आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हुकूमशाहीला सवाल करणारी कविता (डॉ. पृथ्वीराज तौर)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आणीबाणी आणि दडपशाहीच्या प्रसंगी उदय प्रकाश यांनी व्यक्ती आणि कलावंत म्हणून स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. सामान्य माणसांच्या समूहाचा ते असा अविभाज्य भाग आहेत की, त्यांची कलाकृती ही सामान्यांचा सामान्यांच्याच बोलीतील उच्चार आहे.

कवीचं जगणं आणि त्याचं लेखन यांत कमीतकमी अंतर असायला हवं, याचं उत्तम उदाहरणं म्हणून, उदय प्रकाश (जन्म : १ जानेवारी १९५२, मध्यप्रदेश) यांच्याकडे पाहता येईल. आणीबाणी आणि दडपशाहीच्या प्रसंगी उदय प्रकाश यांनी व्यक्ती आणि कलावंत म्हणून स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. सामान्य माणसांच्या समूहाचा ते असा अविभाज्य भाग आहेत की, त्यांची कलाकृती ही सामान्यांचा सामान्यांच्याच बोलीतील उच्चार आहे. कधी हा उच्चार प्रश्नार्थक आहे, तर कधी उद‌्गारार्थी. कधी विधान म्हणून उदय प्रकाश यांचे लेखन पुढे येते, तर कधी उत्तर म्हणून. उदय प्रकाश यांची कविता, अनीतीच्या चेहऱ्यावर मारलेला जबरदस्त ठोसा आहे.
कथा, अनुवाद, निबंध यांच्यासमवेत पटकथा-लेखनाच्या क्षेत्रात उदय प्रकाश यांनी आपली नाममुद्रा उमटवली आहे. ‘मोहनदास’, ‘तिरीछ’, ‘उपरांत’, ‘आणि अंती प्रार्थना’, ‘वॉरन हेस्टिंगचा सांड’, ‘लाल गवतातील निळे घोडे’ या त्यांच्या कथा चित्रपटांद्वारे आणि नाटकाद्वारे रंगमंचावर आल्या आहेत. भारतीय उपखंडातील महत्त्वाचे लेखक म्हणून त्यांची जागतिक स्तरावर ओळख आहे. पुश्कीन सन्मान, साहित्य अकादमी पुरस्कार, मुक्तिबोध पुरस्कार, पहल सन्मान, सार्क पुरस्कार अशा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांच्या लेखनकृतींचा गौरव करण्यात आला आहे. जगातील बहुतेक महत्त्वाच्या भाषांमध्ये उदय प्रकाश यांच्या लेखनाची भाषांतरे झाली आहेत. जयप्रकाश कदम, गणेश विसपुते आणि लोकनाथ यशवंत यांनी यापूर्वी मराठीत त्यांच्या कथा, कविता अनुवादित केल्या आहेत.

‘सुनो कारीगर’, ‘अबुतर कबुतर’, ‘रात मे हारमोनियम’, ‘एक भाषा हुआ करती है’, ‘कवी ने कहा’ हे संग्रह वाचताना उदय प्रकाश अतिसामान्यांच्या जगण्याची बाजू कशी उचलून धरतात, ते लक्षात येते. जनतेच्या मनात खोल उतरून आत वर्षानुवर्षे साठलेली वेदना आणि हतबलता ही कविता मांडते. त्याच वेळी कोणत्याही प्रकारच्या हुकूमशाहीला तीव्र नकार देते. वर्तमान साहित्यकारण हे ‘निष्क्रिय डोक्याच्या आणि खूप सक्रिय धडाच्या साहित्यिकांच्या’ हातात आहे. पैसा, पद, प्रतिष्ठा यांच्या मागे लागल्यामुळे सामान्यांची बाजू मांडण्यासाठी बहुतेकांकडे वेळ नाही. अशा वेळी जीवनातील आणीबाणीला व हुकूमशाहीला विरोध करणारी उदय प्रकाश यांची कविता महत्त्वाची आहे.
ईलू ईलू
हजारो वर्षांपूर्वी मेलेली माणसे
शंका आहे, ज्यांच्या जन्माबद्दलच
ते एकदिवस एकदम निश्चित करतील
की कशा ठेवाव्यात पुरुषांनी आपापल्या मिशा
खाऊ नयेत सभ्य नागरिकांनी कोणकोणत्या भाज्या
बायकांनी कुठे बांधायला हवी साडी
स्वतःच्या देहावर आणि नवऱ्याच्या संपत्तीवर
किती असावा त्यांचा हक्क
शतकांपूर्वी मेलेला माणूस
दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून करेल भाषण
की लोकशाहीत कोणकोणत्या आहेत कमतरता
आणि का झाला, पराभूत युरोपमध्ये समाजवाद
मेलेल्या माणसाचा फोटो दिसेल प्रत्येक बैठकीत
बागेत त्यांचेच कटआऊट
चौकाचौकात पुतळे
स्त्रिया घालतील त्यांचेच लॉकेट
बाजारात विकत मिळतील खेळणी
ज्यांना चावी दिल्यावर ऐकू येतील
मेलेल्या माणसाच्या बाळलीला
विद्वान गातील मेलेल्या माणसाची गाणी
महाराज करतील कीर्तनं
भिकारी भीक मागतील त्यांच्याच नावानं
घामानं भिजलेल्या, एकमेकांसाठी आतूर
दोन शरीरांच्यामधून डोकावेल
मेलेल्या माणसाचा चेहरा
की कोणकोणती जडीबुटी नि आसनं गरजेची आहेत
आणि कुठल्या कुठल्या मुहूर्तावर बाईला
नियमानुसार किती जाळणं योग्य आहे
मेलेल्या माणसाच्या पुढाकारातून भरतील मेळे
मेलेल्या माणसाच्या डोळ्यांतून पाहिलं जाईल भविष्य
निवडणुकीत विजयी होतील मेलेली माणसं
मेलेली माणसं सगळ्या पृथ्वीची करतील परिक्रमा
असाही येईल एक दिवस
की तोच समजला जाईल योग्य
ज्यानं घातलेत मेलेल्या माणसाचे कपडे
मेलेल्या माणसाच्या जिभेतून निघतील शुद्ध उच्चारण
त्यांच्या नावेच ओळखल्या जातील जगातील सगळ्या रक्तांच्या चवी
मेलेल्या माणसाचा मुखवटा लावलेल्या तरुणांनाच
मुली म्हणतील – ईलू ईलू
------------------
पहाट
अर्ध्या रात्री पानं गळून पडतात
नक्षत्रसुद्धा तुटुन जातात,
त्यांच्यासोबत कुठल्याशा आंधळ्या विहिरीत
माझ्या बोटांच्या पेरांवर
कुठल्याशा नक्षत्राचे अश्रू लागले पहाटे पहाटे
जेव्हा मी एका पानाला स्पर्श केला
------------------
व्यवस्था
मित्र पत्रात लिहितो-
‘मी अगदी व्यवस्थित आहे’
मी लिहितो-
‘मी अगदी ठीक ठाक आहे.’
दोघेही आश्चर्यचकित आहोत.
------------------
मृत्यू
माणूस, मेल्यानंतर विचार करत नाही
माणूस, मेल्यानंतर बोलत नाही
जेव्हा विचार करत नाही
आणि बोलत नाही
तेव्हा माणूस मरुन जातो
------------------
दगड
या दगडाच्या आत
नक्कीच एक देव आहे
त्या देवतेच्या मंत्रामुळेच तर
हा दगड आहे
जसे आपण सगळेच दगड आहोत
कुठल्याशा देवतेच्या मंत्रामुळे
------------------
बायका
ती बाई पर्समधून चुरगळलेली नोट काढून
कंडक्टरकडून घरी परतण्याचं तिकिट घेत आहे
तिच्यावर थोड्या वेळापूर्वी बलात्कार झाला आहे
त्याच बसमध्ये एक दुसरी बाई
आपल्याइतक्याच हतबल वयाच्या दोन तीन बायकांसोबत
प्रमोशन आणि महागाई भत्त्याची चर्चा करत आहे
ऑफिसात आज तिला अधिकाऱ्यानं पुन्हा मेमो दिला आहे
ती बाई जी सौभ्याग्यवती राहण्यासाठी,
करवा चौथचं निर्जल व्रत करतेय
नवऱ्याकडून किंवा सासूकडून मारुन टाकल्याच्या भीतीनं
ती झोपेतून एकदम किंचाळते
अजून एक बाई बाल्कनीत अर्ध्या रात्री उभी राहून वाट पाहतेय
आपल्यासारख्याच असुरक्षित आणि लाचार
कुण्या दुसऱ्या बाईच्या घरातून परतणाऱ्या
आपल्या दारुड्या नवऱ्याची
शंका, असुरक्षितता आणि भीतीनं वेढलेली एक बाई
मार खाण्यापूर्वी हळू आवाजात विचारते नवऱ्याला
कुठं खर्च झाली आहे,
तुमच्या पाकिटातील पगाराची अर्ध्यापेक्षा अधिक रक्कम
एक बाई आपल्या बाळाला न्हाऊ घालताना
अशीच रडू लागते स्फुंदू स्फुंदू
आणि पापे घेते बाळाचे, वेड्यासारखे पुन्हा पुन्हा
त्याच्या भविष्यात स्वतःसाठी एखादी जागा किंवा शरणस्थळ शोधत
एका बाईचे हात भाजलेत तव्यामुळे
दुसऱ्यावर तेल सांडलंय कढईत उकळणारं
इस्पितळात हजार टक्के जळून, बाईचा झालेला कोळसा
नोंदवतो आपला मृत्युपूर्व जबाब की तिला कुणीच जाळलं नाही.
तिच्याशिवाय सगळे निरापराध आहेत
चूक तिची होती, तिचंच नशीब होतं फुटकं
म्हणून उडाला स्टोव्हचा भडका.
------------------
सगळ्यात सोपं
सगळ्यात सोपं आहे
सगळ्यात अवघड आणि सगळ्यात महान गोष्टींची
माती करणं
फक्त एक आगकाडी पुरेशी आहे
सगळ्यात प्राचीन आणि दुर्लभ
ऐतिहासिक दस्तऐवजांची राख करण्यासाठी
एक काडी
आतापर्यंत वाचल्या न गेलेल्या
गुप्त सभ्यतांच्या, अज्ञात लिपींची राख
एखाद्या मिथक नायकाच्या
शौर्याची नि शोकाची राख
कुण्या समाजाच्या स्मृतिकोशाची
कुण्या समुदायाच्या प्राक‌्बिंबाची राख
कुण्या समूहाची अस्मिता
कुणा गरिबाची झोपडी
कुणा बाईच्या तरुण शरीराची राख
कुणा आपुलकीच्या परमेश्वराची
कुणा धर्माच्या प्रेषिताची राख
हो, हवी फक्त एक आगकाडी
आणि हवी एखाद्या गोरिला, चिंपाझी
किंवा एखाद्या गुंडासारखी
फारच थोडी हालचाल
एक रुपयांचा चाकू
वीस पैशांची ब्लेड
दोन पैशांची काडी
किंवा गुन्हेगारासारखा बिनडोक पराक्रम
गरजेपेक्षा थोडा अधिकच आहे
मोनालिसाच्या रहस्यमयी हास्याचा मुडदा पाडायला
दीड किलोचा मातकट लोखंडी घन पुरेसा आहे
स्थापत्त्य इतिहासातील अद्भुत घुमटाला उद्ध्वस्त करण्यासाठी.
पुरेसा आहे, एक काळोखा कोपरा
आणि उकळतं शिसं
एखाद्या कवीच्या, संन्याश्याच्या, सुफीच्या चेहऱ्यावर फेकण्यासाठी
फारच फार सोपं आणि सरळ आहे
सगळ्यात लांब आणि क्लिष्ट प्रक्रियेनं बनवलेल्या
गोष्टींना सहज नष्ट करणं
------------------
सहानुभूती
आत्मा इतकं थकल्यानंतर
एक कप चहा मागतो
पुण्य मागतं घाम आणि अश्रू पूसण्यासाठी उपरणं
कर्म मागतं भाकरी आणि कालवण
देव सांगतो डोकेदुखीची गोळी घेऊन यायला
अर्धा ग्लास पाण्यासोबत
आणि तर आणि, फकीर आणि महारोगीसुद्धा बंद करतात
थकून जाऊन भीक मागणं
प्रार्थना आणि आशीर्वादाच्या जागी
त्यांच्या घशातून निघते
दुबळ्या फुफ्फुसातील हवा
चल मीही विचारतो
मीर!, या जगाला मी काय मागू?
जे पोट भरलेल्याला अन्न देतं
श्रीमंताला देतं सोनं, खुनी व्यक्तीला हत्यार देतं
आजारी माणसाला बिमारी, दुबळ्याला कमजोरी
अन्यायी व्यक्तीला सत्ता, आणि व्यभिचार करणाऱ्याला अंथरुण देतं
निर्माण कर सहानुभूती
की मी आतासुद्धा हसताना दिसतो
आणि अजूनही कविता लिहितो
------------------
वसंत
आगगाडी येते
आणि न थांबताच
पुढे जाते
जंगलात
पळसाचा चौकीदार
लाल निशान
फडकवत राहतो.
------------------
महाभारतानंतर
परटाचं पोरगं थोडं खोडकर आहे
आणि सभ्यता नावाची गोष्ट त्याला ठाऊक नाही
त्याला महाभारत पाहायचं आहे टीव्हीतलं
सोबत तो आपल्या मळकट बहिणीलाही घेऊन आलाय
एक दिवस असं घडेल की, मालिका संपून गेलेली असेल
आणि मग धृतराष्ट्र
सगळ्या दिल्लीत विचारत फिरत राहील परिटाचा पत्ता
तेव्हा त्याच्या कानावर आदळतील, फक्त भोंग्यांचे आवाज
कालचक्र सांगतं, महाभारत संपल्यानंतर
फक्त भोंग्यांचे आवाज वाजत राहतील
आणि शोधाशोध केल्यानंतरही, इंद्रप्रस्थात एकही परिट सापडणार नाही
महाभारतानंतर
प्रत्येकाच्याच कपड्यावर दिसू लागतात रक्ताचे डाग.
------------------
माझी वेळ
पाच वर्षांपूर्वी
मरुन गेलेल्या दोस्ताला
पत्र टाकलं आज
उत्तर येईल एके दिवशी
कधीही
पायरी
गोंधळ
टेबल
टेलीफोन यांनी सजलेल्या घराच्या
कुठल्याही ठिकाणी मरुन पडलेलं
ते वाचत
हसेल
की चला, शेवटी मी ही!
------------------
पिंजरा
चिमणी
पिंजऱ्यात नाहीय
पिंजरा रागात आहे
आभाळ आनंदात
आभाळाच्या आनंदात
छोटी चिमणी
उडणं शिकते.
------------------
प्रार्थना
हुमायुनं प्रार्थना केली
अकबर बादशहा बनावा
अकबराने प्रार्थना केली
जहांगीर बादशहा बनावा
जहांगीरने प्रार्थना केली
शहाजहां बादशहा बनावा
बादशहा नेहमीच बादशहासाठी
बादशहा बनण्याची प्रार्थना करतो
लाल किल्ल्याचा म्हातारा रखवालदार सांगत असतो
------------------
तिबेट
तिबेटवरुन आलेले
लामा फिरत राहतात
आजकाल मंत्र पुटपुटत
त्यांच्या खेचरांचे कळप
मळ्यात उतरतात
पण झेंडूची फुलं खात नाहीत
झेंडूच्या एका रोपट्याला
किती फुलं येतात पप्पा?
तिबेटमध्ये जेव्हा पाऊस पडतो
तेव्हा आपल्याकडे कोणता ऋतू असतो?
तिबेटमध्ये जेव्हा तीन वाजत असतात
तेव्हा आपल्याकडे कोणती वेळ असते?
तिबेटात झेंडूची फुलं असतात का पप्पा?
पप्पा, लामा शंख वाजवतात का?
पप्पा, तुम्ही पाहिलंय का
घोंगडी पांघरुन एखाद्या लामाला
काळ्याकुट्ट अंधारात झपझप पावलं टाकत दूर जाताना?
जेव्हा माणसं मरुन जातात
तेव्हा त्याच्या कबरीच्या चारही बाजूंनी
डोके झुकवून उभे राहतात लामा
ते मंत्र म्हणत नाहीत
ते पुटपुटतात - तिबेट
तिबेट - तिबेट
तिबेट - तिबेट
तिबेट - तिबेट
आणि रडत राहतात
रात्र रात्रभर
लामा,
आपल्यासारखेच रडतात का पप्पा?
------------------
गांधी
गांधीजी
नेहमी म्हणत –
‘अहिंसा’
आणि काठी घेऊन
पायी फिरत.
------------------
कुतुबमिनार
कुतबुद्दीन ऐबकला
आता वरुन
खाली खाली पाहण्यासाठी
चश्म्याची गरज लागते
आणि
इतक्या उंचावरुन पडून
चश्मा तुटून जातो
------------------
शिंक
जिल्लेल्लाही
शहंशाह ए हिंदुस्तान
आफताब ए वक्त
हुजुर ए आला
परवरदिगार
जहांपनाह
गुलामाला माफी असावी हुजूर
पण हे सत्य आहे
माझ्या नशिबाचे मालक
माझ्या रक्ताच्या थेंबाथेंबाचे आका
हे अगदी खरं आहे
की आत्ता आत्ता
आपल्याला
अगदी माणसांसारखी
शिंक आली
------------------
रंगा बिल्ला
एक होता रंगा
एक होता बिल्ला
दोघे भाऊ भाऊ नव्हते
पण दोघांनाही फाशी झाली
एक होते टाटा
एक आहेत बिर्ला
दोघे भाऊ भाऊ आहेत
पण दोघांना फाशी झाली नाही
------------------
डुक्कर
एका उंचच चंच इमारतीमधून
भल्या पहाटे
एक धष्टपुष्ट डुक्कर बाहेर आले
आणि मगरीसारख्या कारमध्ये बसून
शहराकडे गेले
शहरात सभा होती
फ्लॅश चमचमले
जयजयकार झाला
कॉफी बिस्किट वाटले गेले
गळ्यात माळा पडल्या
पुढच्या सकाळी
डुक्कर वर्तमानपत्रात
स्मितहास्य करत होते
ते म्हणाले -
आम्ही विकास करत आहोत
त्याच रात्री शहरातून
साखर आणि घासलेट
अचानक गायब झाले
बातम्या आणखी आहेत...