आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरलाचा विजय असो !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंधरा मे- ज्या दिवसाची आम्ही उत्सुकतेने वाट पाहात होतो तो दिवस उजाडला आणि सरलाचा विजय झाला.
कोण ही सरला? तिचा विजय कसा झाला? सरला. औरंगाबाद शहरापासून पस्तीस-चाळीस किमी अंतरावर डोंगरातल्या छोट्या गावात राहणारी मुलगी. जन्मली तेव्हाच आईवडिलांनी जरा नाराजीनेच तिचं स्वागत केलं. तिचं नाव सरला ठेवलं. सरला नावाच्या अर्थाचा नवीनच संदर्भ आमच्या पुढ्यात आला- ज्या आईवडिलांना चारपाच मुली असतात त्यांनी कंटाळून शेवटच्या मुलीचं नाव सरला ठेवलं की, त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील जन्माला येणाऱ्या मुली सरतील म्हणजेच संपतील व नंतर मुलगाच जन्माला येईल, असा ठाम विश्वास. गावात अशा चारपाच सरला आहेत. नंतर आजूबाजूच्या गावात रुग्ण तपासात असताना सरला नाव दिसलं की, आम्ही तिला भावंडांची संख्या विचारू लागलो आणि सरला नावाच्या मुलीच्या कुटुंबाची कहाणी समजायला लागली. पण मी ज्या सरलाविषयी सांगते आहे, ती एका दलित कुटुंबातील पाचव्या क्रमांकाचं अपत्य. घरी डोंगरातील पाच-सहा एकर कोरडवाहू जमीन. आईवडील शेतीत काम करणारे. सरलाच्या मोठ्या तिघी बहिणी शिकल्या म्हणजे जेमतेम चौथी-पाचवी. त्यामुळे त्यांची प्रथेनुसार तेरा-चौदाव्या वर्षी लग्नं झाली.

डोणवाडा गावात सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा. सरला सातवीपर्यंत नियमित शाळेत गेली. आठवीपासून पुढे दहावीपर्यंत मात्र सरलाला रोज बारा किमी आडगावची पायपीट करायला लागली. मेहनती सरला दहावी चांगल्या गुणांनी पास झाली. स्वत: पाचवी पास असलेल्या वडिलांनी सरलाला शिकवायचा निर्णय घेतला. सरलाने मोठ्या बहिणीच्या घरी वरुडला राहून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्याच दरम्यान संस्थेचा गावात किशोरी विकास वर्ग सुरू होता. सरला अधूनमधून त्या उपक्रमांत उत्साहाने सहभागी व्हायची. तिची मैत्रीण यमुनाने नुकताच रुग्णसाहाय्यकाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पुरा केला होता. सरला आणि यमुना या गावातून बारावी होणाऱ्या पहिल्याच मानकरणी. आजही गावात कमी वयात लग्न होण्याचं प्रमाण बरंच आहे. पण सरलाची शिकण्याची जिद्द पाहून तिच्या वडिलांनी तिला रुग्णसाहाय्यक प्रशिक्षणासाठी शहरात पाठवलं. इतर गावातील मुलींसोबत सरला शहरात राहून अभ्यासक्रम पूर्ण करत होती.

अभ्यासातही तिची प्रगती चांगली होती. परीक्षा मे महिन्यात येऊन ठेपली होती. परीक्षा संपली की, लगेच दुसऱ्या दिवशी तिचं लग्न ठरलं होतं. पण अचानक परीक्षेच्या तीन आठवडे आधी सरलाच्या पोटात दुखायला लागलं. सरला गावाकडे गेली. वडिलांनी जवळपासच्या दवाखान्यात दाखवलं, औषधोपचार केले, पण सरला अत्यवस्थ झाली व तिला मोठ्या दवाखान्यात हलवावं लागलं. तिच्या किडनीचे काम बिघडले होते व डायलिसिसची गरज होती. दीड महिना शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार चालू होते. अत्यवस्थ अवस्थेमुळे सगळ्यांचा धीर खचला होता. सरला या दुखण्यातून वाचणार नाही, असं सगळ्यांनाच वाटू लागलं. डॉक्टरांनी पण ती पूर्ण बरी होईलच याची खात्री देता येणार नाही, असं सुचवलं. परीक्षा तर सरलाला देता आली नाही, पण ठरलेल्या लग्नाचं काय? सरलाच्या आईवडिलांनी मुलगा विजय व त्याच्या घरच्यांना स्पष्टच सांगितलं, तुम्ही दुसरी मुलगी पाहा. ज्या दिवशी विजयला हे कळलं, त्या दिवसापासून विजय रोज सरलाला भेटायला येई. नातेवाइकांची पर्वा न करता तो तिची शुश्रूषा करू लागला. अत्यवस्थ अवस्थेतून सरला बाहेर आली, पण तिच्या दोन्ही किडनीत असंख्य खडे होते. लघवीच्या पिशवीत असंख्य खडे होते. त्यामुळे तिची किडनी काम करत नव्हती. तिला वारंवार डायलिसिसची गरज लागणार होती. सरलाला दवाखान्यातून सुट्टी मिळाली, पण डायलिसिससाठीच्या चकरा सुरू होत्या. सरलाच्या आईवडिलांनी मध्यस्थ असलेल्या मावशीकडून पुन्हा एकदा विजयच्या घरी लग्न रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविला. पण विजय निर्णयावर ठाम होता. जोपर्यंत ती आहे तोपर्यंत तिची सेवा करणार आणि तिच्याशिवाय दुसऱ्या कुठल्या मुलीशी लग्नाचा विचार करणार नाही, हे त्याने शांतपणे सांगितलं. आता सरलाच्या वडिलांना पण सरलासाठी चांगल्या उपचाराची सोय पाहावी, असं वाटू लागलं. पण सततच्या दुष्काळामुळे या बापाला काही सुचत नव्हतं. पण सुदैवाने डॉ. हेडगेवार रुग्णालयातील सर्जननी ही जबाबदारी उचलली आणि तिच्यावर सहा महिन्यांत तीन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या. या तिन्ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या.

प्रत्येक शस्त्रक्रियेच्या वेळेस अत्यंत अत्यवस्थ अवस्थेतून सरला बाहेर आली. हिंडू फिरू लागली. हळूहळू सरलाचं वजन वाढू लागलं. विजय तिच्या सोबत होताच. त्याच्या प्रेमामुळे व विश्वासामुळे ती मनाने खंबीर होत गेली. तिचा आत्मविश्वास वाढत होता. ती अजूनही पूर्ण ठणठणीत बरी नाही आणि तिच्या किडन्या चांगल्या काम करतील असं चित्र नाही, याची सगळी कल्पना डॉक्टरांनी वारंवार विजयला देऊनही विजयचा निश्चय अखेर पंधरा मे रोजी कृतीत उतरला आणि सरला-विजयचा मंगल परिणय झाला. एका सिनेमातल्या नायकापेक्षा सत्यातला हा विजय अधिक सरस नायक आहे. निरक्षर आईच्या पोटी, जी स्वयंपाकाची कामं करते, विजय जन्मला. त्याचे वडील बांधकाम मजूर म्हणून काम करतात. त्यांचा हा M. Com. झालेला मुलगा. शहरातील वस्तीत राहणारा. मेहनती. कमवत शिकत स्वत:चं मल्टीसर्व्हिसेसच दुकान चालवतो. स्वत:चा व्यवसाय करावा, अशी मनापासून इच्छा म्हणून त्याने बँकेतून अडीच लाखाचे कर्ज काढले आहे, ते स्वत:च्या हिमतीवर फेडतो आहे. शिक्षणासोबत खेळातही उत्तम प्रावीण्य. कराटेचा ब्लॅक बेल्ट चॅम्पियन. आणि एका साधारण गरीब ग्रामीण भागातील मुलगी जिचं पुढचं आयुष्य म्हणजे प्रश्नचिन्ह आहे, अशा मुलीवर मनापासून प्रेम करतो. जोडीदार म्हणून तिची सेवा करतो, तिचा सन्मान ठेवतो, हे विलक्षण आहे. असं काय आहे ज्यामुळे विजय सरलाचा झाला?

यावर विजय नम्रपणे म्हणतो की, जर सरला एप्रिलऐवजी मेनंतर आजारी झाली असती तर तेव्हा जे मी केलं असतं ते आधी केलं, एवढंच.

लग्नानंतरच्या तिसऱ्या दिवशीच सरलाने मागच्या वर्षी देऊ न शकलेल्या रुग्णसाहाय्यकाची परीक्षा दिली. लग्नाच्या आधीच विजयनं कुटुंब नियोजन करणं तुझ्यासाठी कसं आवश्यक आहे, हे सरलाला समजावलंय. तिचं शिक्षण चालू ठेवावं, प्रेमळ आनंदी संसार करावा, एवढीच त्याची इच्छा आहे. बऱ्याचदा अशा व्यक्तीत त्यागाची झिंग आपण पाहतो. पण विजयनं अहंकारावर विजय मिळवलाय. तो विपश्यना शिबिर करून आलाय. सरलानंही ते करावं, असं त्याला वाटतं. विजयनं समवयस्क मित्रांना एवढाच संदेश दिलाय की, जोडीदारावर निर्व्याज प्रेम करावं, त्यांना सन्मानाने, समानतेने वागवावं.
खरोखर असा विजय विरळाच. आजही आजूबाजूला अशा अनेक सरला आहेत, ज्या विजयची वाट पाहताहेत!

डॉ. प्रतिभा फाटक औरंगाबाद
लेखिका सार्वजनिक आरोग्य व ग्रामविकास तज्ज्ञ आहेत.
drpratibhaphatak@gmail. com
बातम्या आणखी आहेत...