आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांसाहार योग्य की शाकाहार ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आषाढ संपून श्रावण सुरू झाला, की श्रावणी अमावास्या म्हणजेच गटारी अमावास्येचे वेध लोकांना लागलेले असतात. या वर्षी तर व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवरही गटारी साजरी करण्याचे मनसुबे रचले जात होते, तर घरात वडीलधा-या मंडळीकडून पवित्र अशा श्रावण महिन्याची तयारी चालू होते. श्रावण महिन्यात हॉटेलमध्ये गेल्यावर शुकशुकाट जाणवत होता. हे सर्व चित्र पाहिल्यावर अनेक प्रश्न मनात येऊन गेले की, खरंच श्रावणात मांसाहार व मद्यपान बंद ठेवण्याची आवश्यकता असते का? या पलीकडे जाऊनही मांसाहार शरीरास कितपत उपयुक्त असतो? काही धर्म हे शुद्ध शाकाहाराचे पुरस्कर्ते असून काही धर्म नियमित मांसाहार करण्याची परवानगी देतात.
मात्र धर्म कोणताही असो, शरीराची घडण तर प्रत्येकाची सारखीच. त्यामुळे कोणता धर्म काय सांगतो, यापेक्षा आपल्या शरीराची आवश्यकता काय आहे, हे जास्त महत्त्वाचे ठरते.
जगात असे असंख्य पदार्थ आहेत, जे आपले शरीर पचवू शकत नाही. त्यामध्ये काही शाकाहारी तर काही मांसाहारी आहेत. पण एकंदरीत मनुष्यप्राणी मांस व शाक दोन्ही पचवण्याची क्षमता ठेवतो. याचाच अर्थ मांसाहार घेणे चुकीचे आहे, असे नाही. आपण जगातील कुठल्या प्रांतात राहतो, तेथील हवामान अतिशीत वा अतिउष्ण आहे का, आपली जीवनशैली कशी आहे, आपल्याकडे कुठल्या आजाराची आनुवंशिकता आहे का, यावर आपण किती मांसाहार करावा, हे ठरते. आयुर्वेदाने मांसाहार व शाकाहार या दोन्ही आहारप्रणाली अत्यंत शास्त्रीयदृष्ट्या पुरस्कृत केल्या आहेत. आजच्या नवीन निदान करण्याच्या तपासण्यांमध्ये बी-12 जीवनसत्त्वाची तपासणी केली जाते. पूर्णपणे शाकाहारी लोकांमध्ये याचे प्रमाण कमी आढळते. ही कमी पूर्ण शाकाहारामुळे आहे, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र बराचशा मांसाहारी लोकांमध्येही बी-12चे प्रमाण कमी आढळून येते. त्यामुळे आहारापेक्षा पचनास जास्त महत्त्व आहे, असे वाटते. भारतासारख्या उष्ण कटिबंधातील प्रदेशामध्ये नियमित मांसाहार सेवन अपेक्षित नाही. जागतिक आरोग्य संघटनेनुसार साधारणपणे पंधरा दिवसांतून दोन वेळेस या मात्रेमध्ये मांसाहार सेवन योग्य आहे.

मांसाहारामध्ये सर्वसाधारणपणे तीन प्रकार पाहावयास मिळतात. लाल मांस, मासे व पांढरे मांस. हे तिन्ही प्रकार वेगवेगळ्या आजारांमध्ये व वेगवेगळ्या प्रदेशात राहणा-यांसाठी उपयुक्त ठरतात. उदा. समुद्रकिनारी राहणा-या लोकांमध्ये मासे हे प्रमुख अन्न आहे, त्यामुळे हे लोक मासे नियमित सेवन करू शकतात. मात्र मासे तळण्यापेक्षा शिजवून किंवा भाजून सेवन करणे जास्त सयुक्तिक असते. ज्या लोकांना चयापचयात्मक व्याधी आहे किंवा हृदयरोग, उच्च रक्तदाब आहे, वा रक्तातील मेदाम्ले वाढलेली आहेत, अशा व्यक्तींनी लाल मांस/मटण अजिबात खाऊ नये. हल्ली कोंबडी खाण्याचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे. विशेषत: हॉटेलमध्ये बरीच तरुण मंडळी ‘चिकन’च्या वेगवेगळ्या डिशचा आस्वाद घेत असतात. अशा हॉटेलमध्ये जे चिकन पुरविले जाते ते जेनेटिकली मॉडिफाइड असते. त्यामुळे ते वारंवार खाणे आरोग्यास घातक ठरू शकते. सर्वसाधारणपणे पाहिल्यास मांसाहार पचण्यास अत्यंत जड, मनाचा रज व तम गुण वाढविणारा, शरीरात सुस्ती निर्माण करणारा, हृदयाला व यकृताला नियमित रूपाने घेतल्यास घातक ठरतो. त्यासोबतच पोटामध्ये विविध प्रकारच्या जंतांचा प्रादुर्भावही त्यातून होऊ शकतो. परिणामी शरीराच्या इतर संस्थांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

श्रावणात अनेक लोक मांसाहार वर्ज्य करतात. काही तर पूर्ण चतुर्मासातच मांसाहार वर्ज्य करतात व भाजणी आहार सेवन करतात. या सर्व गोष्टींच्या मागे बरीच शास्त्रीय तत्त्वे दडलेली आहेत. आपल्याकडे सर्वसाधारणपणे ज्येष्ठ महिन्यापासून ढगाळ वातावरण व पावसाची सुरुवात होते, या वेळी आपला अग्नी व पर्यायाने आपले पचन मंदावले असते. अशा वेळी पचनास जड असा मांसाहार सेवन केल्यास तो निश्चितच दीर्घकालीन आजार निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो. मानवाचे पचन या दिवसांत मंदावलेले असते, तसेच प्राण्यांचे पचनही मंदावलेले असते. त्यामुळे अतिउच्च प्रतीचे मांस आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही. या सर्व बाबींमुळे श्रावणात व चतुर्मासात मांसाहार वर्ज्य करणे सयुक्तिक ठरते.
मांसाहारामुळे प्रथिनांचे प्रमाण जास्त मिळते, असा सर्वसाधारण समज लोकांमध्ये आहे. मात्र शाकाहारातूनही पूर्ण प्रथिने मिळू शकतात. त्यामुळे मांसाहारच सेवन
करावा, असा आग्रह करण्याचे कारण नाही. जिभेचे लाड पुरविण्यापुरते आठवड्यातून एक वेळा तेही शास्त्रीय पद्धतीप्रमाणे तयार केलेला मांसाहार सेवन करणे योग्य आहे. मात्र नियमित मांसाहार सेवन केल्याने आतड्यांचा कर्करोग (colon cancer), हृदयविकार यांसारखे विकार निर्माण होण्याची जास्त संभावना असते. मांसाहारामुळे मलावष्टंभासारखे विकार होतात, त्यामुळे पचनसंस्था बिघडते. या सर्व बाबींमुळे सातत्याने मांसाहार सेवन करणे आरोग्यास हितकर नाही. चतुर्मास व विशेषत्वाने श्रावणमासातील लंघन, उपवास आरोग्याचे हित समोर ठेवून केल्यास त्याचा नक्कीच दीर्घकालीन फायदा होतो.
sangitahdesh@rediffmail.com