आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तोल जावो पापण्यांचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणसाची प्रेम करण्याची ताकद जेवढी मोठी, तेवढा अधिक श्रीमंत असतो तो...! आणि सांगू, प्रेम करण्याची ताकद आरबीआय गव्हर्नरच्या सहीनं उसनवारीनं नाही घेता येत. ती आतून उमलावी लागते.
माणसं गरीब असतात, माणसं श्रीमंत असतात. पण त्यांना गरीब आणि श्रीमंत ठरवणारे मापदंड काय असतात, आणि कोण ते ठरवतो? परवा पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद झाल्यावर, तर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या सहीने लाभणारी श्रीमंती किती कुचकामी असते, याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. केवळ फिल्मी डायलॉग म्हणून नाही तर... खरंच, पैशात नाही ठरवता येत कुणाला गरीब आणि श्रीमंत...! माणसाची प्रेम करण्याची ताकद जेवढी मोठी, तेवढा अधिक श्रीमंत असतो तो...! आणि सांगू, प्रेम करण्याची ताकद आरबीआय गव्हर्नरच्या सहीनं उसनवारीनं नाही घेता येत. ती आतून उमलावी लागते. अंतःकरणाची कवाडं सताड उघडी असावी लागतात आणि आत ऐसपैस जागा असावी लागते माणसासाठी...! म्हणून तर मी त्या दोघांना बघतो, तेव्हा हरखून जातो त्यांच्या आंतरिक श्रीमंतीनं...!
‘मला कोणीतरी हवे आहे,
मी कुणालातरी हवा असेलच की,
मी शोधात चांदणीच्या,
कोणीतरी चंद्र शोधत असेलच की’
असं म्हणत, अश्विन चांदणं शोधत निघालेला, शहाजी अंकुश कांबळे पंढरपूर तालुक्यातील पुळूजचा. भारतीय समाजात माणूस कुठून आलाय, हे सांगताना नाइलाज म्हणून का असेना, त्याची जात सांगावी लागते, त्याच्याशिवाय त्याच्या प्रवासाची पुरेशी कल्पना येत नाही. शहाजी मांग जातीचा... म्हणजे जातीय उतरंडीत शेवटच्या पायरीवरला. आई-बाप मोलमजुरी करून गुजराण करणारे. आई लोकांच्यात खुरपायला, पडंल त्या शेतातल्या कामाला जाते, तर वडील केरसुण्या तयार करतात. मोठा भाऊ टमटमवर ड्रायव्हर म्हणून काम करतो. अशा फाटक्या कुटुंबात जन्माला आलेल्या शहाजीला मात्र शिकावं वाटायचं. पुस्तकाच्या ओढीनंच तो बारावीनंतर गाव सोडून सोलापूरला आला. पैशाची चणचण तर सोबतीला होतीच, पण जिद्दही होती. पडेल ते काम करत त्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं. ज्या शरदचंद्र महाविद्यालयात तो दिवसा शिकायचा, त्याच महाविद्यालयात रात्री वॉचमन म्हणून काम करायचा. सोबत पुस्तकं होतीच, पण पुस्तकांपेक्षा, चार भिंतींच्या वर्गापेक्षा, बाहेर अवाढव्य पसरलेली बिनभिंतीची शाळा खूप काही शिकवत होती, रोज नवा धडा देत होती.
शहाजीसारख्या तरुणांच्या रस्त्यावर अंधार भरून उरलेला असतो, पण अंधाराच्या या चिखलात पाय बरबटलेले असतानाही त्याचे हात मात्र निळ्या आभाळाकडे फैलावलेले होते. उगवतीचा सूर्य खुणावत होता. पण आजवरल्या अंधारमाखल्या आभाळावर हा स्वप्नातला आगीचा गोळा कॉपीपेस्ट करणं सोपं थोडंच असतं! त्यात रखरखत्या ओसाडात थोडीशी सावली दिसायची, वाट चालायला पुन्हा नवा हुरूप यायचा. सोलापूर विद्यापीठातील पुरातत्त्व विभागातील प्राध्यापिका माया पाटील यांना शहाजीची चिकाटी मनापासून आवडली. त्यांनी दोनेक वर्षे शहाजीच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलला. शहाजीनंही त्यांना नाउमेद केलं नाही, मास कम्युनिकेशनमधील पदवी त्यानं यशस्वीपणे मिळवली. जमीन दुष्काळी असली की, ती पाण्यासाठी चातकासारखी तहानलेली असते. शहाजीच्या गावकुसाबाहेरील वस्तीत तर कालचा पाऊस झालाच नव्हता. वाटेनं चालताना हातावर पडलेला दवबिंदूदेखील समुद्रासारखा वाटावा, अशी सारी परिस्थिती. दिसेल तो किरण खुडत, तो आपल्या अंधारल्या आयुष्याला उजेड माखत होता. सोलापुरात एका मित्रासोबत त्याच्या घरी येणं जाणं व्हायचं. त्याच्या मामाची मुलगी रेखा कॉलेजात शहाजीला सीनियर होती. ती या ज्युनियर पोरांना अभ्यासात मदत करायची. आपली परिस्थिती पालटण्यासाठी आपण स्वतःला झोकून देऊन कष्ट केले पाहिजेत, हे समजावून सांगायची. तिच्याकडून आलं की, अभ्यासाला नवा हुरूप यायचा. रेखाची परिस्थिती वेगळी नव्हती. तिचे आईवडील मोहोळजवळच्या अनगर गावात जगायला गेलेले. ही पोर चुलत्याजवळ राहून शिकायची. इतर कॉलेज पोरापोरींसारखं रईस आईबाच्या जिवावर हवा तेवढा पॉकेट मनी उधळणं, त्यांना कसं परवडणारं होतं? शहाजीची थोरली बहीणही बुधवारात राह्यची. या सगळ्यांचा आधार होताच, पण सगळीच छोटी माणसं, कोण कुणाला कुठवर उपयोगी पडणार होतं? आपला रस्ता आपणच शोधावा लागतो. आपला दिवाही आपणच लावावा लागतो. नसतात आयते, लखलखते दिवे प्रत्येकाच्या वाटेवर...!
जगण्याची अशी रोजची लढाई सुरू असतानाच कधी तरी रेखाचं लग्न झालं. तिनं हिंदीमध्ये एमए केलं होतं. तिला नवराही नोकरदार मिळाला. तो हायस्कूलमध्ये क्लार्क होता. रेखाचा संसार सुरू झाला. तिला मुलगा झाला. चारचौघांसारखं आयुष्य सुरू झालं, पण एके दिवशी नको तेच घडलं. रेखाचा नवरा गारपिटीत सापडून गेला. पदरात लहान पोर. लग्न होऊन अवघं वर्ष-सव्वा वर्ष झालेलं... इतक्या लहान वयात रेखाच्या पदरात वैधव्य आलं होतं. ‘लपे करमाची रेखा। माझ्या कुंकवाच्या खाली। पुसूशिनी गेलं कुंकू। रेखा उघडी पडली।।’ बहिणाबाईनं लिहिलेल्या या ओळीचा अर्थ दिवसागणिक पोळू लागला.
रेखा... मित्राची मामेबहीण. या दुर्दैवी घटनेनंतर शहाजी तिला कधी तरी भेटूनही आला. पण तिचं पांढरं कपाळ आणि उद‌्ध्वस्त चेहरा त्याचा पाठलाग करत राह्यला. तिचं पोरकं लेकरू आठवत राह्यलं. सतत त्याच्या डोळ्यांसमोर रेखाचा ‘अर्ध्यावरती मोडलेला डाव’ येई, आणि मन सैरभैर होऊन जाई. नवरा गेला की, अनेकदा कुटुंबात बाईला काही जागाच उरत नाही. त्यात लग्नानंतर इतक्या लवकर जर नवरा गेला, तर अनेक श्रद्धा-अंधश्रद्धांचा खेळ सुरू होतो. ‘पांढऱ्या पायाची’ म्हणून हिणवलं जातं... कुटुंबव्यवस्थेतील कर्त्या पुरुषांना भावाची विधवा म्हणजे, वडिलोपार्जित संपत्तीतला अडसर वाटू लागते. त्यात परिघावर जगणाऱ्या समाजासाठी क्षुल्लक रक्कम, किरकोळ संपत्तीही मोठी असते. तिच्यावरून भांडणं सुरू होतात. यातलं काय काय होत होतं, कोण जाणे? रेखाचं सुख हरवलं, एक अजब उदासी तिच्या चेहऱ्यावर दिसू लागली.
शहाजी कवी मनाचा पोर... हळवा. त्यानं लिहिलं -
किती आवरू हुंदके, तोल गेला पापण्यांचा
काय सांगू जगाला, अर्थ माझ्या आसवांचा
रेखाची अवस्था त्याला पाहवेना. आपण का करू नये, रेखाशी लग्न? त्याच्या मनात आले, अख्खं आयुष्य पडलंय तिच्यासमोर... कसं होईल तिचं? एवढी शिकलेली, गुणी मुलगी... कोमेजून जाईल ती. स्वतःशी उच्चारतानाही भीती वाटावी असा विचार होता हा...! रेखाशी लग्न? एका विधवेशी लग्न... तेही पहिल्या नवऱ्यापासून मूल असणाऱ्या विधवेशी? पुन्हा ती वयानेही मोठी. शहाजीला काय लग्नासाठी मुली मिळणार नव्हत्या का? शहाजी तसा हरहुन्नरी पोरगा. कवी, स्थानिक पातळीवरील छोट्या-मोठ्या चित्रपटातून काम करणारा कलावंत, पुन्हा शिकलेला, बऱ्यापैकी नोकरी असलेला. पण शहाजीचं आतडं रेखासाठी तुटत होतं. खरं म्हणजे, सहजीवनाच्या पायाशी दयार्द्र भाव कामाचा नसतो, पण कळवळा ही अजबच गोष्ट असते. ‘ऐशी कळवळ्याची जाती, लाभाविण करी प्रीती...!’ असं काहीसं...!
शहाजीनं रेखाजवळ आपल्या मनातलं बोलून दाखवलं, तेव्हा तिची पहिली प्रतिक्रिया ‘नको’ अशीच होती. जग काय म्हणेल? शहाजीच्या घरच्यांचा तर तीव्र विरोध होता. ‘हा काय खुळेपणाय?’ शहाजीच्या आईला वाटत होतं. तिची बिचारीची काय चूक? तिनं हे असलं काही उभ्या आयुष्यात अनुभवलं नव्हतं. बाईची शुद्धता, तिचं मोठेपण तिच्या योनीभोवती गुंफलेलं आहे, हेच पाह्यलेलं, हेच ऐकलेलं. शहाजीच्या अडाणी आईला काय म्हणायचं, त्याचा शिकला सवरलेला प्राध्यापक मित्र त्याला म्हणाला, ‘आरं कशापायी तिच्याशीच लगीन करायचा हट्ट करून राह्यलास? तिच्यात काय राह्यलंय आता?’ योनिशुचितेच्या सनातन कल्पनेनं पछाडलेल्या मंडळींना बाई नेहमीच वस्तूरूपात दिसत असते. शहाजीनं त्याला सहजपणे विचारलं, ‘तिच्यात काय राह्यलं नाय ते सांग म्हणजे, मी तिच्यात काय हाय ते सांगतू... आरं लायब्रीतलं पुस्तक एकानं वाचलं म्हणून नंतर वाचणाऱ्यासाठी त्याच्यातली अक्षरं पुसून जात्यात, का त्येचा अर्थ हरवतो...?’ शहाजी आपल्या प्राध्यापक मित्राला समजावं म्हणून सहज बोलून गेला, पण इतक्या हळव्या हातांनी आणि ओल्या डोळ्यांनी बाईला वाचणारे किती जण आहेत इथं?
सगळे नातेवाईक विरोधात उभे होते. मोजके मित्र सोबत होते. पण शहाजी डगमगला नाही. पोरीचं भलं होतंय, म्हणून रेखाचं घर तिच्या मागं उभं होतं. १६ सप्टेंबर २०१५ला दोघांनी नोंदणी पद्धतीनं विवाह केला. रेखाचे वडील सोडले तर नातेवाईक नव्हतेच. वादळ होतं, पण त्याला समर्थपणे तोंड देणाऱ्या दोन ज्योती दोन हृदयात तेवत होत्या. एका स्थानिक चित्रपटात विधवेशी विवाह करणाऱ्या बंडखोर तरुणाची भूमिका शहाजीनं केली होती. तीच भूमिका तो वास्तवातही जगत होता. पडद्यावरलं शौर्य प्रत्यक्षात आणायला किती जणांना जमतं?
आज शहाजी आणि रेखाचं सहजीवन सुखात सुरू आहे. शहाजी एका शाळेत संगणक शिक्षक म्हणून नोकरी करतो आहे. शाळेतून येताना तो छोट्या मुकेशकरता खाऊ घेऊन येतो. ‘पप्पा’ म्हणून तो लहानगा जीव त्याच्या गळ्यात पडतो. हे ‘बाप’पण त्याला उपरं वाटत नाही, ऊर भरून येतो त्याचा...!
पण... जगणं एवढं सोपं कुठं असतं? रेखाच्या मुलाला आपल्या ताब्यात द्यावं, असं तिच्या सासरच्या मंडळींना वाटतं. भय इथले संपत नाही... मुख्य प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, आपला आतला आवाज ऐकत वाटचाल करणाऱ्या शहाजी-रेखा सारख्या जोडीला असुरक्षित वाटत राहतं. आजही आपली जीवन कहाणी शेजाऱ्या-पाजाऱ्यांना कळली तर त्यांचा आपल्याकडे पाहायचा दृष्टिकोन बदलेल, याची रेखाला काळजी वाटते. त्या दोघांचा फोटो मागितला, तरी तिला कापरं भरतं. शहाजीच्या आईला लेकानं केलेल्या कृत्याचा अर्थच उमगत नाही. कोण सांगेल, तिला तिच्या पोटच्या गोळ्याचं मोठेपण? त्याचं आभाळस्पर्शी माणूसपण...! आये, सोपं नसतं गं असं माणूस असणं... त्याला कबीराचा शेला पांघरावा लागतो, जगण्यावर...! का मनात कुडत राहते, शहाजीची आई मनातल्या मनात? आईचं दुःख शहाजीचं मन कुरतडत राहतं. एक अनामिक भीती सतत उशाला उभी राहते.
मी माझ्या घराबाहेरच्या चौकात उभ्या असणाऱ्या धोंडो केशव कर्वेंच्या पुतळ्याकडे पाहात राहतो. हिस्टेरिक ट्राफिक वेगात वाहात असते. पण या आंधळ्या ट्राफिकला सिग्नलच्या लाल-हिरव्या दिव्यांमागे उभे असणारे ‘आण्णा’ दिसत नाहीत. शहाजी आणि रेखाचं निखळ माणूसपण, या आंधळ्या ट्राफिकला साद घालत नाही. आण्णांच्या पुतळ्याला वळसा घालून आपण कुठं चाललो आहोत, हेच आपल्याला ठाऊक नाही. आर्ची-परश्या असतील, नाहीतर शहाजी-रेखा असतील, त्यांच्यासाठी आपल्या आळीत थोडीही जागा का नसते? आपल्या पापण्यांचा तोल कधीच का जात नाही?
बातम्या आणखी आहेत...