आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr Sachin Chitnis Article About India Population

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आदर्श भारताची आदर्श लोकसंख्या?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काल-परवाच डॅन ब्राऊन यांनी लिहिलेली ‘इन्फर्नो’ ही कादंबरी वाचली. ‘पृथ्वीची आदर्श लोकसंख्या किती?’ यावर त्यात बरेच विचारमंथन करण्यात आले होते. आजपर्यंत लोकसंख्येवर अनेक विवाद ऐकले, वाचले होते; पण ‘आदर्श लोकसंख्या’ हे जरा नवीनच होते. पर्यावरणतज्ज्ञ किंवा संख्या-शास्त्रज्ञांच्या मते, ‘पृथ्वीची आदर्श लोकसंख्या’ म्हणजे मनुष्याला जर वर्षानुवर्षे अनंत काळापर्यंत या पृथ्वीवर आरामात जगायचं असेल (आरामात म्हणजे प्रत्येकासाठी थोडीफार नैसर्गिक साधनसंपत्ती, प्रत्येकाला समान मानवी अधिकार, परिपूर्ण अन्न-वस्त्र-निवारा आदी प्राथमिक गरजा.) तर पृथ्वीची जी लोकसंख्या असावी, ती लोकसंख्या.
आता या आदर्श लोकसंख्येचा ‘जादुई आकडा’ नेमका किती असावा, ते वाचून मी जरा चक्रावलोच… बहुतांश तज्ज्ञांच्या मते, हा आकडा असावा फक्त ४०० कोटी! त्यातल्या त्यात पाश्चात्त्य देशांतील खास करून युरोपीय लोकांची जीवनशैली जगायची असेल, तर हा आकडा असावा अजूनही कमी, म्हणजे जवळपास २०० कोटी. या घटकेला जगाची लोकसंख्या आहे, जवळपास ७३२ कोटी आणि २०५० पर्यंत ती असेल, जवळपास १००० कोटी!

अर्थात, कादंबरी आंग्ल लेखकाची असल्याने आणि तो विश्वाचा वेध घेऊ इच्छित असल्याने त्याने ‘पृथ्वीची आदर्श लोकसंख्या’ यावरच प्रकाश टाकला. पण, मग सहज मनात आलं की, हाच संदर्भ घेऊन आपण फक्त आपल्या भारतापुरताच विचार केला तर?
आजची भारताची लोकसंख्या आहे, जवळपास १२७ कोटी. ती किती झपाट्याने वाढते आहे, हे बघायचे असेल तर http://www.worldometers.info/world-population/india-population/ ही वेबसाईट लॉग इन करता येईल. असो. या वेगाने २०२८मध्ये भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश असेल. २०५०मध्ये भारताची लोकसंख्या असेल जवळपास १६० कोटी. भौगोलिकदृष्ट्या भारताची जमीन आहे, संपूर्ण पृथ्वीच्या जमिनीच्या २.४ टक्के आणि या एवढ्याशा जमिनीवरची लोकसंख्या आहे, जगाच्या लोकसंख्येच्या १७.५ टक्के. तसं पाहिलं तर नैसर्गिक साधनसंपत्ती, सद्य:स्थितीत प्रत्येकाच्या परिपूर्ण प्राथमिक गरजा, आजघडीचे समान नागरी अधिकार इत्यादी बाबतीत इतर देशांपेक्षा आज तरी भारताची स्थिती समाधानकारक नाही. त्यातही नुसत्या उपलब्ध जमिनीच्या निकषावर जर विचार केला, तर भारताची आदर्श लोकसंख्या असावी फक्त १० कोटी. थोडक्यात, भारताची नैसर्गिक साधनसंपत्ती अनंत काळापर्यंत उपभोगत मनुष्याला आरामात जगायचं असेल तर लोकसंख्या असावी, फक्त १० कोटी. हे आकडे भयावह आहेत. परंतु ‘आदर्श लोकसंख्या’ ही फक्त कल्पना असून पृथ्वीमध्ये वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्याचं सामर्थ्य आहे, असं मानणारेही काही आहेत. तरीही आदर्श लोकसंख्या आणि वास्तव आकड्यातली तफावत नक्कीच काळजी करण्यासारखी आहे.

कुठे अपेक्षित १० कोटी आणि कुठे वास्तवातील १२७ कोटी? जरा आपल्या आजूबाजूला बघा. रोजचे वाढत जाणारे प्रदूषण, रोज वाढत जाणारी वाहनांची संख्या, रस्तोरस्ती ठप्प झालेली वाहतूक, कुठल्याही शहरात काय किंवा गावात काय वाढत जाणारे पिण्याच्या पाण्याचे हाल, दिवसाकाठी वाढतच जाणारा हा कचर्‍याचा खच, आकाशाला भिडणारे जमिनीचे भाव, वाढत जाणारे शहराचे आकार, कमी होत जाणारी जंगलं त्यामुळे होणारी जागतिक तापमानवाढ व बदलत जाणारे निसर्गचक्र, असं आणखी बरंच काही. हे प्रत्येकाने अनुभवलंय, याचं दहा-पंधरा वर्षांत. सरकार तरी काय काय करणार? त्यांच्या बहुतेक योजना मग ती ‘सगळ्यांसाठी घर’ असो वा ‘भारत स्वच्छता अभियान’; बहुतांश फसतात, त्या या वाढत्या लोकसंख्येमुळेच.
ही लोकसंख्या वाढ आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची वास्तविकता काय आहे, तर मुलाच्या हव्यासापोटी एकानंतर एक अपत्यांना जन्म देणारे पालक, देशी भांडवलदार व बहुराष्ट्रीय कंपन्यांना भरमसाठ बाजारपेठेचा होणारा फायदा जपण्याकरता, या वाढत्या लोकसंख्येसाठी फारसं काहीही न करणारे राज्यकर्ते आणि त्याहीपेक्षा जे भयानक आहे ते म्हणजे, फक्त सांप्रदायिक फायद्यासाठी लोकसंख्या वाढीचा आग्रह धरणारे महाभाग.

आता तर काय, देशाच्या धर्मनिहाय जनगणनेचा अहवालच जाहीर झाला आहे. या अहवालाची खरंच काय गरज होती? काही दिवसांपूर्वीच कोणीतरी वक्तव्य केले की, अमुक एक संप्रदायातील लोकांनी कमीत कमी चार अपत्यांना जन्म दिला पाहिजे. फक्त सांप्रदायिक फायद्यासाठी लोकसंख्या वाढीचा आधार घेणे, हे हास्यास्पद व वेडेपणाचे आहे. सांप्रदायिक कुरघोडीसाठी लोकसंख्या वाढवायची? अरे, पण नैसर्गिक साधनसंपत्तीचे काय? तुमच्या अन्न-वस्र-निवार्‍याचे काय? पुढील येणार्‍या पिढ्या, मग त्यातील लोक कुठल्याही संप्रदायाचे असोत, ते त्या वेळेच्या लोकसंख्येच्या भस्मासुरासाठी आपल्यालाच जबाबदार धरतील.
जरा विचार करा, वेगाने लोकसंख्या वाढतच राहिली, तर दिसतील सगळीकडे फक्त असंख्य माणसे, किड्या-मुंग्यांसारखं जगणारी, नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी तरसणारी, फक्त प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी लढून मरणारी, माणसंच माणसं, जिवंतपणी नरकयातना भोगणारी… आपल्याच पुढच्या पिढ्यांसाठी आपण हे काय प्रयोजन करतोय?

एकंदरीत ‘हम दो और हमारा एक’ असे अमलात आणायची वेळ आली आहे. आणि त्यासाठी सर्व भारतीयांनी सामंजस्याने, सर्व सांप्रदायिक तसेच लैंगिक भेदभाव विसरून, मानवजातीच्या भवितव्याकरिता ‘हम दो और हमारा सिर्फ एक’ यासाठी प्रयत्न करणे जरुरीचे आहे. जर मानवजातीला ‘अनंत काळापर्यंत या सृष्टीवर आरामात जगायचं असेल’ तर भारताला आपलं योगदान द्यावंच लागेल… पण वास्तव आकडे पाहता ‘अजूनही वेळ गेलेली नाही’, असं म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल…

sachinchitnis@ymail.com