लवकरच श्रावण येईल. चातुर्मासातील उपासही अनेक लोक करतात. भारतात उपास ही फक्त एक धार्मिक संकल्पना नसून ती आरोग्यासाठीसुद्धा उपयुक्त अशी कल्पना आहे. शरीरातील तीन दोष वात, पित्त व कफ व मानसिक गुण व दोष सत्त्व, रज व तम यांचे संतुलन साधण्यासाठी उपास हा खूप मोठा दुवा आहे असे मानले जाते.
उपास म्हणजे लंघन, आयुर्वेद शास्त्रानुसार प्रत्येक व्याधीचे कारण हे ‘आम’ आहे. आम या शब्दाचा अर्थ अपाचित किंवा अर्धवट पचलेला पदार्थ असा होतो. हा अपाचित पदार्थ शरीराच्या विविध स्रोतांमध्ये अडथळा उत्पन्न करून व्याधी उत्पन्न करतो अशी ही संकल्पा आहे. उपासामुळे हा अपाचित पदार्थांचे पचन होऊन आरोग्य सांभाळण्यास मदत होते.
मी उपासाच्या दिवशी काय खाऊ असा रुग्णांनी प्रश्न विचारला की, फार गंमत वाटते.
आपल्याकडे लोक उपासाची वाट खास त्या फराळासाठी बघत असतात. उपासाच्या दिवशी अगदी मनापासून साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा, बटाट्याचे पदार्थ, विविध फळांची उपस्थिती आपल्या ताटात असते. मी तर उपासाची जिलेबीसुद्धा मिठाईवाल्याकडे बघितली आहे. असे सर्व पदार्थ उपासाच्या दिवशी खाणे म्हणजे त्या उपासाचा घोर अपमान करणे असे वाटते. शास्त्रानुसार बरेच आजार हे चुकीच्या आहारामुळे होतात व त्यात प्रामुख्याने व्यायाम न करता रोज पोटभर जेवणे, वारंवार जेवणे, भूक न लागता जेवणे, आधीचे अन्न न पचलेले असताना जेवणे या सर्व गोष्टी येतात. त्यात मग उपासाच्या दिवशी अतिशय जड, गोड पदार्थ, थंड पदार्थ, दुध व दुग्धजन्य पदार्थ सेवन केल्यास त्याचा परिणाम नेमका उलटा होतो. ब-याच वेळा आजारांच्या सबबीखाली लोक उपास किंवा लंघन करायचे टाळतात. त्याचप्रमाणे नातेवाईक किंवा कुटुंबीयसुद्धा घरात एखाद्याला चय-अपचयात्मक आजार असेल तर शास्त्रोक्त उपास करायचे टाळतात. ब्लडप्रेशर, मधुमेह किंवा हृदयविकार अशा संतर्पणाने झालेल्या विकारांमध्ये लंघन किंवा उपवास टाळण्याचा सल्ला दिला जातो. योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन अशा रुग्णांनी उपवास केल्यास त्याचा निश्चित चांगला परिणाम दिसतो. जेवण अर्धपोटी करावे हा मोलाचा सिद्धांत आयुर्वेदाने मांडला आहे. वारंवार पोटभर जेवण्यापेक्षा दररोज आपल्या क्षमतेच्या अर्धेच किंवा अर्धे पोट भरेल इतकेच जेवण घेतल्यासही उपासाचे फायदे थोड्या फार प्रमाणात मिळू शकतात.
उपासाचे विविध प्रकार आपण बघतो. त्यामध्ये संपूर्ण लंघन, फक्त द्रव पदार्थ सेवन, दिवसातून एक वेळा आहार सेवन, फक्त फलाहार सेवन, अशा विविध पद्धतीने लोक उपास करताना दिसतात. या सर्व प्रकारांचा उपयोग आरोग्यासाठी थोड्या फार फरकाने होत असतो.
सातत्याने योग्य प्रमाणात आहार घेतल्यास किंवा वैद्यकीय सल्ल्यानुसार लंघन किंवा उपवास केल्यास बरेच व्याधी होण्याचे टळते. उपवासाचा व प्रमाणात आहाराचा सरळ सरळ परिणाम व्याधी निर्माण करणा-या जनुकांवर होत असतो. योग्य स्वरूपात उपास केल्याचे भरपूर फायदे दिसून येतात. त्यात अन्नाचे पचन व्यवस्थित होणे, मलमूत्र विसर्जन योग्य पद्धतीने होणे, शरीराला हलकेपणा येणे, शरीरातील सुस्ती जाऊन प्रसन्न वाटणे, भूक व तहान योग्य वेळी लागणे, मनाची एकाग्रता वाढणे ही सर्व लक्षणे उपासाने येतात. मात्र गरोदर स्त्रिया, वृद्ध, आजारी, कृश व्यक्ती यांनी लंघन टाळावे. या वेळचा श्रावण आपण आरोग्यदायी उपवासाने साजरा करून आपले कुटुंब व समाज यांना अधिक आरोग्य प्रदान करूया.