आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिझेरीयनचा आग्रह नको

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैद्यकीय क्षेत्रात बर्‍याच वेळा टाॅन्सिल, अ‍ॅपेंडीक्स तसेच सिझेरीयन या शस्त्रक्रिया निष्कारण पैसे उकळण्यासाठी केल्या जातात, अशी धारणा आहे. त्यात तथ्य असल्याने डाॅक्टरांना कठोर आत्मपरीक्षणाची गरज आहे. सर्व डाॅक्टरांनी अंतर्मुख होऊन याबाबत प्रामाणिकपणे शोध घ्यावा. हल्ली वैद्यकीय व्यवसाय हा व्यवसाय न राहता धंदा समजल्या जातो. म्हणून ग्राहक संरक्षण, कायदा (consumer protection act) व दुकानदारी कायदा (shop act) या व्यवसायला लाग्ू करण्यात आलेला आहे. आपल्या व्यवसायाचा व्यावसायिक लेखाजोखा (professional audit) करण्याची वेळ आली आहे. ही काळाची गरज आहे. तसेच ऐरणीवरचा विषय आहे. कारण रुग्णाची विश्वासार्हता ही महत्त्वाची बाब पणाला लागलेली आहे.

निष्कारण विविध तपासण्या : निष्कारण आंतररुग्ण म्हणून भरती करणे निष्कारण इंजेक्शन, औषधी तसेच सलाइन लावणे या सर्व निष्कारणांमुळे रुग्णाची डाॅक्टरांप्रती सकारात्मक व आदराची भावना राहिली नाही, हे खरे दुखणे आहे.

माता-बालकाच्या जीवितासाठी शस्त्रक्रिया शास्त्रसंमत : म्हणून समर्थनीय आहे. परंतु केवळ रुग्ण हट्ट हे त्याचे समर्थन होऊ शकत नाही. निष्कारण अशास्त्रीय कारणांसाठी केवळ रुग्ण इच्छा, नातेवाइकांची इच्छा ही कारणे समर्थनीय ठरत नाहीत.फळ पिकले तर ते आपोआप गळून पडते. हा निसर्ग नियम प्रसूतीसाठीसुद्धा लागू आहे. निसर्गाच्या प्रक्रियेत निष्कारण हस्तक्षेप विकृत व म्हणूनच गुन्हेगारी स्वरूपाचा ठरतो. केवळ माता व बालकाच्या जीविताचे रक्षणासाठी सिझेरीयन शस्त्रक्रिया ह्याचा विसर स्त्रीरोगचिकित्सक व प्रसूतीतज्ज्ञांनी पडू देऊ नये.
बाळंतपणाच्या वेदनांपासून मुक्तीसाठी : शस्त्रक्रिया हे एक मूर्खपणाचे कारण दिले जाते. वास्तविक बाळंतपणाच्या कळा या वेदनादायक / क्लेशदायक समजता कामा नये. स्त्रीच्या आयुष्यातील परिपूर्णतेकडे वाटचाल म्हणजे मातृत्वप्राप्ती व तत्पूर्वीच्या कळा ही एक नैसर्गिक क्रिया आहे. जीवन-मरणाचा प्रश्न उद‌्भवतो तेव्हा सिझेरीयन शस्त्रक्रियेचा अवलंब करावा हे महत्त्वाचे व एकमेव समर्थनीय कारण. अन्यथा निष्कारण सिझेरियन शस्त्रक्रियेच्या अवलंबनामुळे बालकात काय उणिवा राहतील याचा मागोवा सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी घेण्याची गरज आहे. अन्यथा कृत्रिम पद्धतीने दुसर्‍याच्या भाडोत्री गर्भाशयात बालकाची गर्भधारणा व बालकाचा जन्म सरोगेट मदर हा नित्याचाच प्रकार ठरला असता.

अज्ञानमूलक अंधश्रद्धेपोटी : ठराविक तिथीप्रमाणे व वेळेप्रमाणेच बालकाचा जन्म व्हावा या अज्ञानमूलक अंधश्रद्धेपोटी मातेचा सिझेरीयन विषयीचा आग्रह हे कारण अत्यंत सवंग आहे. शतकाच्या सुरुवातीस म्हणजे १-१-२००१ रोजी किंवा १२-१२-१२ या दिवशी १२ वाजून १२ मिनिट व १२ सेकंदांतच मुलाचा जन्म व्हावा हे खूळ आहे. चुकीची धारणा व चुकीची विनंती याचा गैरफायदा डाॅक्टरांनी घेऊ नये तसेच हातभार लावू नये. एक ज्ञानी मित्र व सल्लागार तसेच मार्गदर्शक ही डाॅक्टरांची अपेक्षित भूमिका आहे.

कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचेच : प्रसूतीपूर्व लिंगनिदान व स्त्रीभ्रूण हत्येबाबत स्त्री व पतीची विनंती तसेच पैसे देऊन आग्रह असला तरीसुद्धा ते कृत्य निदंनीय तसेच गुन्हेगारी स्वरूपाचेच होय. सध्या सर्वच वैद्यकीय क्षेत्र विशेषत: स्त्रीरोगतज्ज्ञ जनसामान्यच्या तसेच कायद्याच्या निशाणावर आहेत. किंबहुना समाजाच्या आणि कायद्याच्या दृष्टीने आरोपीच्या पिंजर्‍यात आहेत. त्यात ऐच्छिक सिझेरीयन शस्त्रक्रिया या नवीन आरोपाची भर पडू नये, कारण नैतिक अनैतिकतेच्या पलीकडील हे कृत्य धंदेवाईक तसेच सराईत गुन्हेगाराप्रमाणेच होय. त्याचे समर्थन होऊ शकत नाही.

वैद्यकीय व्यवसाय पैसे कमवायचे क्षेत्र नाही : तरीही या व्यवसायात अगदी सचोटीने काम केले तरीही भरपूर पैसा आजही मिळतो. हे एक डाॅक्टर जेवढा पैसा, ऐशआरामासाठी खर्च करू शकतो, त्या पेक्षा जास्त पैसा सहज मिळवू शकतो. पण तेवढ्यावर समाधान न मानता आणखी पैसा मिळवण्यासाठी वाममार्गाचा अवलंब करण्याची जणू स्पर्धा या व्यवसायात शिरली आहे. खरे तर अशा लोकांनी त्यासाठी दुसर्‍या व्यवसायाची निवड केली पाहिजे.

डाॅ. रामदास आंबुलगेकर, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...