आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • DR Sangita Deshpande Article About Childrens Health

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कृत्रिम साखरेवर नियंत्रण हवे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांचा आहार हा विषय प्रत्येक पालकाच्या जिव्हाळ्याचा असतो. त्यांना खायला देत असताना वाढत्या वयाला कुठल्या गोष्टी जास्त लागतात, याची जाण पालकांना असणे गरजेचे असते. वाढत्या वयाला प्रामुख्याने प्रथिनांची गरज जास्त लागते आणि नेमके तेच मुलांच्या आहारात कमी असते. वाढत्या वयातील मुलांना त्यांच्या मांसपेशी, हाडे व रक्त यांच्या समतोल वाढीसाठी पूरक आहार देणे गरजेचे असते आणि म्हणूनच प्रथिनांचा उपयोग भरपूर प्रमाणात करावा लागतो. प्रथिनांचा स्रोत प्रामुख्याने शाकाहारी व मांसाहारी या दोन स्रोतांमध्ये विभागला जातो. शाकाहारातून प्रथिने मिळवायची असतील तर सोयाबीन, टोफू, विविध प्रकारच्या शेंगा, कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ, सर्व प्रकारच्या डाळी, बदाम, अक्रोडासारखे पदार्थ त्यांना आवर्जून द्यावेत. मांसाहारी पदार्थ हे प्रथिनांचे मुख्य स्रोत असून यामध्ये अंडी, मासे व मांस यांचा समावेश होतो. मुलांच्या आहारामध्ये हे पदार्थ असणे आवश्यक असते. भारतीय उपखंडामधील वातावरण बघता आपल्याकडे नियमितपणे मासांहार करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे प्राण्यांचे व पक्ष्यांचे मांस साधारणपणे ८ ते १५ दिवसांतून एकदा घेणे पुरेसे होते. मात्र मैदानी खेळ खेळणार्‍या मुलांना अंडी व दूध देणे आवश्यक आहे. वाढत्या वयातील स्थूल मुलांमध्ये प्राणीज प्रथिनांचा वापर प्रमाणातच करायला हवा. त्यामुळे मुलांना सर्वसाधारणपणे मिश्र स्वरूपाची प्रथिने द्यायला हवीत.

सर्वसाधारण मुलांना (त्यांच्या वजनानुसार) प्रति किलो एक ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते. त्यामुळे शाकाहारातून प्रथिने द्यायची झाल्यास ती जास्त प्रमाणात द्यायला लागतात. त्यामध्ये डाळी, कडधान्ये, सोयाबीन यांचा वापर मुबलक प्रमाणात करावा. मुलांना डब्यामध्ये चटपटीत चणे, उसळी, चरबीविरहित पनीर, सोयाबॉलचे स्नॅक्स असे पदार्थ नियमित द्यावेत, जेणेकरून त्यांची प्रथिनांची गरज भरून निघेल. याच्या नेमके उलटे आपणास पाहायला मिळते. मुलांना डब्यामध्ये बहुतांश वेळा तळीव पदार्थ, गोड पदार्थ, हवाबंद पुड्यातील पदार्थ, बेकरी पदार्थ जास्त प्रमाणात दिले जातात. ते प्रयत्नपूर्वक टाळणे गरजेचे आहे.

मुलांना गोड पदार्थांची खूप आवड असते. त्यामुळे कॅडबरी, चाॅकलेट, मिठाई व घरी केलेले अन्य गोड पदार्थ मुले जरा जास्तच खातात. यामध्ये प्रामुख्याने कृत्रिम साखरेचा खूप वापर केला जातो. मुलांमध्ये तशी साखरेची गरज नसते. बरीच मुले विविध फळांचे जॅम व सॉसेस नियमितपणे खात असतात. कृत्रिम साखर जॅम व सॉसेसमधून मोठ्या प्रमाणावर शरीरात गेल्याने आणखी जास्त व्याधींना निमंत्रण मिळते. पाश्चिमात्य देशांमध्ये साखरेची जागा, high fructose corn syrupने घेतल्याने स्थूलतेचे आजार बळावले आहेत. तसेच आपल्याकडे अति गोड पदार्थांचे होत आहे. या कृत्रिम साखरेने मुलांच्या स्मरणशक्तीवर व एकाग्रतेवर अतिशय वाईट परिणाम होतो. यासाठी मुलांना नैसर्गिक साखर देणे गरजेचे असते. फळांमधून ती भरपूर मात्रेत मिळते. त्याचप्रमाणे बीट, गाजर, रताळे, मका व अन्य धान्यांपासून नैसर्गिक शर्करा मिळते. अशा पदार्थांमध्ये शर्करेसोबत तंतुमय पदार्थ असल्याने त्यांचा अधिक लाभ होतो. त्यामुळे मुलांमध्ये कृत्रिम शर्करेचे प्रमाण जितके कमी तितके चांगले. (क्रमश:)

डॉ. संगीता देशपांडे, औरंगाबाद
sangitahdesh@rediffmail.com