आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकेत मिलनाचे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणसांच्या मिलन संकेतांविषयी तर आपण ज्ञानीच असतो. हे ज्ञान हवं असो वा नको, आपणापर्यंत (विशेषत: मुलांपर्यंत) पोहोचवण्याचं ‘महान’ कार्य कथा, कादंबऱ्या, चित्रपट आणि टीव्हीवरील मालिकांनी केलं आहे. माणसाने शब्दांची उत्पत्ती केली. भाषा विकसित केल्या. त्यामुळे त्याच्या संपर्क कार्याला पूर्णत्व आले. (मी माझे विचार तुमच्यासमोर मांडतोय, याचं कारण विकसित झालेली भाषाच होय. तरीदेखील कला म्हणून आपल्या काही शास्त्रीय नृत्य प्रकारांत शब्देवीण भावप्रदर्शन केलं जातं.) भाषा प्रगत होऊनही आणि त्याद्वारे संपर्क साधूनही माणसाचं मन ओळखणं, हे कर्मकठीण काम. प्राण्यांच्या विविध संकेतांद्वारे त्यांच्या भावनातरंगांना शब्दरूप देणं वैज्ञानिकांना आव्हान असलं, तरी ते फारसं अवघड गेलं नाही.

उदा. एरवी आक्रमक असलेली वाघीण जेव्हा प्रणयातुर होते, तेव्हा ती बरीच हळवी होते. पाठीवर लोळून, पंजे हवेत उडवून ती नराचं लक्ष आपल्याकडे वेधण्याचे प्रयत्न करते. नराच्या गालाला गाल घासत त्याच्या पायाशी लोळणही घेते. तिच्या नरालाच काय, आपणालाही तिचा इरादा समजतो. मग चारी पायांवर बसून रांगत ती त्याच्याकडं सरकते. नर तिच्या मानेशी हुंगू लागतो. ठरावीक तऱ्हेने आपला पार्श्वभाग ती त्याच्यासमोर सादर करते. याचा अर्थ ती त्याच्या स्वाधीन होते. तिच्या मानेला पकडून नर तिला आणिक खाली दाबतो. मग पुढचा कार्यभाग. नराचं वीर्यस्खलन वेगाने होतं. १०-१५ सेकंदांतच तो तिच्यापासून बाजूला होतो. तथापि हे स्खलन वारंवार होतं. दिवसभरात १०-१२ वेळा तरी त्यांचं पुन:पुन्हा मिलन होत असतं. तरीदेखील वाघीण चतुर असते. ‘दिवाना’ झालेल्या नराला आपल्या मागं फिरवत ठेवते, अगदी फिल्मी टाइप. ‘मेरे पिछे एक दिवाना’. ‘दिवान्या’चा संयम संपतो तेव्हा तो तिची मान पकडतो.

हत्तीबाबत तर बरंच संशोधन झालं आहे. गंध आणि ध्वनी यांच्याबाबत जंगली हत्तींचा अभ्यास चांगलाच रंजक ठरला. हत्तींची घ्राणेंद्रिये अतिशय तीक्ष्ण असतात. वाऱ्याबरोबर वाहात येणाऱ्या १०० कि.मी.वरच्या वासाचीही त्यांना जाणीव होते. त्यांच्या आवाजाचे तर किंचाळ, किंकाळी, गर्जना, कुजबुज असे ७०हून अधिक ध्वनितरंग नोंदवले गेले आहेत. एवढंच नव्हे तर त्यांचा शब्दार्थ कोश बनवण्यात आला. हे संशोधन कार्नेल युनिव्हर्सिटीच्या जैवध्वनिशास्त्रज्ञांनी केनियामध्ये केलं होतं. एकमेकांशी सावधगिरीने संवाद साधताना घोगरा कंठस्थ आवाज ते काढतात. जवळ असणाऱ्या एखाद्या प्राण्याला त्याची जरादेखील चाहुल लागत नाही. मात्र ध्वनिकंपनांतून इतर हत्तींच्या कानी तो आवाज पडतो. संशोधकांना त्यास्तव नीचतम ध्वनिलहरींची नोंद करणारं उपकरण वापरावं लागलं. तो आवाज मोठा केला असता, मांजराच्या गुरगुरण्यासारखा वाटला. अशा नीचतम ध्वनिलहरींचं ज्ञान हत्तींच्या कानानांच नव्हे, तर पायांतील मऊ मांसल तळव्यानांही होतं. अशा नीचतम ध्वनिलहरींद्वारेच हत्ती आपल्या प्रियतमेला साद घालतो. (हत्ती ‘माजा’वर येतो, तेव्हा तो चांगलाच पिसाळतो. कोल्हापुरातील राजवाड्यासमोर ‘बर्चीबहाद्दर’ नावाचा हत्ती असा माजावर आलेला पाहिला होता. माहुतांना त्याला अावरता येत नव्हतं. शेवटी, त्याच्या समागमाची व्यवस्था केल्यानंतरच तो ‘शांत’ झाला. ‘शांत’ होण्यावरून एक प्रसंग आठवला. आमच्या ऑफिसमधला एक तरुण सहकारी. त्याचं कामात लक्ष लागत नसे. आम्ही त्याला लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यामागची आमची फिलॉसॉफीही सांगितली. “प्रथम संस्कृत ‘काम’ करावं. म्हणजे, माणूस इंग्लिशमध्ये ‘Calm’ होतो. मग मराठीतल्या ‘कामा’ला उत्साह येतो.” गमतीची गोष्ट म्हणजे, तसंच झालं.) हत्तींच्या कुटुंब प्रमुखाने कळपाला पुढं जात राहण्यासाठी केलेला गजात्कार, घुसखोरांना हुसकावण्यासाठी केलेली गर्जना, पिलाचा जन्म झाल्यावर आनंदोत्सवात हत्तीणीने सोंड उंचावून मारलेली तुतारी... अनेक कंगोरे होते.

प्राण्यांचे संकेत किंवा इशारे ही बाब वैज्ञानिकांना कुतूहलाची वाटली आणि अभ्यासली गेली. प्राण्यांचे संकेत किंवा संदेश हे विज्ञानात ‘अॅपिजमेंट बिहेव्हिअर’ म्हणून गणले जातात. (प्राथमिक अवस्थेतील सजीवांत अॅपिजमेंट वृत्ती आढळत नाही. तसा वावच नसतो, म्हटलं तरी चालेल.) प्रसिद्ध प्राणी मानसशास्त्रज्ञ पाव्होलोव्ह; एंथॉलोजिस्ट‌्स टिनबर्गेन, लॉरेंझ, व्हॉन फ्रिस्क अशा शास्त्रज्ञांनी विज्ञानात ‘अॅपिजमेंट बिहेव्हिअर’ ही नवी शाखा विकसित केली. ‘अॅपिजमेंट बिहेव्हिअर’ म्हणजे, एकमेकांना संदेश देणं. हे संपर्क तंत्र बहुतेक प्राण्यांमध्ये दिसून येतं. हा स्वभाव वांशिक मानला जातो. ही अ‍ॅपिजमेंट‌्स अनेक प्रकारची असतात. प्रामुख्याने प्रणयक्रीडांशी ती निगडित असतात. तथापि ते केवळ मिलनाचेच नसतात. त्याला अनेक कंगोरे असतात. म्हणून तर ते वैज्ञानिकांना कुतूहलाचे वाटतात. त्यांच्या अभ्यासांतर्गत कारण, माध्यम, क्षेत्र, ज्ञानेंद्रियं असे अनेक मुद्दे येतात. त्यांचा सांगोपांग विचार करणं जरुरीचं आहे. हे शास्त्र खालील प्रश्नांच्या अनुषंगाने विकसित होत गेलं.

१) विशिष्ट प्राण्याचं काही ठरावीक पद्धतीचं वर्तन असण्यामागे कारण काय? २) प्राण्याचा विकास होत असताना या वर्तनात कसा काय बदल होतो? ३) प्रजनन आणि टिकाव कार्यात अशा वर्तनांचं महत्त्व काय? ४) उत्क्रांती प्रक्रियेत या वर्तनात कसे काय बदल होत गेले?
प्रस्तुत लेख प्रजननाशी निगडित असल्याने, त्या अनुषंगानेच आपण ‘अॅपिजमेंट बिहेव्हिअर’चा विचार करणार आहोत.
बातम्या आणखी आहेत...