आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरवलेल्या वाटेवरच्या कविता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जग पंखांखाली घेणाऱ्या पाखरांप्रमाणे मानवालाही आपल्या मूळ जगाकडे परतण्याची ओढ वाटत राहिली आहे. त्याचे जन्मगाव, मनात खोल दडी मारून बसलेले मुक्काम त्याला सतत खुणावत राहिले आहेत. पुन्हा कधीतरी आपणही आपल्या जन्मगावात, शहरात परत जाऊ, असे त्याला वाटत असते. तो परततोच, असे मात्र नाही.
फिरस्ता राहण्यानेच मानवाचा विकास झाला आहे. समुद्र ओलांडून, पर्वत, नद्या आणि जंगलं पार करून तो पृथ्वीला वळसे घालत राहिला. भटकंतीच्या प्रवासात मानवाने केवळ नवी जमीनच शोधली नाही, तर नव्या ज्ञानाचा संग्रह केला, नव्या कलांची, साधनांची आणि संपत्तीची निर्मिती केली. ज्याने आपला गाव, प्रदेश, देश सोडला, त्याने नव्या जागी जाऊन आपला विकास केला. ही माणसाच्या विकासाची प्रक्रिया अनादि काळापासून अखंड सुरू आहे.

असे असले तरी जग पंखांखाली घेणाऱ्या पाखरांप्रमाणे आणि महासागरांना आपल्या चिमुकल्या शक्तीनिशी ओलांडणाऱ्या माशांप्रमाणे मानवालाही आपल्या मूळ जगाकडे परतण्याची ओढ वाटत राहिली आहे. त्याचे जन्मगाव, मनात खोल दडी मारून बसलेले मुक्काम त्याला सतत खुणावत राहिले आहेत. पुन्हा कधीतरी आपणही आपल्या जन्मगावात, शहरात परत जाऊ, असे त्याला वाटत असते. तो परततोच, असे मात्र नाही. मुक्कामाच्या आणि वाटांच्या आठवणी म्हणूनच त्याच्यासाठी अनमोल असतात. जेव्हा जेव्हा माणूस भूतकाळात हरवतो तेव्हा तेव्हा आपुलकीचे मुक्काम त्याला खुणावत राहतात. जुन्या स्नेहाळ वाटा बोलावत राहतात. गावाविषयी, शहराविषयी लिहिली गेलेली जगभरची कविता अशा मुक्कामाविषयीच्या संवाद-विसंवादातून जन्मलेली आहे. कधी ती हळवी, भावविव्हल, तर कधी संताप व्यक्त करणारी आहे. ती प्रतिक्रियात्मक होते, तेव्हा आपले कवितापण हरवून बसते, असेही जाणवते. बनारस, मुंबई, दिल्ली, अयोध्या, कलकत्ता या शहरांनी भारतीय कवितेवरती आपला अमीट ठसा उमटवलेला आहे. उदाहरणच सांगायचे झाले, तर अगदी कश्मीरी-डोगरीपासून तमीळ-मल्याळीपर्यंत व संस्कृत-राजस्थानीपासून बोडो-मणिपुरीपर्यंत प्रत्येक भारतीय भाषेत मुंबई शहरावर कविता लिहिल्या गेल्या आहेत. मराठी, गुजराती, इंग्रजी, सिंधी कवींनी तर मुंबईवर शेकडो कविता लिहिल्या. सुटून गेलेल्या मुक्कामाविषयी व हरवलेल्या वाटांविषयी मनातील गुज सांगणाऱ्या, क्रिया-प्रतिक्रिया नोंदवणाऱ्या सोबतच्या कविता वाचकाला भूतकाळात घेऊन जातील.

मुंबई
निदा फाजली (उर्दू)

ही कसली वस्ती आहे
मी कोणत्या दिशेला आलो आहे
वातावरणात ऐकू येतायत हजारो आवाज
धगधगताहेत वाऱ्यावर असंख्य श्वास
जिकडे पहाल तिकडे दिसतील
खांदे, कंबर, बाहू, पाय
पण कुठेही-
एखादा चेहरा नजरेस येत नाही

इथे तर सगळेच्या सगळे लहान मोठे
आपापल्या चेहऱ्यांना,चमचमत्या डोळ्यांना,
गालांना, हसणाऱ्या ओठांना
डोक्याच्या खोबणीतून बाहेर काढतात
सकाळी उठताच, आपापल्या खिशात घालतात

ही फारच अजब वस्ती आहे
इथे न रात्र आहे, न दिवस, न संध्याकाळ
बसच्या सीटवर उगवतो सूर्य
तळपत्या पत्र्याच्या खोलीत झोपतो, चंद्र

इथे काहीही नाहीय, रेल्वे आणि बसशिवाय
जमिनीवर रांगत जाणाऱ्या चेतनारहित समुद्राशिवाय
इमारतींना गिळणाऱ्या इमारतींशिवाय
हे समाध्या-समाध्यांचं बेट, कुणाकुणाला जागं करशील
आपल्याच विचारात गोंधळशील, मोडून पडशील
या इथे एकही चेहरा नजरेस पडत नाही!
अयोध्या
विनोद दास (हिंदी)

अयोध्या, अजूनही उदार आहे
शरयू तहान भागवते पूर्वीसारखीच

प्रवाश्यांनी कडी वाजवल्यानंतर
थोडं उशिरा का होईना, पण दरवाजे उघडतात

लोक अजूनही एकमेकांना भेटतात
आणि शत्रूप्रमाणे हात मिळवत नाहीत

थांबवून विचारतात, मुलांना परीक्षेत मिळालेले मार्क
पान खाऊ घालतात, चहाच्या ठेल्यापुढं बेंचवर बसून गप्पा मारतात

बायका, शेजारणीकडून पीठ उसनं आणतात
दळण दळून देताना कुणी धर्म विचारत नाही

अयोध्यावाले अजूनही भेटण्यासाठी उत्सुक असतात
फक्त जेव्हा ते बोलतात, तेव्हा माहीत नाही कशामुळे
पण कधी कधी त्यांच्या शब्दांना जळून गेलेल्या वस्तूचा वास येतो...

भारत
पाश (पंजाबी)
भारत

माझ्या आदराचा सगळ्यात महान शब्द
हा शब्द उच्चारताच
इतर सगळेच शब्द अर्थहीन होऊन जातात
या शब्दाचा अर्थ
शेतात राबणाऱ्या त्या मुलांशी जोडलेला आहे
जे आजही झाडांच्या सावल्यांवरुन वेळ ठरवतात
त्यांच्याजवळ पोटाशिवाय दुसरी कोणतीच समस्या नाहीय
आणि भूक लागल्यावर ते स्वतःचे अवयवही खाऊ शकतात.
त्यांच्यासाठी आयुष्य ही एक परंपरा आहे, आणि मृत्यूचा अर्थ मुक्ती असा आहे

जेव्हा जेव्हा कुणी देऊ लागतं
संपूर्ण भारताच्या ‘राष्ट्रीय एकात्मते’विषयी एखादं भाषण
मला वाटतं-
उडवून लावावी त्याच्या डोक्यावरची टोपी वाऱ्यावर
आणि त्याला सांगावं की,
कुठल्या दुष्यंताशी जोडलेला नाहीय भारताचा अर्थ
तो शेतांशी संबंधित आहे, जिथे अन्न पिकतं.

मुंबईतील हात
हर्षदेव माधव (संस्कृत)

उच्छवासाच्या दर्पानं माखलेले, रेल्वेच्या कड्यांना पकडून
आपली भूक शांत करण्यासाठी धावपळ करणारे हात!
‘नेपियन सी रोड’ जवळ रेडलाइट एरियात
रंगीबेरंगी मुलींच्या छातीवर सापासारखे वळवळणारे हात.
‘धारावी’त मजूरांच्या घरात दारूच्या बाटल्या उघडणारे थकलेले हात
‘हॅंगिंग गार्डन’मध्ये प्रियकराला घट्ट बिलगून नवा, अनुभव घेणारे हात
‘चौपाटी’च्या वाळूवर खोपा खोपा खेळणारे
‘बाबुलनाथ’च्या मंदिरासमोर केविलवाणी भीक मागणारे हात
प्रवाशांच्या खिशातून पॉकेट पळवणारे हात
समुद्री वाळूवर थकल्या तळव्यांची विनवणी करणारे हात
‘मरीन ड्राईव्ह’वरती यंत्रवत वेग पकडणारे हात
या हातावर पर्वत आहेत, उभ्या आडव्या सगळ्या रेषा आहेत
पण जीवन रेषा कुठे आहे? केवळ मृतरेषाच तर ठळक आहेत.

कलकत्ता
नीरेंद्रनाथ चक्रवर्ती (बंगाली)

प्रेम आहे, म्हणून प्रेम करतो
या पलीकडे काय करता येऊ शकतं?
हीच तर एक बाब गावठी माणसाप्रमाणे
लपलेली आहे कलकत्ता शहरात

छातीच्या आत वाढत जाते तहान
नळातून पाणी ठिबकतेय थेंब थेंब
आत वाहात जातो, बाहेरचा समुद्र
आह! रे कलकत्ता!! दुधाचा थेंब सुकून गेलाय
बाळाच्या ओठाला लागण्यापूर्वीच

निघून जाण्यासाठीच गेल्यासारखं
परतून येण्यासाठीच आल्यासारखं
अगदी तसंच प्रेमसुद्धा
तसाच परतलो आहे, तुझ्या आटून गेलेल्या नळावर

दूर दूर जातो आणि पुन्हा परततो
प्रेम आहे, म्हणून प्रेम करतो
या पलीकडे काय करता येऊ शकतं?
हीच तर एक गोष्ट आहे, जी लपवून ठेवलीय कलकत्ता शहरानं
एखाद्या ग्रामीण माणसाप्रमाणे

उत्तरकाशी १९९१
कृष्णमोहन झा (हिंदी)

त्या पत्रांची उत्तरं आता कोण वाचील
ज्यात भाचीच्या लग्नात न आल्याबद्दल होत्या हजार तक्रारी.
ज्यात दु:खानं लदबदलेल्या म्हाताऱ्या बापानं
नोकरी करणाऱ्या मुलाला पुन्हा एकदा सांगितलं होतं त्याचं कर्तव्य.
ज्यात लहानग्या बहिणीनं विचारलं होतं की,
वेळेवर पोहोचली होती नं राखी?
माहीत नाही, ती पत्रं आता त्यांना कशी मिळतील
ज्या पत्रांची ते पाहात होते, खूप आतुर होऊन वाट

लाहोरच्या रस्त्यावर
सुतिंदर सिंह नूर (पंजाबी)

लाहोरच्या रस्त्यावरुन जाताना
एक म्हातारी पंजाबन
रस्ता अडवते
आणि बुरखा बाजूला करुन विचारतेः
‘लेकरा, कसा आहे रे पंजाब?’
मी उत्तर देतो,
‘माई, चांगला आहे.’
म्हातारी डोळ्यात अश्रू घेऊन बोलते,
‘नको रे, खोटं तरी नको बोलत जाऊस.’

सूरत
पंकज सिंह (हिंदी)

आठवणीतील सगळी भयस्वप्ने छोटी झाली एकदम
जेव्हा बातम्या येऊ लागल्या, विलाप आणि हुंदक्यात बुडून गेला वर्तमान

खूप सगळी मुलं शळेतून घरी परत आलीच नाहीत
खूप सगळी माणसं कामावर पोहोचली नाहीत, आणि घरीही नाही
खूप सगळ्या मुली एकाएकी गायब झाल्या
काही म्हाताऱ्या होत्या त्यांना कळालं नाही,
की आता पळायचं आहे, की रडायचं आहे
की काजळलेल्या भिंतींजवळ बसून फक्त वाट पाहायची आहे
इस्पितळाच्या प्रेतागारात ओळख पटवण्यासाठी कुणी गेलं नाही
हळू हळू वितळत राहिली दृश्य
हळू हळू उतरुन आली संगिनीसारखी रात्र

प्रियकांत मणीयारच्या नावानं एक पत्र
यशवंत त्रिवेदी (गुजराती)
तुझं न्यूयॉर्क तर पियानो आहे, प्रियकांत!
आणि माझी मुंबई
ईश्वराच्या डोळ्यातून ओघळलेल्या आसवांचं बेट!

इथे - फूटपाथवरती
कुत्र्याच्या जिभेप्रमाणे धापा टाकतात
सात सात लाख प्रश्नचिन्ह!
(जरा पाहून तर ये प्रियकांत,
स्वातंत्र्य देवीच्या काळजात एखादी कळ उठलीय का?)
बाहेर उभी आहेत माणसं
आणि आत जळत जातायत झोपडपट्ट्या

उदास चंद्राच्या डागासारखा
टीबीच्या खोकल्याचा बेडका
कुणी चित्तारलाय लोकल ट्रेनमध्ये
लोंबकळलेल्या गर्दीच्या छातीत?
गिरण्यांच्या चिमण्यांचा धूर पिऊन धडपडणारे मजूर
मांड्यातील वेदना लपवून बाल्कनीत सूर्यासमोर हसणाऱ्या वेश्या
डुकराच्या तोंडातून हिसकावून
कचरापेटीतील दुर्भाग्य वेचून वेचून खाणारी मुलं…

….प्रियकांत!
डोळ्यांवर शेकडो टनांचं ओझं वाटतं रे
‘सर्मन ऑन द माउंट’च!
तिथे येशू भेटला, तर सांग…
सांग की… काही नाही, जाऊ दे…
येशूच्या या सगळ्या मेंढ्यांना!
रात्री उशिरापर्यंत इथेही
व्हिस्कीच्या प्याल्यात तरंगतात नारंगी बायका
कॅबरेच्या खिडकीतून इथेही नग्नतेला…
वालकेश्वर रेडिओच्या ‘हिरव्या डोळ्यांत’
आता झोपी गेलेयत पियानोचे स्वर…
सारी रात्र जागतो मी
मी अश्रुविहीन,
शक्य झालंच तर, अश्रू घेऊन ये प्रियकांत!

काबूलमधून प्रवास करताना
वनीता (पंजाबी)
सगळं काबूल अाच्छादलं गेलंय बर्फानं
कुठेच कुणी नाही
एकही सजीव नाही, पक्षी नाही
बकऱ्या नाहीत, गुराखी नाही
विमानात बसलेले प्रवाशी
पाहात राहतात बर्फाळ जमीन
गवताळ मैदानावर पडलेला बर्फ
हिरव्या देहावर ओढलेली पांढरी चादर
आणि करताहेत आपापल्या कॅमेऱ्यात बंदिस्त
शुभ्र पोशाखातील जमिनीला
पाहात राहतं दूर पसरत गेलेलं निळं आभाळ
सूर्य गुपचूप चिडीचूप
चुपचूप आणि शांतता
इथे एकमेकींशी संवाद करत आहेत.

पंजाबमधून एक पत्र
कीर्ति नारायण मिश्र (मैथिली)

इस्पितळात पडलो आहे मी
इथे बिहारी मजुरांना खाट मिळत नाही
डॉक्टर सांगत होते
बेट्या नशीबवान आहेस, एकच तर पाय गेला
तब्बेत सुधारतेय तुझी, या आठवड्यात सुट्टी मिळेल
खर्चासाठी सरकार पाचशे रुपये देणार आहे
हात आणि कुबड्यांच्या आधारे चालता येईल
तुझ्या देशात परतून आरामात राहता येईल.
माय, सांग की गं
कसं परतू?
कमवायला आलो होतो
पाय गमावून बसलो!
तुझी काठी होतो मी
आता मीच काठी पकडून बसलो!!

आज पहाटेच इस्पितळातून हाकलून दिलं माय
पाचशे रुपये हातात कोंबले फक्त
कुणीच नाही विचारलं, कसा परतशील, कुठे जाशील
‘फारम’वाल्या मालकानं मागं वळूनही पाहिलं नाही
या चौफुलीवर माझ्यासाठी कोणताच रस्ता नाही
पण शस्त्रास्त्राच्या एका व्यापाऱ्याचं गोडावून इथे शेजारीच आहे
कधी कधी वाटतं, त्याच्या रखवालदाराला पटवावं
आणि संधी मिळाली तर आतही जावं.

तू कशी आहेस माय
गावकरी कसे आहेत
सावकार अजूनही तसंच मारतो का?
घरांवरचे पत्रे तसेच काढून नेले जातात का?
शेतातलं पीक तसंच कापून नेलं जातं का?
लेकी बहिणींना तसंच लुटलं जातं का?
काळजी करु नको माय
आता गावातच राहणार आहे मी
डोळे उघडले आहेत माझे
सगळ्यांचीच चिंता दूर करेन मी

मी आज पुरीमध्ये
मनोरमा बिश्वाल महापात्र (उडिया)

तुझं कोवळं गोड गोड प्रेम
चारी दिशांना पसरलं आहे
आता पाऊस येईल तर ते अधिकच हळवं होईल
पावसात भिजत भिजत जगन्नाथ
चालत जातील मावशीच्या घरी
खातील मावशीच्या हातची पंचपक्वान्न
आणि तृप्त भोजनानंतर अजूनच राजबिंडे दिसू लागतील.
समुद्र तर सगळ्यांनाच जोडत असतो
आठवणीतल्या स्वप्नांनासुद्धा..
तू कोणत्या स्वप्नात हरवला आहेस हे नटवरा
कल्पवृक्षाच्या डहाळीवर तुझ्या प्रितीचं पाखरु उडत राहतं
मी या वेळी पुरीत पाहून आले
तूही असाच कुठे दूर उडून जातोस का?
मी शोधू तरी कुठे तुला…
समुद्रात की स्वर्गात?...

कवितांचा अनुवाद – डॉ पृथ्वीराज तौर
drprithvirajtaur@gmail.com / 7588412153
बातम्या आणखी आहेत...