आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तऱ्हेवाईक कुणीकडचे !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माशीचं एक अंडं दीड हजार जिवांना जन्म देतं… आर्माडिलोच्या एका अंड्यात चार जीव वाढतात… कांगारू गर्भाशयात गर्भ सुप्तावस्थेत ठेवतो… निसर्गातील प्राणी जन्माच्या या तऱ्हेवाईक कथा आपल्याला थक्क करतात…
परोपजीवी कृमींत एका अंड्यापासून अनेक गर्भांची वाढ होत असते. (म्हणूनच यातील घातक कृमी आपणास फारच त्रासदायक ठरू शकतात.) यातील बऱ्याच परोपजीवी कृमींना परकायेत प्रवेश करणं कठीण असतं. पण त्यांच्यासाठी प्रजेची मोठी फौज तयार करणं, आवश्यक असतं. अशीच एक परोपजीवी कृमी. ती आपली अंडी ‘हेसियन फ्लाय’ माशीच्या अंड्यावर घालते. कृमीच्या अंड्याचं सोळा पेशींत विभाजन होतं. त्यानंतरच्या विभाजनातून प्रत्येकातून एक किंवा दोन गर्भ वाढतात. तरीही सर्वसाधारण परिस्थितीत आठापेक्षा जास्त जीव जन्माला येत नाहीत. ‘इक्न्युमॉन फ्लाय’ या माशीचे एक अंडे हजार-दीड हजार जिवांना जन्म देते. एवढ्या मोठ्या संख्येतील गर्भांना पोषण द्रव्ये पुरवणं शक्य नसतं. यातील बऱ्याच जिवांना जन्मताच मृत्यूला सामोरं जावं लागतं. याला आणखी एक कारण आहे. ही माशी प्रसूतिपूर्व अन्न साठवणीच्या भानगडीत पडत नाही. जो होना है सो हो जायेगा.
गिटार-फिश द्विनेत्री रे उर्फ विजेरी मासा तसंच करवत-मासा यांच्या एका अंड्यातून तीन ते पाच वा आठही पिल्ले बाहेर पडतात, असा समज होता. तथापि अधिक अभ्यासांती हा ‘फसवा’ प्रकार असल्याचे आढळून आले. ज्याला अंडे समजले जात होते ते वस्तुत: अंडीकोश असल्याचे उघड झाले. या एका कोशात अनेक अंडी सामावलेली असतात, आणि प्रत्येक अंड्यातून केवळ एकच जीव बाहेर येतो. ‘एका अंड्यातून एक जीव’ हा नियम असतानाही स्त्रीला जुळे, पक्ष्याला चार पायांची पिल्ले, गायीला दोन डोक्यांची वासरे, दोन डोक्यांचा भारद्वाज पक्षी, दोन शेपट्यांची गाढवं अशी उदाहरणं पाहण्यात येतात. त्यांना दैवी चमत्कार समजून दंतकथाही प्रसवल्या जातात. (ही प्रसूती भारतात जोमात असते.) मुळात बीजांड विभाजन अत्यल्प अगर अपूर्ण झालं असेल, तर अशा विकृती निर्माण होतात.
सस्तन प्राणी सहसा शरीरांतर्गतच पिल्लांना जन्म देत असतात. अपवाद असतातच. टेक्सासमधील आर्माडिलो हा सस्तन प्राणी ‘आऊटसाइडर’ म्हणता येईल. आर्माडिलोत गर्भधारणेच्या वेळी फलन झालेलं फक्त एकच परिपक्व अंडं असतं. या फलित अंड्यात चार गर्भ वाढतात. याच प्राण्याच्या दक्षिण टेक्सासमधील प्रजातीत ही गर्भसंख्या कमी-जास्त असते. पण, नवापेक्षा जास्त कधीच नसते. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे, यांच्या प्रत्येक बाळंतपणातील सर्व प्रजा एकाच लिंगाची असते. अंडी घालणारे सस्तन प्राणीही आहेत. त्यांचं वर्गीकरण Prototheria असं करण्यात आलं आहे. काही सस्तन उभयचरही असतात. ऑस्ट्रेलियातील प्लॅटिपस प्राणी या वर्गात मोडतो. याचं तोंड बदकासारखं असतं. पाण्यातील भक्ष्य पकडण्यासाठी ते उपयुक्त ठरतं.
सस्तन प्राण्यांच्या प्रजोत्पादनात गुणसूत्र हा महत्त्वाचा भाग असतो. गुणसूत्रे X आणि Y अशा दोन प्रकारांत विभागली गेली आहेत. जन्माला येणाऱ्या पिल्लाचं लिंग या गुणसूत्रांच्या रचनेवर अवलंबून असतं. माणसाबाबतीत XY म्हणजे पुल्लिंगी तर X X म्हणजे स्त्रीलिंगी.
प्लॅटिपस बाबतीत गुणसूत्रांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. नराच्या पेशींमध्ये ५३ गुणसूत्रं असतात, तर मादीच्या पेशींमध्ये ५४. नरामध्ये Y गुणसूत्राची कमतरता असते. नर-मादीचा मिलन काळ ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान असतो. या काळात मादी नदीकाठी बीळ तयार करते. त्यात गवताच्या अाच्छादनाने घर बांधते. आपल्या पारंपरिक घरांत बाळंतिणीची एक खोली असायची. हे घर तसंच असतं. ते केवळ गरोदर मादीसाठी आरक्षित असतं. मादी या घरात (सहसा) दोन अंडी घालते. आपल्या शरीराने अंड्यांना वेढून ती त्यांची उबवण करते. दोन एक आठवड्यांत अंडी उबतात. अंडदंतांनी (Eggteeth) अंड्याचं कवच फोडून पिल्लं बाहेर येतात. आपल्या मोठ्या पायाच्या साहाय्याने पिल्लं आईच्या अंगावर येतात. मादीच्या शरीरावर दोन स्तनाग्रं असतात. त्यातून दूध पाझरतं. वासाने पिल्लं ते दूध पिऊ लागतात.

ऑस्ट्रेलियात आढळणारा इकिडना हा सस्तन प्राणीदेखील प्लॅटिपससारखाच. याच्या मादीमध्ये ६४ गुणसूत्रे असतात, तर नरात ६३. एका Yची कमतरता. प्रजनन काळात इकिडनाच्या मादीत एक पिशवी तयार होते. फलित अंडे मादी या पिशवीत ठेवते. उबवणीचा कालावधी शंभर एक दिवसांचा असतो. पुढचा प्रकार प्लॅटिपससारखाच. कवच फोडून पिल्लू बाहेर येतं आणि आईच्या अंगावर दूधप्राशन करू लागतं.
आईच्या पिशवीतच विकसित होणारं ऑस्ट्रेलियातील पिल्लू सर्वांच्याच परिचयाचं आहे, कांगारू. मादी सहसा एकाच पिल्लाला जन्म देते. क्वचित दोन पिल्लं. पिल्लाला जन्म देण्यापूर्वी ती आपली शिशुपिशवी चाटून स्वच्छ करते. जन्माला आलेलं पिल्लू अंध असतं. त्याला केसही नसतात. जन्मल्यानंतर पाच-एक मिनिटांत आईच्या केसांना धरून, ते वर चढतं आणि शिशुपिशवीत स्थानापन्न होतं. लगेच आईच्या स्तनाला लागतं. त्याला चोखावं लागत नाही. स्तनाला लागल्यावर आई दूध सोडते, पिल्लू पितं. पिल्लू अंगावर चढत असताना चाटून आई त्याला साफ करते. पिल्लाला थोडंफार दिसू लागलं, अंगावर केस आले की, काही दिवसांचा सराव करून पिशवी कायमची सोडतं.
कांगारूच्या मादीचं खास वैशिष्ट्य म्हणजे तिला पिल्लू झाल्यानंतर पुन्हा गर्भधारणा झाली, तर हा दुसरा गर्भ ती आपल्या गर्भाशयात ठेवू शकते. हा गर्भ सुप्तावस्थेत जिवंत असतो. आधी जन्मलेलं पिल्लू पिशवीबाहेर आलं (वा क्वचित प्रसंगी मरण पावलं), की आई दुसरा गर्भ वाढवू लागते.
गर्भाशयात गर्भ सुप्तावस्थेत ठेवणारा कांगारू, तर शुक्राणूंचं जतन करणारा सस्तन प्राणी म्हणजे उडणारं वटवाघूळ. नर-मादीची जोडी जमते. मग त्यांचं मिलन होतं. तेव्हा नर आपले शुक्राणू सोडतो. हे शुक्राणू मादी आपल्या शरीरात जतन करते आणि गरजेनुसार त्यांचा वापर करते, तेव्हा गर्भधारणा होते. मादी गरोदर राहिली की, नर तिच्यापासून बाजूला होतो. त्यांचं प्रसूतिगृह अंधाऱ्या जागी असतं. पिल्लू जन्माला आलं की, माकडाप्रमाणं ती त्याला आपल्या शरीराला बिलगून घेते, दूध पाजते. दुसरा उडणारा सस्तन प्राणी उडणारी खार (Flying squirrel) असाच.
सस्तन प्राण्यांत उडणारे असतात, भूचर असतात, उभयचर असतात, तसेच जलचरही असतात, उदा. नाना प्रकारचे व्हेल्स. अंटार्क्टिक सागरात आढळणारा, पृथ्वीतलावरील सर्वात मोठा प्राणी ब्लू व्हेल हा जलचर सस्तन होय. यांची लांबी १०० मीटरपर्यंत असते, तर वजनाचा काटा दीडशे टनाला भिडतो. याचा आवाजसुद्धा आसमानी, विमानाच्या आवाजाहूनही मोठा म्हणजे, १८० डेसिबल्सचा असतो. पृथ्वीतलावरील प्राण्यांच्यातला हा सर्वात प्रचंड आवाज होय. हा आवाज कण्हण्यासारखाही असतो वा गुरगुरण्यासारखाही असतो. या आवाजात ते एकमेकांशी संपर्क साधतात. वयाच्या सातव्या वर्षी नर-मादी जननक्षम बनतात. हिवाळा हा त्यांचा मिलनकाळ असतो. वर्षभरात पिलाचा जन्म होतो. हे पिल्लूच मुळी अडीच टनाचं असतं आणि लांबीला सात मीटर.
दुसरा सागरी जलचर ड्युगॉन्ग (Sea cow). मलाया, कच्छ आखात, निकोबार सागरात हा आढळतो. याचा गरोदरपणाचा काळ ११ महिन्यांचा असतो. एका वेळी एकाच पिल्लाला आई जन्म देते. प्रसूती पाण्यातच होत असली, तरी याचं पिल्लू जन्माला आल्यावर लगेच पोहू शकत नाही. आईला बरेच दिवस त्याला पाठीवर घेऊन फिरवावं लागतं.
समुद्र, नद्या, सरोवरं अशा सर्व जलप्रदेशात वास्तव्य करणारे डॉल्फिन्स हेदेखील सस्तनच. यांचा गरोदरपणाचा काळ ९ महिन्यांचा असतो. साधारणपणे सरता हिवाळा ते उन्हाळा या काळात पिल्लू जन्माला येतं. मादी सहसा एका वेळी एकाच पिल्लाला जन्म देते. पिल्लू जन्मल्यावर सस्तन जलचरांची आई श्वासोच्छवासासाठी त्याला पटकन पाण्याच्या पृष्ठभागावर आणत असते. डॉल्फिन्सबाबतीत असंच होतं. आई दूध बाकी पाण्याखाली पाजते. तथापि पिल्लू स्तन चोखून दूध पीत नाही. आई त्याच्या तोंडात दूध सोडते. निसर्गाची किमया ही अशी अद््भुत नि अवर्णनीय असते.
बातम्या आणखी आहेत...