आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमाची 'अॅसिड' टेस्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
“कुणीही प्रेमात जसा पडतो, अगदी तसाच मी तिच्या प्रेमात पडलो.” तो सांगत असतो आणि तरीही आपले डोळे विस्फारलेले असतात, कान स्वतःवरच विश्वास ठेवायला तयार नसतात. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असलं, तरी त्याचं आणि आपलं सेम नसतं, हे अगदी पटू लागतं. त्याच्या प्रेमकहाणीचे वेगळेपण समजावून घेण्यासाठी आवश्यक असते, तिला भेटणे, तिची गोष्ट ऐकणे; जिच्या तो प्रेमात पडला आहे.

लक्ष्मी- दिल्लीतील गरीब घरची पोर, सातवीत शिकणारी, चौदा-पंधरा वर्षांची. वडील आचारी. लक्ष्मीला गाण्याची, संगीताची, नृत्याची खूप आवड. तिने गाणी रेकॉर्ड करावीत आणि टीव्ही चॅनेल्सला पाठवावीत. तिला वाटे, आता आपल्याला इंडियन आयडॉल्सचे बोलावणे येईल. दिवास्वप्न...! खरे तर तिला गाण्याचा क्लास लावायचा होता; पण वडलांच्या तुटपुंज्या कमाईत ते शक्य नव्हते, म्हणून तिने एका पुस्तकाच्या दुकानात नोकरी धरली. गाणं शिकायचं होतं, पण सूर लावण्यापूर्वीच तिच्या चिमुकल्या जगात एक खलनायक आला. तिच्या एका मैत्रिणीचा भाऊ. तिच्यापेक्षा दुपटीहून अधिक वयाचा... तो तिला सारखे मेसेज पाठवायचा, “आय लव्ह यू.” ही घाबरून उत्तर द्यायची नाही. पण तो पुन:पुन्हा तिला मेसेज करायचा. आणि एके दिवशी मेसेज आला, “मला आज उत्तर हवे आहे.” तिने पुन्हा तो मेसेज कानाआड टाकला.

२१ एप्रिल २००५. तिचा पुस्तक दुकानातील नोकरीचा पहिला दिवस होता. ती कामावर निघाली होती. दुसऱ्या दिवसापासून ती गाण्याच्या क्लासलाही जाणार होती. ती सेंट्रल दिल्लीच्या भरगच्च बाजारपेठेतील बसस्टॉपवर उभी होती. तेवढ्यात मैत्रिणीचा तो भाऊ तिला दिसला. त्याच्या सोबत त्याच्या भावाची गर्लफ्रेंडही होती. ते तिच्या दिशेने आले आणि काही कळायच्या आत त्यांनी तिला जोरात ओढली. ती रस्त्यावर उताणी पडली आणि त्यांनी तिच्या चेहऱ्यावर बाटलीभर अॅसिड ओतले. ती मदतीसाठी ओरडत होती, पण तो रहदारीने भरलेला रस्ता जणू तिच्यासाठी निर्जन झाला होता. लोक तिच्यापासून दूर पळत होते. तिच्या चेहऱ्यावरून तेजाब ओघळत होते. सुरुवातीला काहीसा थंड स्पर्श तिला जाणवला आणि नंतर पूर्ण चेहऱ्याला आग लागली आहे, असे तिला वाटू लागले. ती वेदनेने किंचाळत होती. त्या नराधमाने फेकलेले अॅसिड तिचा चेहरा जाळीत आत आत झिरपत चालले होते. चेहरा, कान, केस...वणवा पेटल्यासारखी ती आग तिच्या गोजिऱ्या चेहऱ्यावर पसरली होती. चेहऱ्याचे मांस शब्दशः वितळत होते. ती असह्य वेदनांनी तडफडत होती. अखेरीस कोणीतरी तिला हॉस्पिटलला हलविले. उपचार सुरू झाले. तिला आपला चेहरा पाहू वाटायचा, पण त्या हॉस्पिटलमध्ये आरसाच नव्हता. नर्स तिला फ्रेश होण्यासाठी रोज पाटीभर पाणी आणून द्यायची. ती त्या पाण्यात स्वतःचा चेहरा पाहायचा प्रयत्न करायची, पण बॅन्डेजशिवाय दुसरे काहीच दिसायचे नाही.

तब्बल दहा आठवड्यांनंतर तिने आरशात पाहिलं. एखादं भूत पाहावं तशी ती हादरली. तिच्या चेहऱ्याचं हे काय झालं होतं? तिचा नाजूक चेहरा, कोमल त्वचा सारे सारे हरवले होते. तिच्या देखण्या चेहऱ्याचा निव्वळ कोळसा झाला होता. पुढची आठ वर्षे ती घरातून बाहेर पडायलाच तयार नव्हती. अगदीच गरज पडली तर घुंगट घेऊन, लपून छपून. आरशात पाहताना तिला स्वतःचीच स्वतःला भीती वाटायची. संपवून टाकावं हे जगणं, असं वाटायचं.

...आणि हा वेडा आलोक दिक्षित सांगतो, कुणीही जसं प्रेमात पडतो, तसा मी लक्ष्मीच्या प्रेमात पडलो. एअर फोर्समधील नोकरी सोडून पत्रकारितेत आलेला, कानपूरच्या प्राचार्यांचा मुलगा असलेला, उच्च मध्यमवर्गीय घरातला हा आलोक अॅसिड हल्ल्यात चेहऱ्याचं सारं सौंदर्य, सारी कोवळीक हरवलेल्या लक्ष्मीच्या प्रेमात पडला. हे सारे चारचौघांसारखे कसे असेल? ‘चौदहवी का चांद’ ही आपली सौंदर्याची पारंपरिक धारणा. तिथं तेजाबनं जळका चेहरा घेऊन वावरणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडणं सर्वसाधारण कसं असेल?

मुळातच आलोकला हमरस्त्यानं चालायचंच नव्हतं, म्हणून तर त्यानं एअर फोर्समधील नोकरी सोडली. नंतर बंगलोरच्या नामांकित संस्थेतून पत्रकारितेची पदवी घेतली. टीव्ही ९ चॅनेलमध्ये कामही केले, पण जीव तिथंही रमत नव्हता त्याचा. त्याचा पिंड मुळात सामाजिक कार्यकर्त्याचा. एका स्टोरीचा पाठलाग करता करता त्याची आणि लक्ष्मीची गाठ पडली. तिच्याशी बोलताना, तिची अॅसिड हल्ल्यानंतरची लढाई समजावून घेताना, या प्रश्नाची दाहकता त्याला समजत गेली. त्या तेजाब हल्ल्यानंतर लक्ष्मीला सात वेगवेगळ्या सर्जरींना तोंड द्यावे लागले. तिच्या घरची परिस्थिती बेताची. लक्ष्मीचे वडील धीराचे. त्यांनी उसनवार करून कसाबसा लक्ष्मीच्या हॉस्पिटलचा खर्च भागवला. हिंमत न हरता लक्ष्मी त्या नराधमाविरुद्ध न्यायालयीन लढाई लढली. पण तिचे वडील खचले, गेले. भावाला टीबी झाला. हे सारं समजावून घेत असताना, त्याला लक्ष्मीची नवी ओळख होत होती. बाईचं वरवरचं दिसणं तसंही त्याला कधी महत्त्वाचं वाटलं नव्हतं. लक्ष्मीला समजावून घेताना त्याला वाटत राहिलं, “किती सुंदर, किती देखणी मुलगी आहे ही.” तिच्या जळलेल्या चेहऱ्यापलीकडे पाहण्याची विलक्षण नजर त्याच्या प्रेमाने त्याला बहाल केली होती. ‘चाहे मेरी आंखे ले ले, आंतर के पट खोल,’ खरे प्रेम असे आतले डोळे उघडते. मर्त्य देहापलीकडे दडलेला माणूस या दृष्टीला दिसू शकतो. तिचे खरे सौंदर्य तिच्या हृदयात दडले आहे, ते त्याला जाणवत होते. ‘नैनं छिदंति शस्त्राणि, नैनं दहती पावकः’प्रमाणे तिचे धैर्य, तिची विजिगीषू वृत्ती तेजाब जाळू शकले नव्हते, उलट ती आंतरिक सौंदर्याच्या नव्या तेजाने तळपत होती. आलोक तिच्या प्रेमात पडला होता.

लक्ष्मीसाठी तर हा चमत्कार होता. त्या तेजाब हल्ल्यानंतर कोणी आपल्या प्रेमात पडू शकते, अशी अपेक्षाच तिने सोडली होती. या दोघांच्या प्रेमाचे वेगळेपण इथेच संपत नाही, उलटपक्षी ते इथून सुरू होते. आलोक आणि लक्ष्मी यांनी एकत्र राहायचे ठरविले, पण लग्न न करता- ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये. त्या दोघांचाही पारंपरिक लग्नाला विरोध होता. लक्ष्मी म्हणते, “कशाकरता लग्न करायचं? माझ्यावर ज्यानं अॅसिड फेकलं, तो जेव्हा जामिनावर सुटला तेव्हा त्यानं पहिलं काम कोणतं केलं असेल तर लग्न! मला प्रश्न पडतो, का आणि कुणी दिली असेल आपली मुलगी अशा नराधमाला? कसला नाइलाज असेल म्हणून त्यांनी बांधली असेल आपली मुलगी अशा माणसासोबत? असली लग्नं आणि असली लग्नसंस्था, काय कामाची?” आलोकच्या घरून तर खूप विरोध झाला. एकतर आपल्या मुलाने अॅसिड हल्ल्यात चेहरा गमावलेल्या मुलीवर प्रेम करावं आणि पुन्हा लग्न न करताच तिच्या सोबत राहावं, हे आलोकच्या प्रिन्सिपॉल असलेल्या वडिलांच्या ‘प्रिन्सिपल्स’मध्ये बसत नव्हतं. त्यांनी पोराचं नावच टाकलं. नाही म्हणायला, त्याची आई त्याच्या सोबत उभी राहिली. लक्ष्मी तर आपलं आडनावही लावत नाही. तिच्या कातडीवर सांडलेल्या तेजाबनं बंडखोरीचं एक नवंच रसायन तिच्या देहातून वाहतं आहे.

आलोक आणि लक्ष्मीनं आपल्या मित्रांसोबत “स्टॉप अॅसिड अॅटक्स (एस एस ए)” ही चळवळ सुरू केली आहे. या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ही दोघेही अॅसिड हल्ला झालेल्या अनेक मुलींपर्यंत पोहोचताहेत. त्यांना जगण्याची नवी उमेद देताहेत. ‘छांव’च्या माध्यामातून हे काम सुरू आहे. अॅसिड विक्रीवरील नियमनाचे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिले आहेत. यासोबतच इंटरनेट सेन्सॉरशिप विरुद्धही आलोक “सेव्ह युवर व्हॉइस” या संस्थेच्या माध्यमातून संघर्ष करतो आहे. लक्ष्मीनं नुकताच एका लहानगीला जन्म दिला आहे. पिहू तिचं नाव. पिहूलाही इतर काही नाव-आडनाव नाही...! लक्ष्मीला वाटायचं, तिच्या होणाऱ्या बाळाला तिचा भयंकर चेहरा पाहून भीती वाटेल, पण तसं काहीच झालं नाही. पिहू तिच्या कुशीत मस्त दंगामस्ती करते आहे. या जगात भीती वाटावं, असं काही असेल तर ते आहे आपल्या मनात साचलेलं द्वेषाचं, सूडाचं शेवाळ...! लहानग्या पिहूला हे उमगले आहे, कारण तिच्या आईबाबाने प्रेमाची दाहक ‘अॅसिड’ टेस्ट पार केली आहे. म्हणून तर २०१४चा इंटरनॅशनल ‘वुमन ऑफ करेज’ हा पुरस्कार मिशेल ओबामांच्या हस्ते स्वीकारताना लक्ष्मी आपल्या हल्लेखोराला कवितेतून म्हणाली होती,
“तू ऐकशील आणि तुला सांगतीलही कुणी
‘अरे, जो चेहरा तू जाळलास,
तोच चेहरा आता आवडू लागलाय मला...’
तुला खायला उठेल तुझी अंधार कोठडी
जेव्हा तुला कळेल, मी जिवंत आहे
नुसती जिवंत नाही तर
विहरतेय मी पाखरासारखी मुक्त,
जगणं ढुसण्या मारतंय माझ्या नसानसातून..!
मी भरुभरुन जगत्येय,
तू जाळू पाहलेली माझी सारी स्वप्नंऽऽ”

डॉ. प्रदीप आवटे
dr.pradip.awate@gmail.com