आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाएटचं पथ्य पाळण्याची गरज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्तीची मनोमन एक इच्छा बाळगावी, ती म्हणजे सुडौल किंबहुना थोडेफार रोड दिसण्याची. या रोड दिसण्यामध्ये तरुण वयातील मुलामुलींमध्ये बरीच स्पर्धा असते. बरेच तरुण जिममध्ये जाऊन किंवा व्यायाम करून आपले शरीर पिळदार करून घेतात. योग्य व्यायाम व योग्य आहार सेवन केल्यास आपली आंतर्बाह्य प्रकृती उत्तम राखता येते. शरीर सुडौल व बांधेसूद ठेवण्याचे खूप फायदे आहेत. सर्वात प्रथम त्याने मानसिक व शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहते. त्यासोबत आपले व्यक्तिमत्त्व छान दिसते. आपले शरीर बांधेसूद असल्यास एक विशिष्ट प्रकारचा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो व आपली चांगली छाप इतरांवर पडते. सध्याच्या काळात कॉर्पोरेट जगात चांगले व्यक्तिमत्त्व असण्याचे खूप फायदे आहेत. असे हे चांगले व काहीसे रोड शरीर किंवा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप लोक डाएट किंवा नियंत्रित आहार घेत असतात. डाएट या शब्दाचा अर्थ अन्न किंवा आहार असा होतो. मात्र डाएट हा शब्द नियंत्रित आहार किंवा विविध प्रकारच्या आहार उपक्रमांसाठी वापरला जातो.
खासकरून वजन कमी करण्यासाठी लोक बिनधास्त विविध प्रकारच्या डाएटच्या आहारी जातात, कुठल्याही सल्ल्यािशवाय. भारतीय आहारशास्त्राप्रमाणे प्राकृत व्यक्तींनी आहार अर्धपोटी घ्यावा व आहार षड‌्रसात्मक म्हणजे सर्व चवींनी युक्त असावा, असा सर्वसाधारण नियम सांगितला आहे. मात्र या साध्या नियमाकडे दुर्लक्ष करून विविध प्रकारचे डाएट लोक अंगीकारत असतात.

आयुर्वेदामध्ये डाएटला लंघन या उपक्रमात स्थान दिले आहे व त्यात उपवास हा प्रकार वर्णन केला आहे. यात पूर्णपणे लंघन, पाणी वर्ज्य करणे, दुधापासून अल्प भोजनापर्यंतचे प्रकार वर्णन केले आहेत. असे उपक्रम कोणत्या व्यक्तींनी करावे व कुणी करू नये, कधीपर्यंत करावे, असे स्पष्ट उल्लेख आहेत. वजन कमी करण्याच्या मागे आहाराचे शास्त्र न समजावून घेता बरेच लोक फॅशन डाएट घेत असतात. हे फॅशन डाएट वेबसाइट्सवर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय अशा प्रकारचे आहार उपक्रम राबविले जातात. काही डाएट किंवा आहार उपक्रम वजन कमी करण्यासाठी असतात, तर काही वजन वाढवण्यासाठी. काही उपक्रम रक्तातील चरबी कमी करण्यासाठी असतात, तर काही मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी. प्रामुख्याने बहुतांश लोक हे डाएट वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी करतात. अशा प्रकारच्या डाएटमध्ये सर्वप्रथम क्रमांक लागतो तो जास्त प्रथिनयुक्त आहाराचा. यात कर्बोदके बिलकुल घेतली जात नाहीत व जास्तीत जास्त प्रथिनांचा वापर करून वजन व चरबी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या आहारात आवश्यक पोषक मूल्ये वेगळी सेवन केली जातात. अशा प्रकारच्या आहारात चरबीचे विघटन ketone bodies मध्ये होते व चरबी कमी होण्यात मदत होते. मात्र अशा प्रकारचा आहार खूप जास्त दिवस घेता येत नाही. अशा प्रकारची प्रथिने, विशेषत: मांसाहारापासून मिळणारी प्रथिने, जास्त दिवस सेवन केल्यास या प्रथिनांपासून पुन्हा ग्लुकोज तयार होण्याची शक्यता काही व्यक्तींमध्ये असते. अशा प्रकारचा आहार ज्यांचे प्रथिनांचे चयअपचय विकृत आहे, त्यांना वर्ज्य आहे. उदा. ज्या व्यक्तींचे uric acid वाढलेले आहे, ज्यांना पचनाचा किंवा यकृताचा काही आजार आहे, ज्यांना किडनीचे काही आजार आहेत किंवा ज्यांचे कॉलेस्ट्राॅल जास्त अाहे, अशा व्यक्तींनी फक्त प्रथिनयुक्त आहार सेवन करू नये.

ज्या व्यक्तींचे वजन खूप जास्त आहे, त्यांना किंवा काही मधुमेही व्यक्तींना अशा प्रकारचा आहार उपयोगी ठरतो. काही व्यक्ती डाएट करत असताना फक्त शाकाहाराचा अवलंब करतात. शाकाहारी लोकांमध्ये काही असे असतात जे दूध व मध हे प्राणिज पदार्थ खातात, मात्र अंडेदेखील खात नाहीत. काही लोक दूध घेत नाहीत, मात्र शाकाहारासोबत अंडी खातात. काही लोक अंडी, दूध, मध व सर्व शाकाहार घेतात. काही लोक कोणताही प्राणिज पदार्थ घेत नाहीत.
असा आहार घेणाऱ्या व्यक्ती शक्यतो स्थूल नसतात. त्यांचे कोलेस्ट्राॅल नियंत्रणात असते. पूर्णपणे शाकाहारी लोकांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण खूप कमी असते. काही संशोधनात असे अाढळून आले आहे की, पूर्णपणे शाकाहारी लोकांची साधारण आयुर्मर्यादा मांसाहार घेणाऱ्या लोकांपेक्षा जास्त असते.
 
संगीता देशपांडे, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...