आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कवितेतली नदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नदी ही मानवी जीवनाचा आणि संस्कृतीचा सतत अविभाज्य भाग राहिली आहे. मानवी संस्कृती व सभ्यता ही नदीकिनारीच निर्माण झाली, वाढली आणि विस्तारली.

प्राचीन काळापासून नदीवरील स्वतःचं परावलंबन मानवाला पुरतं ठाऊक आहे, त्यामुळं तिच्याविषयीचा कृतज्ञभाव त्यानं वेळोवेळी व्यक्त केला आहे. जगभर झालेली जी जी अभिव्यक्ती आज लिखित आणि मौखिक रूपात उपलब्ध आहे, ती पाहिली तर लक्षात येईल की, नदी हा मानवी जीवनाचा आणि चैतन्याचा जिवंत स्रोत राहिली आहे. ती मानवाच्या चिंतनाचा विषय राहिली आहे. प्रत्येक मानवी समूहात, प्रत्येक काळात नदीविषयी लिहिले गेले आहे.

भारतीय कवींनाही नदीने नेहमीच भुरळ घातली आहे. अगदी वेदकाळापासून तिची सुक्ते आणि स्तोत्रे उपलब्ध आहेत. बदलत्या काळासमवेत अभिव्यक्तीचे आशय-विषय बदलत गेले. अलीकडे आपल्याकडे अनेक नद्यांचे अस्तित्व केवळ सांगण्यापुरतेच शिल्लक राहिले आहे. वर्तमानाच्या वर्तनाने तिचे पावित्र्य घालवून टाकले आहे. नदीकाठची गावे पाण्यासाठी दशदिशा पांगली आहेत. हे चित्र दु:खद आहे आणि हे दुःख भारतीय कवींनी तीक्ष्णपणे पकडले आहे.

विविध भारतीय भाषांतील कवितांमधून व्यक्त झालेल्या नदीच्या प्रतिमा वाचणे मनोरंजक आणि तेवढेच उद‌्बोधक आहे. प्रस्तुत अनुवाद आपल्याला विविध रूपातील नदीशी गाठभेट घालून देणारा आहे.

अनरुध नदी ओलांडत नाही
अनरुध जवळ एक झोपडी आहे
एक आहे बायको
एक लेकरु छोटंसं
लेकरासाठी आणायचे आहेत जांब
बायकोसाठी आणायचित पाव किलो रताळी
झोपडीपुढे बांधलेल्या वासरासाठी
आणायची आहे कोवळ्या गवताची पेंडी

अनरुध उठतो सूर्यासोबत
गाव नदीकडे पळत असतं
अनरुध नदी ओलांडत नाही
जणू त्याच्यासाठी तिन्ही लोक आहेत
त्याची झोपडी
आणि त्याची बायको
आणि त्याचं लेकरु
आणि खुंट्याला बांधलेलं वासरु
अनरुध सगळ्या जगाला फेरी मारत नाही

त्याचं सगळं जग
झोपडीपासून नदीपर्यंत
झोपडीच्या परिक्रमेत
नृत्याची चाल घेऊन फिरणारा अनरुध
जणू फिरत असतो तिन्ही लोक!

जीवकांत (मैथिली)
--------------------------
नदी आणि समुद्र
ती नदी
जेव्हा कोसळत असे समुद्रात
तेव्हा तो उसळी घेत असे किनारे फोडून
धडका घेत असे, पाण्याशी पाणी

पण मग रस्ताच बदलला
नदीतल्या वाहत्या पाण्यानं
तेव्हापासून समुद्र किनाऱ्याच्याही
खाली उतरुन गेला

बलबीर माधोपुरी (पंजाबी)
--------------------------
कवी आणि नदी
कवी आणि नद्या
रक्तवाहिन्या असतात भूगोलाच्या
नद्या वाहतात कवितांप्रमाणे
पाखरांसाठी, प्राण्यांसाठी, माणसांसाठी

स्वप्न जी पाहतात नद्या
साकार होतात शेतात
आणि कवींनी पाहिलेली स्वप्ने
साकारतात माणसांच्या आत

शेषेंद्र शर्मा (तेलुगू)
--------------------------
नदीचा शोध
मी तर तिथे एका
नदीच्या शोधात गेलो होतो
पण मला भेटल्या
विटक्या साड्या घालून
चुली फुंकणाऱ्या बाया
मुली छोट्या छोट्या,
कोळश्यांशी नि दगडांशी खेळणाऱ्या
नागडी मुलं भुकेनं व्याकुळ -
कण्हणारे म्हातारे
सातही प्रहर कलयुगाला शिव्या घालणारे
बिडी पित विचारत,
‘किती वाजले साहेब?
तुमच्या दिल्लीत तर
मजा असेल खूप’

हा कोणता काळ आहे
हा कोणता देश आहे
युगाच्या कोणत्या
तुकड्यावर उभा आहे मी
पृथ्वीच्या कोणत्या भूभागावर

पहिलं मतदान करण्याअगोदरच
कित्तेकदा आई बनलेली मुलगी
विचारले मला, ‘कोण आहे या देशाचा राजा?’
तिच्या घरात इच्छेला जागा नाही
स्वयंपाकाला जागा नाही
जी आहे ती एक नदी आहे केवळ
तिच्या आश्रयानं सरकत आहे,
हे पर्वतासारखं आयुष्य.

राजेंद्र उपाध्याय (हिंदी)
--------------------------
नदी
कवितेनं जगणं शिकवलं
आणि नदीनं प्रेम
कवितेत नदी आली
जगण्यात प्रेम

नदी एकटी
नको आहे
इतर गोष्टींसोबत
नदीही हवी आहे

इतर गोष्टी मिळतात
नदी पुढे निघून जाते
किंवा मागे राहून जाते.
इतर गोष्टी सोबत चालतात
नदीशिवाय.

नदी नवी भाषा
लवकर शिकते
नव्या भाषेत
नदी लवकर वाहते

अर्पण कुमार (हिंदी)
--------------------------
नदीवरुन परतताना

ओलाचिंब होऊन
थेंब थेंब निथळत परतलो मी
तर रस्त्यात
असे कोरडे डोळे भेटले काही
की थोडासा शोषला गेलो, आपोआप.

काही मुक्कामावर
तहानलेली माणसं भेटली
आणि ओढाओढीत
नाइलाजानं लुटला गेलो.

काही गर्वानं फुत्कारताना भेटले
चित्कारताना भेटले
वाफ होऊन थोडासा उडून गेलो
मिसळून गेलो सभ्यतेच्या शहरी धुरात.

कुठे डागांनी काळवंडलेलं ऊन भेटलं
तर कुठे रुपाचा जाळ भेटला.
कुठे वरवंडीवर घूं घूं करणारे पारवे भेटले
तर कुठे एकाएकी दगड व्हावं
असे हृदयाचे ठोके भेटले.
कान तुटलेले कप
काठ फुटलेल्या बश्या भेटल्या.

सांभाळता येईल स्वतःला
असा विचार घेऊन परतलो
आज मी
नेहमीचा रस्ता बदलला
आणि नदी आटून गेली.

मंगल राठौड (गुजराती)
--------------------------
नदीचा विस्तार
नदी विस्तारत जातेय हळू हळू
आणि आम्ही म्हणत आहोत, नदी आकुंचन पावतेय

नदीचं आटून जाणं
नदीचं आकुंचन होणं नाहीय
तिचा विस्तार आहे

ज्याला तुम्ही आटलेलं म्हणता
ते तर केवळ पाणी आहे

ज्याला विस्तार म्हणतात,
ते नदीचं वाहणं आहे

जरा तुमच्या भिंतींना कोरुन बघा
कितीतरी आवाज ऐकू येतील तुम्हाला

तुम्हाला प्रयाग ऐकता येईल आणि हरिद्वारही
तुम्हाला प्रत्येक व्यक्ती आपल्या पावलांच्या शीतलतेत
हळू हळू चालत येताना दिसेल

श्रीप्रकाश शुक्ल (हिंदी)
--------------------------
नदी कुमारवयात
शेजारी - आपल्या आजोबांकडे - सुट्टीत आलेल्या मुलीसारखी
वाटते ही नदी
आपल्याच धुंदीत काय काय करत असते!
मला आतल्या आत वाटत राहतं
ती माझ्या हाकेची जणू वाट पाहते.

लोटली कित्येक वर्षे
कित्येक खिडक्या बंद झाल्या, बंद झाले कितीएक दरवाजे
आणि काल सकाळी
एकाएकी तिची भेट झाली
तिनं कधीच ओळखलं नव्हतं मला
म्हणून ओळखूही शकली नाही

कितीतरी उन्हाळ्यांनी तिचा चेहरा मलूल झाला आहे
प्रौढ झाला आहे, देह
पुढे पुढे ती चालत जातेय
मागे मागे बदकांचा कळप
मक्याची कणसं, सिगारेटची रिकामी पाकिटं
छोट्या छोट्या होड्यांमधून
शाळकरी मुलांची पावसाळा खेळण्याची हौस
जात आहे, तिच्या पाठेपाठ चालत.

ती खूप शांत, धीरोदात्त, स्थिर
कायद्यासारखी.
सुरीसारखी कापत जात आहे जंगल, डोंगर, नगर
जटा ल्यालेल्या म्हातारपणात
रक्तानं माखलेली, माझ्या स्वप्नांचा गळा
आणि माझ्या दु;खांची दुखरी हाडं

सौभाग्यकुमार मिश्र (उडीया)

सर्व कवितांचे अनुवाद - डॉ. पृथ्वीराज तौर
drprithvirajtaur@gmail.com
बातम्या आणखी आहेत...