आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Pradeep Awte Story About Asif And Renu Love Story

निळ्या आभाळातलं असीम इंद्रधनुष्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसिफ आणि राणू एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हापासून त्यांच्या प्रेमासोबत एक विचार, माणूस जोडणारा विचार, साऱ्या सीमा ओलांडणारा विचार या दोघांच्याही हृदयातून वाहत होता... आजही तो वाहतो आहे. आणि म्हणूनच आसिफ- राणूचे एकत्र येणे एका नव्या जगाची पायाभरणी आहे.
“तु मच्या होणाऱ्या मुलांचा धर्म कोणता असेल?,” आसिफच्या अब्बांनी त्याला विचारले, तेव्हा तो क्षणभर गोंधळला होता, पण क्षणभरच...! “तितर बितर होऊन जातील ती...!”, अब्बाच पुढं बोलले होते. आसिफ इक्बाल हा दिल्लीतील तरुण अलिगढच्या राणूच्या प्रेमात पडला होता. आसिफ मुस्लिम, तर राणू हिंदू. दोघेही आपापल्या पालकांना आपलं प्रेम समजावून सांगायचा प्रयत्न करत होते. मोठी कठीण गोष्ट होती समजायला. कबीर उगीच का म्हणाला, ‘पोथी पढ़ि पढि़ जग मुआ, पंडित भया न कोय, ढाई आखर प्रेम का, पढे़ सो पंडित होय।’ म्हणजेच पोथ्या पुराणं, मोठमोठे ग्रंथ वाचून कोणीच विद्वान होत नाही, पण ज्याला प्रेमाची अडीच अक्षरे वाचता आली, तो मात्र तत्काळ पंडित होऊन जातो. त्याला जगण्याचे सार आणि या साऱ्या पसाऱ्याचा मथितार्थ आकळतो. पण अनेकांना ही अडीच अक्षरे पेलवत नाहीत. साधा सोपा वाटणारा हा शब्द अनेकांना वाचता येत नाही, वाढत्या वयाबरोबर अनेकांचे डोळ्याचे नंबर वाढतात. तरुण पोरं-पोरी जे बोलताहेत, ते कानापर्यंत आलं तरी हृदयापर्यंत पोहोचत नाही.
आसिफ आणि राणूकरिता धर्म हा अडथळा नव्हता. त्यांचा स्वतःवर आणि त्यांच्या नात्यातील शाश्वत प्रेमावर अपरंपार विश्वास होता. आपल्या आंतरधर्मीय विवाहातून जन्माला येणाऱ्या मुलांचा धर्म कोणता असेल, हा प्रश्नही त्यांना सतावत नव्हता. कारण, आपल्या मुलाच्या जगण्याचे दोर आपण हातात का घ्यायचे? मुलं हिंदू-मुस्लिम या दोन्ही धर्माच्या सांस्कृतिक रंगात फुललेल्या अंगणात वाढतील. त्यांना दिवाळी, होळी आणि ईद सारे काही साजरं करण्याचं सौभाग्य मिळेल, आणि ती जेव्हा मोठी होतील, जाणती होतील, तेव्हा त्यांचं ती ठरवतील, आपला धर्म कोणता? हिंदू, मुस्लिम, आणखी काही की कोणताच नाही...! हे त्यांचं स्वातंत्र्य असेल. ते आपण का हिरावून घ्यायचं? हे स्वातंत्र्य भारताच्या घटनेनं प्रत्येकाला दिलं आहे.
आसिफ आणि राणू १९९६ ला एकमेकांच्या प्रेमात पडले. पण हे प्रेम म्हणजे, केवळ भावनांची भरती नव्हती. त्या मागे विवेक होता. जवळपास चार वर्षे दोघे एकमेकांना समजावून घेत होते. आपल्या नात्यातील सामर्थ्य उमजल्यावर पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी दोन गोष्टी आसिफ आणि राणू यांनी निश्चितपणे ठरवल्या होत्या. पहिलं म्हणजे, दोघांनी कमावतं असलं पाहिजे, कारण आर्थिक स्वायत्तता तुम्हाला सुरक्षितता देते आणि दुसरी गोष्ट म्हणजे, लग्नानंतर दोघांपैकी कोणीही आपला धर्म बदलणार नाही. राणू म्हणते, “मी आणि आसिफ रूढार्थाने धार्मिक नाही आहोत, पण आपापली ओळख-आयडेंटिटी पुसून टाकणे, आम्हा दोघांनाही मान्य नव्हते.” त्याच बरोबर लग्नानंतर आपण आनंदाने दोन्ही धर्माचे सणसमारंभ साजरे करू, पण कोणत्याही धार्मिक सण समारंभासाठी, व्रत वैकल्यासाठी कोणीही कोणावर सक्ती अथवा बळजबरी करणार नाही.”
आणि म्हणूनच या दोघांनी आपले लग्न ‘स्पेशल मॅरेज अॅक्ट १९५४’ नुसार करावयाचे ठरविले. वेगवेगळ्या धर्माचे जोडीदार या कायद्यानुसार आपापली धार्मिक ओळख न पुसता, म्हणजेच धर्मांतर न करता लग्न करू शकतात. हिंदू विवाह कायदा किंवा मुस्लिम निकाहमध्ये हे स्वातंत्र्य नाही. पण आपल्या घटनेने सेक्युलर विवाहासाठी हा विशेष कायदा स्वातंत्र्यानंतर पहिल्या पाच वर्षांतच संमत केला. कायदा आहे, पण तो राबवणारी नोकरशाहीदेखील तेवढी सेक्युलर आणि कायद्यामागील मूलभूत तत्त्वाची जाण असणारी असावी लागते. अनेकदा असे घडत नाही. आसिफ आणि राणू यांनाही हा अनुभव आला. देशाच्या राजधानीत ते स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार लग्न करू पाहत होते. त्यांच्याकडे लागणारी सर्व कागदपत्रे होती, पण सरकारी यंत्रणा अनेक अडथळे निर्माण करत होती. नोएडाच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलगा आहे, हे लक्षात येताच तिथल्या बाबूने साधा फॉर्म द्यायलाही नकार दिला. उपजिल्हाधिकाऱ्यांना (एसडीएम) भेटायला सांगितले. या एसडीएम साहेबांनी या जोडीचे कौतुक केले. म्हणाले, “अरे वा, मला तुमच्या प्रेमाचे आणि धैर्याचे कौतुक वाटते. तुमच्या लग्नाच्या दस्तएेवजावर मी स्वतः साक्षीदार म्हणून सही करतो.” हे दोघेही हरखले, पण एसडीएम साहेब पुढं म्हणाले, “पण माझ्या कार्यक्षेत्रात तुम्ही लग्न करू नका. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.” अशा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत, या कायद्याप्रमाणे लग्न करायला आसिफ आणि राणूला एक वर्षाहूनही अधिक काळ लागला. अखेरीस २००० सालामध्ये आसिफ आणि राणूचे लग्न झाले. वास्तविक पाहता कायद्याप्रमाणे महिनाभरात हे सारे व्हायला हवे होते. मुळात वेगळ्या वाटेने जाणाऱ्या परिवर्तनवादी तरुणाईला मदत करण्यासाठी आणि भारतातील धर्मनिरपेक्षता बळकट करण्यासाठी हा कायदा निर्माण झाला. पण अनेकदा व्यवस्थेच्या परंपरावादी वर्तनामुळे मूळ कायद्यालाच हरताळ फासला जातो.
आज आसिफ- राणूच्या लग्नाला १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना दोन गोड मुली झाल्या आहेत. दिवाळी, होळी, ईद सारे सण आनंदाने साजरे होताहेत. आसिफ म्हणतो, “मेरा पोस्टमन शुरू शुरू में कन्फ्यूज हो जाता था. दिवाळीची पोस्त मागितली त्याच घरात ईदची बक्षिसी पण?” आसिफ गोड हसतो. राणू खळखळून हसते आणि म्हणते, “माझी कामवाली मात्र खुश असते. नेहमी घरात चार चार सण... तिची चंगळ असते ऽऽ ” पण आसिफ- राणूची लव्ह स्टोरी इथेच संपत नाही. ती इथून सुरू होते.. अधिक व्यापक होते.
आसिफ आणि राणू आजूबाजूला पाहत होते. आंतरधर्मीय लग्न करू पाहणाऱ्या जोडप्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. समाजातून फारसा सपोर्ट नव्हता. २००२च्या गुजरात दंगलीनंतर परिस्थिती आणखी बिघडली. आंतरधर्मीय लग्न केलेल्या जोडप्यांना टार्गेट केले जाऊ लागले, मारहाण होऊ लागली. गुजरात दंगलीमधील प्रमुख आरोपी असलेला बाबू बजरंगी आपण सुमारे दोन हजार हिंदू मुस्लिम जोडपी विलग केल्याचे अभिमानाने सांगत असे. या पार्श्वभूमीवर काही तरी करणे आवश्यक होते. २००५ मध्ये आसिफ आणि राणूने आपल्या समविचारी मित्रांसोबत एक संस्था स्थापन केली -‘धनक’. धनक हा उर्दू शब्द आहे. धनक म्हणजे इंद्रधनुष्य...! जातीपातीच्या धर्माच्या भिंती ओलांडणाऱ्या प्रेमाचे मनोहारी इंद्रधनुष्य या आभाळात उमलले पाहिजे, हाच या मागील प्रधान हेतू होता आणि आहे. धर्मनिरपेक्ष जोडप्यांना एकत्र आणणे, अनुभवाचे आदानप्रदान करणे, एकमेकांना सहकार्य करण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करणे आणि त्याच बरोबर आवश्यकता असेल त्या जोडप्याला कायदेशीर आणि सहकार्यात्मक समुपदेशन उपलब्ध करून देणे, या करिता ‘धनक’ काम करते आहे. आता अशा पाचशेहून अधिक आंतरधर्मीय/आंतरजातीय जोडप्यांपर्यंत ‘धनक’ पोहोचली आहे. दरवर्षी व्हॅलेंटाइन डेच्या आसपास ‘धनक’चे सारे सदस्य एक साहस मेळावा भरवतात. साहस म्हणजे Strengthening Alliance For Humanity & Secularism (SAHAS). या वर्षी १३ आणि १४ फेब्रुवारीला हा साहस मेळावा दिल्ल्लीत भरला होता.
हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांतील मूलतत्त्ववादी मंडळी वातावरण अधिक प्रदूषित करताहेत. प्रेमासारखी पवित्र गोष्टही बदनाम होते आहे. आसिफ म्हणतो, “प्रेम सारे बंध तोडते. प्रेम कोणत्याचा सीमारेखा मानत नाही. प्यार की कोई सरहद नही होती. प्रेम फक्त जोडते. याचीच या मंडळींना भीती वाटते. कुणी ‘लव्ह जिहाद’चे नारे देतो, तर कुणी फतवे काढतो. आपापल्या समाजातील स्त्रीची लैंगिकता, तिचे स्वातंत्र्य-समता याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रत्येक धर्मातील धर्मांध लोकांचा हा डाव आहे.” हिंदूना वाटते, हा मुस्लिमांचा डाव आहे. आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या मुलींमध्ये हिंदू मुलींचे प्रमाण अधिक आहे, असे कोणत्याही आकडेवारीशिवाय बोलले जाते. आसिफ लिहितो, “एखाद्या समाजातील मुलींनी आपल्या विवाहाबाबत ‘राइट टू चूज’ (निवडीचा अधिकार) वापरणे, हे त्या समाजाच्या प्रागतिकतेचे लक्षण आहे, त्याचे वाईट का वाटावे? उलट प्रत्येक समाजातील अधिकाधिक तरुणींनी हा अधिकार वापरला पाहिजे. लव्ह हा जिहाद आहेच पण तो धार्मिक मूलतत्त्ववाद्यांविरुद्धचा जिहाद आहे. आणि याचीच या सनातनी मंडळींना भीती वाटते.” प्रेम यांच्या संकुचित जगाच्या भिंती पाडेल आणि यांना भिंती नसलेल्या जगात राहण्याची भीती वाटते.
आसिफ आणि राणू एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हापासून त्यांच्या प्रेमासोबत एक विचार, माणूस जोडणारा विचार, साऱ्या सीमा ओलांडणारा विचार या दोघांच्याही हृदयातून वाहत होता... आजही तो वाहतो आहे. आणि म्हणूनच आसिफ राणूचे एकत्र येणे एका नव्या जगाची पायाभरणी आहे. अशा नव्या जगाची जिथं माणसाच्या रक्तपेशीवर जातधर्माची लेबल नसतील, जिथं माणूस हीच असेल माणसाची ओळख आणि जिथं निळ्याशार आभाळात शांती, प्रेम आणि करुणेची कबुतरे विहरत असतील आणि तुमच्या माझ्या अंगणात असीम प्रेमाचे इंद्रधनुष्य उमलले असेल.
असे जग कोणाला नको आहे?
अशा जगासाठी आपणही आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे.
dr.pradip.awate@gmail.com