आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबीराचं निसटलेलं बोट...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक मशीद पडली. दोन विभिन्न धर्माची माणसं एकमेकांच्या जिवावर उठली आणि अभिजितच्या मनात एक उत्खनन सुरू झालं... कुदळीचे घाव पडत होते. फावड्यानं माती बाजूला होत होती... खरंच, धर्म म्हणजे काय? धार्मिक असणं म्हणजे काय ?

६ डिसेंबर १९९२... आपल्या सगळ्या साथीदारांसोबत तो तिथं पोहोचला, तेव्हा सकाळचे आठ वाजले होते. जिकडे-तिकडे भगवे झेंडे दिसत होते. शरयूच्या काठी जणू कुंभमेळा भरला होता. भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतांतून असंख्य हिंदू आज अयोध्येत अवतरले होते. तो त्या गर्दीत समुद्रातल्या एखाद्या छोट्या थेंबासारखा मिसळून गेला होता. किती लोक असावेत, याचा अंदाज त्याला स्वतःलाही येत नव्हता. पण अशा महाकाय सागरात इवल्या इवल्या बिंदूंनाही भावनांची किती अनिवार भरती येते, हे तो अनुभवत होता. जनसागर कल्लोळत होता, हेलकावत होता. दोन वर्षांपूर्वी अयोध्येला कारसेवेसाठी येण्याची त्याची संधी हुकली होती, कारण तेव्हा तो बारावीला होता. त्याची आई आणि काका त्या वेळी कारसेवेसाठी आले होते. आणि आज तो अयोध्येत होता.

एकोणीस-वीस वर्षांच्या त्याच्या तरुण रक्तात एक अनिवार लाट पुन:पुन्हा उसळत होती... ‘अयोध्या तो झांकी है... काशी-मथुरा बाकी है’ मागून मोठ्याने घोषणा झाली, आणि त्या घोषणेचे शतध्वनी गुंजले. ‘तेल लगावो डाबर का, नाम मिटा दो बाबर का...’ पुन्हा नवी घोषणा... पुन्हा हलकल्लोळ...! एका प्रचंड ऊर्जेने हिप्नॉटाइज झालेल्या समूहाचा भाग होता तो. परवा तर रामधून गात दृष्ट लागावं, असं बेभान होत नाचला होता तो. काल सकाळी त्याला थोडी चक्कर आली होती, अंगात थोडासा तापही होता, पण या भान हरपलेल्या गर्दीत काहीच जाणवत नव्हतं. दूर स्टेजवर रामनामसंकीर्तन भजन कीर्तन सुरू होतं. सकाळी दहाच्या सुमारास व्यासपीठावर विविध नेते यायला सुरुवात झाली. लालकृष्ण अडवाणी, साध्वी ऋतंबरा, उमा भारती, मुरली मनोहर जोशी, विनय कटियार, आचार्य धर्मेंद्रजी अशी मान्यवर माणसं व्यासपीठावर विराजमान झाली आणि भाषणं सुरू झाली. बोलणारा शब्दांचा नव्हे, जणू अग्निफुलांचा मारा करत होता. ऐकणारी माणसं त्वेषानं पेटून निघत होती. घोषणांचा आवाज अयोध्येचं आकाश दुमदुमून टाकत होता. आणि दुपारी बाराच्या आसपास एकदम हलकल्लोळ माजला. बाबरी मशिदीवर काही कारसेवक चढले होते. मशिदीवर भगवा झेंडा लावण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. ‘एक धक्का और दो, बाबरी मसजीद तोड दो’च्या घोषणांना जोर चढला होता. गर्दीतून वाट काढत तो मशिदीजवळ पोहोचला. तेव्हा कुदळ फावडी घेऊन आलेले कारसेवक आपलं काम शांतपणे आणि समन्वयाने करत होते. मशीद भुईसपाट झाली. कारसेवकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. तोही उत्फुल्ल झाला.

...आणि परतीचा प्रवास सुरू झाला. घरी परतायचे होते. स्वतःकडे जाण्याचा प्रवास होता तो. अलाहाबाद... खांडवा... पूर्णा असा प्रवास सुरू होता. कानावर धक्कादायक बातम्या येत होत्या. बाबरी मशीद पाडल्याने देशभरात दंगली उसळल्या होत्या. बहुतेक ठिकाणी संचारबंदी लागू झाली होती. अनेक माणसं या दंगलीत मारली गेली होती. तो आपल्या गावी... परभणीला परतला, पण कधी नव्हे ते परभणीतही दंगे भडकले होते. कर्फ्यू लावला होता. त्यानं आपल्या छोट्याशा आयुष्यात आपलं गाव इतकं अशांत, इतकं असुरक्षित कधीच पाहिलं नव्हतं. ते अस्वस्थ परभणी पाहून त्याला नजीब आठवला. त्याचं छोटं टपरीवजा हॉटेल. चहाभजी, शेवचिवडा विकणारा नजीब आणि त्याचे वडील हमीदभाई, सायरा, युनूस ही भावंडं. नजीब, सायरा हे त्याचे मित्र. ईदला त्याच्याकडील शीरकुर्मा घरी यायचा आणि सणासुदीला आजी पुरणपोळ्या नजीबच्या घरी द्यायची. आजी पुस्तकात अडकून पडली नव्हती... धर्म कुठं संपतो आणि मानवी नातं कुठं सुरू होतं, तिला नेमकं कळत होतं. नजीबला काही झालं तर नसेल ना, त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

...तरीही लोक येत होते, कारसेवकांचे सत्कार करत होते. त्याच्याही गळ्यात युद्ध जिंकून आलेल्या सैनिकांसारखे विजयाचे हार पडत होते. त्याला आनंद व्हायला हवा होता. कारण, त्याचं सगळं घर हिंदुत्ववादी विचारांचं. आई, वडील, काका... अगदी सर्व. याने तर अगदी चौथीत असताना १०८ ओव्यांचे गणपती स्तोत्र लिहिले होते. वयाच्या बाराव्या वर्षापासून तो सुश्राव्य कीर्तनं करू लागला होता. पाचवी-सहावीपासूनच तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाऊ लागला होता. पण अयोध्येहून परतल्यापासून त्याचे काही तरी बिनसले होते.
...तो कुठंतरी हरवला होता.

कानावर रोज दंगलींच्या बातम्या पडत होत्या. देशामध्ये अनेक ठिकाणी धार्मिक दंगे पेटले होते. गोरगरीब माणसं नाहक मरत होती. मुंबई पेटली होती. एकट्या मुंबईमध्ये नऊशेच्या आसपास माणसं मृत्युमुखी पडली होती. दंगलीच्या बातम्या, ती मृतदेहांची छायाचित्रं... हे सारं पाहून त्याचं मन सैरभैर झालं. कारसेवेचा सगळा माज खाडकन् उतरला. आपल्या कारसेवक असण्याची, त्या असुरी उन्मादाची त्याला लाज वाटू लागली. त्या दंगली, मेलेली ती निष्पाप माणसं आठवून आपण मोठा सामाजिक गुन्हा केला आहे, या अपराधी भावनेनं मनाला घेरलं. त्यानं स्वतःलाच प्रश्न विचारला, “कशासाठी केलंस तू हे? हेच का तुला हवं असणारं हिंदू राष्ट्र?” आपण कोणत्या एका विशिष्ट धर्माचे असल्याचा गर्व त्याला वाटेनासा झाला. ऐन विशीत असलेला अभिजित अरविंद देशपांडे स्वतःला प्रश्न विचारू लागला. स्वतःला प्रश्न विचारता येणं, ही माणूसपणाकडं नेणारी वाट असते. आणि ही वाट एकाकी असते. सोबतीला कोणीच नसते. एकट्यानेच करायचा असतो हा प्रवास...! सिद्धार्थाला नव्हते का पडले असेच प्रश्न आणि सारं राजवैभव सोडून तो बाहेर पडला होता. आपल्या प्रत्येकातही असा एक सिद्धार्थ असतोच की...! फक्त आपण त्याच्याशी बोलणं गरजेचं असतं.

एक मशीद पडली. दोन विभिन्न धर्माची माणसं एकमेकांच्या जिवावर उठली आणि अभिजितच्या मनात एक उत्खनन सुरू झालं... कुदळीचे घाव पडत होते. फावड्यानं माती बाजूला होत होती...
खरंच, धर्म म्हणजे काय?
धार्मिक असणं म्हणजे काय?
मानवी जगण्यासाठी धर्माची आवश्यकता आहे का? ईश्वराची आवश्यकता आहे का?
एक ना अनेक प्रश्नांचं मोहोळ उठलं. तो शांतपणे विचार करू लागला. आत आत डोकावू लागला. घरातल्या सनातन वातावरणात मूलभूत प्रश्न विचारणं नामंजूर होतं. छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडू लागले. एके दिवशी त्यानं गळ्यातलं जानवं काढून टाकलं. जानवं हे केवळ संस्काराचं प्रतीक असेल तर त्याचं लोढणं गळ्यात का अडकवा? संस्कार वर्तनातून प्रकट व्हायला हवेत. त्यांची निरर्थक प्रतीके कशासाठी? पण या साऱ्या निव्वळ फांद्या होत्या. त्याला मुळापर्यंत जायचं होतं. शिक्षणाच्या निमित्तानं तो परभणीवरून मुंबईला आला. या महानगरीनं त्याच्या जगण्याला नवा अवकाश दिला. नितिन रिंढे... मन्या जोशीसारखे मित्र आणि चार्वाक, बुद्ध, कृष्णमूर्ती यांच्या विचारदर्शनानं नव्या वाटा दिसू लागल्या. समजेचा सूर्य वर येऊ लागला, तसं वाटेवरलं धुकं वितळू लागलं. चार्वाकाच्या निमित्तानं अवैदिक परंपरा प्रथमच उमजत होती. बुद्ध ईश्वर नाकारत होता. कृष्णमूर्ती ‘विचारसरणी नाकारा,’ म्हणत होते. परभणीला असताना बीएला मराठी शिकवणारे शेख शफी सर त्याला आठवले. एक मुस्लिम माणूस आपल्याला मराठी संतपरंपरा शिकवतो, याचं त्याला किती अप्रूप वाटायचं. किती सुंदर शिकवायचे सर. एकदा सुफी संप्रदाय शिकवताना शफी सरांचा आवाज दाटून आला होता. हुंदका आवरत सर बोलले होते, “माझंच बघा ना. लोकांच्या दृष्टीनं मी कुणीच नाही. हिंदू मला मुसलमान समजतात आणि मी हिंदंूमध्ये मिसळतो... त्यांच्यासारखं वागतो-बोलतो म्हणून मुसलमान मला काफीर समजतात. दोघांनाही मी त्यांचा वाटत नाही.”

नुसतं माणूस असणं किती कठीण असतं! पण सामाजिक सौहार्द आणि परस्पर सहभावासाठी हे नुसतं माणूस असणं महत्त्वाचं आहे, हे त्याला आता आकळू लागलं होतं. या सगळ्या वाचनातून, अनुभवातून तो एका निश्चयाशी येऊन ठेपला. चांगलं, नैतिक जगण्यासाठी ईश्वराची, धर्माची आवश्यकता नाही. ईश्वर, धर्म नाकारणारा तो पहिला नव्हता, पण हा निर्णय सोपा नव्हता. दहाव्या वर्षी गणपती स्तोत्र लिहिणाऱ्या अभिजितकरिता हा यू टर्न होता. विवेकाचा जीपीएस अॅक्टिवेट झाल्याशिवाय रास्त मार्ग सापडत नाही. आपण चांगलं वागलं तर सगळेच लोक आपल्याशी चांगलं वागतील असं नाही, पण किमान पक्षी बहुतांश लोक चांगले वागतील, हे तर नक्की. आणि चांगलं वागण्यासाठी कोणत्या धर्माची, ईश्वराची आवश्यकता काय? फक्त आपल्याला भान हवं. चांगल्या-वाईटाचं भान बाळगणं महत्त्वाचं. धर्म हे साधन आहे, साध्य नव्हे. आणि मानवी वृत्ती-प्रवृत्तींना विधायक वळण लावण्याचा वसा घेतलेले आजचे सर्वच धर्म जर आपला आशयच हरवून बसले असतील, तर असे धर्म असले काय आणि नसले काय, काय फरक पडतो ?

…आणि म्हणून जन्मासोबत चिकटून आलेला धर्म नाकारत, तो नुसता माणूस झाला. खूप काटे असतात या माणूस होण्याच्या वाटेवर. त्यानं ते पावलोपावली झेलले.
परक्यांशी, आप्तांशी संघर्ष करावा लागला, तो त्यानं केला. पण एखादा धर्म किंवा विचारसरणी स्वीकारून एकांगी होणं नाकारलं. म्हणून तर आज त्याला ग्यानबा-तुकोबाचा मोक्ष, ईश्वर कळत नाही, पण त्यांचा आंतरिक संघर्ष समजतो, ज्ञानेशाच्या पसायदानातील आर्तता उमगते, ‘ढाई अक्षर प्रेम का’ शिकविणाऱ्या कबीराची कणव कळते. सुफी परंपरेतील विशुद्ध प्रेम आकळतं. देव धर्म पंथ विचारसरणीशिवाय त्याला सुंदर जगता येतंय, त्याच्या अंगणाला कसलंच कुंपण नाही.

‘आपुलाचि वाद आपणांसी,’ असं म्हणत मनाशी संवाद साधून आपली वाट चोखाळणारा कालचा विशीतला पोर, कालचा कारसेवक आज मुंबईच्या एका महाविद्यालयात मराठी विषयाचा प्राध्यापक आहे. प्रा. अभिजित देशपांडे हे मराठी साहित्यासोबतच चित्रपट समीक्षेतील एक महत्त्वाचे नाव आहे. आपल्या
मुलाचे नाव त्यांनी जाणीवपूर्वक ‘कबीर’ ठेवले आहे. कबीरला कोणताही धर्म नाही, कोणताही पंथ नाही. त्याच्या शाळेच्या दाखल्यावरही तो असणार नाही, याकरिता अभिजितने संघर्ष केला आहे. तो जाणता होईल तेव्हा त्याचा धर्म, त्याची विचारसरणी त्याची त्यानं निवडायची आहे. त्याच्या बाळमुठीत एक भावओलं पत्र त्याच्या बापानं ठेवलं आहे-

“प्रिय कबीर,
मी का हट्ट केला तुझं नाव कबीर ठेवण्यासाठी? ज्या भोवतालच्या आक्रमक धर्मांध प्रवृत्तींनी मी अस्वस्थ झालोय, त्याला ‘कबीर’ या नावापेक्षा दुसरं कुठलं सुंदर उत्तर होतं, बाळा माझ्याकडे? प्रेम, मानवता, समन्वय म्हणजे कबीर.
नाही, पण मी तुला माझ्या विचारांचे साधन बनवणार नाही. बोट धरण्याची आवश्यकता वाटेल तोवरच जगाचा मी लावलेला अर्थ तुला सांगेन, सांगत राहीन. तोच तुझाही असला पाहिजे, असा आग्रह नाही.
तू कुठल्या जगाला सामोरे जाणार आहेस, ते आधी समजावून घे. विविधता असणे म्हणजे भेदभाव असणे नव्हे. सगळ्यांनाच जगता आले पाहिजे, हे तत्त्वतः खूप सुंदर आहे कबीर. ते व्यवहारतः सुंदर कसे करता येईल, हा माझा प्रश्न आहे.
नाही तर असं करू का, तुला माझ्या प्रश्नांची गोष्टच सांगू का?
एक होता कारसेवक…
कळावे,

पुढील पिढ्यांचा एक अपराधी.
ता. क. गोष्ट इथेच संपू देत का कबीर?”
नाही अभिजित, माणूस होण्याची गोष्ट अशी इतक्यात संपत नाही. ती अनादि अनंत आहे, आपल्या जगण्याच्या प्रवासाइतकीच...! तू दहा वर्षांपूर्वी लिहिलेलं ‘एक होता कारसेवक’ हे पुस्तक दिवसेंदिवस अधिक प्रस्तुत होत असताना, तुझी निखळ माणूस होण्याची गोष्ट, तुझ्या प्रश्नांची गोष्ट पुन:पुन्हा सांगत राहणं, हेच हाती उरतं मित्रा! आपल्या समकालाच्या हातातून कबीराचं निसटलेलं बोट पुन्हा गवसण्यासाठी एवढंच करू शकतो आपण...!

डॉ. प्रदीप आवटे
dr.pradip.awate@gmail.com
बातम्या आणखी आहेत...