आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुगुणी तांबूल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये जेवणानंतर विड्याचे पान सेवन करण्याला विशेष महत्त्व आहे. विड्याच्या पानाचे महत्त्व वैदिक काळापासून चालत आलेले आहे. धार्मिक कार्यामध्येसुद्धा विड्याचे पान आवश्यक असते. सणावारांच्या दिवशी भारतामध्ये आवर्जून पान सेवन करतात. बऱ्याच कुटुंबामध्ये दैनंदिन व्यवहारातसुद्धा नियमित पान खाल्ले जाते. विड्याच्या पानाला तांबूल म्हणतात. तसेच विड्याच्या पानासोबत काही इतर पदार्थ एकत्र करून ते खलबत्त्यात कुटून बारीक केलेल्या पदार्थासही तांबूल असे संबोधले जाते. विड्याचे पान कसे असावे, त्याचे प्रकार व त्याचे औषधी गुणधर्म वर्णन करणारी दोन प्राचीन पुस्तके आहेत. तांबुलमंजिरी व तांबुलकल्पसंग्रह अशी ही पुस्तके असून यामध्ये तांबूल सेवनाचे फायदे स्पष्ट वर्णन केले आहेत. विड्याच्या पानाची वेल असून संस्कृतमध्ये त्याला नागवेली असे संबोधले जाते. चरक, सुशृत व अष्टांगसंग्रहासारख्या ग्रंथांमध्ये त्याचे औषधी गुणधर्म वर्णन केले आहेत.

सर्दीमुळे होणारी डोकेदुखी कमी करण्यासाठी विड्याच्या पानाचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे सर्दीमुळे होणारी घशातील कचकच किंवा आवाज बसला असल्यास विड्याच्या पानाचा फायदा होतो. पान नियमितपणे खाल्यास त्याने रक्तशर्करा कमी होण्यास मदत होते. विड्याच्या पानाचा उपयोग सर्वात जास्त तोंडातील कर्करोग नियंत्रणात राहण्यास होतो. विड्याच्या पानामध्ये ब, क जीवनसत्त्व भरपूर मात्रेत असल्याने तोंडातील कर्करोगामुळे होणाऱ्या जखमा नियंत्रणात राहतात. त्याचप्रमाणे जीवनसत्त्व ‘क’च्या anti oxidant activityमुळेसुद्धा कर्करोगात त्याचा फायदा होतो.

बऱ्याच लोकांचा असा समज आहे की, तोंडातील कर्करोग हा विड्याच्या पानामुळे होतो. हा समज चुकीचा असून, मुखातील कर्करोग त्यातील अत्याधिक सुपारी किंवा तंबाखूमुळे होतो. पान सेवन करताना त्यात सुपारी व तंबाखू घालून सेवन करणे अपेक्षित नाही. विड्याच्या पानांचा आहारानंतर व औषधांमध्येसुद्धा खूप उपयोग केला जातो.

विड्याचे पान जेवणानंतर खाल्यास पुन:पुन्हा खाण्याची इच्छा होत नाही व एक प्रकाराची आहाराबद्दल तृप्ती निर्माण होते. त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होत नाही. विड्याच्या पानाच्या या गुणधर्मामुळे याचा उपयोग स्थूलतेसारख्या आजारांमध्ये भुकेवर नियंत्रण राहण्यासाठी अावर्जून करावा. विड्याचे पान थोडेसे तिखट व कडवट असल्याने त्याचा उपयोग अन्नपचन व्यवस्थित होण्यासाठी करण्यात येतो. त्यामुळे सणावारांचे जेवण झाल्यावर किंवा गोड जेवण झाल्यावर ते जेवण व्यवस्थित पचण्यासाठी विड्याच्या पानाचा उपयोग करावा. प्राचीन काळापासून कदाचित याच कारणासाठी जेवण झाल्यावर पान खाण्याची प्रथा आली असेल. विड्याच्या पानामध्ये जंतुनाशक गुणधर्म असल्याकारणाने तोंडामधील व्रण, दातांमधील कीड किंवा त्या संबंधित आजारांवर पानाचा चांगला उपयोग होतो. विड्याच्या पानामध्ये सुगंधी द्रव्य असल्याने मुखामधील दुर्गंधही कमी होते. विड्याचा पानाचा वापर सर्दी, खोकला विशेषत: कोरडा खोकला यांमध्ये होतो.
नियमितपणे पान खाणाऱ्यांनी पानामध्ये चुना, अल्पसा कात, आवश्यक वाटल्यास बडीशोप व आपल्या आवडीनुसार लवंग, वेलची किंवा पुदिना घालावा. सध्या बाजारात मिळणाऱ्या गोड पानांमधून आपणास अावश्यक औषधी गुणधर्म मिळण्याची शक्यता कमीच आहे. गोड पान किंवा मिठा मसाला पानांमध्ये टाकण्यात येणारे रंगीत पदार्थ व कृत्रिम सुवासिक पदार्थ कितपत आरोग्यकर असतील, शंकाच आहे. पानामधील चुना व कात हे उत्तम कॅल्शियमचे स्रोत असल्याने याचा उपयोग हाडांसाठी, हृदयासाठी व स्त्रियांमधील काही आजारांवर होऊ शकतो. असे हे बहुगुणी पान नियमितपणे सेवन केल्यास आपल्या आरोग्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

डाॅ. संगीता देशपांडे, औरंगाबाद
sangitahdesh@rediffmail.com
बातम्या आणखी आहेत...