आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr Prakash Khandge Article About Marathi Drama Indira

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका वादळाचा नाट्यवेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चरित्र नाटक हे त्या व्यक्तीच्या आयुष्याचा पूर्ण जीवनपट मांडणारं असतं, असं नाही; तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अतिशय लक्षवेधी, उत्कंठावर्धक प्रसंगांची गुंफण चरित्र नाटकात केलेली असते. ‘इंदिरा’ नाटकातही नेमके असेच आहे. चरित्र नाटकात नाटककाराने, त्या विशिष्ट व्यक्तिमत्त्वाविषयीचे आपले म्हणून काही ठोकताळे बांधलेले असतात. ‘इंदिरा’ नाटकात एक करारी राजकीय व्यक्तिमत्त्व आणि एक सहृदय माता म्हणून, इंदिराजींची रूपे उभी करण्यात नाटककार रत्नाकर मतकरी निश्चित यशस्वी ठरले आहेत.

इंदिरा गांधी हे भारतीय राजकारणातील सर्वात वादळी व्यक्तिमत्त्व. पं. नेहरूंनंतर भारतीय राजकारणात अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांनी पंतप्रधान म्हणून इंदिराजींनी आपली स्वतंत्र नाममुद्रा कोरली. त्यांचे आणीबाणीसारखे काही निर्णय अतिशय वादग्रस्त ठरले; पण धोरणी, मुत्सद्दी नेत्या म्हणून जागतिक पातळीवर त्यांनी कीर्ती संपादन केली. इंदिराजींच्या व्यक्तिमत्त्वाची जादू इतकी मोठी होती की, त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्यावर कादंबर्‍या, चरित्रपर लेखन सुरू होते. इतकेच काय, इंदिराजींवर महाराष्ट्रातल्या तमाशा कलावंतांनी वगनाट्यही रचली होती. नामदेव ढसाळ यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न विद्रोही कवीने ‘प्रियदर्शिनी’ हा काव्यसंग्रहही प्रसिद्ध केला होता. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा वेध ‘इंदिरा’ या नाट्यकृतीद्वारे अलीकडेच घेण्यात आला आहे. रसिका, महाद्वार आणि अनामिका या संस्थांची ‘इंदिरा’ ही नाट्यकृती लक्ष वेधून घेणारी आहे. लेखक, दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांनी खूप पूर्वी हे नाटक लिहिले आहे.

चरित्र नाटक हे त्या व्यक्तीच्या आयुष्याचा पूर्ण जीवनपट मांडणारं असतं, असं नाही; तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अतिशय लक्षवेधी, उत्कंठावर्धक प्रसंगांची गुंफण चरित्र नाटकात केलेली असते. ‘इंदिरा’ नाटकातही नेमके असेच आहे. चरित्र नाटकात नाटककाराने त्या विशिष्ट व्यक्तिमत्त्वाविषयीचे आपले म्हणून काही ठोकताळे बांधलेले असतात. त्या व्यक्तिमत्त्वाच्या निष्कर्षाप्रत नाटककार आलेला असतो. ‘इंदिरा’ नाटकात एक करारी राजकीय व्यक्तिमत्त्व आणि एक सहृदय माता म्हणून, इंदिराजींची रूपे उभी करण्यात नाटककार रत्नाकर मतकरी निश्चित यशस्वी ठरले आहेत.

माणूस म्हणून जीवनातल्या अनेक कसोटीच्या क्षणांना सामोरे जाताना इंदिराजी अनेक वेळा घायाळ झाल्या, संत्रस्त झाल्या, क्वचित प्रसंगी ढासळल्यादेखील; पण नव्या उमेदीने फिनिक्स पक्ष्यासारख्या पुन्हा उभ्या राहिल्या. त्याचं दर्शन ‘इंदिरा’ नाटकात होतं. कधी कधी इंदिराजींचा प्रभाव निर्माण करणारा लंबक हेलकावतो; पण तरीही नाटककार आणि दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांच्या काही त्रुटी आपण सहजच विसरून जातो. मुख्यतः इंदिराजींच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक बारकावे टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न ‘इंदिरा’ या नाटकातून झालेला आढळतो.

मुळात इंदिरा गांधींबद्दल भारतीय राजकारणात आणि सर्वसामान्य जनांत दोन स्वतंत्र मतप्रवाह आहेत. पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंचा वारसा चालविणार्‍या इंदिराजी पुत्रप्रेमाने अंध झालेल्या, अतिशय महत्त्वाकांक्षी, सत्तालोलूप, प्रसंगी मत्सरी होत्या, अशी एक त्यांच्याबद्दलची प्रतिमा; तर सत्तर-ऐंशीच्या दशकात त्यांना ‘नव दुर्गा’, ‘नव चंडी’ अशी संबोधने देऊन भारताच्या भाग्यविधात्या, ‘गरिबी हटाओ’चा नारा देऊन गरिबांचे अश्रू पुसणार्‍या अशी त्यांची दुसरी प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात होती. दिल्लीतल्या एखाद्या शासकीय सांस्कृतिक महोत्सवात आदिवासींसोबत नृत्य करणार्‍या, महाराष्ट्रातील लोककलावंतांसोबत फुगडी घालणार्‍या, हत्तीवर बसून आंध्र, कर्नाटकात, दुर्गम भागात दौरा करणार्‍या अशी इंदिराजींची रूपं कोण विसरू शकणार? उरलीसुरली संस्थाने खालसा करणे, बँकांचे राष्ट्रीयीकरण करणे, विदेशी भांडवलदारांवर जरब बसविणे, राजकारणातल्या मोरारजींसारख्या ढुढ्ढाचार्यांना दूर ठेवणे, डाव्या विचारसरणीचा, प्रागतिक, पुरोगामी विचारसरणीचा स्वीकार करणे आदी बाबींसाठी इंदिराजी सर्वांना ज्ञात आहेत. त्यांचे निर्णय वादळी ठरले. सार्वजनिक जीवनात आणि व्यक्तिगत जीवनात वादळे पेलताना इंदिराजी हेलावल्या, पण तरीही वादळातून पुन्हा उभ्या राहिल्या.

इंदिराजींच्या दोन टोकाच्या प्रतिमा भारतीय जनमानसात निर्माण झालेल्या आहेत. या प्रतिमांना ‘इंदिरा’ नाटकात स्पर्श झालेला असला तरी, या दोन टोकाच्या प्रतिमांच्या हिंदोळ्यावर ‘इंदिरा’ नाटक उभे आहे, असे नाही. नाटकाचा काळ सुरू होतो, तो अलाहाबाद उच्च न्यायालयाने जो इंदिराजींच्या विरोधात ऐतिहासिक निकाल दिलेला असतो तेव्हापासून. या निकालाच्या काळापासून तो इंदिराजींच्या हत्येपर्यंतचा काळ नाटकात उभा करण्यात आला आहे. या काळातील इंदिराजी अनेक वेळा भयग्रस्त, संभ्रमावस्थेतील वाटतात. इंदिराजी भारतीय राजकारणातील एका परमोच्च स्थानावर असतानाही एक महिला म्हणून त्यांची घालमेल रत्नाकर मतकरी यांनी खुबीने उभी केली आहे.

इंदिराजींच्या बालपणीच्या आठवणींची मतकरी यांनी खुबीने पेरणी केली आहे. आणीबाणीची काळरात्र अन् पहाट. पहिल्या प्रहरीचा देशावर झालेला आणीबाणीचा आघात. नेमका या पहिल्या प्रहरात संजय गांधींच्या कुत्र्याचं भुंकणं, आणीबाणी पर्व संपुष्टात आल्याची घोषणा करायला निघालेल्या इंदिराजींकडे शेख मुजीबर रेहमान यांच्या हत्येची बातमी येणं आणि इंदिराजींनी आणीबाणीचा निर्णय फिरवणं, अशा अनेक नाट्यपूर्ण घटनांनी ‘इंदिरा’ नाटकात राजकीय क्षेत्रातलं हे वादळ पेलण्याचा प्रयत्न रत्नाकर मतकरी यांनी समर्थपणे केलेला आहे.

इंदिरा निष्ठांची मांदियाळी, त्यांचे संदर्भ नाटकात अनेकदा येतात. पुपुल जयकर हे त्याचं उत्तम उदाहरण. पुपुल जयकर आणि इंदिरा गांधी यांचं नातं अधिक दृढ होतं. नाटकातील विविध प्रसंगातून ते जाणवतं. पण पुपुल जयकर आणि इंदिरा गांधी यांच्यातील संवाद राजकीय मुत्सद्देगिरीची चुणूक दाखविणारे वाटत नाहीत. इंदिरानिष्ठांच्या मांदियाळीत आर. के. धवन, बरूआ अशी मंडळी दाखविली आहेत; पण इंदिराजींचे त्या काळातले ज्येष्ठ सहकारी जगजीवनराम, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण आदींच्याबाबत उल्लेख आढळत नाहीत. एखाद-दुसरा उल्लेख अतिशय जुजबी वाटतो. इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिगत जीवनावर प्रकाश टाकणारे हे नाटक मनेका आणि इंदिरा गांधी यांच्यातील तणावपूर्ण प्रसंगाचे दर्शनही घडविते; अथवा राजीव आणि संजय गांधी यांच्यातील राजकीय, वैचारिक मतभेदांचे दर्शनही घडविते; पण या सर्वच प्रसंगांचा परिणाम ठळकपणे अधोरेखित होत नाही. आणीबाणी जाहीर करताना आणि आणीबाणी उठवितानाची इंदिरा गांधी यांची घालमेल त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळाच पैलू स्पष्ट करणारी वाटते.

जनता पक्षाच्या विजयानंतर मोरारजी, जयप्रकाश यांच्यामुळे देशाच्या जनतेत आपले चेटकीण, राक्षसीण असे चित्र तयार झाले आहे, त्याबद्दल इंदिरा गांधी यांना सतत खंत वाटत राहते. जनता राजवटीनंतर त्या फिनिक्स पक्ष्यासारख्या पुन्हा भारतीय राजकारणात उभ्या राहतात, पण या संदर्भात इंदिराजींचे भाष्य अथवा संजय गांधी, पुपुल जयकर यांच्यासोबतचे त्यांचे संभाषण खूपच प्राथमिक स्तरावरचे वाटते. राजकीय मुत्सद्देगिरी हा इंदिराजींचा प्रकृती पिंड होता. त्या मुत्सद्देगिरीचे संभाषण नाटकात अभावानेच दिसते. मोरारजी, जयप्रकाश यांच्या संदर्भातल्या इंदिराजींच्या प्रतिक्रिया खूपच सर्वसामान्य माणसासारख्या राग, द्वेषाच्या वाटतात. खरे म्हणजे, इंदिराजी त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने एकूणच जयप्रकाश, मोरारजी एपिसोडचा विचार करत असाव्यात.

संजय गांधी हा आपला पुत्र इंदिराजींना कसोटीच्या क्षणी आधार देणारा वाटतो. प्रसंगी भावाइतका जवळचा वाटतो, असं इंदिराजींनी म्हटलं आहे. संजय आणि इंदिराजी यांच्यातील माता-पुत्र प्रेमाचे हळवे क्षण चटका लावून जातात; पण संजय गांधी यांच्याबद्दल पुपुल जयकर, सिद्धार्थ शंकर राय यांनी केलेल्या शेरेबाजीवर विचारपूर्वक प्रतिवाद इंदिराजी करताना दिसत नाहीत. सुवर्ण मंदिरातील कारवाई अन् यानंतर त्यांच्या तोंडी त्यांच्या हत्येच्या चाहुलीबाबतचे संवाद वारंवार दाखविले आहेत. ‘इंदिरा’ नाटक हे अधिक नाटकी करण्यासाठी कदाचित मतकरी यांनी लेखन, दिग्दर्शनात तशा प्रकारचे धोरण स्वीकारलेले असावे. इंदिराजींची प्रखर मुत्सद्देगिरी नाटकात का जाणवत नाही? असा प्रश्नही वारंवार पडतो. इंदिरा गांधींच्या हत्येचा प्रसंग अधिक परिणामकारक हवा होता. दिग्दर्शक म्हणून रत्नाकर मतकरी यांनी पर्सनॅलिटीला उभी करण्यात यश मिळवलेलं असलं तरी ‘इंदिरा’ भव्यता गाठण्यात थोडं मागे पडतं, असं उगाचंच वाटतं.

इंदिराजींचं एक स्त्री, माता म्हणून रूपच अधिक ठाशीवपणे उभं करण्याचा नाटककाराचा मनोदय असावा, असं वाटतं. चिनार वृक्षाची ओढ असणार्‍या इंदिराजी शेवटी कदंबाचा वृक्ष बंगल्यात लावा, असा सल्ला राजीव-सोनियाला देतात, त्यांचं हे भावुक रूप नाट्यरसिकांना अधिक स्पर्शून जातं.

सुप्रिया विनोद यांनी इंदिराजी उभं करण्याचं आव्हान चांगल्या पद्धतीने पेललं आहे. निदान इंदिराजी म्हणून आपल्याला आता पर्याय नाही, ही अपरिहार्यता सुप्रिया विनोद यांनी उभी केली आहे. अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल ते सुवर्ण मंदिर कारवाईनंतरचा हत्येचा प्रसंग या काळाच्या पटलांचे दर्शन घडविताना इंदिराजी एक करारी राजकीय नेत्यापासून भावुक स्त्रीपर्यंत पोहोचतात, ते सुप्रिया विनोद यांनी आपल्या अभिनयातून दाखवून दिले आहे. संजय गांधी यांची प्रतिमा विक्रम गायकवाड यांनी बेमालूम उभी केली आहे. विशेषतः संजय गांधींच्या कृती-उक्तीतील आक्रमकता, खुनशी वृत्ती, बेदरकार वृत्ती आणि नंतर तिहार तुरुंगात रवानगी झालेल्या संजयची कीर्ती त्यांनी चांगल्या पद्धतीने उभी केली आहे. नकुल घाणेकर यांचा राजीव गांधी अतिशय संयमी आणि संयत वाटतो. एकूणच, ‘इंदिरा’ हे नाटक देशाच्या एका वादळी नेतृत्वाचं दर्शन घडविणारं आहे.
prakash.khandge@gmail.com