आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr Sangita Deshpande Article About Diet In Arthritis

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिळे अन्न टाळाच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांध्याचे विकार व आहार याबद्दल विविध कल्पना, समज व गैरसमज रूढ आहेत. या रुग्णांनी आंबट खाऊ नये, वात वाढवणारे पदार्थ खाऊ नयेत, गवार व वांग्यासारखे पदार्थ घेऊ नयेत, असे समज आहेत. वास्तविक हा आहार सांध्याच्या विकाराच्या प्रकारावर अवलंबून असतो. आमवात ( Osteo-Arthritis ), संधिवात व (वातरक्त) या प्रकारे वर्गीकरण करून त्यांचा आहार ठरवावा लागतो.
आमवात हा विकार स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. भारतीय स्त्रियांमध्ये पथ्यापथ्याचे पालन व्यवस्थित होताना दिसत नाही. आमवात आनुवंशिक असला तरीही आहाराचे व्यवस्थित पालन केल्याने तो नियंत्रणात राहू शकतो. त्यासाठी खालील प्रकारच्या पथ्यापथ्याचे पालन करणे आवश्यक असते. सर्वात प्रमुख आहे अपथ्य म्हणजे जे खावयाचे नाही. ते आहे दूध. दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण बर्‍यापैकी असल्याने बहुतांशी आमवात असणार्‍या व्यक्ती दुधाचे नियमित सेवन करतात. मात्र दुधातील काही विशिष्ट प्रथिनांमुळे प्रतिकारशक्तीवर विपरीत परिणाम होऊन आमवात बळावण्याची शक्यता वाढते. ही विशिष्ट प्रथिने सांध्यांतील ऊतींवर सूज निर्माण करतात व रुग्णांच्या वेदना वाढतात. त्यामुळे अत्यधिक दुधाचे सेवन टाळावे.

दुसरे महत्त्वाचे टाळावयाचे पदार्थ म्हणजे तळलेले. तळलेल्या पदार्थांमध्ये ओमेगा 6 फॅटी अ‍ॅसिड्सचे प्रमाण वाढलेले असते व त्यामध्ये सूज निर्माण करणार्‍या घटकांचे प्रमाण अत्यधिक असते. त्याचप्रमाणे अत्यधिक स्निग्ध पदार्थ, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड्स कमी असणार्‍या स्निग्ध पदार्थांच्या नियमित सेवनाने वेदनांमध्ये वाढ होऊ शकते. त्यामध्ये आमवात असणार्‍या रुग्णांनी तीळतेल, राइसब्रॅन अथवा आॅलिव्ह तेल वापरावे.
याशिवाय अत्यधिक प्रक्रिया केलेले अन्नसुद्धा संधिवात व आमवात यासाठी घातक असते. अत्यधिक प्रक्रिया केलेल्या पदार्थांना अधिक तापवणे, ग्रिल करणे (भाजणे), अत्यधिक गार करणे किं वा पाश्चराइज करणे या सर्व अन्नावरील प्रक्रिया आमवातासाठी घातक आहेत. याच कारणास्तव काही मोठ्या शहरांमध्ये Unpasteurized दूध सेवन करण्याची प्रथा रूढ होऊ लागली आहे. अशा प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये Advanced Glycation End products (AGE) निर्माण होतात, जे सूज निर्माण करण्याला कारणीभूत होतात. अशा प्रकारात बर्थडे केक्स, पेस्ट्रीज, हॉट चॉकलेट यांचा समावेश होतो. याशिवाय तळलेले मासे किंवा मांस याचासुद्धा समावेश होतो. त्यामुळे अशा पदार्थांचा वापर आमवात असलेल्या रुग्णांनी टाळावा.
अत्यधिक साखरेचे अथवा गोड पदार्थांचे सेवन व त्यासोबत रिफाइंड कार्बोहायड्रेट्स सेवन (कोंडारहित) या पदार्थाच्या सेवनाने पेशींवरची सूज वाढते व आमवात वाढतो. यामध्ये मैदा, कॉर्नफ्लोर, तांदळाचे पीठ अशा पदार्थांचा समावेश होतो. यामुळे बेकरीमधील पदार्थांची निवड करताना आमवाताच्या रुग्णांनी कोंडायुक्त पदार्थांची निवड करावी. त्याचप्रमाणे साखरेचे सेवन नियंत्रणात असणे अत्यंत गरजेचे असते.

साखरेच्या नियंत्रणासोबत आमवाताच्या रुग्णांनी जास्त मीठयुक्त पदार्थांचेसुद्धा नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे असते. यात लोणची, पापड, खारवलेले पदार्थ, पॉपकॉर्न, बटर, चीज यांचा समावेश होतो. मिठाच्या अत्यधिक सेवनाने शरीरावर सूज येण्याची शक्यता वाढते व परिणामी सांधे जखडतात. आमवात असणार्‍या रुग्णांनी सर्वसाधारणपणे 3 ते 5 ग्रॅम प्रतिदिवस इतकेच मीठ खावे. म्हणजे मसाल्याचा छोटा चमचा. याशिवाय अत्यधिक थंड पदार्थ घेतल्याने सांध्यातील वेदना वाढतात. यात प्रामुख्याने अतिशीत जलपान, शीतपेये, कृत्रिमरीत्या तयार केलेले फळांचे रस यांचा समावेश होतो. शीत पदार्थांच्या सेवनाने सांध्यातील रक्तपुरवठा कमी होऊन वेदना वाढण्याची शक्यता असते. वरील अपथ्यामध्ये सर्वात महत्त्वाचे अपथ्य जे भारतातील स्त्रिया सेवन करतात ते म्हणजे शिळे अन्न. शिळ्या अन्नामुळे सर्व ऊतींमध्ये सूज निर्माण होऊन प्रतिकारशक्तीवर अत्यंत विपरीत परिणाम होतो. त्यामुळे आमवात वाढण्याची विकृत कार्यप्रणाली प्रदीप्त होते. शिळ्या अन्नाच्या नियमित सेवनाने पेशींमधील free radicals प्रमाण वाढते व आजार बळावतो. वरील पथ्याचे पालन केल्यास आमवात नियंत्रणात येण्यास मदत होते.
(क्रमश:)
sangitahdesh@rediffmail.com