आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसं येणार वर्ष नवं ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुने वर्ष सरले, नव्या वर्षाचे स्वागत सर्वत्र जल्लोशाने करण्यात आले. तुम्ही सर्वांनीही गेल्या वर्षी घडलेल्या घटनांचा, अनुभवांचा आढावा घेत ३१ डिसेंबर साजरा केला आणि खूप साऱ्या संकल्पांची यादी स्वतःपुढे ठेवत नव्या वर्षाचे स्वागत केले असेल आणि एव्हाना अनेकांचे संकल्प विरलेही असतील. ९० टक्के लोकांचे संकल्प वर्षाच्या पहिल्या ८/१५ दिवसांतच मागे पडायला लागतात आणि मग येरे माझ्या मागल्या. दिवस, महिने आणि वर्षं सरत राहतात आणि आपण तिथेच राहतो.

छोट्या मोठ्या गोष्टींनी येणारा मानसिक ताण, भावनिक घुसमट आणि त्याचं व्यवस्थापन आपल्याला नेटाने करायचं आहे. आनंदाने जगणं आपल्याच हातात असतं. आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल फक्त आपण घडवून आणू शकतो आणि बदल म्हणजे जादू नसते, वर्षानुवर्षं मनावर साठलेली जळमटं चुटकीसरशी दूर होणारी नसतात. सातत्य आणि सराव याशिवाय काहीच शक्य नसतं. येत्या वर्षभरात आपल्या ‘तळ्यात मळ्यात’ या सदरात बरेच विषय घेऊन येणार आहे मी. पण पुढे जाण्यापूर्वी गेल्या वर्षभरात आपण कोणत्या गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या? त्यातल्या किती गोष्टी केल्या? किती जमल्या? कोणत्या जमल्या नाहीत? ज्या जमल्या नाहीत त्या का जमल्या नाहीत? त्या जमण्यासाठी नेमकं काय करायला हवं होतं? हे आधी पडताळून पाहायला हवं. नसेल जमली एखादी गोष्ट म्हणून नाराज होण्याचीही गरज नाही. आपल्याला जमतच नाही काही, म्हणून स्व-आदराशी जोडून स्वतःला दोषही देत बसायचं नाही. पण ठरवलेलं काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आता ठरवून कृती करायची आहे, आणि जोमाने पुढे जायचं आहे. 

आपण आपल्या विकासाचं एकमेव साधन असतो. एखाद्या गोष्टीकडे पाठ दाखवून जाणं खूप सोपं असतं, आजची गोष्ट उद्यावर टाकणंही सोपं असतं. पण पळून पळून किती पळणार, टाळून टाळून किती दिवस टाळणार? आज न उद्या एखादी गोष्ट समोर येणारच आहे, आणि त्या गोष्टीचा सामना करायचाच आहे, तर उशीर करण्यात काय अर्थ? आताच का करू नये? एक एक दिवस पुढे ढकलून ठिणगीचा वणवा होण्याची वाट पाहण्यात काय हशील? सामोरे गेलात तर वाट सापडेल, टाळत गेलात तर भीती. आयुष्य क्षणभंगुर आहे, मृत्यू तुमच्यापाशी येताना टाळाटाळ करत येणार नाहीये. त्यामुळे मोकळं होऊन जगण्यासाठी का टाळाटाळ करावी आपण तरी? आणि सरतेशेवटी अरे हे केलं असतं तर बरं झालं असतं, अशी खंत बाळगल्यानेही काही होणार नसतं. त्यामुळे आतापर्यंत कराव्या वाटलेल्या, शिकाव्या वाटलेल्या, बोलाव्या वाटलेल्या गोष्टींना आजच रस्ता मोकळा करून द्या. बरेच दिवस झाले काही शारीरिक, मानसिक त्रास सतावतोय, पण अंगावर काढताय, घेताय काहीतरी मनाने, वाटतोय तात्पुरता आराम म्हणून टाळताय भेटायचं डॉक्टरला? व्यायाम, योगासनं, माॅर्निंग वॉक सुरू करायचाय, शिकायचंय एखादं वाद्य वाजवायला, गाणं गायला, मोबाइल/संगणक वापरायला, सांगायचंय घरातल्यांना कधीचं आठवड्यातून एखादा दिवस तरी मला माझा हक्काचा वेळ द्या, घरकामात थोडी मदत करा असं? कुठलीही गोष्ट जी संकोचाने, भीतीने, आळसाने, कामाच्या व्यापामुळे करायची टाळत आलात वा करू शकला नाहीत, ती आवर्जून करा. उद्या कधीच येत नसतो, हे सांगा स्वतःला. दमदार सुरुवात करा नव्या वर्षाची, वर्षातल्या प्रत्येक दिवसाची. टाळाटाळ टाळली तर प्रत्येक दिवस तुमचा आणि तुमचाच असणार आहे. प्रदीप आवटे यांची एक खूप बोलकी कविता तुमच्यासाठी देऊन आज इथेच थांबते. नवे वर्ष इच्छापूर्तीचे ठरो. 
 
तुझ्या घराच्या भिंतीवर कॅलेंडर उद्या लागेल नवं,
कॅलेंडर बदललं म्हणून सांग, वर्ष कसं येईल नवं 
तेच असतील रागलोभ, तुडुंब मनात साठलेले
तसेच असेल थंडगार, हृदयात बर्फ गोठलेले
कपाळावरील आठ्या तुझ्या, उद्यासुद्धा अशाच असतील
कशी तुझ्या अंगणात सांग, उद्या नवी फुलं हसतील 
तूच असशील जुना जुना, तर सांग काय होईल नवं 
कॅलेंडर बदललं म्हणून सांग, वर्ष कसं येईल नवं...
 
डॉ. निशीगंधा व्यवहारे, औरंगाबाद