आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चतुर्मासातील आहार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्षा ऋतूत येणाऱ्या चतुर्मासात राजस गुणधर्म असलेले पदार्थ सेवन केल्यास मनाचा सात्त्विक भाव कमी होऊन श्रावणातील व्रतांमध्ये अडथळा येऊ शकतो. म्हणून श्रावणात सुपाच्य, अल्प, स्निग्ध, गरम आणि पचायला हलका आहार घेणे योग्य ठरते.

भारतीयांमध्ये चतुर्मास आणि त्यातही श्रावणाचे विशेष महत्त्व आहे. चतुर्मासातला श्रावण महिना पवित्र समजला जातो. या महिन्यात विविध व्रतवैकल्यं केली जातात. बरेच सणवारसुद्धा या महिन्यात असतात. अशा या श्रावणात  लोक मांसाहार आणि मद्यपान टाळतात. भाद्रपद आणि गणपतीच्या दिवसांतसुद्धा मद्यपान आणि मांसाहार निषिद्ध असणारी मंडळी आहेत. काही धर्मांमध्ये श्रावण आणि चतुर्मासात कांदा आणि लसूण वर्ज्य केला जातो. श्रावणातील सोमवार, एकादशी, चतुर्थीला उपवास करणारी अनेक मंडळी आहेत. काही बहुतांश लोक श्रावणात कडकडीत उपवास करतांना दिसून येतात.
 
श्रावण महिना आणि चतुर्मासात उपवास करण्याची, व्रतवैकल्याच्या निमित्तानं लंघन करण्याची प्रथा एक प्रकारे योग्यच आहे. मात्र बऱ्याच व्यक्ती उपवासाच्या नावाखाली तळलेले बटाटा-साबुदाण्याचे पापड, वेफर्स, शेंगदाणे, फळं यांचा खूप जास्त प्रमाणात वापर करतात. आणि नेमके हेच त्यांच्या आजाराचे कारण ठरते. आयुर्वेदानं ऋतूनुसार आहाराचे वर्णन केले आहे. त्या-त्या ऋतूनुसार आहार घेतल्यास आपल्याला आरोग्य प्राप्त होते. श्रावण महिना हा वर्षा ऋतूमध्ये येतो. या ऋतूमध्ये संसर्गजन्य व्याधींचे प्रमाण खूप जास्त असते. त्याचप्रमाणे आपला जठराग्नीसुद्धा खूप मंद असतो. या काळात वातदोषाचे अाधिक्य असल्याचे आयुर्वेद सांगतो. त्यामुळे पचन अनियमित असते. त्यामुळे स्निग्ध व कमी आहार घेणे गरजेचे असते. तसेच उष्ण आहारही गरजेचा आहे.
 
पूर्वीच्या काळी श्रावण महिन्यात गहू, तांदूळ भाजून त्यापासून खाद्यपदार्थ तयार करण्याची पद्धत होती. यापासूनचे तयार अन्नपदार्थ उपवासालाही वापरले जायचे. खरे तर वातावरणाचा विचार करता हीच योग्य पद्धत होती. श्रावणाच्या उपवासात वारंवार उकळलेल्या दुधाचा चहा, कॉफी किंवा दूध घेण्यापेक्षा गरम पाणी पिणे जास्त योग्य ठरते. या दिवसात पचायला जड पदार्थ हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे मांसाहार घेणे टाळावे. त्याचप्रमाणे लेखाच्या सुरुवातीला वर्णन केल्याप्रमाणे, कांदा आणि लसूणही वर्ज्य करावा. कांदा आणि लसूण यांचे रस कडू आणि तिक्त असल्याने ते राजस आहारात मोडतात. त्याचप्रमाणे मद्यसुद्धा राजस आहारात येत असल्यानं, असे पदार्थ सेवन केल्यास मनाचा सात्त्विक भाव कमी होऊन श्रावणातील व्रतांमध्ये अडथळा येऊ शकतो. म्हणून असे गुणधर्म असलेला आहार श्रावणात वर्ज्य करावा. थोडक्यात श्रावणामध्ये सुपाच्य, अल्प, स्निग्ध, गरम आणि पचायला हलका आहार घेणे योग्य ठरते.
 
 
 sangitahdesh@rediffmail.com
बातम्या आणखी आहेत...