आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr Sangita Deshpande Article About Diet For Diabetics

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मधुमेहातील आहार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही लेखांमध्ये आपण मधुमेही व्यक्तींनी कसा आहार घ्यावा, ग्लायसेमिक इंडेक्स व ग्लायसेमिक लोड याबद्दल माहिती बघितली. मधुमेहातील आहार बघत असताना मधुमेही रुग्ण कुठल्या प्रकारचा आहे म्हणजे तो इन्सुलिन घेणारा आहे किंवा नाही, तसेच तो जाड आहे किंवा रोड आहे, मधुमेहासोबत इतर काही अनुषंगिक आजार त्याला आहेत का या सर्व गोष्टींवर त्याचा आहार ठरवावा लागतो. त्याचबरोबर मधुमेहींना आवश्यक असणा-या सूक्ष्म पौष्टिक घटकांचासुद्धा बारकाईने विचार करावा लागतो. या सर्व बाबतीतली माहिती या लेखात आपण बघणार आहोत.

मधुमेही व्यक्ती जर जाड असेल तर साहजिकच साखरेव्यतिरिक्त त्या व्यक्तीला स्निग्ध पदार्थांवर म्हणजे तेल व तुपावर नियंत्रण ठेवावे लागते. वजन कमी होण्याकरिता 1000 उष्मांकाइतकाच आहार सेवन करणे आवश्यक ठरते. त्यामध्ये पुन्हा पिष्टमय पदार्थांचा समावेश अत्यल्प असणे अभिप्रेत आहे. आणि अतिस्थूल मधुमेही व्यक्तींमध्ये कधीकधी 800 उष्मांक प्रतिदिवस इतकाच आहार घेणे अपेक्षित आहे व त्याबरोबर व्यायाम व गरजेनुसार दिनचर्या बदलावी लागते. हाच जर मधुमेही व्यक्ती कृश असेल किंवा त्याचे वजन संतुलित असेल तर प्रतिदिवस उष्मांकाची मात्रा 1500 ते 1800 गरजेनुसार ठेवावी व अशा वेळी कार्बोदकाचे, स्नेहाचे व प्रथिनांचे प्रमाण समतोल ठेवावे.

स्थूल मधुमेही रुग्णांमध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ, गोड फळे, मद्य पूर्णपणे वर्ज्य करावे लागतात. मात्र कृश मधुमेही रुग्णांमध्ये रक्तशर्करा नियंत्रणात असेल तर अधूनमधून थोडीफार फळे व दुग्धजन्य पदार्थ घेणे उचित ठरते.ज्या व्यक्ती कृश व इन्सुलिन घेणा-या आहेत त्यांनी कर्बोदकाचे प्रमाण कमी करता कामा नये. या व्यक्तींनी इन्सुलिनच्या मात्रेमध्ये कर्बोदकाचे प्रमाण घेणे उचित ठरते, अन्यथा त्यांची रक्तगत शर्करा कमी होऊन भोवळ येण्याची शक्यता असते. अशा व्यक्तींनी साधारणपणे दर 6 तासांनी आहार सेवन केला पाहिजे. तसेच या व्यक्ती किती वेळा व कोणते इन्सुलिन घेतात त्यानुसार त्यांचा आहार असावा. कृश व इन्सुलिन घेणा-या मधुमेही व्यक्तींनी दुग्धजन्य पदार्थ टाळणे आवश्यक आहे. याचे कारण असे की दुधामधील विशिष्ट प्रथिने स्वादुपिंडातील बीटा पेशींची कार्यक्षमता कमी करतात. ज्या स्थूल व्यक्ती इन्सुलिन घेतात व ज्यांचे छऊछचे प्रमाण 100पेक्षा अधिक आहे त्यांनी आहारातील स्निग्धांशाचे प्रमाण 10% पर्यंत ठेवावे. अतिस्थूल व्यक्तींमध्ये स्निग्धांशाचे प्रमाण 7%पेक्षा कमी घेतले तरी चालते.

सर्वसाधारणपणे स्थूल मधुमेही व्यक्तींमध्ये आहारातील कॉलेस्टरॉलचे प्रमाण 300 ग्रॅम प्रतिदिनपेक्षाही कमी असणे आवश्यक आहे. इतक्या नियंत्रित प्रमाणात मेदाम्लांचे सेवन केल्यास मधुमेहाच्या परिणामी होणारे हृदयविकार, स्थूलता व त्याचे अनुषंगिक आजार टाळता येतात. स्थूल मधुमेहींमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असणे गरजेचे असते व त्यासाठी जे लोक मांसाहारी आहेत त्यांनी आठवड्यातून 2-3 वेळा मत्स्याहार करणे फायद्याचे ठरते.

प्रथिने, स्निग्ध पदार्थ व कर्बोदके यांच्या समतोल सेवनासोबतच आवश्यक सूक्ष्म पौष्टिक घटकांचासुद्धा विचार करावा. यामध्ये प्रामुख्याने antioxidents म्हणून क व ई जीवनसत्त्वांचा वेळोवेळी वापर करावा. बीटा कॅरोटीन, कॅरोटेनॉइड्स विविध भाज्यांमध्ये उपलब्ध असतात, त्यांचा योग्य वापर करावा. मधुमेही रुग्णांनी आहारात antioxidents चा सुयोग्य वापर केल्यास हृदयरोग होण्याची शक्यता खूप कमी होते. त्याचप्रमाणे जीवनसत्त्वे इ1, इ6 व इ12 यांचे योग्य मात्रेमध्ये सेवन करणे गरजेचे आहे. भारतीय मधुमेही रुग्णांमध्ये इ12चे प्रमाण कमी आढळते व परिणामी Diebetic neuropathy निर्माण होण्यास मदत होते. शुद्ध शाकाहारी व्यक्तींनी अधूनमधून जीवनसत्त्व इ12 औषधाच्या माध्यमातून घेणे आवश्यक आहे. खनिजांचा वापरसुद्धा यथायोग्य असावा. प्रामुख्याने कॅल्शियमचे प्रमाण आहारात चांगले असावे. 45 ते 50 वयोगटातील लोकांनी, प्रामुख्याने स्त्रियांनी, आहारातून भरपूर मात्रेत कॅल्शियम घ्यावे. यात नाचणी, राजगिरा व डाळी यांचा समावेश होतो.

मधुमेही व्यक्तींनी नियमित मद्य घेण्याचे टाळावे. ज्या मधुमेही व्यक्तींमध्ये रक्तगत मेदाम्लांचे प्रमाण वाढले आहे त्यांनी तर निश्चित टाळावे. तसेच स्थूल मधुमेही व्यक्ती, इन्सुलिन घेणा-या मधुमेही व्यक्तींनीही मद्य टाळावे.अत्यल्प दुधाचा चहा किंवा ग्रीन टी, लेमन टीचा वापर करावा. आहारात नैसर्गिक antioxidents म्हणून हळदीचा वापर मुबलक प्रमाणात करावा. तसेच आवळ्याचा वापरसुद्धा हितकारक ठरतो. इतर वनस्पतींचे रस उदा. भोपळा, निंब, कारले यांचा वापर वैद्यकीय सल्ल्याशिवाय करू नये. कारण अतिमात्रेत त्यांचे दुष्परिणाम दिसून येतात.मधुमेही व्यक्तींनी आहारावर पूर्ण नियंत्रण, नियोजित आहार व आयुष्यभर नियमित व्यायाम केल्यास हा आजार कमी त्रासदायक होतो.
(sangitahdesh@rediffmail.com)