आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सजीवसृष्टी एक अजबखाना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रजनन हा वैज्ञानिक विषय आहे. त्याला प्रारंभ करण्याआधी एक चावट जोक आठवला. जोक चावट असला, तरी त्याचं सभ्य रूप असं आहे.
एक शालेय मुलगा आपल्या वडलांना विचारतो,
“बाबा माझा जन्म कसा झाला?”
काय सांगावं, वडलांना प्रश्न पडतो. काहीतरी उत्तर द्यायचं, म्हणून ते बोलतात,
“देवाने तुला आकाशातून टाकलं. मी तुला झेललं आणि तुझा जन्म झाला.”
या उत्तराने मुलाचं समाधान झाल्याचं दिसलं नाही. तो गोंधळलेला दिसून आला. त्याने वडलांपुढं पुढचा पेच टाकला.
“बाबा तुमचा जन्म कसा झाला?”
या प्रश्नमालिकेतून सुटका करून घेण्यासाठी, त्यांनी चेंडू आजोबांच्या नेटमध्ये टाकला.
“ते तुझ्या आजोबांना विचार.”
गोंधळलेला मुलगा आजोबांकडं गेला.
“आजोबा, बाबांचा जन्म कसा झाला?”
आजोबांना पेच. त्यांनीही आपली सुटका करून घेण्यासाठी उत्तर दिलं, “देवाने तुझ्या बाबांना आकाशातून टाकलं. मी त्याला झेललं आणि त्याचा जन्म झाला.”
यावर त्या मुलाची प्रतिक्रिया, ‘देवा मला कशा कुटुंबात जन्माला घातलंस; मुलांचा जन्म कसा होतो, आमच्या पुस्तकात लिहिलं आहे, ती पद्धत या कुटुंबाला माहीत नसावी?’

मनुष्य प्राण्याच्या, बऱ्याच सस्तन प्राण्यांच्या प्रजननाविषयी शालेय विद्यार्थ्यांना ज्ञान असतं. तथापि या पृथ्वीतलावर सजीवांच्या लाखो प्रजाती नांदत आहेत. त्यांच्या प्रजनन पद्धती, हा अत्यंत रंजक विषय आहे. वनस्पतींबाबतीत ते रंजक असलं, तरी त्यात वैविध्य नसतं. लहानपणी गावी जायचो. जमिनीत धणे पेरायचो. त्याची कोथिंबीर कशी होते, हे पाहणं हा एक मजेशीर खेळ होता. प्राण्यांच्या प्रजननात वैविध्य असलं, तरी ते अनुभवणं सहज शक्य नसतं. खरं म्हणजे, जैवविविधता हाच पृथ्वीवरील एक रंजक विषय आहे. यात वनस्पती आहेत, तसेच प्राणीही. लाखो जाती-प्रजातींचे प्राणी पृथ्वीतलावर सुखेनैव जगत आहेत. पृथ्वीचं पर्यावरण त्यांच्या जीवनशैलीच्या विविधतेस कारणीभूत आहे. काही प्राण्यांचा अधिवास जमिनीवर आहे, काही पाण्यात वास्तव्यास आहेत, तर काही हवेत रमणार आहेत. कित्येक प्राणी थंड वातावरणाला सरावलेले आहेत, तर कित्येकांना उष्ण वातावरण मानवत आहे. ही जीवनशैली विविधता, -५० ते +५० अंश से. अशा तापमान पर्यावरणाशी विस्तारित आहे. परिणामतः या प्राण्यांच्या प्रजोत्पादनांच्या तऱ्हांतही अशीच विविधता आढळते. तिचा वेध घेणं, हा केवळ अभ्यासाचाच नव्हे, तर रंजनाचाही भाग ठरू शकतो.

अशी विविधता असली तरी एका गोष्टीत साम्य आढळतं. बहुतेक सर्व सजीवांत नर आणि मादी असा लिंगभेद असतो. याला अपवाद असतात, अगदी प्राथमिक स्वरूपांतील, अविकसित (protozoa वगैरे) सजीव. मग विकसित सजीवांत लिंगभेद करण्याची गरज निसर्गाला का भासावी? किंवा उत्क्रांती प्रक्रियेत लिंगभेद विकसित झाले, असं मानलं तर ते का व्हावेत? असे कूट प्रश्न वैज्ञानिकांना अजूनही सतावतात. पुनरुत्पादन प्रक्रियेस चालना देण्यासाठी लिंगभेद उत्क्रांती विकसित झाली, असा सर्वसाधारण सिद्धांत मांडला जातो. तथापि या सिद्धांतालाही वैज्ञानिकांचा आक्षेप आहे. कारण ज्या अविकसित सजीवांत असा लिंगभेद नाही, त्यांचंही पुनरुत्पादन कार्य व्यवस्थितरीत्या चालूच आहे. तसंच काही सजीवांत लिंगभेद असूनही अलैंगिक पद्धतीने पुनरुत्पादनाची प्रक्रिया अव्याहत चालू आहे. मग सजीवांच्या पुनरुत्पादनासाठी लिंगभेद आवश्यक आहे का? असल्यास नर आणि मादी यांचा समागमही आवश्यक असतो का? पुनरुत्पादनासाठी अंडी, बिजांडं यांची तरी जरुरी आहे का? आणि यापैकी कोणतीही व्यवस्था सजीवांत नसेल तर ते सजीव पुनरुत्पादनासाठी सक्षम असतात वा कसे? अशा सर्वच सजीवांची संख्या वाढताना तर आपण पाहतो. मग निसर्गाने त्यांच्या प्रजननासाठी काय व्यवस्था रचली आहे? असे अनेक प्रश्न सामोरे येतात. आणि त्यांचा अभ्यास करताना कित्येक रंजक गोष्टी उकलत जातात...

डॉ. प्रकाश जोशी
eknathjosh@gmail.com