’ आहे, हे सर्वांना कळावं म्हणून काहीतरी नाना उद्योग करत राहणारे अशी फास्ट मैत्री फास्ट करतात.

स्त्रियांच्या बाबतीत विचार केला तर त्या भावनाकेंद्रित असतात, चटकन नात्यात गुंततात. त्यांना बोलायला आवडतं. त्यात भावना व्यक्त करण्याचा भाग जास्त असतो, नाती त्यांना अधिक महत्त्वाची वाटत असतात, पण व्यापारीकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये या व्यक्त होण्याचं स्वरूपही बदलत गेलंय. नात्यांचं व्यापारीकरण होत चाललंय. भावना व्यक्त करायला हव्यात हे मान्य होतंय, त्या व्यक्तही केल्या जातात पण आता भावनांची तीव्रता मोजण्याची परिमाणं बदलली आहेत. पैसा, ब्रँड, गिफ्ट्सचा आकार, सेलिब्रेशनची पद्धत महत्त्वाची ठरतेय. महागड्या गिफ्ट्सवर नात्यांमधली जवळीक मोजली जातेय. सार्वजनिकरीत्या शेअर करण्यासाठी या गोष्टी मोठ्या वाटू लागल्या आहेत. यातील काही गोष्टी केल्या जात नसतील तर त्याचं तिच्यावर किंवा तिचं त्याच्यावर प्रेमच नाही, असं त्यांना वाटतं. हे सगळ्याच नात्यांच्या बाबतीत घडताना दिसून येतंय. भावंड, मित्रमैत्रिणी, आईवडील, काका-मामा, आत्या-मावशी अशा सगळ्याच नात्यांमध्ये हे डोकावतंय. भावाने भाऊबीजेला ओवाळणी किती रुपयांची दिली? वाढदिवसाला आईवडिलांनी काय दिलं? भावंडांनी किती ग्रँड सेलिब्रेशन केलं? यावर नात्यांची जवळीक, प्रेम, आपुलकी ठरतेय. हे ग्लोबलायझेशन इथेच थांबत नाही तर हे नातं सोशल साइटवर कसं दिसतंय, हेदेखील तितकंच महत्त्वाचं वाटत आहे. भावना एकमेकांपर्यंत पोहोचण्याआधीच ती सेल्फीत कैद केली जातेय आणि त्या भावनांकडे लक्ष जाण्याआधीच सेल्फी अपलोड केले जातात, ते किती लोकांनी लाइक केले याकडे लक्ष दिलं जातंय. हे सगळं करताना ती भावना, तो क्षण अनुभवायचा असतो, आत झिरपू द्यायचा असतो, याकडे लक्षच जात नाही.

तो आत न जाता तसाच सुटून जातो, या अशा आत न पाेहोचलेल्या भावना कशा रुजतील? या सगळ्यात स्वतःला काय वाटतं, याचा विचारच होत नाही. आपण कसे आहोत? काय आहोत? हे लोकांच्या प्रतिक्रियांवरून ठरवलं जातं. किती लोकांनी लाइक केलं, किती लोकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या, या सगळ्याशी स्व-आदर नकळत जोडला जातो. मी जर चांगली असेन तर सगळ्यांनी मला लाइक केलं पाहिजे, सगळ्यांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे. कुणी मला चांगलं नाही म्हटलं तर मी चांगली नाहीये. मला चांगलं म्हणावं म्हणून मग मी सतत धडपडत राहते. आणि वास्तवापासून पुन्हा पुन्हा आभासी जगात स्वत:चं स्थान, स्वतःचं नातं शोधत भरकटत राहते. नात्यातल्या समोरच्या व्यक्तीने सतत प्रशंसा केली पाहिजे, असेच काहीसे विचार बहुतेक नात्यांना प्रभावित करताना दिसून येतात आणि जे त्यात सुंदर आहे ते नजरेच्या आड कधी जातं, हे कुणालाही कळत नाही.

सगळंच टू मिनट नूडल्ससारखं झालंय. नातं रुजण्यासाठी, बहरण्यासाठी त्याला त्याचा वेळ नको का द्यायला? एखाद्याविषयी प्रेम वाटलं की, बाजारात जायचं, जितक्या तीव्रतेचं प्रेम आहे तितक्या किमतीची भेटवस्तू घ्यायची. ती दिली की मोकळं व्हायचं. भावना आत झिरपतच नाहीये, त्यामुळे नातंही नीट रुजत नाहीये, वाढत नाहीये. ते फार लवकर उन्मळून पडतंय. हे टाळण्यासाठी नात्यांना नुसता घड्याळी तासातला वेळ नाही तर क्वालिटी टाइम द्या. खुशाल सेल्फी काढा, गिफ्ट्स द्या, पण त्या आधी भावना आत रुजू तर द्या. नात्यांचं मूल्य, जवळीक अनुभवण्यातून कळत असते, पैशाने अथवा जगजाहीर प्रदर्शनाने त्याला दृढता येत नसते. नातं उमलण्यासाठी त्याला त्याचा वेळ द्यावाच लागतो. तुम्हाला काय वाटतं?

डॉ. निशीगंधा व्यवहारे, औरंगाबाद
v.nishigandha@gmail.com
बातम्या आणखी आहेत...