आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Sachin Chitnis Article About Need To Change Old Rituals In Weddings,Madhurima

ही रीतच आहे?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मला कोणत्याही लग्नात जो झगमगाट असतो ना तो खूप आवडतो. अत्तराचा सुवास, गडद रंगांचे कपडे, रंगीत फुले, नुसतं बघत राहावं… कालपरवाच अशाच एका लग्नाला हजेरी लावली. जरा जवळच्याच नात्यातलं असल्याने दिवसभर तिथेच होतो. अनेक नातेवाईक कितीतरी वर्षांनी भेटत होते. आनंदीआनंद होता.

पण का कोण जाणे, इतक्या आनंदी वातावरणातही काही गोष्टी या वेळेस मनाला खटकल्या. खासकरून, पाहुण्यांची वरात जशी हॉलच्या दारात पोहोचली, मी ते पाहून जरा दचकलोच. वधूची आई त्यांच्या पायावर पाणी टाकून त्यांचे स्वागत करत होती. वरातीतील पाहुण्यांचे पाय धुऊन स्वागत करायची रीत आहे म्हणतात. नंतर लग्नामधल्या पूजेतही वराचे पाय धुण्याचा कार्यक्रम झाला. लक्ष्मी­नारायणाचा जोडा समजून वधू­वरांची पूजा करतात म्हणे, पण मग पाय धुवायचे ते फक्त नारायणाचेच! सासूबाईचं ‘तोंड धुणे’ ही रीत म्हणजे एक अजबच गोष्ट होती. ही रीत कुठून आली आणि याचं नेमकं तर्कशास्त्र काय, याचं उत्तर मला अजूनही मिळालेलं नाही. मानाच्या पंगतीला वधूकडच्यांनी आग्रह केला नाही, वधूकडचे सगळे याच पंगतीला जेवायला बसले म्हणून वराची आई थोडी नाराज होती. वधूपिता वरवर कितीही स्मित करत असला तरी थोडा तणावाखालीच वावरत होता. तसं पाहायला गेलं तर उभयपक्ष चांगले सुशिक्षित. हुंड्याचा तर प्रश्नच नव्हता. उलट सगळा खर्च उभय पक्षांनी वाटून घेतला होता. खेळीमेळीचं वातावरण असलं तरी एका गोष्टीचा मात्र नक्की अभाव होता. ती म्हणजे वधूकडच्यांचा आदर व मानसन्मान. याहीपेक्षा जे वाईट होते ते म्हणजे तिथे उपस्थित सगळ्यांची, वधूसह तिच्याकडच्यांची मूक संमती.

आम्ही काहीच घेतलं नाही मुलीकडून, यातच आपण लोक स्वतःला अतिप्रगत समजू लागलो आहोत. खासकरून मध्यमवर्गीय, उच्चविद्याविभूषित यातच धन्यता मानायला लागलेत. हे तर व्हायलाच पाहिजे. पण स्त्रीची अस्मिता, आदर, मानसन्मान याचं काय? याला आपण आजच्या काळात खरंच महत्त्व देतोय का? वधूच्या पालकांना इतकी हीन वागणूक कशासाठी? का म्हणून मुलीच्या आईने पाहुण्यांचे पाय धुवायचे? लक्ष्मी­नारायणाची पूजा करायचीच असेल तर फक्त नारायणाचेच पाय, तेही फक्त वधूपित्यानेच का धुवायचे? सासूचे तोंडधुणे दोन्ही सासवांचे का नको? मानाच्या पंगतीला एवढ्या अपेक्षा कशासाठी? उभय पक्षांनी बरोबर बसून एकमेकांना आग्रह करून जेवायला काय हरकत आहे? थोड्याफार फरकाने सगळ्याच लग्नांमध्ये अशाच अनेक रीती. या बदलायलाच पाहिजेत. वरपक्षाइतकाच मानसन्मान वधूकडच्यांनाही मिळालाच पाहिजे. हुंडा तर सोडाच, पण आईवडिलांच्या किंवा माझ्या अस्मितेला धक्का लागेल असली कुठलीही गोष्ट ‘ही रीतच आहे असं म्हणून या लग्नात खपवून घेतली जाणार नाही, असं प्रत्येक मुलीने लग्ना आधीच ठासून सगळ्यांना सांगून टाकलं पाहिजे.

मला वाटतं, स्त्रीपुरुषांना समान दर्जा हे जर समाजात खरंच राबवायचं असेल तर सगळ्यात आधी स्त्रीला मान, आदर द्यावा लागेल आणि यानंतरच ती खऱ्या अर्थाने सबळ होईल, स्त्रियांचं समाजातील प्रमाण कधी कमी होणारच नाही, गर्भलिंग निदानाची गरजच पडणार नाही. आणि तरच मुलीचं स्वागतही मुलाइतकंच आनंदाने होईल.