आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्तमानाची काव्यात्म नोंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कृष्ण कल्पित (जन्म ३० ऑक्टोबर १९५७, फत्तेपूर, राजस्थान) हे हिंदीतील महत्त्वाचे कवी आहेत. तरल संवेदनक्षम कवितेने त्यांनी हिंदी कवितेमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. सत्तरच्या दशकात त्यांनी काव्यलेखनाला प्रारंभ केला. कविता, बालसाहित्य, समीक्षा आणि गद्य अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी मोजके पण टोकदार लेखन केले आहे. ऑल इंडिया रेडिओमध्ये कृष्ण कल्पित यांनी दीर्घकाळ नोकरी केली. या काळात ऋत्विक घटक यांच्या आयुष्यावर त्यांनी ‘एक पेड की कहानी’ या वृत्तचित्राची निर्मितीही केली आहे. १९८०मध्ये त्यांचा पहिला संग्रह ‘भीड से गुजरते हुए’ प्रकाशित झाला. बढई का बेटा, कोई अछूता शब्द, बाग ए बेदिल, कविता रहस्य या पुस्तकांनी त्यांना वाचकप्रियता मिळवून दिली. ‘शराबी की सूक्तीयां’ या २००६मध्ये प्रकाशित झालेल्या संग्रहाने त्यांची कविता प्रत्येकाच्या ओठावर आली. कविता हे कवीचे आत्मचरित्र असते त्याप्रमाणेच कविता हे कवीच्या वर्तमानाचेही चरित्र असते. डॉ. पी. विठ्ठल यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘कविता ही वर्तमानाची कवीने केलेली काव्यात्म नोंद असते.’ काळाचे हास्य आणि रुदन, आवाज आणि अबोला, धडपड आणि पडझड, झुंज आणि अपयश या सगळ्यांचा आलेख कवितेतून व्यक्त होत असतो.

वर वर साधी सोपी वाटणारी कविता स्वविशिष्ट प्रतिमा प्रतीकांमधून आपला निषेध आणि राजकीय स्वर सूचकपणे व्यक्त करत असते. कृष्ण कल्पित यांची कविता ही अशी वर्तमानाची काव्यात्म नोंद आहे. ती सामान्यांच्या बाजूने उभी आहे, हे सांगावे लागत नाही, इतकी ती सामान्यांची बोली स्वतःतून व्यक्त करते. परिचित वाक्याची कृष्ण कल्पित अशी मांडणी करतात की, त्यातून कवितेची निर्मिती होते. ख्यातनाम कवी कृष्ण कल्पित यांची कविता वाचत असताना आपण आपल्याच आवाजाचे प्रतिध्वनी ऐकत आहोत, असे वाचकाला वाटत राहते. आजचे अनुवाद आपल्याला या बाबीचा प्रत्यय घडवतील, हे नक्की.

गाढव
जेव्हा ते काबूलपर्यंत आढळत होते
तेव्हा मग भारतात का आढळणार नव्हते?
ते आढळत असत आणि ते मजेतही असत
आणि बदामासोबत महागडा गर खात असत
गाढवं आनंदी होती,
त्यांच्यातील आणि घोड्यांतील अंतर,
कमी होत होतं
फक्त परटाची गाढवं दु:खी होती,
काम झाल्यानंतर ते उकीरड्याचे धनी होते,
या प्राचीन देशात, गाढवांना ओळखलं जात असे
चक्रीवान वालेयः रासभः गदर्भः खरः
अशा गोंडस, अलवार नावांनी, या महान देशात
गाढवांची कोणत्याच काळात
कधी कमतरता नव्हती
फक्त इथे एकही मुल्ला नसरुद्दीन नव्हता!
गोळी
पुस्तक ईश्वरी असो
की मानवी
बंदूकीची एक गोळी
जगातील सगळ्या पुस्तकात
छिद्र पाडू शकते

पाणी
पाणी आमच्यासाठी आठवण नव्हे
मरण होतं
आम्ही वाळवंटात
राहणारे होतो
आणि कवींसारखे खोटारडे नव्हतो

वापस जाणाऱ्या रेल्वेप्रमाणं
चिरंतन काहीच असत नाही
मोठी मोठी युद्धसुद्धा
संपून जातात एके दिवशी
प्रेमही परतून गेलं
वापस जाणाऱ्या रेल्वेप्रमाणं
पुन्हा परतलं नाही प्रेम
वापस आला व्यभिचार पुन्हा पुन्हा
आत्म्याच्या सुन्या
प्लॅटफॉर्मवर शंटिंग करत

अच्छे दिन -१
चांगल्या दिवसात सगळं चांगलंच होणाराय काय?
जितके वाईट
कवी आहेत
ते चांगल्या दिवसात चांगले कवी
होणारायत काय?
खुनी लोकांना
चांगले खुनी
म्हटलं जाईल काय?
सगळे डाकू,
सुल्ताना डाकूसारखे चांगले नि इमानदार
होणारायत काय?
वेश्यांना गणिका म्हटलं जाणाराय का
चांगल्या दिवसात?
ज्याचाही गळा
कापला जाईल
चांगल्या पद्धतीनं
कापला जाणाराय का
चांगल्या दिवसात?
वाईटही चांगले होऊन जाईल का
चांगल्या दिवसात?
येतील, नक्कीच येतील
चांगले दिवस!
येतील आणि
थोबाडावर पडतील!!

तिकीट
तुझ्याजवळ एखादं पत्र आहे का
रक्तानं लिहिलेलं?
तुझ्याजवळ एखादा लिफाफा आहे का
रिकामा, वाट पाहणारा?
तुझ्याजवळ एखादा पत्ता आहे का
जिथं कुणी राहात असेल?
माझ्याजवळ एक पोस्टाचं तिकीट आहे
तुला हवं असेल तर!

अच्छे दिन -२
चांगले दिवस जेव्हा येतील
सनई चौघडे वाजवत येतील
ते येतील हत्तीवर स्वार होऊन
वाजतील रणवाद्ये
उडत राहील धूळ
सगळ्या गोष्टी
पायाखाली तुडवत जाणाऱ्या
झुंडीसारखे येतील
चांगले दिवस
रक्तात न्हाऊन माखून
गरिबांना चिरडत
वाळून गेलेल्या शेतांतून जाईल
एक विक्रांत विजय रथ
तमाशे होतील जोरदार
निघेल राजपथावरून
चांगल्या दिवसांचा मोर्चा
आणि नंतर बराच काळ
उडत राहील त्याची राख
डॉ. पृथ्वीराज तौर
drprithvirajtaur@gmail.com
कवितांचा अनुवाद - डॉ. पृथ्वीराज तौर, संपर्क - ७५८८४१२१५३
बातम्या आणखी आहेत...