आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr Sangita Deshpande Article About Diet For Heart Patients

लसूण व हळदीचे सेवन आवश्‍यक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आहार सेवन करत असताना हृदयरोग्यांनी काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते. हृदयरोग्यांनी कधीही पोटभरून जेवण करू नये. तसेच अध्यन (वारंवार खाणे) व खाल्ल्याखाल्ल्या अतिशय जोरात चालणे टाळावे. आहार सेवन केल्यानंतर बहुतांश रक्तपुरवठा हा आहारपचनासाठी आमाशयाकडे जातो व तुलनात्मकदृष्ट्या मेंदूकडे व हृदयाकडे कमी होतो. या कारणास्तव जेवण झाल्या झाल्या कुठलेही श्रमाचे कार्य करू नये.

आहाराच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास हृदयरोग असलेल्या व्यक्तींनी, किंबहुना सर्वच व्यक्तींनी आपल्या आहारात संपृक्त मेदाम्लाचे (सॅच्युरेटेड फॅट्स) प्रमाण कमी ठेवावे. अत्यावश्यक मेदाम्लाचे सेवन आहारात असणे गरजेचे असते. अत्यावश्यक मेदाम्लाचे आहारातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. ही अत्यावश्यक मेदाम्ले रक्तवाहिन्यांच्या आतल्या स्तराला सूज निर्माण होऊ देत नाहीत. त्याचप्रमाणे रक्ताभिसरण व्यवस्थित ठेवतात म्हणून असा मेदाम्लेयुक्त आहार हृदयरोग्यांनी घेणे गरजेचे असते. अशा प्रकारच्या आहारात जवस, कारळ, अक्रोड, बदाम, माशांचे तेल यांचा समावेश होतो. जवस व कारळ या पदार्थ्यांचे चटणी या स्वरूपात सेवन होऊ शकते. तसेच बदाम किंवा अक्रोड आपण 4-5 प्रतिदिवस या मात्रेमध्ये सेवन करू शकतो. माशांच्या तेलाच्या गोळ्या बाजारात उपलब्ध असतात. या सर्व गोष्टी आपण योग्य मार्गदर्शनाखाली व आहारतज्ज्ञाच्या सल्ल्याने योग्य तितक्या मात्रेत सेवन कराव्यात.

काही विशिष्ट पदार्थ हृदयरोगांसाठी उपयुक्त ठरतात. त्यात लसणाचा वापर हृदयरोग्यांसाठी फायदेशीर ठरतो. लसणाचा विशिष्ट मात्रेतच वापर आवश्यक आहे. लसणाची चटणी, लसूण-शेंगदाणा, लसूण मिरची यासारखे पदार्थ उपयुक्त ठरत नाहीत. हृदयरोग टाळण्यासाठी लसणाचा वापर हा कच्च्या स्वरूपातच करावा. लसूण ठेचून ताबडतोब सेवन केल्यास व 3-4 पाकळ्या या मात्रेत घेतल्यास त्याचे बरेच फायदे दिसून येतात. त्यामध्ये रक्तदाब आणि रक्ताभिसरण नियंत्रणात राहणे, रक्त पातळ राहणे हे काही महत्त्वाचे फायदे आहेत. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी, की लसणातील महत्त्वाचे सत्त्व डायनील डायसलाइट हे लसूण ठेचल्यावर 5-10 मिनिटांत निष्क्रिय होते व लसणाचे हृदयविकारासाठी उपयुक्त परिणाम दिसून येत नाहीत. या कारणास्तव लसूण ठेचल्या ठेचल्या खाणे अत्यावश्यक आहे.

लसूण औषधी म्हणून सेवन करताना ज्या व्यक्ती अ‍ॅस्पिरिन किंवा वॉरफॅरिनसारखी औषधे सेवन करतात, त्यांनी आहारतज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय लसणाचे नियमित सेवन करू नये. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना अल्सर व रक्तस्रावाचा विकार आहे, अशा लोकांनी लसणाचा वापर जपून करावा.
आहारातील महत्त्वाचा दुसरा पदार्थ म्हणजे हळद. हळद ही एक अशी वनस्पती आहे, ज्यामध्ये अँटिआॅक्सिंडट, अँटिइन्फ्लेमेटरी आणि इम्युनो मोड्युलेटर हे तिन्ही गुणधर्म एकत्रित आढळतात. याशिवाय यकृतातील पित्त तीव्र गतीने आतड्यात आणण्याचा त्याचा विशिष्ट गुणधर्म होय. यामुळे हळदीच्या सेवनाने रक्तगत स्नेहांशाचे प्रमाण नियंत्रित राहते. वरील गुणांनी युक्त असल्याकारणाने हळद हा आहारातील श्रेष्ठ घटक आहे. हळद ही हळदीचे लोणचे या स्वरूपात सेवन केले जाऊ शकते. त्याचप्रमाणे भाज्यांमध्ये हळदीचे प्रमाण जास्त टाकून किंवा हळदीच्या वड्यांच्या स्वरूपात सेवन करू शकतो. हृदयरोग्यांनी मुख्य आहार म्हणून शक्यतो गव्हाचे सेवन करावे. गव्हानंतर नाचणीचे पीठ, राजगिरा व ओटस यांचा मुख्य आहार घटक म्हणून वापर करता येतो. मुख्य आहार पदार्थांमध्ये गव्हाचा ग्लासमिक इंडेक्स कमी असून, चोथ्याचे प्रमाण मुबलक आहे. या गुणांमुळे गव्हाला प्राधान्य देण्यात आले आहे. नाचणी व राजगिरा यामध्ये कॅल्शियमचे मुबलक प्रमाण असल्याने याचाही अधूनमधून वापर करावा.

सातूच्या पिठाचे मिश्रण हे हृदयरोग्यास अमृतासम आहे. यामध्ये पोषणमूल्ये भरपूर असल्याने त्याचा पचनावर अनुकूल परिणाम होतो. त्यामुळे वरील घटकांचा व अन्नपदार्थांचा हृदयरोग्यांनी सातत्याने आहारामध्ये समावेश करावा.
क्रमश:
sangitahdesh@rediffmail.com