आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका रेषेचा प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ललित कला अकादमीच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी भगवान चव्हाण आणि जेजेच्या अनेक विद्यार्थी-शिक्षकांनी आपापली चित्रं पाठवली आणि १९८२चं ललित कला अकादमीचं नॅशनल अवाॅर्ड भगवान शंकर चव्हाण या अवघ्या चोवीस वर्षांच्या विद्यार्थ्याला बहाल करण्यात आलं. हा चमत्कार होता.

बिंदूंचा मूक मोर्चा निघतो आणि रेषा जन्माला येते. तिला कुणीच नाही थांबवू शकत. अनंत असते रेषा, कोणत्याही दिशेने अनंतापर्यंत धावण्याची धमक असते तिच्यात...! पण आपल्या डोळ्यांमध्ये नाही मावू शकत तिची अशी अनंतता आणि मग आपण तिचा रेषाखंड करतो, तुमच्या-माझ्या कागदात मावणारा. चौकटीची हौस अशी आपल्या नजरेच्या मर्यादेतून जन्माला येते. खूप कमी जणांना रेषा पेलता येते, तिच्यासोबत ती नेईल त्या दिशेने झेपावता येते. बालपणीच त्याच्या शिसपेन्सिलीला अशी एक रेषा फुटली आणि तो त्या रेषेसोबत चालत राहिला. रेषेने आकार बदलले, आपलं रेषत्व सोडून गोलाकार वळणं घेतली, हा या रेषेवर झुलत राहिला, झाडाला टांगलेल्या आणि आभाळाला टेकणाऱ्या श्रावणझुल्यासारखा...! ती सोबत असल्यावर, तिचा गंध सभोवताल व्यापून टाकत असताना किती अनोखी मजा असते झुल्यावर झुलण्यात...! अखेर जगणं म्हणजे काय असतं, रेषांची करामत...! रेषांमध्ये रेषा मिळतात, नवे आकार, नवे जगणे बहरू लागते.

चिंक हिल हे नाव ऐकलंय? नाही, नाही, हे कोणतंही थंड हवेचं ठिकाण नाही. सोलापूर जिल्ह्यात कुर्डूवाडीजवळचं, पूर्वीच्या नॅरो गेज रेल्वेलाईनवरील एक छोटंसं रेल्वे स्टेशन आहे हे! इथून त्याची रेषा सुरू झाली. वडील रेल्वेत मशिनिस्ट होते. दोन भाऊ, दोन बहिणी आणि हा अशी ही पाच भावंडे, त्यात हा तीन नंबरचा. मुलांच्या शिक्षणासाठी कुटुंब कुर्डूवाडीत! आंतरभारती विद्यालयात शिक्षण सुरू होते. या शाळेत चित्रकलेसाठी अशोक तुकाराम थिटे नावाचे अफलातून मास्तर होते. त्यांच्या वळणदार अक्षरातील रोजचा सुविचार आणि त्याभोवतीचं नक्षीकाम त्याला त्या पोरवयात मोह घालत राह्यचं. थिटे सर म्हणजे रंग, रेषा आणि कुंचल्यानं झपाटलेला माणूस. पोरं त्यांच्याभोवती बसून आपल्या परीनं गिरवत राह्यची काहीबाही! सरांच्या संगतीत आपली रेषा शोधत राह्यची पोरं. थिटे सरांनी या पोराच्या हातात दडलेली रेषा ओळखली. साधीसुधी रेषा नव्हती ही! ही अंतरीची खूण, ज्याची त्यालाच कळो जाणे! थिटे सरांनी भगवानच्या चित्रकलेला मनापासून प्रोत्साहन दिले. या पोरानं मुंबईला जाऊन जे. जे. स्कूल ऑफ आर्ट‌्समध्ये चित्रकलेचे पुढचे धडे गिरवावेत, असे त्यांना मनोमन वाटत होते. १९८०च्या आसपासचा काळ होता तो. कुर्डूवाडीसारख्या खेड्यातून मुंबईपर्यंत पोहोचणे, हेसुद्धा दिव्यच वाटावे, असा तो काळ. मॅट्रिकनंतर भगवान शंकर चव्हाण असं अस्सल मराठी वळणाचं नाव घेऊन हा पोर मुंबईला पोहोचला खरा, पण जे.जे.ला प्रवेश घेण्याची तारीख उलटून गेली होती. मग थिटे सरांच्या मार्गदर्शनानुसार त्यानं सोलापुरातल्या चित्रकला महाविद्यालयात फाऊन्डेशन कोर्सला प्रवेश घेतला आणि पुढच्या वर्षी भारतीय चित्रकलेची पंढरी असलेल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट‌्समध्ये अॅडमिशन मिळालं. चिंक हिलपासून सुरू झालेली रेषा आता एका महत्त्वाच्या बिंदूपर्यंत पोहोचली होती. भगवान चव्हाण यांचं फाईन आर्ट‌्समधलं शिक्षण सुरू झालं. आणि पुढच्याच वर्षी मोठा आघात झाला. भगवानचे वडील हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू पावले. हा भावनिक आघात तर होताच, पण आर्थिकही होता. घरातला एकमेव कमावता माणूस गेला. शेती नाही, दुसरा कसलाही आधार नाही. मुंबईतलं शिक्षण सुरू ठेवणं कठीण होतं. पण मग कुर्डूवाडीचे डॉ. कुंतल शहा मदतीला आले. त्यांच्या सहकार्याने भगवान चव्हाणला जोगेश्वरीच्या मागासवर्गीय वसतिगृहात प्रवेश मिळाला. राहणं, जेवणखाण, कॉलेज फी असा सारा प्रश्न सुटला. त्याच्या रेषेनं एक निःश्वास टाकला आणि पुन्हा ती धावू लागली. पुढच्याच वर्षाची गोष्ट. ललित कला अकादमीच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी भगवान चव्हाण आणि जेजेच्या अनेक विद्यार्थी-शिक्षकांनी आपापली चित्रं पाठवली आणि १९८२चं ललित कला अकादमीचं नॅशनल अवाॅर्ड भगवान शंकर चव्हाण या अवघ्या चोवीस वर्षांच्या विद्यार्थ्याला बहाल करण्यात आलं. हा चमत्कार होता.

ज्या सन्मानासाठी अनेक मंडळी पन्नाशी-साठीपर्यंत तिष्ठत राहात, तो पुरस्कार चालत भगवान चव्हाणकडं आला होता. महाराष्ट्राला हा पुरस्कार मिळून तब्बल दहा वर्षे झाली होती, जेव्हा तो प्रभाकर बर्वे यांना मिळाला होता. १९८२मध्ये जे. जे. स्कूल ऑफ आर्ट‌्सचा शतकोत्तर रौप्य महोत्सव होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर भगवान चव्हाणचं हे यश अजून उजळून निघालं. आभाळाच्या एका कोपऱ्यावर हा उदयाला आलेला चित्रकार आपली स्वाक्षरी करत होता. चिंक हिलच्या दुष्काळी काळ्या मातीतून उगवलेली रेषा आभाळाकडं झेपावली होती. फाईन आर्ट आणि म्युरल्समधला डिप्लोमा पूर्ण झाला. जेजेची सन्माननीय फेलोशिप पूर्ण झाली आणि १९८६मध्ये युवा कलाकारांसाठी असलेली ललित कला अकादमीची एक वर्षाची फेलोशिप मिळाली. या फेलोशिप अंतर्गत ललित कला अकादमीच्या भारतात असलेल्या प्रमुख केंद्रामध्ये राहून काम करावं लागे. भगवान चव्हाण यांनी नव्यानं सुरू झालेल्या चेन्नई केंद्राची निवड केली. नकाशावर ओढलेली पहिली आभासी रेषा मातीतून उगवलेल्या या अस्सल रेषेनं ओलांडली होती. महाराष्ट्राची सीमारेषा ओलांडून ती तामीळनाडूमध्ये दाखल झाली होती. एक नवा उत्साह, नवं क्षितिज या रेषेला खुणावत होतं. ती वेगवेगळ्या रंगांत न्हात होती. तिची वेगळी वळणं, तिचं जलरंगांशी असणारं तादात्म्य रसिकांना खुणावत होतं. पुढच्या दोन वर्षांतच फ्रेंच सरकारची शिष्यवृत्ती मिळाली आणि रेषेनं हवेत उड्डाण केलं. नकाशावरल्या कितीतरी आभासी रेषा ओलांडत ती पॅरिसला पोहोचली. इथं कितीतरी मास्टर स्ट्रोक्स होते, अशोक थिटे सरांपासून सुरू झालेल्या प्रवासाला आता आभाळही थिटे झाले होते. पिकासोपासून अनेक मान्यवरांचं मूळ काम पाह्यला मिळत होतं. रेषेला डोळे फुटण्याचा हा काळ होता.

भगवान चव्हाण पॅरिसहून पुन्हा चेन्नईलाच पोहोचले. चेन्नईशी काही एक नातं तयार झालं होतं. के.सी.एस. पन्नीकरांनी १९६०मध्ये सुरू केलेल्या चोलामंडल आर्टिस्ट व्हिलेजचे ते आता नागरिक झाले होते. हे कलाकारांनी कलाकारांसाठी वसवलेलं कलेची साधना करणारं अद्भुत गाव आहे. चेन्नई शहरापासून महाबलीपूरमच्या रस्त्यावर वसलेलं हे कलाकारांचं गाव ही रेषेची कर्मभूमी होणं, स्वाभाविक होतं. १९९०चा काळ असावा. मॅक्समुल्लर भवनच्या एका जर्मन मित्रानं केरळमधील कालिकत येथे विणकाम करणाऱ्या कलावंतासोबत एका आंतरराष्ट्रीय कॅम्पचे आयोजन केले होते. पारंपरिक कलांमध्ये नवकलांमधील आधुनिकता कशी पेरता येईल, याचा हा विलोभनीय प्रयत्न...! भगवान चव्हाणही या कॅम्पमध्ये सहभागी होते. याच कॅम्पमध्ये त्यांची ओळख प्रचिदा पिन्नानाथ या विणकाम क्षेत्रातील तरुणीशी झाली. प्रचिदा मल्याळम, तर भगवान चव्हाण मराठी पण आता तामीळ! दोघांनाही परस्परांच्या भाषा येत नव्हत्या. प्रचिदांना हिंदी समजतच नव्हते, तर इंग्रजीही जेमतेम! संवादासाठी कोणती भाषाच नव्हती; पण रेषा, रंग आणि विणकामातील धागे परस्परांशी बोलू लागले. कोलंबस प्रथम कालिकतला आला होता म्हणे! रंग रेषेचा मागोवा घेत नव्या नव्या भूमींचा शोध घेणाऱ्या या कोलंबसाला प्रचिदाच्या डोळ्यांत एका प्रेमभूमीचा शोध लागला. या डोळ्यांच्या किनाऱ्याला रेषेच्या तालावर डोलणारं त्याचं गलबत स्थिरावलं. मराठी मातीचा आणि मल्याळी सागराचा गंध ल्यालेल्या रेषा एकमेकांच्या हातात हात घालून नाचू लागल्या. दोन हातांच्या रेषा अशा जुळल्या की, ‘आज कल पाँव जमींपर नहीं पड़ते मेरे...’ ही अवस्था या दोन जिवांची होऊन गेली. कालिकतचा कॅम्प संपला, पण या कॅम्पमध्ये झालेली हृदयांची देवाणघेवाण सोबत होती. एकमेकांना पत्र लिहायचं तरी कसं? मग प्रचिदानं ते मल्याळममध्ये लिहून पाठवावं, मल्याळी समजणाऱ्या दाक्षिणात्य मित्रानं त्याचं भाषांतर करावं. तर इकडंही तोच प्रकार. यानं हिंदीत लिहावं, कुणीतरी त्याचं मल्याळममध्ये भाषांतर करावं, असं सारं सुरू होतं. पण प्रेमाला कुठं असते गरज भाषेची आणि भाषांतराची! सगळ्या अंतरांना ओलांडून ते अंतरात ओतप्रोत नांदत असते. पण प्रेमापल्याडच्या जगात व्यवहार असतो, साऱ्या आभासी रेषा त्यांच्याकरिता कमालीच्या खऱ्या असतात.

जातपात, धर्म, प्रांत, भाषा या साऱ्यांनी आखलेल्या रेषा सामान्य जिवांना ओलांडताना जीव मेटाकुटीस येतो. या रेषेची व्यर्थता इतरांना पटवून सांगायची कशी? प्रचिदाचं केरळी कुटुंब हे सामान्य शेतकरी कुटुंब, घरी नारळाच्या बागा. त्यांना वाटे, हा कसला पोरगा निवडलाय पोरीनं? याचा ना आगा, ना पिछा! याचं चेन्नईतही कुणी नाही. हा नक्की कोण? इकडे भगवान चव्हाणांना काळजी, आईला पटेल ना हे सारे? कारण आता वडलांमागे आईच एकमेव उरली होती. धडधडत्या अंतःकरणाने त्यांनी प्रचिदाला घरी नेले. कधी कुर्डूवाडीच्या बाहेरही न गेलेल्या आईनं या मल्याळी पोरीत काय पाहिलं कोणं जाणे! पण भाषेचा कसलाही अडसर आला नाही आणि आईला प्रचिदा आवडली. एकमेकींची भाषा न उमजताही दोघींनी एकमेकींना समजून घेतलं. एकदा आईनं होकार दिला की कोणत्याच रेषेला जाडी, उंची नसते, हे भूमितीय सत्य न उमगलेल्या इतर नातेवाइकांचा त्यांनी फारसा विचार केला नाही. केरळमध्ये थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. धाग्यांची वीण उबदार जलरंगात न्हाऊन निघाली. चोलामंडल आर्टिस्ट व्हिलेजमध्ये दोन कलावंतांचा अनोखा संसार सुरू झाला.

या कलासंगमावर आता दोन फुलं उमलली आहेत. दिगंत आणि दीप्ती! मराठी बाप आणि मल्याळी आई असलेली ही पोरं शिकली मात्र चिकमंगळूरला म्हणजे कन्नड भाषिक कर्नाटकात!! कुर्डूवाडीच्या आंतरभारतीमध्ये कुंचला हातात धरलेल्या भगवान शंकर चव्हाण नावाच्या या अवलिया चित्रकाराने आपले अवघे जगणे आंतरभारतीच्या रंगात रंगविले आहे. भगवान चव्हाण चित्रकला क्षेत्रात ‘दादा’ म्हणून ओळखले जातात. अमूर्त शैलीतील महत्त्वपूर्ण चित्रकार म्हणून त्यांची जगभर ओळख आहे. चोलामंडल आर्टिस्ट व्हिलेजच्या त्यांच्या घरी चित्रकला स्टुडिओ आणि प्रचिदा वहिनींचा हातमाग हातात हात घालून उभे आहेत. कलाकाराचं जगणं हेच त्याच्या कलेचं सर्वात महत्त्वपूर्ण विधान असतं, भगवानदादांच्या कुंचल्यातून आणि प्रचिदा वहिनींच्या विणकामाच्या धाग्यातून हेच सत्य रोज नव्याने प्रकाशमान होत असतं. हृदयाचा गंध ल्यालेली, भगवान चव्हाणांच्या सर्जक हातातून जन्मलेली ही रेषा अजूनही नव्या दिशा शोधत असते, निरंतर! इथल्या मातीतून उगवलेली ही रेषा आभाळीची निळाई लेवून जगण्याचा गाभारा सुगंधित करत जाते, अव्याहत!

डॉ. प्रदीप आवटे
dr.pradip.awate@gmail.com
बातम्या आणखी आहेत...