आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल धडकने दो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशेषत्वाने हृदयरोगामध्ये हल्ली व्यायामाचा सर्रास सल्ला िदला जातो. तसा तो अत्यावश्यकसुद्धा आहे. हृदयविकार व व्यायाम या विषयाकडे बघत असताना त्याचे चार प्रकारे वर्गीकरण करता येते. (१) हृदयविकार व स्थूलता असणार्‍या व्यक्तींनी करावयाचा व्यायाम व त्यासोबतचा आहार. (२) हृदयविकार व मध्यम वजन असणार्‍या व्यक्तींनी करावयाचा व्यायाम व आहार. (३) हृदयरोगाची आनुवंशिकता असताना तो होऊ नये म्हणून करावयाचा व्यायाम व यासोबत आहार. (४) स्वस्थ व्यक्तींनी हृदयविकार टाळण्यासाठी करावयाचा व्यायाम व आहार.

हृदयविकारांमध्ये cardiac excercise, ज्याला प्रचलित भाषेत कार्डिओ म्हणतात, या प्रकारच्या व्यायामाला खूप महत्त्व आहे. या प्रकारात हृदयाची गती, व्यायाम करताना हृदयावर येणारा ताण यावर विशेष लक्ष केंद्रित केले असते. स्वस्थ व्यक्तींनी कार्डिओ करत असताना २२० उणे त्यांचे वय इथर्यंत हृदयाची गती घेऊन जाणे व ही गती काही काळापुरती स्थिर ठेवणे आवश्यक असते. यालाच शास्त्रीय भाषेत Target heart rate असे म्हणतात. या THRपर्यंत पोहोचणे सुरुवातीला अवघड असते. मात्र, सवयीने या THRपर्यंत आपण पोहोचू शकतो. या प्रकारचा व्यायाम केल्यास त्याचा खर्‍या अर्थाने हृदयास फायदा होतो. हा THR जितका स्थिर ठेवू शकता, तितके तुमचे हृदय कार्यक्षम होते. या व्यायामाच्या प्रकारात धावणे, सायकलिंग, पोहणे, नाचणे, एरोबिक्स इत्यादी प्रकार येतात. हा THR मिळवण्यासाठी आहार सकस असणे आवश्यक आहे.

या प्रकारचा व्यायाम करताना स्नायूंवर विशेष ताण येत असतो. त्यामुळे या व्यायामाच्या प्रकारात आहारातील प्रथिनांचे प्रमाण यथायोग्य ठेवणे आवश्यक असते. त्याचबरोबर विशिष्ट जीवनसत्त्वे जसे की D3, B12, फोलिक अ‍ॅसिड यांचे प्रमाण संतुलित असणे गरजेचे असते. ज्या व्यक्तींचे शरीरातील कोलेस्टेराॅलचे प्रमाण जास्त आहे व वजनसुद्धा जास्त आहे, अशा व्यक्तींचा कार्डिओ करत असतानाचा आहार हा भिन्न स्वरूपाचा असणे गरजेचे असते. यामध्ये कर्बोदके, उदा. भात, पोळी, भाकरी, फळे, साखर, फळांचे रस यांचे प्रमाण नियंत्रित असणे गरजेचे आहे. अशा व्यक्तींनी स्नेहांशाच्या नियंत्रणापेक्षा कर्बोदकाच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते म्हणून ग्लायसेमिक इंडेक्सचे एकक येथे उपयुक्त ठरते. जास्त वजन असणार्‍या व्यक्ती जेव्हा कार्डिओ करतात त्या वेळी अशी कर्बोदके सेवन करावी, ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स पंचावन्न ते साठपेक्षा कमी आहे. त्यासोबतच अशा व्यक्तींनी Hydrogenerated fat (वनस्पती तूप) कटाक्षाने टाळावे. बाहेरील सर्व तयार अन्नपदार्थात बर्‍याच वेळा वनस्पती तुपाचा वापर केलेला असतो. त्यामुळे असे पदार्थ टाळावेतच.

ज्या व्यक्ती कृश असूनदेखील त्यांना हृदयरोगाचा त्रास आहे, त्यांनी आपल्या रक्ताच्या तपासण्या करून घेऊन व्यायाम व त्या अनुषंगाने आहार ठेवावा. मात्र, स्थूल हृदयरोगी व्यक्तीसारखे कर्बोदकांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक नसते. कृश व्यक्तींनी कार्डिओसोबत मांसपेशींना बळकट करण्याचे व्यायाम करावेत व यासाठी पुन्हा प्रथिनांचे प्रमाण वाढवावे लागते. यासाठी सोयाबीन, मशरूम, अंडी, मासोळी या पदार्थांचे सेवन या प्रकारातील व्यक्ती करू शकतात. ज्या लोकांमध्ये हृदयरोगांची आनुवंशिकता आहे, त्यांनी तो टाळण्यासाठी नियमित व्यायाम करावा. अशांंनी अगदी लहान वयापासून कार्डिओ करणे गरजेचे आहे. यासोबत आहारावर नियंत्रण ठेवावे. साखर, गोड पदार्थ, फास्ट फूड, तळीव पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ टाळावेत. असे पथ्य केल्यास व्यायामाचा खर्‍या अर्थाने फायदा होऊ शकतो.

डॉ. संगीता देशपांडे, औरंगाबाद
sangitahdesh@rediffmail.com
बातम्या आणखी आहेत...