आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंशोधनासाठी वैज्ञानिक आपलं सगळं आयुष्य पणाला लावतात, परंतु त्याचा व्यवहारी फायदा व्यापारी जन उठवतात. अंटार्क्टिकाबाबतीतही हेच झालं. क्रिल हे अंटार्क्टिक सागरात प्रचंड प्रमाणात गवसणारे मासे. दुधाळ रंगाचे, साधारणपणे कोळंबीच्या आकाराचे हे मासे. व्हेल, सील असे अजस्र प्राणी; अॅल्बेट्रॉस, पेंग्विन, स्कुआ, असे पक्षी; अंटार्क्टिकावरील सर्वच पशू-पक्ष्यांची गुजराण या क्रिल्सवर होत असते.
वैज्ञानिकांनी अपार श्रम घेऊन संशोधन करून क्रिल्सबाबतीत नको तेवढी माहिती जमा केली. क्रिल्सच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर प्रथिनांची मात्रा असते, हा शोध लागला. त्याचा फायदा आपण का उठवू नये, हा स्वार्थी विचार व्यापारी मानवाच्या मनात डोकावला. सायंटिफिक कमिटी ऑन अंटार्क्टिक रिसर्च (स्कार) ही संस्था अंटार्क्टिकावरील वैज्ञानिक माहितीचं संकलन करत असते. वैज्ञानिक माहिती समोर होतीच. व्यापारी जन हिशेब मांडू लागले. या सागरात किती क्रिल्स आहेत? हिशेब लागला, 5 अब्ज टन. कोणत्याही प्राण्याची शिरगणती आकड्यांत होत असते (त्यानुसार ही संख्या भरते, 1 ते 2 लाख अब्ज. पृथ्वीवर शिरगणतीत संख्येने पहिल्या क्रमांकाचा प्राणी, क्रिल्स.); परंतु त्याचा ‘माल’ झाला, की हिशेब वजनात!
व्यापारी जन पुढचा ताळेबंद मांडत बसले. या 5 अब्ज टनांपैकी प्रतिसाल जेमतेम चार-साडेचार कोटी टन इतके क्रिल्स व्हेल्स मासे फस्त करतात. प्रतिसाल 8 ते 10 कोटी टन क्रिल्सवर सील्सची भूक भागू शकते. सहा कोटी टन क्रिल्स इतर जलचरांना पुरेसे आहेत. चार कोटी टन क्रिल्सचा फडशा विविध पक्षी पाडतात. हा ताळेबंद मांडून कुशाग्र व्यापा-यांनी निष्कर्ष काढला, सालिना 8 ते 15 कोटी टन क्रिल्सची शिकार मानवाने केली, तरी अंटार्क्टिकाच्या इकॉलॉजीवर फारसा परिणाम होणार नाही. परंतु ‘अंटार्क्टिक ट्रिटी’ या शिकारीच्या आड येत होती.
तथापि व्यापारी जन म्हणजे कुशाग्र मतीचे. ज्यांचं शोषण करणं ते आपला जन्मसिद्ध अधिकार मानतात, त्या अविकसित मानव समाजाचा त्यांना पुळका आला. या रयतेच्या अन्नात प्रथिनांची कमतरता असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला. किमान त्यांच्यासाठी तरी या शिकारीला मुभा असावी, असा ‘सोयीनुसार’ बदल ट्रिटीत करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. बिल्डर लॉबी आपल्याकडं जशी ‘सीआरझेड’ वगैरे कायद्यात सोयीनुसार बदल करून घेते, तसंच हे प्रकरण. ‘भ्रष्टाचार ही भारतीय प्रवृत्ती’ हा विचार संकुचित ठरावा; त्याला वैश्विक आयाम आहे, हे ध्यानात ठेवावं.
दहा कोटी टन क्रिल्स जाळ्यात अडकवायचे म्हटलं तरी, 20 हजार टन क्षमतेच्या 5 हजार मोठ्या जहाजांचा ताफा या शीतसागरात घुसवावा लागेल, हे एक गणित. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील जलवाहतुकीची इंधन गळती, तथा इतर कचरा यामुळे सागरी प्रदूषण लक्षणीय होईल, हा धोका होताच. संशोधनास्तव अंटार्क्टिक मानवी प्रदूषणापासून मुक्त राखण्याच्या उद्देशावरच हा घाला होता. तथापि, व्यापारी मानवांना एवढा विचार करायला फुरसत कुठली? लगेच तत्परतेने काही राष्ट्रांनी क्रिल्स शिकारीस्तव अंटार्क्टिक सागरात आपली जहाजे रेटली. 1981-82च्या उन्हाळी काळात जपान आणि रशियाने या सागरातून पाच लाख टन क्रिल्स उपसले. परंतु निसर्गाचे हिशेब काही वेळा औरच असतात. क्रिल्सच्या शरीरात आरोग्यास बाधक अशा फ्लुराइडचं अवास्तव प्रमाण आढळलं आणि क्रिल्सवरची संक्रांत टळली. जीवनावश्यक प्रथिनं क्रिल्सच्या जिवावर उठली, तर आरोग्यघातक फ्लुराइड त्यांना जीवदायी ठरलं. शिवाय क्रिल्सच्या शिकारीस्तव येणारा खर्च व्यापारी हिशेबात किफायतशीर नव्हता. अविकसित मानवाच्या आरोग्याचा पुळका आलेल्या व्यापा-यांनी या शिकारीचा नाद सोडला...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.