आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादुई कविता (पृथ्वीराज तौर)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबुषाच्या कविता वाचत असताना एखाद्या जादूगाराच्या सोबत प्रवास करत असल्याची आपल्याला अनुभूती येते. आपल्या हजारो मुखांनी दुःख या कवितेतून बोलतं, तर मध्येच अचानक आलेल्या पाहुण्यासारखा आनंद वाचकाला विस्मयचकित करतो.
‘प्रेम गिलहरी दिल अखरोट’ या कवितासंग्रहामुळे बाबुषा कोहली (जन्म ६ फेब्रुवारी १९७९) हिंदीतील महत्त्वाची युवा कवयित्री-लेखिका म्हणून समोर आली आहे. या संग्रहाला भारतीय ज्ञानपीठाच्या वतीने दिला जाणारा नवलेखन पुरस्कार दिला गेला. ‘युवा ज्ञानपीठ’ असंही या पुरस्काराचं वर्णन केलं जातं.

मध्यप्रदेशातील कटनी येथे बाबुषाचं अनेक वर्षं वास्तव्य झालं, जबलपूर येथे आता ती स्थायिक झाली आहे. तिची कविता समकालीन हिंदी कवितेमध्ये शब्द, प्रतिमा, मांडणीच्या अंगाने अगदी जादुई पद्धतीनं आविष्कृत होते. सहजता हा या कवितेचा स्थायीभाव आहे. ज्या सहजतेनं ती वाचकांशी हितगुज साधते, त्याच सहजतेनं निसर्ग आणि ईश्वराशी संवाद प्रस्थापित करू पाहते. ईश्वरासोबत बसून मक्याचं कणीस खाण्याची जंगली इच्छा या कवितेतून व्यक्त होताना दिसते.
बाबुषाच्या कविता वाचत असताना एखाद्या जादूगाराच्या सोबत प्रवास करत असल्याची आपल्याला अनुभूती येते. आपल्या हजारो मुखांनी दुःख या कवितेतून बोलतं, तर मध्येच अचानक आलेल्या पाहुण्यासारखा आनंद वाचकाला विस्मयचकित करतो. प्रेमाच्या अस्पर्शित छटा या कवितेतून एकाखाली एक अशा प्रकट होतात. ‘ब्रेक अप’सारख्या विषयावर हिंदीतच काय पण इतर भारतीय भाषांमध्येही फारशा कविता नाहीत, या पार्श्वभूमीवर बाबुषाची दीर्घ कविता लक्षात राहते. प्रेमाची धुंदी आणि विरहाची असहायता या कवितेतून एकाच वेळी प्रतीत होते.
‘दंड’मधून तिचे सामाजिक भान अतिशय तीव्र आवेगाने व्यक्त होते. आशय आणि बांधणी या दोन्ही पातळ्यांवर बाबुषाची कविता एकदम नवी आहे. सुफी संगीत, अरबी उर्दू शायरी, भारतीय व पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, विश्व साहित्य यांचे संस्कार असणाऱ्या या कवितेत आपण जसजसे उतरत जातो, तसतसे या कवितेमागे असणारे कष्ट लक्षात येऊ लागतात. ही कविता कोणत्याही ठरावीक साच्यात बसवता येत नाही. विचारांच्या विस्तृत पटलावर ही कविता संचार करताना दिसते.

कविता ही स्त्रीच्या आत्म्याचा आरसा आहे, असे बाबुषाला वाटते. तिच्या कवितेतील स्त्री मुक्तीसाठी धडपड करत नाही, कारण ती आतून-बाहेरून मुक्त आहे. मोकळ्या हवेत श्वास घेणारी स्त्री आपल्याला या कवितेत भेटते. समस्यांच्या विरोधात उभी राहिलेली, त्यांचा सामना करणारी स्त्री या कवितेची नायिका आहे. विकासाच्या अनेक शक्यता असणाऱ्या या कवयित्रीच्या या काही कविता.
मक्का
ती वाट
जात नाही
मक्केला
पण
पोहोचवते
शेवटी
मक्केलाच!
*****
मृत्युपत्र
पूर्णतः शुद्धीवर असताना
लिहीत आहे आज मी
मृत्युपत्र माझे!
मरुन जाईन मी, जेव्हा
झडती घ्या माझ्या खोलीची
प्रत्येक गोष्ट तपासा-
देऊन टाका माझी स्वप्नं
त्या सगळ्या बायकांना
ज्या स्वयंपाकघरापासून बेडरुमपर्यंत
आणि बेडरुम ते किचनच्या धावपळीत
वर्षांअगोदर विसरल्या आहेत, स्वप्न बघणं
वाटून टाका माझं खळखळतं हास्य
वृद्धाश्रमातील त्या म्हाताऱ्यांमध्ये
राहतात ज्यांची मुलं
अमेरिकेतील झगमगत्या शहरांमध्ये!
टेबलवर बघा माझ्या
काही रंग पडलेले असतील
देऊन टाका सगळे रंग
त्या सैनिकांच्या विधवांना
शहीद झाले जे
सीमेवर लढतांना!
मिजास माझी, मस्ती माझी
भरुन टाक त्यांच्या नसानसांत
झुकलेले आहेत, खांदे ज्यांचे
दप्तराच्या भरभक्कम ओझ्यानं!
अश्रू माझे देऊन टाका
सगळ्या कवी लोकांना
प्रत्येक थेंबातून जन्मेल नवी कविता
माझं वचन आहे
माझी गाढ झोप नि भूक
देऊन टाक ‘अंबानी’ आणि ‘मित्तल’ला
बिच्चारे निवांत झोपू शकत नाहीत आणि
सुखानं खाऊही शकत नाहीत!
माझा मान, माझी अब्रू
त्या वेश्येचं नाव आहे
विकते जी आपलं शरीर
मुलीला शिकवण्यासाठी!
या देशातील एकेका तरुणाला
पकडून टोच ‘इंजेक्शन’
माझ्या आक्रोशाचं
याची गरज पडेल, त्यांना
क्रांतीच्या दिवशी!
माझा वेडेपणा
हिस्स्याला आहे
त्या सुफीच्या
निघाला आहे जो सर्वस्व सोडून
ईश्वराच्या शोधात
आता शिल्लक
माझी ईर्षा
माझा लोभ
माझा राग
माझा खोटेपणा
माझं दुःख
तर
असं कर;
यांना माझ्यासोबतच टाक जाळून!!

******

अज्ञात प्रदेशातून
मी स्पॅनिशमध्ये बोलते,
तू हिब्रूमध्ये ऐकतोस,
आपण ब्रेलमध्ये वाचले जातो
आपण खितानीप्रमाणं लुप्त होऊ पाहिलं
पण सभ्यतेचा कुणी ‘दरोगा’ असतोच
मला गोंधळात हातकडी घातली जाते,
तू चुप्पीत मारला जातोस
मी तुमच्या कंठात
अडकलेला हुंदका आहे
तुम्ही माझ्या श्वासातून
निघालेलं कण्हणं आहात
रडू नेहमीच बाराखडीच्या बाहेर फुटतं
हुंकारांचं कुठेच नाही व्याकरण
चमकणारे दागिने फोडू शकत नाहीत,
माझे डोळे तुझ्या मौनाची पट्टी
मी डोळ्यांवर बांधली आहे
आपण आयत आहोत, आपण मंत्र आहोत,
आपण श्लोक आहोत, आपण प्रत्येक बोलीत
सतत पुटपुटले जात आहोत
माझ्या प्रिय बहिऱ्या बिथोवन
तू रचलेली जादुई सिंफनी आहे मी
बघ तर! हे जग मला अगदी
मन लावून ऐकतं आहे!!

****
मग कृष्ण म्हणाले…
जर भेटायचं असेल मला
माझ्या चमत्कारांच्या पलीकडे भेट
माझ्यापर्यंत येणाऱ्या वाटा
मौनातून प्रकाशित आहेत.
-------------------
घोषणेपूर्वी
मी हे घोषित करण्यापूर्वी
टाक माझ्या पायात बेड्या
दे मला फासावर
क्रुसावर चढवून मला
हातापायात ठोक खिळे
किंवा प्यायला दे विषाचा प्याला
मी हे घोषित करण्यापूर्वी की
मीच धरती आहे, मीच आकाश, जल आणि अग्नीही
मीच आहे झाड नि डोंगर
नदी, नाला आणि इंद्रधनु मी
माघातील पाऊस आणि ज्येष्ठातील दुष्काळही मी
वावटळ, वादळ, त्सुनामीही मीच आहे
मीच कन्हेर आहे, गाजरगवत नि बेशरमाचं फुलही
गौतमाच्या डोक्यावर असणारा वडही मीच
मीच आहे दलदल
मीच खड्डा, कचरा, चिखल मीच आहे
मीच भूक आहे आणि भोजनही मीच
मीच तहान आहे नि अमृतही मी
मी दिसते, लपते, उडते आणि उमलून येते
मी अनंत, मी असीम, मी अविभाज्य आहे
मी ही घोषणा करण्यापूर्वी
- मार मला गोळी भर चौकात.

******
ब्रेक अप
तो भेटला होता जेव्हा
त्याच्या मनावर एक गंजलेलं कुलूप होतं
माझं बालपण इतकं साधंसरळ, त्यात एखादी कैरी चोरल्याचीही नोंद नाही
मग एखाद्या कुलूपबंद कोठराला कशी छिद्र पाडीन
म्हणून मी फिरवायची इकडे तिकडे नजर
एके दिवशी तो माझा हात त्याच्या छातीपर्यंत घेऊन गेला
आणि उजव्या हाताच्या बोटांनी फिरवून कुलूप उघडलं
माझ्या मनावरही अडकवलेली असावी एखादी कडी कदाचित
त्यानं दार ठोठावलं नि
एका बोटांच्या जादूनं उघडलं गेलं मन
आमच्या आत कुठलासा जादूचा झरा होता
झाडांवर उगवून येई इंद्रधनुष्य
चिमण्या डोळे मिटवून गात असत अरदास
सोहनी द्यायची मटक्यावरती ताल
पहाट अशी जणू हीरचं हसणं
रात्र रात्र चंद्र नदीत पोहत राही
आम्हाला प्रत्येक जागी जायचं होतं
जणू तीर्थयात्रेला निघालो होतो आम्ही
सुटु नये एकही देव
कोप होऊ नये कुणाचाही
प्रत्येक मंदिराचं पंचामृत चाखलं आम्ही
प्रत्येक गुरुद्वाऱ्यात टेकवला माथा
पण करणार काय, रस्ते होतेच चकवणारे
आम्ही दूरवरुन बघायचो पाणी, पण तरीही आम्ही तहानले राहात असू
आमच्या मनात तन लपलं होतं आणि तनामध्ये मन
किती तनं होते आणि किती मनं
किती कुलुपं, किती चोऱ्या
किती स्पर्धा, किती बक्षीसं
किती लालसा, आणि आंधळ्या विहिरीसारखी झोळी
आम्ही कांद्याच्या पापुद्र्यासारखे होतो
आपल्याच दाहानं आम्ही डोळे सुजवून घेतले
आम्ही खूप चाललो आणि खूप चाललो आणि खूप चाललो
मग एके दिवशी आपल्या आपल्या मनाकडे परतून गेलो
उरलेल्या नऊ बोटांसह जगण्यासाठी
सगळी जादू बंद दरवाजामागे असते
कुलूप उघडलंच, तर चावी हरवून जाते.

*****
ब्रेक अप २
सांगतात की प्रत्येक कथेचा नायक तोच असतो ज्यानं कथा लिहिली
एका बाजूच्या बयानबाजीला नका ऐकू
प्रेम तर डोळ्यांवर पट्टी बांधून होतं
म्हणून तरी प्रेमानं न्यायप्रिय असायला हवं
त्याच्या बाजूनं काय म्हणणं मांडू? कयामतीच्या दिवशी त्याला माफ केलं जावं
हे खरं की खटला त्याच्या विरोधात आहे
आणि हा न्याय की त्याची वकिली मी करु
त्यानं प्रेम केलं होतं, क्षणभर का होईना
माझी हत्या हा शेवटी त्याचा अधिकारच तर होता
मी लॉर्ड! माझ्या हत्याऱ्याला दोषमुक्त केलं जावं
इतकं पुरेसं नाही काय की, त्याच्याजवळही एक काळीज होतं
हृदय,
जे डॉक्टर वाचतो मशिन लावून
आडव्या उभ्या रेषांमधून.
मी निव्वळ गावठी
हृदय वाचलं मी हृदयापासून
काळीज ठोक्यांनी वाचलं काळीज
मीच वाचलं चुकीचं
त्याला दोषमुक्त केलं जावं
आमच्या बाजूनं निदान एवढं तरी व्हावं हा खटला थांबवला जावा
तीन वेळा तलाकच्या उच्चारापेक्षा कितीतरी जास्त कडवट आहे, त्याचं मौन
इतकंच कडवट त्याचं प्रेमसुद्धा
तितकीच कडवट त्याची घृणा
तितकंच कडवट त्याचं चुंबन
तितकीच कडवट विरक्ती
अशीच कडवट मुक्ती
सुळावर टांगलेली आहे, त्याची मुक्ती खिळ्यांनी ठोकलेली
सहन करताना मातीमोल होईल, पण बचावासाठी तोंड नाही उघडणार
ही कमजोर माणसं इतकी कडवट का होतात? मी लॉर्ड!
या स्वार्थी जगात मी एकमेव वकील आहे, त्याची
त्याचं कुठलंच बयान मी तुम्हाला ऐकवणार नाही
त्याचं मौन हाच त्याच्या बाजूनं सगळ्यात मोठा युक्तिवाद आहे
त्याचं मौन ऐका, मी लॉर्ड!
पूर्ण गोष्टी खूपच सहजतेनं पूर्ण होत असतात
कुठल्याही डावपेचाशिवाय
कुठल्याही वादविवादाशिवाय
अर्धवट गोष्टींचेच सुरू राहतात खटले
मजबूत इमारतींमध्ये पडझड होणाऱ्या कच्च्या, घरांवर खटले चालत राहतात
आमचा किस्सा अर्धवट सोडून द्या
आम्हाला असेच सोडून द्या
त्याला माझ्या हत्येच्या अपराधातून दोषमुक्त करा
नाहीतर, किमान आम्हाला पुन्हा एखादी नवी तारीख तरी द्या.
****
दंड
हे माझ्या देशा
जर या घोर विपत्तीच्या काळात माझ्या तोंडात फोड आले
आणि मी काहीच बोलले नाही तर तू मला दंड दे
माझ्या मुकेपणाचा इतिहासाच्या चौकात धिक्कार कर
हे माती
माझ्या फुफ्फुसातील वाऱ्या
आणि मला जगवणाऱ्या पाण्या
या कठीण काळात तटस्थ राहणाऱ्या माझ्या कंठावर थुंका
हे मुक्त आभाळा
हे नम्र वटवृक्षा आणि लवलवत्या ज्वाळांनो
जिभेवर आलेल्या फोडांसाठी मला दंड द्या
फाशीपेक्षा कमी बिलकुलच नाही
चालाखीनं गुपचुप बसलेल्या माझ्या शवालासुद्धा दंड द्या
आपल्या स्मृतींमध्ये रात्रंदिवस मला चाबकाचे फटके मारा.

*****
जादू
नको शोधू मला शब्दांमध्ये
मी विरामचिन्हात पूर्ण नाही
व्याकरणासाठी आव्हाने आहे मी
नको शोधू मला रागांमध्ये
शास्त्रीय पासून दूर भटकता स्वर आहे
एक जादुई लकेर आहे
माझ्या पायांची थाप
फक्त कदमताल नाही
एक आदिम जिप्सी नृत्य आहे
आपली टोकदार नखं कुरतडून टाक
माझ्या शोधात मला बोचकारु नको
एक नदी जी झोपली आहे, आत कुठे
तिला स्पर्श करण्याच्या इच्छेतून मला खोदू नको
नको कापू, फाडू
माझ्या नाभीतूनच उगवतात रहस्ये
हा सुगंध पिणं म्हणजेच मला पिणं आहे
मला मिळवणं मूठभर माती मिळवण्याच्या बरोबर आहे
माझ्यात हरवणं, अनंत आकाशाला सामावणं आहे
स्वप्न आहे, भ्रम आहे, मृगजळ मी
सत्य आहे, सागर आहे, अमृत मी
मूळ कविता - बाबुषा कोहली

सर्व कवितांचे अनुवाद - डॉ. पृथ्वीराज तौर
drprithvirajtaur@gmail.com
बातम्या आणखी आहेत...